नागराज बंदन आजही घरी शिजत असलेल्या रागी कलीचा घमघमाट विसरलेले नाहीत. अगदी दररोज त्या सुगंधाची, रागी कालीची ते आतुरतेने वाट बघत असायचे.
आज पन्नास वर्षांनंतर रागी काली बनतं पण त्याची चव मात्र कुठे तरी हरवून गेलीये. “आजकाल जी नाचणी मिळते ना तिला तसा सुगंधही नाही आणि तेव्हाइतकी चांगली चवही नाही,” ते म्हणतात. आताशा रागी कलीसुद्धा अगदी क्वचित कधी बनत असल्याचं ते पुढे सांगतात.
नागराज इरुला आदिवासी आहेत आणि निलगिरी पर्वतराजीतल्या बोक्कापुरम पाड्याचे रहिवासी आहेत. त्यांचं लहानपणच सभोवताली नाचणी आणि इतरही अनेक भरडधान्यं पिकत असताना गेलं. रागी म्हणजेच नाचणी, चोलम (ज्वारी), कम्बू (बाजरी) आणि सामइ (वरई). घरी खाण्यासाठी म्हणून थोडा वाटा बाजूला ठेवून बाकी धान्य बाजारात विकलं जायचं.
नागराज मोठे झाले आणि शेतीचं पाहू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या वडलांच्या काळात जितकं पिकायचं त्यामध्ये मोठी घट झाली आहे. “आजकाल आम्हाला फक्त खाण्यापुरतं पिकतंय. कधी कधी तर तितकंही नाही,” ते पारीला सांगतात. पण तरीही ते आजही आपल्या दोन एकरांत नाचणी पिकवतात. त्यासोबत विविध शेंगावर्गीय भाज्या, वांगी वगैरे.
इतर शेतकऱ्यांना सुद्धा हा बदल जाणवतोय. मारी सांगतात की त्यांच्या वडलांना १०-२० पोते नाचणी व्हायची. पण आज मात्र २ एकरात फक्त २-३ किलो नाचणी पिकत असल्याचं ४५ वर्षीय मारी सांगतात.
नागराज आणि मारी यांचा अनुभव फार वेगळा नाही. सरकारी आकडेवारीनुसार निलगिरीमधलं नाचणीचं उत्पादन १,३६९ हेक्टर (१९४८-४९) वरून ८६ हेक्टर (१९९८-९९) इतकं खालावलं आहे.
२०११ साली झालेल्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात भरड धान्याखाली केवळ एक हेक्टर क्षेत्र असल्याची नोंद झाली आहे.











