आम्ही तिला भेटलो तेव्हा तिचं वय होतं १०४. आतल्या खोलीतून बाहेर येताना मदतीसाठी पुढे आलेले हात झटकत ती आमच्यासमोर येऊन बसली. आपली काठी सोडता इतर कुठलाही आधार भबानी दीदाने कधी घेतला नाही. त्या वयातही चालणं, बोलणं, उभं राहणं... सगळं स्वतःच्या मर्जीने. आणि खरं तर पश्चिम बंगालच्या पुरुलियाच्या चेपुआ गावातल्या तिच्या मोठ्या खटल्यातल्या अनेक पिढ्याच तिच्यावर विसंबून होत्या. शेतकरी आणि घर चालवणारी ही कारभारीण त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू होती.

स्वातंत्र्यसैनिक भबानी महातो २९ ऑगस्टच्या मध्यरात्री कधी तरी झोपेतच हे जग सोडून गेल्या. वय १०६य भबानी दीदा गेली आणि माझ्या पेंग्विन इंडिया प्रकाशित द लास्ट हिरोजः फूट सोल्जर्स ऑफ इंडियाज फ्रीडम (मराठी आवृत्तीः अखेरचे शिलेदारः भारतीय स्वातंत्र्याचं पायदळ, मधुश्री प्रकाशन) या माझ्या पुस्तकातले चौघंच आता आपल्यासोबत उरले. खरं तर पारीवरच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या दालनातल्या अलौकिक अशा व्यक्तिमत्वांमध्येही उठून दिसणारी व्यक्ती म्हणजे भबानी दीदा. चार तास आमच्याशी बोलल्यानंतरही स्वातंत्र्यलढ्याशी आपल्या काडीचाही संबध नाही असं सांगणारी या सगळ्यांमधली ती एकटीच. “माझा त्या लढ्याशी किंवा तसल्या कशाशीही काय संबंध?” मार्च २०२२ मध्ये आम्ही पहिल्यांदा तिला भेटायला गेलो तेव्हा ती आम्हाला म्हणाली होती. वाचाः भबानी महातोः क्रांतीची धगधगती चूल

१९४० च्या दशकात तिने पेललेली जबाबदारी फार मोठी होती. बंगालमध्ये भयंकर दुष्काळ असताना तिने किती आणि कसे हाल सोसले असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही

व्हिडिओ पहाः भबानी महातो – पुरुलियाच्या पडद्याआडच्या स्वातंत्र्यसैनिक

खरं तर तिचा संबंध होता, आणि फार जवळचा होता. तिचे पती स्वातंत्र्यसैनिक बैद्यनाथ महातो यांच्यापेक्षाही जास्त जवळचा होता. बैद्यनाथ बाबू २२ वर्षांपूर्वीच वारले. मन बझार तालुक्यातल्या तिच्या घरी आम्ही तिची भेट घेतली. मी काही स्वातंत्र्यसैनिक नाही असं त्यांचं ठाम मत ऐकून मी आणि माझी सहकारी स्मिता खटोर अगदी नाराज होऊन गेलो. ती असं का म्हणत होती ते समजायला आम्हालाच किती तरी तास लागले.

खरं सांगू, १९८० मध्ये सुरू केलेल्या स्वतंत्रता सैनिक सम्मान योजनेचे निकषच जणू त्यांना समजले असावेत. या योजनेतील पात्रता निकषांनी बहुतेक स्त्रियांना स्वातंत्र्यसैनिक या व्याख्येतून बाहेर ठेवलंय. कारण त्यांचा मुख्य भर किती काळ तुरुंगवास भोगला यावरच आहे. त्यामुळे अटक टाळून भूमीगत काम केलेल्या अनेक क्रांतीकारकांचाही या यादीत समावेश नाही. इतकंच नाही, तत्कालीन सरकारने त्यांना गुन्हेगार जाहीर केल्याचा पुरावा मागितला गेला ही वरकडी. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्यांनी इंग्रज सरकारचं प्रमाणपत्र आणून द्यायचं तर!

पण जेव्हा आम्ही त्यांच्या आयुष्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागलो, वेगळ्या पद्धतीने विचारू-बोलू लागलो तेव्हा मात्र त्यांचा असीम त्याग पाहून आमचे डोळे भरून आले. पुरुलियाच्या जंगलांमध्ये लपलेल्या भूमीगत क्रांतिकारकांना अन्न पुरवण्याचं काम करताना त्यांनी किती मोठी जोखीम पत्करली होती! एका वेळी २० किंवा त्याहून अधिक लोकांना खाऊ घालायचं. आणि घरची २५-३० मंडळी आणि त्यांचं सगळं खाणं-पिणं वेगळंच. आणि हे सगळं कधी तर १९४२-४३ च्या सुमारास, जेव्हा बंगालच्या दुष्काळाच्या झळा सगळ्यात तीव्र झाल्या होत्या. त्या तशा काळात शेती करून, धान्य पिकवायचं! भारताच्या स्वातंत्रलढ्यासाठी केवढी मोठी जोखीम होती ही!

भबानी दीदा, तुझी ही जादू आमच्या कायम स्मरणात राहील.

PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath
PHOTO • P. Sainath

२०२२ साली आम्ही तिला भेटलो तेव्हा तिचं वय १०१ ते १०४ च्या मधे अधे होतं. सत्तरी पार केलेला आपला मुलगा श्याम सुंदर (डावीकडे) यांच्यासोबत

PHOTO • Courtesy: the Mahato family

१९८० च्या दशकातील भबानी महातो (मध्यभागी) सोबत पती बैद्यनाथ आणि बहीण ऊर्मिला. या कुटुंबाची त्या आधीची कोणतीही छायाचित्रं नाहीत

PHOTO • Pranab Kumar Mahato

२०२४ साली मतदान करून आलेल्या स्वातंत्र्यसैनिक भबानी महातो

PHOTO • P. Sainath

भबानी दीदा आपल्या मोठ्या खटल्यासोबत. नातू पार्थ सारथी महातो (खालच्या ओळीत उजवीकडे). कुटुंबातले काही सदस्य या छायाचित्रात नाहीत

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale