पण कामठ्यात एका आठवड्यापलिकडे काही हे आंदोलन टिकू शकलं नाही. “आम्हाला जितकं जमलं, तितकं आम्ही ते ताणलं,” विकास म्हणतात. “एका आठवड्यातच आम्ही ८०,००० गमावले [बाजारला माल पाठवला नाही म्हणून].” विकास स्वतः आणि त्यांच्या दोन भावांबद्दल सांगत होते. तिघांचं मिळून २० एकराचं रान आहे. ते भाजीपाला घेतात आणि दूध विकतात. “संपात झालेलं नुकसान भरून काढायला आम्हाला एक वर्ष लागेल,” ते म्हणतात. पाटाडे बंधूंवर ८ लाखाचं कर्ज आहे, त्यात असं नुकसान त्यांच्यावरचा बोजा जास्तच वाढवतं.
एका आठवड्याच्या चिवट झुंजीनंतर – सात दिवस उस्मानाबाद आणि कळंबचा बाजार बंद पडला होता – कामठ्याला माघार घ्यावी लागली. “आमच्यावर कुटुंबाची जबाबादरी आहे,” विकास म्हणतात. या गावात जास्त करून भाजीपालाच होतो आणि दर दिवशी किमान ७०,००० चा माल बाजाराला जातो. “आठवडाभर बाजारात कसलाच माल नव्हता,” विकास सांगतात. “आता १७०० लोकसंख्येचं गाव [२०११ च्या जनगणनेनुसार १८६०] सरकारला काय धक्का लावणार? पण छोटा का होईना, आम्हाला या आंदोलनाचा हिस्सा व्हायचं होतं.”
अहमदनगर आणि नाशिक ही या संपाची दोन महत्त्वाची केंद्र होती. मात्र कायमच शेतीसंकटात असणाऱ्या मराठवाडा आणि विदर्भातही ठिकठिकाणी मोर्चे निघाले, संप झाले – अर्थात ते लवकरच थंडावलेही.
मराठवाड्यातलं आंदोलन तीव्र का झालं नाही, का टिकू शकलं नाही? उस्मानाबादच्या कामठ्यासारख्या गावाचा अपवाद वगळता मराठवाड्यातल्या बीड, औरंगाबाद, जालना, लातूर आणि नांदेड या पाच जिल्ह्यात या आंदोलनाला फारच नरम प्रतिसाद मिळाला. फक्त परभणी आणि हिंगोलीमध्ये आंदोलन चालू राहिलं.
कदाचित यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की या प्रदेशाला संपावर जाणं परवडतच नाही. नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी इथल्या शेतकऱ्याच्या मानाने खाऊन पिऊन सुखी आहेत. मात्र मराठवाड्यातला शेतकरी २०१२ ते २०१५ या चार वर्षात दुष्काळाने होरपळून निघाला आहे. आणि पाण्याच्या तीव्र दुर्भिक्ष्यामुळे तर तो कडेलोट होण्याच्या मार्गावर आहे.
बीडच्या लिंबगणेश गावात एक दिवस दुपारी मी ४५ वर्षांच्या महानंदा जाधव यांना भेटलो. त्या त्यांच्या रानात भुईमूग वेचीत होत्या. त्यांची आधीच तारेवरची कसरत चालू आहे. त्यात संप म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. “गेल्या साली आमचा सगळा झेंडू पार वाळून गेला,” त्या सांगतात. “आमचे ५०,००० गेले त्यात. त्यात आम्ही रानात बोअर घेतली, ठिबक केलं. आमच्यावर आताच बँकेचं दोन लाखाचं कर्ज झालंय.”
झेंडू हातनं गेला आणि आणखी एका समस्येत भर पडली. “आम्ही गेल्या साली तूर केली पण सरकारी खरेदी केंद्रावर निस्ता घोळ, त्यामुळे तूर बी इकली न्हाई.” महानंदा सांगतात. “ती इकली असती, तर खाद, बी बियाण्याला काही तरी पैसा राहिला असता, कर्ज घ्याया लागलं नसतं.”
महानंदाताईंची दोन मुलं, वय २२ आणि २५, बीडमध्ये बीएस्सीचं शिक्षण घेतायत. संपात भाग घेतला असता तर त्यांच्या फीचे पैसे तरी कुठनं भरले असते? “दर साली प्रत्येकाला १ लाख खर्च होतो,” त्या सांगतात.