उजव्या हातात तलवार, डाव्या हातात घोड्याचा लगाम घेतलेली रणरागिणी राणी वेल नचियार. प्रजासत्ताक दिनी चेन्नईत निघालेल्या चित्ररथाच्या परेडमधल्या या ऐतिहासिक योद्ध्यांच्या पुतळ्यांपैकी सर्वात जास्त फोटो काढले जात होते तिच्याच पुतळ्याचे आणि चर्चाही तिचीच होत होती.

स्वातंत्र्य संग्रामात तमिळ नाडूचे योगदान दाखवणारा याच चित्ररथाला केंद्र सरकारच्या ‘तज्ज्ञ’ समिती ने २६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभाग नाकारला होता. राज्याचे मुख्यमंत्री, एम के स्टालिन यांनी पंतप्रधान मोदींना यामध्ये लक्ष घालण्याची विनंती करूनही काही फायदा झाला नाही. त्यानंतर चेन्नईमध्ये साजऱ्या झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हा चित्ररथ दिमाखात फिरला.

केंद्राच्या या ‘तज्ज्ञ’ समितीचं म्हणणं होतं की चित्ररथावरील काही व्यक्ती “देशभरातल्या लोकांच्या माहितीच्या नाहीत” आणखीही बरंच काही. अक्षया कृष्णमूर्तीला मात्र हे बिलकुल पटलेलं नाही. त्यातल्या एका व्यक्तीशी, वेल नचियारशी आपलं काही तरी नातं असल्यासारखं तिला वाटतं. याच वेल नचियारने इंग्रजांशी लढा दिला आणि आपल्या मृत्यूपर्यंत, १७९६ सालापर्यंत तमिळ नाडूमधल्या सिवगंगैवर राज्य केलं.

“अकरावीत असताना मी आमच्या शाळेत एका नाचाच्या कार्यक्रमात वेल नचियारची मुख्य भूमिका केली होती. तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलं,” ती सांगते.

“आणि ते काही फक्त नाच आणि गाणं इतक्यापुरतं नव्हतं,” अक्षया पुढे सांगते. त्या गाण्यातून, गाण्याच्या शब्दांतून तिला ‘वीरमांगई’चं धैर्य आणि शक्ती जाणवल्याचं अक्षया सांगते. राणीला वेल नचियारला प्रेमाने लोक वीरमांगई म्हणतात. अक्षयाने नृत्याचं शास्त्रीय शिक्षण घेतलं आहे. तिला आठवतं की आंतरशालेय नृत्य स्पर्धेच्या दिवशी तिची तब्येत ठीक नव्हती. आपल्याला नीट सगळं जमेल का याची शंकाच वाटत होती पण तिने सगळी ताकद गोळा करून सर्वोत्तम सादर करायचा प्रयत्न केला.

रंगमंचावरून ती खाली उतरली आणि तिला घेरी आली. तिला तडक हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे सलाइन लावण्यात आलं. “आमचा दुसरा क्रमांक आला. मी पुरस्कार स्वीकारला तेव्हाही माझ्या हाताला सलाईनची नळी लावलेली होती.” आपल्यातल्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचा धडा ती त्या दिवशी शिकली. ती “अधिक धाडसी बनली,” मोटरसायकल आणि कारही चालवायला शिकली.

Tamil Nadu's tableau for the Republic Day parade, with Rani Velu Nachiyar (left), among others. The queen is an inspiration for Akshaya Krishnamoorthi
PHOTO • Shabbir Ahmed
Tamil Nadu's tableau for the Republic Day parade, with Rani Velu Nachiyar (left), among others. The queen is an inspiration for Akshaya Krishnamoorthi
PHOTO • Shabbir Ahmed

प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधला तमिळ नाडूचा चित्ररथ, त्यावरती राणी वेल नचियार (डावीकडे) आणि इतर योद्ध्यांचे पुतळे. या राणीपासून अक्षया कृष्णमूर्तीने प्रेरणा घेतली आहे

पदवी घेणारी अक्षया तिच्या कुटुंबातली पहिलीच. ती व्यवसाय चालवते आणि त्याच सोबत प्रेरक भाषणं देते.

आणि तिचं वय आहे केवळ २१ वर्षं.

अक्षयाच्या घरी तिचे आई-वडील, धाकटा भाऊ, आत्या एक कुत्रा आणि अनेक सारे पोपट आहेत. तमिळ नाडूच्या इरोडे जिल्ह्यात सत्यमंगलमजवळचं अरियप्पमपालयम हे तिचं मूळ गाव. राज्याच्या नकाशावर एका ठिपक्याएवढं. पण एक दिवस हेच गाव देशाच्या नकाशावर नेण्याचं स्वप्न ही व्यवसाय व्यवस्थापनशास्त्राची पदवीधर मुलगी पाहतीये.

तमिळ नाडूच्या या पट्ट्यात – कोइम्बतोर, करुर आणि तिरुप्पुरमध्ये अगदी गावपातळीवर असे अनेक उद्यमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. यांचा वारसा आता अक्षया पुढे नेतीये. तिचे आई-वडील दोघंही १० वी नंतर शिक्षण घेऊ शकले नाहीत ना त्यांच्या मालकीची जमीन आहे.

“माझ्या वयाचा मला म्हटलं तर फायदा होतो, म्हटलं तर तोटा,” ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही अक्षयाला भेटलो तेव्हा हसून ती सांगत होती. हळदीची शेती करणाऱ्या तिरु मूर्तींच्या घरी दिवाणखान्यात आम्ही चहा आणि भजी खात होतो तेव्हाच आमची तिची भेट झाली. ती भेट आमच्या चांगली लक्षात राहिली होती. अक्षया फार सुस्पष्टपणे तिचं म्हणणं मांडते. डोळ्यावर येणाऱ्या बटा मागे सारत तिची मोठी आणि सुंदर स्वप्नं बोलून दाखवते.

तिला आवडणारा सुविचारही तसाच आहेः “तुमचं स्वप्न साकार करायचं असेल ते जगा. आता.” वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये जाऊन ती विद्यार्थ्यांशी संवाद साधते तेव्हाही ती हा सुविचार मांडते. आपल्या आयुष्यात, उद्योगात, स्वतःचा सुरुकुपई फूड्स हा ब्रँड सुरू करण्याच्या धडपडीत हा तिचा मंत्र आहे. तमिळ भाषेत सुरुकुपई म्हणजे बटवा. गतस्मृती, काटकसर आणि शाश्वती अशा सगळ्यांचं प्रतीक असणारा बटवा.

ती स्वतःच्या जोरावर काही तरी करेल हे खरं तर अपेक्षितच होतं. “मी आणि माझ्या काही दोस्त मंडळींनी कॉलेजमध्ये असताना उलियिन उरवम ट्रस्ट सुरू केला आहे. त्याचा अर्थ होतो शिल्पकाराच्या हातातली छन्नी. ही विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून काम करणारी संघटना असून आमच्यासारख्या छोट्या गावातल्या मुला-मुलींना पुढे जाण्यासाठी मदत करते. २०२५ सालापर्यंत २०२५ लीडर्स तयार करण्याचं आमचं ध्येय आहे.” मोठं आणि महत्त्वाकांक्षी. अक्षयासारखं.

Akshaya in Thiru Murthy's farm in Sathyamangalam. She repackages and resells the turmeric he grows
PHOTO • M. Palani Kumar

सत्यमंगलममध्ये तिरू मूर्तींच्या शेतात उभी असलेली अक्षया. त्यांनी पिकवलेली हळद पॅकेजिंग करून विकण्याचं काम अक्षया करते

आपल्याला व्यवसाय करायचाय हे तिला माहित होतं, पण २०२० साली मार्च महिन्यात देशभरात लावण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तिच्यापुढचे पर्याय आटून गेले. तेव्हाच तिची तिरू मूर्तींची गाठ पडली. तिरू सत्यमंगलमजवळच्या उप्पुपाल्लममध्ये जैविक शेती करतात. अक्षयाच्या आई-वडलांचं पूर्वी गृहोपयोगी वस्तूंचं दुकान होतं, तिथे तिरू कायम यायचे. “अप्पांचं रेडियो-कॅसेटचं दुकान होतं तेव्हापासूनची त्यांची ओळख आहे,” अक्षया सांगते.

तिरु हळदीची शेती आणि व्यवसाय करतात आणि त्यात त्यांचा चांगला जम बसला आहे. मूल्यवर्धन आणि ग्राहकांना थेट विक्री हे त्यांच्या नफ्याचं गमक. अक्षयाने एकदा तिरु ‘अंकल’ना विचारलं की त्यांची हळद पॅकिंग करून ती विकू शकते का ते. “एडुथु पन्नुंगा (घे आणि सुरू कर),” तिरूंनी तिला प्रोत्साहन दिलं. “अंकलनी इतका छान पाठिंबा दिला,” अक्षया हसून सांगते. आणि तिथेच सुरुकुपई फूड्सचा जन्म झाला.

ती आपल्या नव्या कंपनीचा माल घेऊन पहिल्या प्रदर्शनाला गेली तो अनुभव खूपच आश्वासक होता. टॅन फूड’२१ एक्स्पो हे भव्य प्रदर्शव २०२१ साली फेब्रुवारी महिन्यात मदुराईमध्ये भरवण्यात आलं होतं. तिच्या स्टॉलला २००० हून जास्त जणांनी भेट दिली. त्यांचा प्रतिसाद आणि नंतर केलेल्या बाजारपेठेच्या आकलनातून तिच्या एक गोष्ट लक्षात आली. ब्रँडिंग आणि पॅकेजिंगचं महत्त्व.

“ग्राहकांचं आमच्या ब्रँडच्या नावाशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं,” अक्षया सांगते, “शिवाय त्यात नाविन्य होतं. आतापर्यंत हळद फक्त प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये विकली जात होती. कागदी पिशव्या लोक पहिल्यांदाच पाहत होते. किंवा बटवासुद्धा!” झटपट खपणाऱ्या खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या मोठ्या कंपन्या किंवा जैविक उत्पादनं विकणाऱ्या विशेष दुकानांनी देखील कधी ही साधी कल्पना त्यांच्या कामात वापरली नव्हती. पण अक्षया इतक्यावरच थांबणारी नाही.

आपला व्यवसाय कसा वाढू शकेल यासाठी तिने अनेक व्यक्ती आणि संघटनांचं मार्गदर्शन घेतलं. तिचे मार्गदर्शक, पोटन फूड्सचे डॉ. एम. नच्चीमुथ्थु त्यातलेच एक. मदुराई ॲग्री बिझनेस इनक्युबेशन फोरमने (एमएबीआयएफ) तिला ट्रेडमार्क आणि अन्न परवाना (भारतीय अन्न सुरक्षितता व प्रमाण संस्थेकडून मिळणारा परवाना) मिळवण्यासाठी सहाय्य केलं. आणि हो, जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्षया वेगवेगळी स्व-मदत पुस्तकंही वाचत असते. अगदी अलिकडेच तिने वाचलेलं पुस्तक म्हणजे - Attitude is Everything, तुमची प्रवृत्तीच सर्वकाही आहे.

Akshaya's Surukupai Foods products on display in Akshaya Home Appliances, the store owned by her parents
PHOTO • M. Palani Kumar

अक्षयाच्या सुरुकुपई फूड्सची उत्पादनं तिच्या आईवडलांच्या मालकीच्या अक्षया होम अप्लायन्सेस या दुकानात मांडून ठेवली आहेत

“मी बीबीएचं शिक्षण घेतलं असलं तरी मला एक उद्योग सुरू करण्यासाठी जे ज्ञान किंवा या क्षेत्राची ओळख होणं गरजेचं आहे ते काहीही त्यातून मिलालं नाही,” ती म्हणते. शिक्षणव्यवस्थेवर ती नाराज आहे. “कॉलेजमध्ये असताना साधे बँकेचे व्यवहार कसे करायचे हे का बरं शिकवलं जात नाही? किंवा बीबीएच्या अभ्यासक्रमात बँकेतून कर्ज कसं घ्यायचं हे का समाविष्ट नाही? अगदी विभागप्रमुख किंवा शिक्षकांनाही प्रत्यक्षातला काहीही अनुभव नाही, असं कसं?”

आणि या सगळ्या त्रुटी ती आता स्वतः भरून काढतीये. “शिकण्यासारखं इतकं काही आहे.”

आणि हे प्रभावीपणे करण्याचा तिचा मार्ग म्हणजे दररोज ‘आजच्या कामांची यादी’ लिहिणे. काम झालं की ते यादीतून खोडून टाकायचं. “मी एका छोट्या डायरीत सगळ्या गोष्टी लिहून काढते. दिवसाच्या शेवटी एखादं काम तसंच राहिलं असेल तर ते दुसऱ्या दिवशीच्या यादीत लिहायचं.” तसं केल्याने मनात “अपराधीपणाची भावना येते” आणि अजून जोमाने काम केलं जातं.

पदव्युत्तर पदवीच्या तीन सत्रांचा खर्च तिने स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केला. आणि तिने पदवी कशात घेतली माहितीये? “मी दूरशिक्षणातून समाजकार्यामध्ये मास्टर्स करतीये. प्रत्येक सत्राची फी १०,००० रुपये आहे आणि परीक्षेची वरचे ५००० रुपये. अप्पांनी सुरुवातीला मला ५,००० रुपये दिले. त्यानंतर बाकीचे सगळे पैसे माझे मी भरले आहेत,” ती सांगते. तिच्या आवाजातला अभिमान कानात रुंजी घालतो. आपला व्यवसाय सुरू करताना १०,००० रुपयांच्या भांडवली खर्चातून तिने ४०,००० रुपयांचा नफा कमवला. त्यातून हे सगळे ‘बाकीचे’ पैसे उभे राहिले.

तिचे ग्राहक तिच्याकडून ठोक माल खरेदी करतात. आणि ती त्यांच्या गरजेनुसार सोपे पर्याय त्यांना देते. सध्या चलती असणारं उत्पादन म्हणजे लग्नात आहेर म्हणून देता येईल असा जैविक हळदीपासून तयार करण्यात आलेला उत्पादनांचा संच. असं काही उत्पादन आणणारी तिच्या मते ती पहिलीच उद्योजक आहे. “किंमत ५० ते १०० रुपये ठेवलीये. प्रत्येक संचात एक बटवा, हळदीच्या पुड्या आणि बियांची पाच ग्रॅमचं पाकिटं (वांगं, टोमॅटो, भेंडी, मिरची आणि पालकाच्या देशी बिया) आणि आभार मानणारं एक कार्ड.”

“लोक लग्नाचं निमंत्रण करायला जातात तेव्हा पत्रिकेसोबत ते ही भेट देतात,” अक्षया सांगते. तिच्या ग्राहकांना यापेक्षा भारी काही हवं असलं आणि त्यासाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असेल तर ती काचेच्या सुबक बाटल्यांमध्ये हळद भरते. तिने काही मोठ्या लग्नसमारंभांसाठी अशा प्रकारे हळद पुरवली आहे. आणि आता एकाकडून दुसरी असं करत तिच्या उत्पादनांना मागणी यायला लागली आहे. “मागची ऑर्डर होती प्रत्येकी ४०० रुपये किंमतीच्या २०० संचांची.”

Left: Akshaya with a surukupai, or drawstring pouch, made of cotton cloth. Right: The Surukupai Foods product range
PHOTO • M. Palani Kumar
Left: Akshaya with a surukupai, or drawstring pouch, made of cotton cloth. Right: The Surukupai Foods product range
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः सुती कापडाचा बटवा – सुरुकुपई घेतलेली अक्षया. उजवीकडेः सुरुकुपई फूड्सची उत्पादनं

मी सत्यमंगलमला जाऊन आल्यानंतर काही महिन्यांनी मी फोनवर अक्षयाशी बोलत होते. आणि मध्येच तिने फोन ठेवलाः “बँकेच्या मॅनेजरचा फोन येतोय.” मग एक तासभराने तिने फोनवर सांगितलं की ते पाहणीसाठी आले होते. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेने तिला १० लाखांचं कर्ज मंजूर केलं आहे. तिने स्वतःच कर्जासाठी अर्ज केला, सगळ्या कागदपत्रांची जुळवाजुळव केली आणि तारण काहीही न ठेवता ९ टक्के व्याजाने तिला कर्ज मंजूर झालं. या पैशातून तिने एक यंत्र आणलं आहे. यात अतिशय सुरक्षित आणि स्वच्छ पद्धतीने हळद दळली जाते आणि पॅक केली जाते. तिचा पल्ला खरंच खूप मोठा आहे. आणि जलदही.

“मला एक टन हळदीची ऑर्डर आहे. त्यामुळे मी व्यापाऱ्यांकडून हळद विकत घेतलीये,” ती सांगते. ही यंत्रसामग्री देखील साधी सरळ नाही. “मी कॉलेजात असताना जाहिरात कशी करायची ते शिकले. पण पूर्णपणे स्वयंचलित यंत्रांचे सेन्सर, पेपर लावणं, खेचणं यातलं मला ओ का ठो माहित नाही. आणि हे नीट झालं नाही तर पूर्णच्या पूर्ण बॅच वाया जाऊ शकते.”

अशाच इतर कोणत्या चुका होऊ शकतात याची जंत्रीच तिच्याकडे आहे. चुकांची जोखीम घेऊनही हे करायचंच हा ठाम विश्वासही तिच्यापाशी आहे. यंत्रावर काम करण्यासाठी तिच्याकडे अर्धा वेळ काम करणारे दोघं कामगार आहेत. पण या यंत्राने भविष्यात ती महिन्याला २ लाखांची उलाढाल करू शकेल असा तिला विश्वास आहे. कॉलेजचं शिक्षण घेत असताना मिळालेल्या नफ्यापेक्षा किती तरी जास्त नफा तिला खुणावतोय.

या सगळ्यातही अक्षया जे काही करतीये ते केवळ वैयक्तिक फायद्यापुरतं नाहीये. ॲग्री बिझनेस किंवा कृषी व्यापारातली जी उतरंड आहे ती मोडीत काढायला तिने सुरुवात केली आहे. आणि या उतरंडीत अर्थातच सगळ्यात वर आहेत ते पुरुषांच्या हातात असलेले उद्योग किंवा कॉर्पोरेट कंपन्या.

“हळदीवर प्रक्रिया केली जाते ती अगदी जिथे पिकतं त्या शेजारी. आणि ही सर्वात चांगली गोष्ट मानायला हवी,” उषा देवी वेंकटाचलन म्हणतात. त्या कृषी जननीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कृषी जननी हा कंगायम स्थित समाजाभिमुख उद्योग आहे. फायदेशीर आणि चिरंतन कृषी-परिस्थितिकीला प्रोत्साहन देण्याचं काम कृषी जननी करते. “शिवाय, कृषी-प्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या तरुण स्त्रिया अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या आहेत. पीक आल्यावर त्यावर प्रक्रिया करण्यात स्त्रियांची भूमिका मोलाची होती. पण यांत्रिकीकरण आणि केंद्रीकरण करता करता त्यांना यापासून दूर केलं गेलं आहे.”

“अन्न पुरवठा साखळीतली एक समस्या म्हणजे या सगळ्या प्रक्रिया अतिशय केंद्रीकृत झाल्या आहेत. पुरवठ्याचे निर्णयही विचित्र. अमेरिकेत पिकलेली सफरचंदं पॉलिशिंगसाठी दक्षिण आफ्रिकेला जातात आणि तिथून भारताच्या बाजारपेठेत येतात. करोनाची महासाथ येऊन गेलीये. त्यानंतरच्या काळात हे अशक्य आहे. आणि या सगळ्या मालवाहतुकीचा पर्यावरणावर काय परिणाम होतोय याचा विचार करता अशी प्रारुपं अधिकच धोकादायक म्हणावी लागतील,” उषा देवी सांगतात.

The biodegradable sachets in which Akshaya sells turmeric under her Surukupai Foods brand. She says she learnt the importance of branding and packaging early in her entrepreneurial journey
PHOTO • Akshaya Krishnamoorthi
The biodegradable sachets in which Akshaya sells turmeric under her Surukupai Foods brand. She says she learnt the importance of branding and packaging early in her entrepreneurial journey
PHOTO • Akshaya Krishnamoorthi
The biodegradable sachets in which Akshaya sells turmeric under her Surukupai Foods brand. She says she learnt the importance of branding and packaging early in her entrepreneurial journey
PHOTO • Akshaya Krishnamoorthi

अक्षया सुरुकुपई फूड्स या नावाने हळद विकते, त्याची विघटन होऊ शकणारी कागदी पाकिटं. उद्योग उभारणीच्या अगदी सुरुवातीच्या काळात आपण ब्रँडिंग आणि पॅकेजिंगचं महत्त्व ओळखल्याचं ती सांगते

अक्षयाने आगामी काळात जे काही नियोजन केलंय त्यात या सगळ्या समस्यांवर तोडगा निघणं शक्य नाही. पण हळदीपासून चॉकलेट्स आणि वेफर्स तयार करण्याची तिची आगळी कल्पना पारंपरिक बाजारपेठेला शह देणार हे नक्की. सध्या स्थानिक पातळीवर तरी नक्कीच. पण या कल्पना फार पुढे जाऊ शकतात याची तिला खात्री आहे.

“लोक हे प्रयोग उचलून धरतील,” ती म्हणते. अशी उत्पादनं तेवढ्यापुरतीच राहतात, त्याची सगळ्यांना गोडी लागेलच असं नाही ही माझी शंका. “लोक पेप्सी आणि कोक पितात. त्यांना नन्नारी सरबत आणि पनीर सोडाही आवडतं. हळदीपासून तयार झालेले पदार्थही रुळतील,” ती ठासून सांगते. “आणि तब्येतीसाठीही ते चांगलेच आहेत.”

२०२५ सालापर्यंत ग्रामीण बाजारपेठेला तेजीचे दिवस येतील असा अंदाज बांधला जातोय आणि त्य लाटेवर स्वार होण्यासाठी अक्षया सज्ज आहे. “पण त्यासाठी आपली उत्पादनं किफायतशीर पाहिजेत. जैविक उत्पादनं जास्त माल असेल तर महाग होतात – पाव किलोला १६५ रुपये पडतात. म्हणून मी एका वापरापुरती पाकिटं तयार केली आहेत.”

‘हे आहे सुरुकुपईचं पॅकेट,’ आपल्या आईवडलांच्या दुकानातल्या फडताळात ठेवलेला एक बटवा काढत ती मला सांगते. त्या बटव्यात ६ ग्रॅम हळदीच्या १२ कागदी पुड्या आहेत. “हे पाकिट १२० रुपयांना मिळतं. किंवा मग ते १० रुपयाला एक पुडी देखील विकत घेऊ शकतात,” अक्षया सांगते. बटवा जाडसर सुताचा आहे. आणि आतल्या पुड्या विघटनशील आहेत. आर्द्रता टिकून राहण्यासाठी कागदाला आतून पातळ प्लास्टिकचा थर दिलेला आहे.

हळदीचं आणि बाकी उत्पादनं तयार करण्याचं काम तिरू मूर्ती करतात. त्याचं पॅकेजिंग, लेबलिंग अक्षया करते. त्यातले फायदे ती मला सांगते. “लहान पुड्यांमुळे हळद वाया जात नाही, आर्द्रता टिकून राहते. आणि किंमत फक्त १० रुपये असल्याने लोकही घेऊन पहायला हरकत नाही असा विचार करतात.” अक्षया अखंड बोलत असते. “मी कायमच अशी उत्साही असते,” ती हसायला लागते.

तिच्या पालकांचाही तिला खूप पाठिंबा आहे. गृहोपयोगी वस्तूंची त्यांची छोटेखानी दुकानं म्हणजे तिची उत्पादनं विकण्याची हक्काची जागा. तिचे निर्णय आणि व्यवसायाची दिशा या दोन्हींचा त्यांनी आदर राखला आहे. आपला स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय तिने घेतला तेव्हाही ते तिच्या पाठीशी खंबीर उभे राहिले होते.

“I always have energy,” she says, laughing
PHOTO • M. Palani Kumar

“मी कायमच अशी उत्साही असते,” ती सांगते, हसत हसत

काही वर्षांपूर्वी तिने कुळदेवतेपुढे मुंडन करून घेतलं तेव्हा अनेकांनी तिला नावं ठेवली होती. पण तिचे आईवडील तिच्या पाठीशी होते. ती सुंदर दिसत होती, ते सांगतात. “मी सारखी आजारी पडत होते, म्हणून मी केस उतरवले. मला खरं तर कर्करुग्णांसाठी केस दान करायचे होते, पण नाही जमलं. पूर्ण मुंडन केल्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला,” ती सांगते. “माझी ओळख काही माझ्या केसांमुळे नाहीये हे माझ्या लक्षात आलं. आणि कसंही काहीही झालं तरी माझ्या आई-वडलांचं माझ्यावर प्रेम आहे हे पाहून मी आनंदून गेले.”

तिच्या स्वप्नांनाही त्यांची साथ आहे. पदवीचं शिक्षण घेत असताना तिच्या वर्गात असलेल्या साठ मुलींपैकी बहुतेकींचं आता लग्न झालंय. “टाळेबंदी लागल्यानंतर त्यांनी मुलींची लग्नं लावून टाकली. काही जणी कामाला जातात. पण एकीनेही उद्योग सुरू केला नाही.”

उषा देवी वेंकटाचलन यांच्या मते अक्षयाला मिळत असलेलं यश पाहून हे चित्र बदलू शकेल. “इथलीच एक तरुण मुलगी एक पाऊल पुढे टाकत इथे गावातच एक प्रक्रिया केंद्र सुरू करते आणि राष्ट्रीय किंवा जागतिक स्तरावर पोचण्याचं स्वप्न पाहते हेच मुळात अतिशय प्रेरणादायी आहे,” त्या म्हणतात. “आणि यातून इतरांना, खास करून तिच्या समवयस्कांना किती तरी नव्या कल्पना सुचू शकतील.”

अक्षयाला आता एमबीए करायचंय. “अनेक जण आधी एमबीए करतात आणि मग उद्योग सुरू करतात. माझा प्रवास उलटा आहे.” आणि याचा फायदा होईल असंच तिला वाटतं. आपल्याच गावी रहायचं आणि इथूनच आपला ब्रँड विकसित करायचा हे तिने ठरवलं आहे. तिची स्वतःची वेबसाइट आहे, ती इन्स्टाग्राम आणि लिंक्डइनवर आहे. ती आपल्या पाककृती इतरांना पाठवते, विविध हॅशटॅग वापरते (#turmericlatte आणि इतरही बरेच). तिला शेतकरी उत्पादक कंपन्यांसोबत आणि निर्यातदारांशी जोडून घेत काम करायचंय. “शेतकऱ्यांनी आपल्या शेताकडे लक्ष द्यावं आणि विक्रीची बाजू सांभाळायला आम्ही आहोत ना,” ती म्हणते. शेत-बाजार आणि ग्राहकांतला महत्वाच्या दुव्याकडेच ती बोट दाखवते.

“सध्या कसंय सगळं काही तुम्ही तुमची गोष्ट कशी सांगता यावर आहे. “लोक माझ्याकडनं ही उत्पादनं घरी घेऊन जातात. समजा त्यांनी पैसे ठेवण्यासाठी बटवा वापरला तर दर वेळी तो काढला की माझ्या ब्रँडची त्यांना आठवण होईल आणि ते परत तो खरेदी करतील.” आणि अशाच पद्धतीने तमिळ नाडूची हळद फार दूर, सर्वदूर पोचेल...

या संशोधन कार्यास अझीम प्रेमजी युनिवर्सिटीच्या २०२० सालच्या रिसर्च फंडिंग प्रोग्राम अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्रः एम. पलनी कुमार

Aparna Karthikeyan

Aparna Karthikeyan is an independent journalist, author and Senior Fellow, PARI. Her non-fiction book 'Nine Rupees an Hour' documents the disappearing livelihoods of Tamil Nadu. She has written five books for children. Aparna lives in Chennai with her family and dogs.

Other stories by Aparna Karthikeyan
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale