३० एप्रिल २०२३. हिमालयाच्या धौलाधार रांगांमधल्या धरमशाला नगरीत पहिला वहिला प्राइड मोर्चा निघाला.
‘तुमचं, माझं, तिचं, त्याचं आणि त्यांचंही आहे हे घर’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन लोक मुख्य बाजारपेठेतून मॅकलॉइडगंजमधल्या दलाई लामा मंदिराच्या दिशेने पायी निघाले. धरमशालातली ही तिबेटी लोकवस्ती. तिथून पुढे हा मोर्चा कोतवाली बझार या अगदी वर्दळीच्या बाजारपेठेकडे गेला. समलिंगी, उभयलिंगी, इंटरसेक्स, अलैंगिक, पारलिंगी आणि इतरही विविध प्रकारे आपली लैंगिकता व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा म्हणून सार्वजनिक ठिकाणी झालेला हा हिमाचल प्रदेशातला पहिलाच कार्यक्रम.
“आम्ही अजीब हा शब्द वापरतोय, पण तोही अगदी अभिमानाने बरं,” या मोर्चाचा आयोजक आणि हिमाचल क्वियर फौंडेशन या संस्थेचा संस्थापक डॉन हसर सांगतो. हाच शब्द का यामागचं कारण सांगताना ३० वर्षीय डॉन म्हणतो, “क्वियरनेस किंवा वेगळं असण्याचा अर्थ सांगताना आपण इंग्रजी शब्द वापरतो. पण हिंदी आणि इतर भाषांचं काय? आम्ही आता स्थानिक भाषांमधल्या गोष्टी आणि गाण्यांचा वापर करून वेगळेपणा, लैंगिकतेतला प्रवाहीपणा किंवा अस्थायीपणा म्हणजे काय ते सांगतोय.”
इथे जमलेले ३०० लोक दिल्ली, चंदिगड, कोलकाता, मुंबईतून आले होते आणि इथल्या छोट्या मोठ्या गावांमधून इथे जमा झाले होते. या मोर्चाची माहिती काहींना अगदी शेवटच्या क्षणी मिळाली होती. शिमल्याचा २० वर्षीय आयुष विद्यापीठात शिकतो. तो प्राइड मोर्चाला आला होता. तो म्हणतो, “इथे याविषयी कुणीही काही बोलत नाही.” शाळेत असताना लघवी करायला जायचं म्हणजे आयुषसाठी मोठा कठीण प्रसंग असायचा. “माझ्या वर्गातली मुलं माझी चेष्टा करायची, माझ्यावर दादागिरीसुद्धा करायची. मला या समुदायाविषयी इंटरनेटवर समजलं तेव्हा मला इतकं सुरक्षित वाटू लागलं. तसं या आधी कधीच वाटलं नव्हतं. मला समजून घेऊ शकतील अशा लोकांचा सहवास मला मिळाला.”
आयुष आता त्याच्या कॉलेजमध्ये या विषयावर खुली चर्चासत्रं आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला एका प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळतंय. लोक येतात. लिंगभाव आणि लैंगिकता हे विषय समजून घेतात आणि नंतर त्यांच्या मनातल्या शंका विचारतात, विचार मांडतात.
























