“ही भेट तुमच्यासाठी,” स्थानिक लाभार्थी समितीचे सदस्य बेहारी लकरा तेरेसा लकरांना म्हणतात. गुमला जिल्ह्याच्या तेतरा ग्राम पंचायतीच्या त्या सरपंच. बोलता बोलता त्यांनी तेरेसाच्या हातात ५,००० रुपये कोंबले. तेरेसांना समजलंच नाही की ती भेट म्हणजे रोख ५,००० रुपये होते. समजलं तर नाहीच पण ते पैसेही खरं तर त्यांना मिळाले नाहीत. कारण त्याच क्षणी भ्रष्टाचारविरोधी पथकाचे लोक आले आणि त्यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा, १९८८ खाली सरपंच असणाऱ्या तेरेसांना “अवैध लाभाच्या” आरोपाखाली अटक केली.
या कृतीमुळे ओराँव आदिवासी असलेल्या ४८ वर्षीय तेरेसा पुरत्या कोलमडून गेल्या. तेतरा ग्राम पंचायत झारखंडच्या बासिया तालुक्यात येते. तेरेसा यांच्या अटकेच्या बातमीने या तालुक्यातल्या ८०,००० च्या आसपास रहिवाशांना धक्काच बसला. भ्रष्टाचारविरोधी पथक थेट रांचीहून १०० किलोमीटर प्रवास करून इथे आलं, तेही ५,००० रुपयांची लाच घेतल्याच्या तथाकथित प्रकरणात, याचं खरं तर फारसं कुणाला आश्चर्य वाटलं नव्हतं. एसयूव्ही गाडीने हाच प्रवास करायला मला दोन तास लागले होते. तेरेसांना ज्या न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं त्यांनीही यावर टिप्पणी केली होती. या पथकाला प्रवासाला येऊन जाऊन पाच तास लागले असणार, आणि नुसत्या त्या प्रवासाचा खर्च या रकमेच्या निम्मा होता. बाकी खर्च तर सोडूनच द्या.
आणखी एक अजब गोष्ट. तेरेसा यांना बासिया तालुका पंचायत कचेरीत नेण्यात आलं. आणि तेही त्यांच्याच पंचायत सदस्यांनी. आणि नंतर हेच सदस्य त्यांच्या विरोधात साक्षीदार झाले. तेरेसा स्वतःच म्हणतात तसं आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना “बासिया पोलिस स्टेशनला काही कुणी नेलं नाही.” आणि पोलिस स्टेशन तर तालुका पंचायत कचेरीच्या बरोबर समोर होतं. जिथे हे सगळं नाटक घडलं तिथून हाकेच्या अंतरावर. तसं न करता “त्यांनी मला १०-१५ किलोमीटरवरच्या कामदरा तालुक्यातल्या पोलिस स्टेशनला नेलं.”
हे सगळं घडलं जून २०१७ मध्ये.
आज या सगळ्या घटनांची संगती लावताना त्यांच्या लक्षात येतं की “बासिया पोलिस स्टेशनात सगळेच मला ओळखतात. आणि त्यांना माहितीये की मी काही गुन्हेगार नाहीये.” त्यानंतर त्यांची केस रांचीच्या विशेष न्यायालयात सादर झाली.






