मोहेश्वर समुआ यांना पुरामुळे पहिल्यांदा स्थलांतर करावं लागलं ती घटना आजही स्पष्टपणे आठवते. आठवून आजही त्यांच्या अंगावर काटा येतो. ते सांगतात, 'मी अवघा पाच वर्षांचा होतो. “आमच्या घरांपैकी एक घर बघता बघता पुराच्या पाण्यात वाहून गेलं आणि मग आम्हाला सुद्धा जीव वाचवण्यासाठी बोटीत बसून तिथून पळ काढावा लागला; आम्ही बेटाजवळच्या जमिनीवर आसरा घेतला,’ वयाची साठी पार केलेले समुआ सांगतात.

माजुली या आसाममधल्या बेटावर राहणाऱ्या १.६ लाख रहिवाशांची गतही समुआंसारखीच झाली आहे. सततच्या पुराचा खूप विपरीत परिणाम त्यांच्या आयुष्यावर झाला आहे. आक्रसत जाणाऱ्या जमिनींमुळे त्यांचं अस्तित्वच आता धोक्यात आलं आहे. १९५६ साली बेटाचं क्षेत्रफळ अंदाजे १,२४५ चौरस किलोमीटर होतं. तेच २०१७ मध्ये ७०३ चौरस किलोमीटर इतकं कमी झालं आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालात म्हटलं आहे.

"हे काही पूर्वीचं खरंखुरं सालमोरा गाव नाही. पूर्वी तर आम्ही तिथे राहायचो," पाण्याने वेढलेल्या एका छोट्याश्या टापूकडे बोट दाखवत समुआ सांगतात. "सालमोरा जवळजवळ ४३ वर्षांपूर्वीच ब्रह्मपुत्रेने गिळंकृत केलं." आत्ता आपण आहोत हे गाव ब्रह्मपुत्रा आणि तिची उपनदी, सुबानसिरी या नद्यांच्या पुरामुळे तयार झालेलं नवीन सालमोरा गाव. समुआ आपली पत्नी, मुलगी आणि मुलाच्या कुटुंबासह गेल्या १० वर्षांपासून नवीन सालमोरा मध्येच रहात आहेत.

त्यांचं नवीन घर सिमेंट आणि मातीपासून बनवलेलं अर्धे-पक्कं बांधकाम आहे. बाहेर बांधलेल्या शौचालयात जायचं तर प्रत्येकाला शिडीचा आधार घ्यावाच लागतो. “दरवर्षी, ब्रह्मपुत्रा आमची जमीन हळू हळू गिळत चाललीये," उद्विग्न चेहऱ्याने समुआ म्हणतात.

PHOTO • Nikita Chatterjee
PHOTO • Nikita Chatterjee

डावीकडे: ' मी तिथे रहायचो.' माहेश्वर समुआ चापोरीकडे (एक लहान वाळूचे बेट) दाखवत म्हणतात. जेव्हा ब्रह्मपुत्रेने हे बेट गिळंकृत केले तेव्हा त्यांना जीव वाचवण्यासाठी आता सालमोरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. स्वतःला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी महेश्वरला आजपर्यंत अनेक ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागले आहे. उजवीकडे: सालमोरा गावचे सरपंच ईश्वर हजारिका सांगतात की वारंवार येणाऱ्या पुरामुळे जमिनीची धूप होते आणि गावातील शेतीवर त्याचा विपरित परिणाम होतो

वारंवार येणाऱ्या पुराचा गावातील शेतीवरही विपरीत परिणाम झाला आहे. “आम्ही तांदूळ, उडीद किंवा वांगी,  कोबीसारख्या भाज्या पिकवूच शकत नाही; आता कोणाकडेच जमीन नाही,” सालमोराचे सरपंच जिस्वार सांगतात. अनेक रहिवाशांनी होड्या बांधणं, कुंभारकाम आणि मासेमारी अशी इतर कामं हातात घेतली आहेत.

समुआ म्हणतात, “सालमोरामध्ये बनवलेल्या होड्यांना संपूर्ण बेटावर मागणी असते,” कारण इथल्या लहान लहान बेटांवर राहणाऱ्या लोकांना नदी पार करण्यासाठी, मुलांना शाळेत नेण्यासाठी, मासेमारी करण्यासाठी आणि पूर आल्यावर देखील होड्यांचा खूप उपयोग होतो.

समुआंनी स्वतः बोट बनवण्याची कला अवगत केली आहे. ते तीन-तीन जणांच्या गटात काम करतात. या होड्या हझल गुरी या महागड्या लाकडापासून बनवल्या जातात. हे लाकूड सहज उपलब्ध होत नाही पण ते "मजबूत आणि टिकाऊ" असल्यामुळे होडी बनविण्यासाठी मुख्यत्वे त्याचाच वापर केला जातो,” समुआ सांगतात. हे लाकूड सालमोरा आणि आसपासच्या लाकूड विक्रेत्यांकडून विकत घेतले जाते.

एक मोठी होडी पूर्ण होण्यासाठी साधारणपणे आठवडा लागतो, तर लहान नावेला अंदाजे पाच दिवस लागतात. पण गटात काम केल्यामुळे अनेक हातांच्या मेहनतीने महिन्याला ५-८ होड्या बनवून पूर्ण होतात. १०-१२ लोक आणि तीन मोटारसायकली नेऊ शकणाऱ्या मोठ्या होडीची किंमत रु.७०,०००/-, तर लहान होडीची किमंत रु. ५०,०००/- आहे. होडी विकून आलेले हे पैसे दोन ते तीन लोकांमध्ये वाटून घेतले जातात.

PHOTO • Nikita Chatterjee
PHOTO • Nikita Chatterjee

डावीकडे: सालमोरामध्ये बनवलेल्या बोटींना चांगली मागणी आहे. मोहेश्वर यांनी स्वतः बोट बनवण्याची कला आत्मसात केली आहे. हे काम ते आणखी दोन-तीन लोकांच्या मदतीने करतात आणि त्यातून मिळणारे उत्पन्न एकत्र वाटून घेतात. उजवीकडे: सालमोराच्या लोकांमध्ये मासेमारी देखील खूप लोकप्रिय आहे. मोहेश्वर अटोवा जाळीचा वापर करतात. हे जाळे बांबूच्या साहाय्याने बनवले जाते आणि हि जाळी लहान मासे पकडण्यासाठी वापरली जाते. त्यांच्यासोबत सालमोराची आणखी एक रहिवासी मोनी हजारिका दिसत आहे

PHOTO • Nikita Chatterjee
PHOTO • Nikita Chatterjee

डावीकडे: रुमी हजारिका नदीत भटकून शोधून जाळण्यासाठीचे सरपण गोळा करते व नंतर विकते. उजवीकडे: ती काळ्या मातीपासून सत्रिय शैलीची भांडी बनवते आणि स्थानिक बाजारात विकते

असं असूनही होड्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात सातत्य नसतं. कारण ऑर्डर फक्त पावसाळ्याच्या (आणि पुराच्या) काळातच येतात. त्यामुळे, समुआच्या हातांना अनेक महिने काम नसतं त्यामुळे दर महिन्याला खात्रीशीर कमाईचं साधनच त्यांच्यापाशी नाही.

पन्नाशीच्या रुमी हजारिका बोट वल्हवण्यात निष्णात आहेत. पूर येतो तेंव्हा रुमी नदीतून स्वतः डोंगी (लहान होडी) चालवत सरपण गोळा करण्यासाठी जातात. घरच्यापुरती लाकडं बाजूला ठेवून जास्तीची लाकडं त्या गावातल्या बाजारात विकतात. क्विंटलमागे अंदाजे शंभर रुपये मिळतात. दरमूर आणि कमलाबाडी या गावातल्या मुख्य बाजारपेठेत त्या ‘कोलो माती’ म्हणजेच काळ्या मातीची भांडीही विकतात. १५ रुपये नगाने. मातीचे दिवे ५ रुपयांना.

त्या म्हणतात, "आमच्या जमिनीसोबतच, आमच्या पूर्वापार चालत आलेल्या प्रथाही आम्ही गमावत चाललो आहोत" "आमची काळी माती देखील आता ब्रह्मपुत्रेच्या पुरात वाहून जाते आहे.”

सदर वार्तांकनासाठी कृष्णा पेंगू यांची मदत झाली आहे. त्यांचे मनःपूर्वक आभार.

Nikita Chatterjee

Nikita Chatterjee is a development practitioner and writer focused on amplifying narratives from underrepresented communities.

Other stories by Nikita Chatterjee
Editor : PARI Desk

PARI Desk is the nerve centre of our editorial work. The team works with reporters, researchers, photographers, filmmakers and translators located across the country. The Desk supports and manages the production and publication of text, video, audio and research reports published by PARI.

Other stories by PARI Desk
Translator : Jayesh Joshi

Jayesh Joshi is a Pune based poet, writer and translator working across Hindi and Marathi. Jayesh has been an active facilitator in the area of child development with a focus on creating scientific and brain based learning systems for grassroots and ward level educational institutions. He is actively associated with organisations such as En-Reach Foundation, Learning Home and World Forum Foundation in various capacities.

Other stories by Jayesh Joshi