“पश्मिना शालीला जी रेशमी चमक येते ना, ती आमच्यामुळे.”

अब्दुल माजिद लोन यांच्या घरात जिथे तिथे धागे आणि दोरे पडलेले दिसतायत. श्रीनगरच्या आपल्या घरी जमिनीवर बसलेले लोन हातातल्या वुत्सने पश्मिना शालीवरचे धागे काढून टाकतायत. शाल अगदी आताच विणून झालीये. “अशीही काही कला आहे हेच फार कुणाला माहित नाहीये,” ते सांगतात.

४२ वर्षीय लोन श्रीनगर जिल्ह्याच्या नवा कदल गावी राहतात. भारी किंमतीच्या पश्मिना शालींवर येणारे लोकरीचे धागे ते वुत्स नावाच्या एका उपकरणाऱ्या मदतीने हाताने काढून टाकतात. या कामाला पुरझगारी असं म्हणतात आणि एकट्या श्रीनगरमध्ये हे काम करणारे किमान २०० लोक आहेत. लोन गेल्या २० वर्षांपासून पुरझगार म्हणून काम करतायत आणि आठ तासांच्या कामाचे त्यांना २०० रुपये मिळतात.

हरतऱ्हेच्या पश्मिना शालींवरचे धागे असे हातानेच काढून टाकले जातात. मग शाल विणलेली, रंगवलेली किंवा भरतकाम केलेली असली, तरी. या शालीची लोकर इतकी नाजूक असते की कारागीर ज्या हलक्या हाताने काम करतात तसं कुठल्याही यंत्रावर होणं केवळ अशक्य.

वुत्सशिवाय पुरझगारी होणं केवळ अशक्य. “आमची सगळी कमाई वुत्सवर आणि तो चांगला आहे का नाही यावर अवलंबून असते,” लोन सांगतात. त्यांच्या समोरच्या लाकडी मागावर एक लोकरी शाल ताणून बसवलेली दिसते आणि ते त्या शालीकडे अगदी बारकाईने पाहत असतात. “या वुत्सशिवाय आम्हाला पश्मिना शालीवर असं सफाईने काम करणं शक्य नाही.”

Abdul Majeed Lone works on a pashmina shawl tautly stretched across the wooden loom in front
PHOTO • Muzamil Bhat

अब्दुल मजीद लोन समोरच्या लाकडी मागावर ताणून बसवलेल्या पश्मिना शालीवर काम करतायत

Working with an iron wouch, Abdul removes lint from the shawl
PHOTO • Muzamil Bhat

हातातल्या लोखंडी वुत्सने ते शालीवर आलेले लोकरी धागे काढून टाकतात

पण हल्ली हे वुत्स घडवणारे आणि त्याला धार लावून देणारे लोहार शोधणं श्रीनगरच्या या पुरझगारांसाठी मोठी डोकेदुखी झालीये. “वुत्सची टंचाई झालीये. कोण जाणो एक दिवस पुरझगारीची कलाच लोप पावेल,” लोन अगदी काळजीच्या स्वरात म्हणतात. “मी वापरतोय तो वुत्ससुद्धा माझ्याकडचा माझ्या मालकीचा शेवटचाचय त्याची धार बोथट झाल्यावर माझं काम संपलं समता.”

लोन यांच्या घरापासून चालत २० मिनिटांच्या अंतरावर अली मोहम्मद अहंगर यांचं दुकान आहे. श्रीनगर जिल्ह्याच्या अली कदर भागामध्ये लोहारांची किमान दहा-बारा दुकानं आहेत आणि अली यांचं दुकान सगळ्यात जुनं आहे. आता इथल्या कुणालाच अगदी अलींना देखील वुत्स तयार करण्यात फारसा रस राहिलेला नाही. त्यांचं म्हणणं आहे की ही एक वस्तू तयार करण्यात जेवढे कष्ट आणि कौशल्य लागतं त्या मानाने कमाई काही तितकी होत नाही.

“वुत्स घडवणं फार कौशल्याचं काम आहे. त्याची धार इतकी तेज पाहिजे, त्याची रचनाही अशी पाहिजे की पश्मिना शालीवरचे अगदी बारीक बारीक धागेसुद्धा काढता आले पाहिजेत.” करवतीचं पात ठोकता ठोकता ५० वर्षीय अली म्हणतात, “माझंच सांगतो ना, मी जरी वुत्स घडवायचं ठरवलं तरी मला जमेलच असं काही नाही. वुत्स घडवावा तो नूरनेच,” ते अगदी ठामपणे सांगतात.

नूर मोहम्मद वुत्स बनवण्यात एकदम माहीर होते. श्रीनगरमध्ये आपल्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नूर यांचं १५ वर्षांपूर्वी निधन झालं. आजही श्रीनगरमध्ये वापरले जाणारे बहुतेक वुत्स त्यांनीच बनवलेले आहेत. पुरझगारांची चिंता वेगळीच आहे. “नूर यांनी फक्त आपल्या लेकाला वुत्स कसा बनवायचा ते शिकवलंय आणि त्याला काही हे काम करायचं नाहीये. तो एका खाजगी बँकेत नोकरी करतो. तिथे त्याला पैसेही जास्त मिळतात,” मिरजनपुरामधल्या आपल्या कार्यशाळेत काम करणारा तरुण पुरझगार फेरोज एहमद म्हणतो.

या कार्यशाळेत ३० वर्षीय फेरोझबरोबर इतर १२ कारागीर काम करतायत. त्याच्या हातातल्या वुत्सला हवी तशी धार नाही. “पुरझगारी करून माणूस फार पुढे जाऊ शकत नाही,” तो म्हणतो. “दहा वर्षापूर्वी मी जेवढं कमवत होतो, आजही तितकंच कमावतोय.”

'I am sure that even if I try to make a wouch, I will not be successful,' says Ali Mohammad Ahanger, a blacksmith in Srinagar’s Ali Kadal area
PHOTO • Muzamil Bhat

‘मी जरी वुत्स घडवायचं ठरवलं तरी मला जमेलच असं काही नाही,’ श्रीनगरच्या अली कदल भागातले अली मोहम्मद अहंगर म्हणतात

Feroz Ahmad, a purazgar at a workshop in Mirjanpura, works with a wouch which has not been sharpened properly in the previous two years
PHOTO • Muzamil Bhat
Feroz Ahmad, a purazgar at a workshop in Mirjanpura, works with a wouch which has not been sharpened properly in the previous two years
PHOTO • Muzamil Bhat

पुरझगार फेरोझ अहमद, मिरजानपुरातल्या आपल्या वर्कशॉपमध्ये काम करतायत, त्यांच्या हातातल्या वुत्सला गेल्या दोन वर्षांत धार केलेली नाही

“गेली ४० वर्षं मी पुरझगारी करतोय पण आजइतक्या अडचणी आम्हाला कधीच आल्या नाहीयेत,” मझीर अहमद भट म्हणतात. “वीस वर्षांपूर्वी मला एका शालीमागे ३० रुपये मिळायचे. आज त्याच कामासाठी मला ५० रुपये मिळतायत.” नझीर यांच्या कुशल कामाचा मोबदला दर वर्षी केवळ एका रुपयाने वाढलाय.

या पुरझगारांना काय अडचणींना सामोरं जावं लागतंय ते काश्मिरी शालींच्या निर्यातसंबंधी आकडेवारीतूनही लक्षात येतं. २०१२-१३ साली या शालींचं निर्यात मूल्य ६२० कोटी होतं, तेच २०२१-२२ साली १६५.३८ कोटीवर आलं असल्याची माहिती श्रीनगरच्या हस्तकला आणि हातमाग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पारीला दिली.

दोन महिने नियमित वापर केल्यानंतर वुत्सला धार करावी लागते. पण हे कामच ठप्प पडलंय त्यामुळे मोजकेच लोहार धार लावण्याचं कौशल्य शिकून घेतात.

“पुरझगारांना वुत्सला धार कशी लावायची हे थोडीच माहित असतं?” गेल्या तीन पिढ्या पुरझगारी करत असलेल्या भट कुटुंबातले नझीर म्हणतात. काही जण एका उपकरणाचा वापर करून प्रयत्न करतात. पण नझीर यांच्या मते काम फार काही चांगलं होत नाही.

“काही तरी करून निभावून न्यायला लागतं,” ते म्हणतात.

'We have low wages, shortage of tools and get no recognition for our work,' says Nazir Ahmad Bhat as he removes purz – stray threads and lint – from a plain shawl
PHOTO • Muzamil Bhat

‘मोबदला कमी, हत्यारं कमी आणि आमच्या कामाची नोंदही होत नाही,’ एका बिननक्षीच्या शालीचे पुर्झ काढता काढता नझीर अहमद भट सांगतात

Left: Nazir sharpens his wouch using a file, which does an imperfect job.
PHOTO • Muzamil Bhat
He checks if the edges of the wouch are now sharp enough to remove flaws from a delicate pashmina shawl
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः नझीर त्यांच्या वुत्सला फाइलचा वापर करून धार करतायत. पण त्याने काम नीट होत नाही. उजवीकडेः पश्मिना शालीचे धागे काढता येतील इतकी वुत्सला धार झाली आहे का ते पाहताना

“बघ, या वुत्सला देखील पुरेशी धार नाहीये,” आशिक अहमद म्हणतात. ते वर्कशॉपमध्ये नझीर यांच्याच बाजूला बसले होते. त्यांच्या हातातल्या वुत्सची दातेरी बाजू दाखवत ते मला सांगतात. “मी जास्तीत जास्त २-३ शालींचं काम करू शकतो. त्यातून दिवसाला जास्तीत जास्त २०० रुपये मिळतात.” वुत्सला धार नसली तर प्रत्येक शालीच्या कामाला जास्त वेळ लागतो. पण तेच जर धार तेज असेल तर कामाचा वेग वाढतो आणि अचूक काम होतं. त्यातून त्यांची कमाई देखील दिवसाला ५०० रुपयांपर्यंत वाढू शकते.

साधी ४० x ८० इंचाची पश्मिना शाल असेल तर पुरझगार नगाला ५० रुपये कमवतात. भरलेली शाल, जिला इथे कनी म्हणतात, तिचे २०० रुपये मिळतात.

यातल्या काही समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने पुरझगारांची हस्तकला आणि हातमाग विभागाअंतर्गत नोंद करायला सुरुवात केली. या वर्षी मार्च-एप्रिलमध्ये या नोंदी होणार आहेत. “अशी नोंद झाली तर आर्थिक सहाय्य मिळवणं सोपं जाईल,” विभागाचे संचालक महमूद अहमद शाह म्हणतात.

नोंदींमुळे परिस्थिती जरा सुधारण्याची आशा असली तरी सध्या मात्र पुरझगारांचा संघर्ष सुरूच आहे.

A purazgar brushes over a pashmina shawl with a dried bitter gourd shell to remove purz plucked with a wouch
PHOTO • Muzamil Bhat
Ashiq, a purazgar , shows the purz he has removed from working all morning
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः वुत्सने काढलेले धागे साफ करण्यासाठी वाळलेल्या घोसावळ्याचा वापर केला जातो. उजवीकडेः आशिक सकाळपासून वुत्सने काढलेले शालीवरचे धागे आणि गोळे दाखवतो

Khursheed Ahmad Bhat works on a kani shawl
PHOTO • Muzamil Bhat
If a shawl is bigger than the standard 40 x 80 inches, two purazgars work on it together on a loom
PHOTO • Muzamil Bhat

डावीकडेः खुर्शीद अहमद भट एका कनी शालीवर काम करतायत. उजवीकडेः ४० x ८० इंच या ठरलेल्या आकारापेक्षा शाल मोठी असेल तर दोन पुरझगार एका वेळी मागावर शाल अंथरून त्यावर काम करतात

किती तरी तरुण पुरझगारांना या कलेतून आपल्याला पुरेशी आणि नियमित कमाई करता येणार नाही हीच चिंता लागून राहिली आहे. “काही संधी मिळाली तर मी नक्कीच दुसरा कोणता तरी व्यवसाय करेन,” फेरोझ म्हणतो. त्याच्यासोबतचा एक कामगार म्हणतो, “माझं वय ४५ आहे आणि आता माझं लग्न होतंय. कारण कुणालाच इतकी तोकडी कमाई असलेल्या पुरझगाराशी लग्न करायचं नाहीये. दुसरं काही तरी शोधलेलं उत्तम.”

“ते तितकं सोपं नाहीये,” ६२ वर्षीय फयाझ अहमद शल्ला झटक्यात म्हणतात. या दोन तरुण पुरझगारांचं म्हणणं ते लक्ष देऊन ऐकत होते. वयाच्या १२ व्या वर्षापासून हे काम करत असलेले फयाझ बोलता बोलता गतस्मृतीत रमतात. “मी माझे वडील, हबीबुल्लाह शाल्ला यांच्याकडून ही कला शिकलोय. श्रीनगरच्या गावठाणात राहणारे बहुतेक सगशे पुरझगार माझ्याच वडलांच्या हाताखाली तयार झाले आहेत.”

या व्यवसायाचं भविष्य अंधारमय असलं तरीही फयाझ पुरझगारी सोडायला तयार नाहीत. “मला बाकी कामं फारशी माहितही नाहीत,” ही कल्पनाच धुडकवात ते म्हणतात. नाजूक पश्मिना शालीवरचे धागे अगदी सफाईने काढता काढता, हसतच ते म्हणतात, “मला फक्त पुरझगारी माहित आहे. दुसरं काहीही नाही.”

Muzamil Bhat

Muzamil Bhat is a Srinagar-based freelance photojournalist and filmmaker, and was a PARI Fellow in 2022.

Other stories by Muzamil Bhat
Editor : Dipanjali Singh

Dipanjali Singh is an Assistant Editor at the People's Archive of Rural India. She also researches and curates documents for the PARI Library.

Other stories by Dipanjali Singh
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale