मार्च महिन्यातली दुपार. उन्हाची तलखी. औरापानी गावातल्या एका छोट्या चर्चच्या सफेद इमारतीत काही मंडळी जमली आहेत.
जमिनीवर गोलात बसलेल्या सगळ्यांचं एकच दुखणं आहे. सगळ्यांना रक्तदाबाचा काही ना काही त्रास आहे. उच्च तरी नाही तर कमी तरी. म्हणून ते महिन्यातून एकदा एकत्र जमतात, रक्तदाब किंवा बीपी तपासतात आणि औषधगोळ्या मिळेपर्यंत गप्पा टप्पा करतात.
“मला इकडे यायला आवडतं कारण मला इथे माझ्या मनातल्या चिंता सांगता येतात,” रुपी बघेल सांगतात. सगळे त्यांना लाडाने रुपी बाई म्हणतात. त्या ५३ वर्षांच्या आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून इथे येतायत. पोटापुरती शेती करणाऱ्या रुपी गौण सरपण आणि महुआसारखं गौण वनोपज गोळा करून चार पैसे कमावतात. रुपी बैगा आहेत आणि छत्तीसगडमध्ये त्यांची नोंद विशेष बिकट परिस्थितीतील आदिवासी समूह म्हणून करण्यात आली आहे. औरापानी बैगा बहुल गाव आहे.
बिलासपूरच्या कोटा तालुक्यात येणारं हे गाव छत्तीसगडच्या अचानकमार-अमरकंटक बायोस्फियर रिझर्व्ह (एएबीआर)मध्ये येतं. “मी पूर्वी जंगलात जाऊन बांबू आणायचे आणि झाडू बनवायचे आणि विकायचे. पण आताशा मला जास्त चालणंच होत नाही त्यामुळे मी घरीच बसून असते,” फुलसोरी लकडा सांगतात. बीपीमुळे येणाऱ्या थकव्याने आपल्या आयुष्यावर कसा परिणाम झालाय ते साठीच्या फुलसोरी सांगतात. आता त्या घरी बसून आपली शेरडं सांभाळतात, दिवसभर शेण गोळा करतात. बैगा लोक बऱ्याच गोष्टींसाठी जंगलावर अवलंबून असतात.








