आठ वर्षाच्या रघुचा नवीन चेन्नई महानगरपालिकेच्या शाळेतला तो पहिला दिवस – फळ्यावर आणि पाठ्यपुस्तकात तमिळ भाषेत लिहलेले शब्द त्याला पूर्णत: नवखे होते. उत्तर प्रदेशात त्याचं घर असलेल्या नावोली गावातल्या शाळेत तो हिंदी किंवा भोजपुरी भाषेत वाचत होता, लिहीत होता आणि बोलतही होता.
आता तो फक्त पुस्तकातली चित्रं पाहून अंदाज बांधतोय. “एका पुस्तकात अधिक-वजाचं चिन्ह होतं, मग ते गणिताचं पुस्तक असावं; दुसरं पुस्तक विज्ञानाचं असावं; आणखी एका दुसऱ्या पुस्तकात बायका, मुलं, घरं आणि डोंगर होते,” तो सांगतो.
इयत्ता चौथीच्या वर्गात दुसऱ्या रांगेतल्या बाकावर तो शांतपणे बसला असताना, त्याच्या शेजारीच बसलेल्या मुलानं त्याला काहीतरी विचारलं. “सगळी मुलं मला घेरून उभी राहिली आणि तमिळमध्ये काहीतरी विचारलं. मला काहीच समजत नव्हतं ते काय बोलत होते. मग मी म्हटलं, ‘मेरा नाम रघु है’. ते सगळे जण हसायला लागले. मी घाबरलो.”
जेव्हा २०१५ साली रघुच्या आई-वडिलांनी जलौन जिल्ह्यातल्या नादीगाव तालुक्यातलं त्यांचं गाव सोडण्याचा निर्णय घेतला, त्या दिवशी चेन्नईला जाणाऱ्या रेल्वेत बसताना तो अगदी जमिनीवर लोळून रडला होता. त्याचा पाच वर्षांचा लहान भाऊ आपल्या वडिलांचा हात धरून उभा होता. “त्याला जायचंच नव्हतं. त्याला तसं रडताना पाहून माझ्या काळजाचं पाणी-पाणी झालं होतं,” त्याची आई, गायत्री पाल सांगते.
पण रघुच्या आई-वडिलांकडे रोजगारासाठी गाव सोडण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता. “शेतातून काहीच उत्पन्न येत नसेल तर गाव सोडावंच लागतं. त्या वर्षी अवघी दोन क्विंटल बाजरी झाली. पिकांना पाणी नाही, गावात काही दुसरं काम नाही. अर्धं गाव तर कधीच परराज्यात निघून गेलं होतं. जिथे कुठे काम-धंदा मिळाला तिथे लोक निघून गेले,” ३५ वर्षांची गायत्री सांगते. ती आणि तिचा नवरा, ४५ वर्षांचा मनिष, चेन्नईच्या दिशेने गेले, बांधकामावर काम करायला, त्यांच्या गावातले काही जण आधीच तिथे काम करत होते.












