क्रिकेटच्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यांचा मोसम सुरु आहे पण नयागावमधील रहिवाश्यांना त्याचा मागमूसही नाही. जवळच्या धुमासपूर गावात झालेल्या हिंसाचाराची सावट अजूनही इथे रेंगाळतंय. २१ मार्चला, होळीच्या दिवशी, क्रिकेट खेळणाऱ्या छोट्या मुलांच्या भांडणातून एका मुस्लिम कुटुंबावर हल्ला झाला. माध्यमातून या प्रसंगाला बरीच प्रसिद्धी मिळाली. हल्लेखोरांनी काठ्या आणि सळ्या वापरल्या होत्या आणि म्हणे त्या कुटुंबाला सांगितलं की ‘जा पाकिस्तानात आणि खेळा क्रिकेट’. हल्लेखोरांच्या पाच म्होरक्यांपैकी तीन जण नयागावचे आहेत.

“या भागातल्या प्रश्नांमध्ये लक्ष घालताना पोलीस जसे नेहमीच हलगर्जी असतात, तसेच ते याही वेळी होते,” गृहिणी असलेली ३१ वर्षांची राखी चौधरी म्हणते. “आम्ही ८-१० जणींचा एक गट बनवलाय, कुठलीही वादावादी झाली तर आम्ही त्यात मध्यस्थी करतो [बहुतेक प्रसंग गावातल्या मुलांनी मुलींची छेड काढण्याचेच असतात]. स्वसंरक्षणाचा हाच एक मार्ग आहे. पोलिस एक तर रहदारी सांभाळत असतात किंवा राजकारण्यांच्या भेटीत गुंतलेले असतात. हां, एखाद्या श्रीमंताने बोलावलं तर मात्र ते ताबडतोब हजर होतात. आम्हाला किड्यांसारखं वागवलं जातं.”

राखी नयागावमधील कृष्ण कुंज कॉलनीत राहते. (गावात मारुती कुंज कॉलनी सुद्धा आहे. काँग्रेस नेता संजय गांधी यांनी १९७० नंतरच्या दशकात जपानी मोटर कंपनीला इथे कारखाना काढायला बोलावलं तेव्हा कामगारांना राहायला तिथे घरं दिली होती.)

हरयाणातील भोंडसी, ता. सोहना, जि. गुरुग्राम या गावाच्या ग्रामपंचायतीतून जानेवारी २०१६ मध्ये नयागावची पंचायत वेगळी करण्यात आली. मेच्या १२ तारखेला नयागावचे मतदार गुरुग्राम लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करणार आहेत.

२०१४ मध्ये, तब्बल १३.२१ लाख मतदान झालं, (एकूण मतदार १८.४६ लाख) त्यात भाजपचे राव इंदरजित सिंघ यांनी इंडियन नॅशनल लोक दलाचे झाकीर हुसेन यांना २,७०,००० च्या मोठ्या मताधिक्याने हरवलं. गुरुग्राम मध्ये २००९ पर्यंत प्रबळ असलेल्या काँग्रेसचे राव धरमपाल सिंघ यांना १,३३,७१३ (१०.१२%) मते मिळाली तर आम आदमी पक्षाचे योगेंद्र यादव यांना ७९,४५६ (६.०२%) मते मिळाली.

woman
PHOTO • Shalini Singh
Women posing
PHOTO • Shalini Singh
Woman posing by the national flag
PHOTO • Shalini Singh

राखी चौधरी (डावीकडे), रुबी दास आणि तिची आई प्रभा (मध्ये) आणि इतर स्त्रियांसाठी सुरक्षितता आणि दळणवळण या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित बाबी आहेत, पूजा देवीला मात्र काही गोष्टी सुधारत आहेत असं वाटतं

राव इंदरजित सिंघ २०१९ ची लोकसभा निवडणुक पुन्हा लढवत आहेत. इतर दोन उमेदवार आहेत कॉंग्रेसचे निवृत्त कॅप्टन अजय सिंघ यादव आणि प्रथमच राजकारणात प्रवेश केलेले जननायक जनता पार्टी- आम आदमी पक्षाचे डॉ. मेहमूद खान.

राखी आणि इतर स्त्रियांच्या मते, दोन्ही निवडणुकांत प्रश्न तेच आहेत – सुरक्षितता हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. कृष्ण कुंजमध्ये राहणाऱ्या २० वर्षांच्या रुबी दासच्या मते गावाजवळील दारूच्या दुकानांची संख्या वाढली आहे. ती म्हणते, “आता आमच्या आसपास दारुड्यांची संख्या खूप वाढलीये. पोलिस आमच्या तक्रारींना दाद देत नाहीत. अलिकडेच एका दुकानात एका माणसाने एका महिलेला मारहाण केली पण तिथेच बसलेले पोलिस काही मध्ये पडले नाहीत. आम्ही जेव्हा शाळा-कॉलेजसाठी बस किंवा रिक्षाने प्रवास करतो तेव्हा बरेच मोटरसायकलस्वार आमची छेड काढण्यासाठी टपलेले असतात. रस्तेही इतके वाईट आहेत की भरभर चालूही शकत नाही.”

राव इंदरजित सिंघ २०१९ ची लोकसभा निवडणुक पुन्हा लढवत आहेत. इतर दोन उमेदवार आहेत कॉंग्रेसचे निवृत्त कॅप्टन अजय सिंघ यादव आणि प्रथमच राजकारणात प्रवेश केलेले जननायक जनता पार्टी- आम आदमी पक्षाचे डॉ. मेहमूद खान

भोंडसी गावातील स्त्री-पुरुष प्रमाण ६९९ आहे, हरियाणाच्या आधीच कमी असलेल्या [१००० पुरुषांमागे ८७९ स्त्रिया (२०११ ची जनगणना)]  इतर भागांपेक्षाही कमी. हा प्रामुख्याने गुज्जर लोकांचा भाग आहे, इतर समूह आहेत राजपूत आणि यादव, असे जिंद तालुक्यातील, नयागावपासून १५० किमीवरील बिबिपूर या गावाचे माजी सरपंच सुनील जगलन सांगतात. (२०१५ मधील ‘लेकीसोबत सेल्फी’ या मोहिमेची कल्पना त्यांची होती) “आपल्या मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन, गेल्या ७-८ वर्षांत यादवांनी प्रगती केली, पण गुज्जरांनी नाही,” असं ते म्हणतात. अनेक गुज्जर मुलींची आठवीतच लग्ने होतात. काही अडचण किंवा समस्या असल्यास उपयोग व्हावा यासाठी इथल्या मुलींकडे डीसीपी (पोलीस उपायुक्त) चा मोबाईल नंबर असावा असा प्रयत्न मी केला.”

मूलभूत सोयी सुविधा हाही इथला एक मोठा प्रश्न आहे. या नवीन गावाची सीमा निश्चित नोंदलेली नाही आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी मान्य झालेले रु. २३ कोटीही मिळालेले नाहीत, नयागावचे सरपंच सुरग्यान सिंघ सांगतात. गावचे रस्ते ओबडधोबड आणि खड्डेमय आहेत, सांडपाण्याची व्यवस्था नाही. छपरांवर विजेच्या तारांचे गुंते लोंबताना दिसतात आणि त्यावरून शेजाऱ्यांमध्ये भांडणंही लागतात!

“माझ्या कॉलनीतील सहा मोठ्या गल्ल्यांतील फक्त एकीत विजेचा खांब आहे. इतर ठिकाणी विजेच्या तारा आडव्यातिडव्या एकमेकीत गुंततात आणि लोक त्या कापतात... मग जिवंत तारा धोकादायकपणे लोंबत राहतात. त्यातून होतात भांडणं, पण करायचं काय?” ४६-वर्षीय अवधेश कुमार साहा सांगतात. ते मुळचे उ.प्र. मधील देवरिया जिल्ह्यातील आहेत आणि मयूर कुंज मध्ये एकटेच राहतात. त्यांचं एक छोटं होमिओपॅथिक औषधाचं दुकान आहे आणि त्यातून ते दिवसाला ५०-१०० रुपये कमावतात.

“आमचं ५० गज (४५० चौ.फूट) क्षेत्रफळ घराचं बांधकाम १७ लाखात झालं [पालम विहार मधील भाव पाहता स्वस्तात] हे खरं पण पालम विहार मधील भाड्याच्या जागेतील जीवन खूपच सुखकर होतं. तिथे सुरक्षितता होती, स्वच्छता होती....इथे मुलांसाठी काहीच नाही, ना बाग, ना इस्पितळ, आठवीपर्यंतची एकच सरकारी शाळा,” राखी सांगतात; त्यांचे पती मानेसारमध्ये कपड्यांची निर्यात करणाऱ्या एका कंपनीत काम करतात.

रिक्षा आणि शाळांच्या व्हॅन कमी असल्याने त्या चालवणारे अव्वाच्या सव्वा भाडी आकारतात. “इतर ठिकाणांपेक्षा इथले व्हॅनवाले अधिक पैसे मागतात. एखादा प्रवासी कमी असेल तर रिक्षाचालक तुम्हालाच त्याचे भाडे भरायला सांगतात आणि तुम्ही नाही म्हटलं तर जागचे हलतच नाहीत. जाण्यायेण्याची सोय नसल्याने अनेक मुली कॉलेज सोडतात. नजिकचं मेट्रो स्टेशन आहे हुडा [नयागाव व भोंडसी पासून १३-१५ किमीवर]. [राज्य परिवहनची] एक बस इथून जात असे पण आता तीही बंद झाली आहे,” रुबी सांगते.

Street
PHOTO • Sunil Jaglan
Electricity post
PHOTO • Sunil Jaglan

गुरुग्रामकडे दिल्लीहून येणाऱ्या रस्त्यावर नवनवी चकचकीत बांधकामं उभी राहत आहेत, नयागावमधील उघडी गटारं आणि लोंबणाऱ्या वायरी जिथल्या तिथेच आहेत

नऊ वाजताच्या क्लाससाठी ती सकाळी ५ वाजता आपल्या वडिलांसोबत बाहेर पडते; खरं म्हणजे कोचिंग क्लास त्यांच्या घरापासून फक्त पाऊण तासाच्या अंतरावर आहे. तिचे वडील एका रहिवासी संकुलात माळीकाम करतात. ती वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशपरीक्षेची तयारी करत आहे. “वेगवेगळ्या बस आणि रिक्षा घेऊन वडील आधी मला सोडतात आणि मग ते आपल्या कामाला जातात,” तिने सांगितलं. तिची आई प्रभा दास, वय ३८, १०-१५ किमी. अंतरावरच्या एका मोठ्या मॉलमधील बुटिकमध्ये काम करते आणि महिना १० हजार रुपये कमावते. सकाळी कामावर पोचायला तिला दोन तास लागतात.

काहीजण गुरुग्रामला ‘सहस्रकाचं शहर’ म्हणतात. ते देशातील प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांतील एक आहे आणि तिथे अनेक झगझगीत मॉल, महागड्या खाजगी शाळा, उंच इमारती, मोठ्ठाली गोल्फ मैदानं आणि अनेक ‘फॉर्च्यून ५००’ कंपन्या आहेत. मध्य दिल्लीपासून येणाऱ्या ४५ किमी.च्या रस्त्यावर याहूनही अधिक चकचकीत बांधकामं तयार होत आहेत. ती बांधकामं आणि भोंडसी आणि नयागावमधील उघडी गटारं आणि खडबडीत रस्ते, मोठा विरोधाभास दिसतो!

काही सुधारलंय का? “भ्रष्टाचार आणि लाच घेणं कमी झालंय असं वाटतं,” गृहिणी असणारी ३० वर्षांची पूजा देवी म्हणते. तिचा पती गुरुग्राममध्ये रिक्षा चालवतो. “घरातली ज्येष्ठ मंडळी सांगतात की त्यांना निवृत्तिवेतन (वेळेवर) मिळतंय. आम्हा सर्वांकडे गॅस जोडण्या आहेत. ऑनलाईन व्यवहार, चालान देखील आमच्या मोबाईलवर मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींमुळे आम्हाला असं वाटायला लागलं की ‘आम्ही पण कुणी तरी आहोत,” ती म्हणते.

मे महिन्याच्या रणरणत्या उन्हात जमलेल्या लोकांना सरपंच सुरग्यान सिंघ सांगताहेत की सत्तेतील पक्षाला मत द्या. त्यांना आणखी एक संधी द्या, ते सांगतात. “आपल्या मागण्या पूर्ण होतील असं आश्वासन आपण भाजप प्रतिनिधीकडून स्टँप पेपरवर घेऊ. नाहीतर आपण नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना बाहेरची वाट दाखवू!” पूजा सांगते, दुसऱ्याच दिवशी सध्याचे खासदार राव इंदरजित सिंघ इथे भेट देणार आहेत.

“रविवारी (५ मे) ते जेमतेम पाच मिनिटं इथे टेकले आणि म्हणाले की आम्ही जिंकलो तर आम्हाला शक्य होईल ते आम्ही करू,” दुसऱ्या दिवशी मला फोनवर जगलान यांनी सांगितलं. इतर दोघा उमेदवारांनी, अजय सिंघ यादव आणि मेहमूद खान, यांनी तर अजून इथे पाऊलही ठेवलेलं नाहीये.

Group of people posing
PHOTO • Shalini Singh
Man poses in front of a dispensary
PHOTO • People's Archive of Rural India

डावीकडे : “काही अडचण किंवा समस्या असल्यास उपयोग व्हावा यासाठी इथल्या मुलींकडे डीसीपी (पोलीस उपायुक्त) चा मोबाईल नंबर असावा असा प्रयत्न मी केला,” सुनील जगलान सांगतात. उजवीकडे: “माझ्या कॉलनीतील सहा मोठ्या गल्ल्यांतील फक्त एकीत विजेचा खांब आहे,” अवधेश साहा म्हणतात

राव इंदरजित सिंघ यांनी रविवारच्या इथल्या भेटीत  मोदींच्या नावाने मते मागितली. बहुतेक (भाजप) नेते मोदींच्याच नावाने मते मागतात,” अवधेश साहा म्हणतात, “मला वाटते, या निवडणुकीत इथली ८०% मते भाजपला जातील, मोदी आणि देशाची सुरक्षा यांसाठी.”

होळीच्या वेळची दंगल निवडणुकीचा मुद्दा आहे असे साहांना वाटत नाही. “त्याचा मतदानावर परिणाम होईल असे मला वाटत नाही कारण ते प्रकरण दोनेक आठवड्यात थंडावलं. त्यालाही आता जवळ जवळ दोन महिने उलटलेत...”

दरम्यान, अशीही बातमी आहे की हल्ला झालेल्या कुटुंबाने आपली भोंडसी पोलिसांकडची तक्रार एप्रिलमध्ये – तक्रार नोंदवल्यानंतर ३ आठवड्यांनी मागे घेतली आहे.

“प्रकरण मिटलेलं आहे. लोक आता त्याबद्दल बोलतही नाहीत आणि विचारही करत नाहीत, इथे कुणाला वेळ आहे? प्रत्येकाला आपलं काम आणि आपलं आयुष्य यांकडे वळायलाच हवं,” मुख्य तक्रारदार मोहम्मद दिलशाद यांनी मला सांगितलं.

“मी काम करणारा माणूस आहे, माझ्याकडे फार वेळ नाही. मला वेळ मिळाला तर मी जाऊन मतदान करीन,” ते पुढे म्हणाले. “काहीही असो, काय फरक पडतो? सर्वच राजकारणी आपली पोळी भाजण्यासाठी जातिवाद वापरून घेतात. रस्ते बांधणे, नोकऱ्या मिळवून देणे, वीज सुरळीतपणे देणे... यातलं ते तुमच्यासाठी काय करणार आहेत, हे कुणीच बोलत नाहीत. नेहमी मुद्दा उभा करतात हिंदू-मुसलमानांचा. कुणी हिंदू असो वा मुस्लिम, जनतेचे प्रश्न सोडवले गेले पाहिजेत.”

अनुवादः छाया देव

Shalini Singh

Shalini Singh is a founding trustee of the CounterMedia Trust that publishes PARI. A journalist based in Delhi, she writes on environment, gender and culture, and was a Nieman fellow for journalism at Harvard University, 2017-2018.

Other stories by Shalini Singh
Translator : Chhaya Deo

Chhaya Deo is a Nashik based activist of Shixan Bazaarikaran Virodhi Manch, a group working against commercialisation of education and for quality education which is a constitutional right of Indian citizens. she writes and also does translation work.

Other stories by Chhaya Deo