यंदाच्या दिवाळीसाठी १०,०००-१२,००० पणत्या बनवल्या असल्याचं श्रीकाकुलम पारदेसम सांगतात. तब्बल ९२ वर्षांचे पारदेसम यांनी महिनाभर आधीच कामाला सुरुवात केलीये. रोज सकाळी उठून, कपभर चहा घेऊन ७ वाजता ते कामाला लागतात. दिवसभरात एक-दोनदा थोडी विश्रांती सोडली तर अंधारून येईपर्यंत त्यांचे हात सुरू असतात.
काही आठवड्यांपूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी स्टँडचा वापर करून पणत्या तयार करून पाहिल्या. “या पणत्या बनवायला थोड्या अवघड आहेत. त्या स्टँडची जाडी एकसारखी यावी लागते,” ते सांगतात. स्टँडमुळे पणती कलंडून तेल सांडत नाही तसंच पेटलेली वात बाहेर पडण्याचा धोकाही नसतो. पण अशी पणती करायला पाच मिनिटं लागतात. साध्या पणत्या पारदेसम अगदी दोन मिनिटात तयार करतात. साधी पणती ३ रुपयाला जाते. गिऱ्हाईक जाऊ नये म्हणून ते स्टँडच्या पणतीसाठी त्यापेक्षा एकच रुपया जास्त घेतात.
आपल्या कलेविषयी असणारं प्रेम आणि उत्साह या जोरावरच कुम्मारी वीधी (कुंभार आळी)मधल्या त्यांच्या घरातलं त्यांचं चाक गेली ८० वर्षं अखंड फिरतंय. आजवर त्यांनी दिवाळीसाठी लाखो पणत्या आणि दिवे तयार केले आहेत ज्यांनी दिवाळीत अनेकांची घरं उजळून टाकली आहेत. “मातीच्या साध्या गोळ्याला आमचे हात लागतात. आमचे हात, हे चाक आणि ऊर्जेमुळे त्यातून पणती तयार होते. कलाच आहे झालं,” पारदेसम सांगतात. नव्वदी पार केलेले हे आजोबा आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि आजकाल ऐकायला कमी येत असल्यामुळे फार बाहेर पडत नाहीत.
विशाखापटणम शहराचल्या अक्कय्यपालेमच्या गर्दीने गजबजलेल्या बाजारपेठेजवळच कुम्मारी वीधी आहे. या आळीत राहणारे बहुतेक सगळे कुम्मारी म्हणजेच कुंभार आहेत. मातीपासून मूर्ती आणि इतर वस्तू बनवणं हाच त्यांचा परंपरागत व्यवसाय आहे. पारदेसम यांचे आजोबा विशाखापटणम जिल्ह्याच्या पद्मनाभन मंडलातल्या पोन्टुरु गावाहून कामाच्या शोधात इथे आले. ते तरुण असताना कुंभाराची ३० कुटुंबं या गल्लीमध्ये पणत्या, कुंड्या, मातीच्या पिगी बँक, भांडी, पेले आणि मूर्तींसारख्या इतरही काही वस्तू बनवत होती. त्याच्या आठवणी आजही त्यांच्या मनात ताज्या आहेत.
पण आज विशाखापटणममध्ये पणत्या बनवणारं त्यांचं एकमेव कुटुंब उरलंय. आणि त्यातले ते अखेरचे कारागीर आहेत. कुंभाराची इतर कुटुंबं मूर्तीकाम किंवा इतर वस्तू घडवतायत. काहींनी ही कला सोडून दिली आहे. अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत तेही सणाच्या काळात मूर्ती बनवत होते पण नंतर त्यांनी ते थांबवलं. मूर्तीकाम जास्त कष्टाचं असतं आणि तासंतास जमिनीवर एकाच ठिकाणी बसून राहणं त्यांना जमेनासं झालं.













