आणि विजेता आहे... असं म्हटल्यावर जे काही घडतं, तसंच सगळं घडण्याच्या बेतात आहे. सहा पुरुषांचं एकमत झालंय की फणसाचा धंदा बायांचं काम नाही. वाहतूक म्हणा, वजनदार फळ उचलणं म्हणा, शक्यच नाही. या संभाषणानंतर पाचच मिनिटात लक्ष्मी दुकानात अवतरतात. पिवळी साडी, पिकत चाललेल्या केसाचा अंबाडा, नाका-कानात सोनं. “या धंद्यातली ही सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे बरं,” एक शेतकरी निवाडा देऊन टाकतो.
“आमच्या मालाचा भाव त्याच ठरवतात.”
पासष्ट वर्षांच्या ए. लक्ष्मी पनरुतीत फणसाचा व्यापार करणाऱ्या एकमेव महिला व्यापारी आहेत. आणि तितकंच नाही कृषी व्यापार क्षेत्रातल्या बऱ्याच अनुभवी व्यापाऱ्यांपैकीही त्या एक आहेत.
कडलूर जिल्ह्यातलं पनरुती हे गाव फणसासाठी प्रसिद्ध आहे. फळाच्या हंगामात इथे टनावारी फणसाची खरेदी विक्री होते. दर वर्षी पनरुतीतच्या मंडईतल्या २२ दुकानांमध्ये जे फळ विकलं जाईल त्याचा भाव लक्ष्मी ठरवतात. खरेदी करणाऱ्यांकडून त्यांना दर हजार रुपयांमागे ५० रुपये कमिशन मिळतं. शेतकरी पण त्यांच्या इच्छेनुसार त्यांना काही तरी देत असतात. त्यांच्या अदाजानुसार फणसाच्या हंगामात त्यांचं दिवसाचं उत्पन्न १,००० ते २,००० रुपये इतकं असतं.
पण हा पैसा हातात येतो कारण त्या दिवसाचे १२ तास काम करतात. आणि सुरुवात मध्यरात्री १ वाजता होते. “माल खूप जास्त असेल तर मला न्यायला व्यापारी पार मध्यरात्रीच घरी येतात,” लक्ष्मी सांगतात. रिक्षाने उशीरात उशीरा म्हणजे मध्यरात्री ३ वाजता त्या मंडीत पोचतात. त्यांचा कामाचा ‘दिवस’ दुपारी १ वाजेपर्यंत चालतो. त्यानंतर घरी जायचं, जेवायचं आणि निजायचं. ते परत एकदा रात्रीच्या अंधारात बाजारात जाईपर्यंत...
“फणस पिकतो कसा वगैरे मला फार काही माहित नाही,” त्या सांगतात. तासंतास बोलून, घसा ताणून ओरडून त्यांचा आवाज घोगरा झालाय. “पण तो विकायचा कसा ते मात्र मला थोडं फार माहित आहे.” थोडंफार? हा लक्ष्मींचा नम्रपणा. गेली तीस वर्षं त्या या धंद्यात आहेत आणि त्या आधीची २० वर्षं त्यांनी रेल्वेत फणस विकलाय.















