“ही मझार तात्पुरती बांधलीये. सावला पीरची मूळ मझार आहे ना ती भारत -पाकिस्तानाच्या समुद्री सीमेवर आहे,” फकिरानी जाट समुदायाचे जाणते गुरू ७० वर्षीय आगा खान सावलानी सांगतात. ते ज्या तात्पुरत्या जागेचा उल्लेख करतात तो म्हणते लखपत तालुक्यातल्या पिपर वस्तीजवळच्या मोकळ्या मैदानाच्या मधोमध उभा असलेला एकटा, साधासा दर्गा. छोटा, हलक्या हिरव्या रंगाचा. आता शांत दिसत असलेल्या या दर्ग्यात थोड्याच वेळात सावला पीर उरुस साजरा करण्यासाठी मोठी गर्दी उसळेल.

मूळ दर्गा एका छोट्याशा बेटावर आहे. २०१९ सालापासून सुरक्षेच्या कारणास्तव तिथे प्रवेश बंद केला आहे. सध्या तिथे सीमा सुरक्षा दलाचं ठाणं आहे. “स्वातंत्र्याआधी कोटेश्वरच्या पलिकडे कोरीच्या खाडीत एका बेटावर सावला पिराचं ठाणं होतं तिथे मोठा उरूस भरायचा. आताच्या पाकिस्तानातल्या सिंध प्रांतातले पशुपालक बोटीने तिथे यायचे आणि नमाज अदा करायचे” असा उल्लेख बायोकल्चरल कम्युनिटी प्रोटोकॉल या दस्तावेजात सापडतो.

या भागातले हिंदू आणि मुसलमान या जत्रेत येतात आणि आपली उपासना करतात. फकिरानी जाट समुदाय जर वर्षी ही जत्रा भरवतो. गुजराती पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी. साधारण मार्च-एप्रिल महिन्यात.

“सावला पिराकडे कुणीही येऊन डोकं टेकवू शकतो. कसलीही आडकाठी नाही. कुणीही यावं, भलं कर म्हणावं. तुम्ही संध्याकाळपर्यंत थांबा आणि स्वतःच बघा,” चाळिशीचे सोनू जाट मला सांगतात. ते कच्छच्या पिपर वस्तीवर राहतात. इथे फकिरानी जाटांची सुमारे ऐंशी कुटुंबं राहतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

सावला पिराचा नवा छोटा दर्गा कच्छच्या लखपत तालुक्यातल्या पिपर गावात आहे. मूळ दर्गा भारत-पाक समुद्री सीमेवरच्या एका बेटावर असून २०१९ पासून तिथे नमाज बंद केली आहे

फकिरानी जाट उंट पाळतात. कच्छच्या किनारी भागातल्या वाळवंटी, शुष्क भागात गेल्या अनेक पिढ्यांपासून ते राहतायत. त्यांच्याकडे इथले देशी खराई उंट आहेतच आणि कच्छी उंटही असतात. पशुपालन हाच त्यांचा व्यवसाय आहे आणि भटकंती करत ते आपले उंट चारतात, पाळतात. अनेक पिढ्यांपासून ते दुधाचाही धंदा करतात. दूध, लोणी, तूप तसंच लोकर आणि लेंडीखतही शहरांना पुरवतात. शेरडं, मेंढरं, म्हशी, गायी आणि इतर देशी जितराब पाळणारा हा समुदाय आहे. पण त्यांच्यासाठी त्यांची खरी ओळख म्हणजे उंटपालक. आपले उंट आणि कबिला घेऊन ते भटकंती करतात. कळपातल्या उंटांची आणि खास करून पिलांची काळजी घेण्याचं महत्त्वाचं काम फकिरानी बायांकडे असतं.

“पण अगदी सुरुवातीला आम्ही उंट पाळत नव्हतो,” या भागातले सूफी कवी उमर हाजी सुलेमान सांगतात. “एकदा एक उंट कुणी पाळायचा यावरून दोन रबारी भावांमध्ये वादावादी झाली,” असं म्हणत ते फकिरानी जाटांच्या सध्याच्या व्यवसायाची कूळकथा सांगू लागतात. “हा वाद घेऊन ते आमचे संत सावला पीर यांच्याकडे गेले. त्यांनी मधाच्या पोळ्याच्या मेणापासून एक उंट तयार केला आणि त्या दोघांना म्हणाले आता हा उंट आणि खरा उंट यातला एक निवडा. मोठ्या भावाने जिवंत उंट घेतला आणि तो निघून गेला. धाकट्या देवीदास रबारीकडे मेणाचा उंट आला. सावला पिराने त्याला आशीर्वाद दिला की तू परत जाशील तेव्हा तुझ्या परतीच्या मार्गावर उंटांचा अख्खा कळप असेल. हा कळप वाढत जाईल. अट एकच. मागे वळून पहायचं नाही.”

“पण घर येईपर्यंत देवीदासची उत्सुकता काही त्याला स्वस्थ बसू देईना. आणि घर आलं आलं म्हणतानाच त्याने मागे वळून पाहिलं. आणि खरंच मागे उंटाचा मोठाला कळप होता. पण त्याने तर दिलेला शब्द मोडला. त्यामुळे आता कळपाची संख्या वाढायची थांबली. सावला पिराने त्याला आणखी एक गोष्ट सांगितली होती. उंटांची संख्या जास्त वाटली तर त्याने त्यातले काही जाटांना देऊन टाकावे. आणि म्हणूनच अगदी आजही जाट समुदाय रबारींनी दिलेले उंटं राखतोय,” सुलेमान सांगतात. “आणि म्हणूनच अगदी आजही इथले सगळेच सावला पिराला मानतात.”

फकिरानी जाट मुसलमान आहेत आणि सुमारे ४०० वर्षांपूर्वी कोरी खाडीच्या एका बेटावर आपल्या उंटांच्या कळपासह राहणारा सावला पीर एक लोकप्रिय सूफी संत होता. दर वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील - २८ आणि २९ एप्रिल २०२४ रोजी - लखपतमध्ये त्याचा दोन दिवसांचा उरूस भरलाय – सावला पीर नो मेलो.

PHOTO • Ritayan Mukherjee
PHOTO • Ritayan Mukherjee

भाविक सुरेख नक्षीकाम केलेल्या लाकडी होड्या घेऊन दर्ग्यावर येतात. सूफी कवी उमर हाजी सुलेमान सांगतात की ही होडी म्हणजे सावला पिराचं प्रतीक आहे कारण पीरसाहेब होडीने खाडीतल्या बेटांवर फिरायचे

*****

हा उरूस म्हणजे रंगांची मुक्त उधळण आहे. उंचशा मंचावर एक मांडव टाकलाय आणि तिथेच संध्याकाळचे कार्यक्रम होणार आहेत. कपडे, भांडी-कुंडी, हाताने बनवलेल्या अनेक वस्तू आणि खायची प्यायची छोटी-छोटी दुकानं थाटलेली दिसतात. काही म्हातारी मंडळी चहा पीत बसलीयेत. मला बघून हसून माझं स्वागत करतात आणि म्हणतात, “या उरसात सामील व्हायला तुम्ही एवढ्या लांबून आलात. बरं वाटलं.”

उरुसात भाग घेण्यासाठी भाविक यायला लागलेत. काही चालत, काही गाड्यांनी. बहुतेक सगळे टेम्पो ट्रॅव्हलर करून आलेत. बाया पण मोठ्या संख्येने या जत्रेसाठी इथे येतात. त्यांचे रंगीत कपडे सगळीकडे उठून दिसतात. त्यांना फोटो काढलेले फारसे आवडत नाहीत आणि त्या बोलतही नाहीत फारशा.

रात्रीचे ९ वाजतात. ढोलांचा आवाज सुरू होतो. संथ लयीतला ढोल ताल धरू लागतो. हवेत त्याचा आवाज भरून राहिल्यासारखा वाटतो. आणि अचानक एक आजोबा सावला पिरासाठीचं एक सिंधी भाषेतलं गाणं गायला लागतात. आणि काही क्षणात इतर अनेक लोक त्यांच्या आवाजात आवाज मिसळतात. काही जण फेर धरून नाचू लागतात. गाणं आणि ढोलाचा ताल सांभाळत मध्यरात्र येते.

२९ एप्रिल. उरुसाचा मुख्य दिवस. सकाळची सुरुवात समुदायाच्या गुरूंच्या धार्मिक प्रवचनाने सुरू होते. मग दुकानं थाटली जातात. लोक नमाज अदा करण्यासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी आणि उरुसाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने येतात.

व्हिडिओ पहाः सावला पीर नो मेलो

“जुलूस निघतोय, सगळे जण दर्ग्यापाशी या.” दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास भोंग्यावरून घोषणा केली जाते. पांढऱ्या शिडाच्या, नक्षीकाम केलेल्या छोट्या लाकडी होड्या आपल्या डोक्यावर घेतलेले पुरुष दर्ग्यापाशी येतात. सावला पिराचं नाव घेत, आनंदाने गात, आरोळ्या ठोकत जुलुसू सुरू होतो. डोळे दिपवणारा प्रकाश आणि धुळीच्या ढगांमध्ये लपलेल्या दर्ग्यापाशी जुलूस पोचतो. या होड्या म्हणजे सावला पिराचं प्रतीक. कारण पीरसाहेब खाडीतल्या बेटांवर होडीनेच प्रवास करून जायचे.

“मी दर वर्षी इथे येतो. सावला बाबाचा आशीर्वाद घ्यावाच लागतो आम्हाला,” ४० वर्षीय जयेश रबारी सांगतात. ते अंजारहून इथे आलेत. “आम्ही रात्रभर इथे राहतो. आमच्या फकिरानी भावांबरोबर चहा-पाणी होतं. आणि सोहळा संपला की आम्ही अगदी भरल्या मनाने आपापल्या घरी परत जातो.”

“घरी काही पण अडचण असली, संकट आलं तर आम्ही इथे पिराला येतो. डोकं टेकवतो आणि सगळे प्रश्न सुटतात. मी गेल्या १४ वर्षांपासून इथे येतीये,” ३० वर्षीय गीता बेन रबारी सांगतात. त्या पार भुजहून चालत इथे आल्या आहेत.

“सगळ्या धर्मांचं मूळ प्रेमात आहे. लक्षात घ्या. प्रेमाशिवाय धर्माचं काहीही अस्तित्व नाही,” उमर हाजी सुलेमान सांगतात. दोन दिवसांच्या उरुसाच्या शेवटी त्यांचा निरोप घ्यायला मी गेलो तेव्हा ते म्हणतात.

PHOTO • Ritayan Mukherjee

काही फकिरानी जाट उंटाच्या दुधाचा चहा बनवतायत. हा चहा त्यांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे

PHOTO • Ritayan Mukherjee

मरूफ जाट पिराची उपासना करतायत. ‘मी सगळ्यांचं, अगदी तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं भलं होऊ दे, सुख शांती येऊ दे असी दुआ मागतोय’

PHOTO • Ritayan Mukherjee

पिपर गावातले लोक संध्याकाळची नमाज अदा करण्याच्या तयारीत

PHOTO • Ritayan Mukherjee

आदल्या रात्री लागलेलं जत्रेतलं एक दुकान – कपडे, भांडी-कुंडी, हाताने बनवलेल्या कित्येक वस्तूंनी सजलेलं

PHOTO • Ritayan Mukherjee

रात्र झाली की सगळीकडे शांतता पसरते आणि मग आलेले भाविक गाणी सुरू करतात. रात्री १० वाजण्याच्या सुमारास सगळे जण उरुसाच्या मैदानात येतात. ढोलकरी ढोलावर थाप मारतात आणि कार्यक्रम सुरू होतात

PHOTO • Ritayan Mukherjee

फेर धरून नाचणारे गडी आणि त्यांच्या सावल्या आपण दुसऱ्याच कुठल्या तरी दुनियेत असल्याचा आभास निर्माण करतात. ही गाणी आणि नाच अगदी मध्यरात्रीपर्यंत सुरू राहतात

PHOTO • Ritayan Mukherjee

दोन दिवसांच्या या उरुसात सगळ्या जाती-धर्माचे लोक, गडी, बाया, मुलं सामील होतात

PHOTO • Ritayan Mukherjee

पिराला वाहण्यासाठी आणलेल्या लाकडी होड्या घेऊन निघालेले भाविक

PHOTO • Ritayan Mukherjee

जुलूस पुरुषांचाच असतो. उरुसासाठी मोठ्या संख्येने बाया येतात मात्र त्या जुलूसमध्ये किंवा नाच-गाण्यात सहभागी होत नाहीत

PHOTO • Ritayan Mukherjee

पिराचं नाव आणि त्याला वाहण्यासाठी आणलेल्या होड्या. दर वर्षी भरणाऱ्या या उरुसात भाविकांचा महासागर उसळतो

PHOTO • Ritayan Mukherjee

उरुसाच्या मैदानामध्ये जुलूस निघतो आणि सावला पिराचं नाव दुमदुमतं

PHOTO • Ritayan Mukherjee

सावला पिराला होड्या वाहण्यापूर्वी निघालेले, पिराचं नाव घेत, आनंदाने आरोळ्या ठोकत गात निघालेले पुरुष

PHOTO • Ritayan Mukherjee

दर्ग्यावर छोटी नमाज होते. त्यानंतर संध्याकाळची नमाज अदा करून आलेले भाविक आल्या वाटेने आपापल्या घरी जायला निघतात

Ritayan Mukherjee

Ritayan Mukherjee is a Kolkata-based photographer and a PARI Senior Fellow. He is working on a long-term project that documents the lives of pastoral and nomadic communities in India.

Other stories by Ritayan Mukherjee
Editor : Pratishtha Pandya

Pratishtha Pandya is a Senior Editor at PARI where she leads PARI's creative writing section. She is also a member of the PARIBhasha team and translates and edits stories in Gujarati. Pratishtha is a published poet working in Gujarati and English.

Other stories by Pratishtha Pandya
Translator : Medha Kale
mimedha@gmail.com

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale