चेहरा पिवळा आणि पांढऱ्या रंगाने रंगवलेला, तीन लाल गोळे – एक नाकावर आणि दोन गालांवर दोन, विदूषकाच्या टोपीसाठी आज निळ्या प्लास्टिकची पिशवी डोक्यावर घातलेली, ओठावर कुठलं तरी मजेशीर गाणं आणि अंगात मुक्त लय – त्यांना पाहून कुणीही खिदळू लागावं. आणि हे सगळं अगदी नित्याचं आहे. येळिल अण्णांचं कला शिबिर सुरू होतं ते असं. जव्वादच्या टेकडीवरची सरकारी शाळा असो किंवा चेन्नई शहरातली एखादी झकपक खाजगी शाळा. सत्यमंगलमच्या जंगलात आदिवासींच्या शाळेत किंवा विशेष मुलांच्या, अण्णा एकदम गायलाच लागतात, किंवा एखादं छोटंसं नाटुकलं सादर करतात. मग काय, मुलांची भीती, लाज सगळं एका क्षणात गुल आणि मुलं पळतात, खिदळतात आणि सोबत गायला लागतात.
प्रशिक्षित कलाकार असलेल्या अण्णांना शाळेत काय काय सुविधा आहेत याची बिलकुल फिकीर नसते. ते कशाचीच मागणी करत नाहीत. राहण्यासाठी वेगळ्या हॉटेलमध्ये किंवा वेगळी काही सोय किंवा विशेष काही साहित्यसुद्धा नाही. वीज, पाणी किंवा भारी कागद-रंग इत्यादी काहीही नसलं तरी ते काम करतात. त्यांना फक्त मुलं हवीत, त्यांना भेटून, त्यांच्याशी संवाद साधत, त्यांच्या बरोबर ते काम करतात. बाकी सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. त्यांच्या आयुष्यातून तुम्ही मुलं वेगळी काढू शकत नाही. मुलांच्या संगतीत असले की एकदम वेगळे, राजबिंडे दिसायला लागतात.
सत्यमंगलममधल्या एका गावात ते काही मुलांबरोबर एकदा शिबिर घेत होते. या मुलांनी या आधी कधी रंगच पाहिले नव्हते. त्यांनी पहिल्यांदा या मुलांना रंग वापरून स्वतःच्या कल्पनेतलं काही तरी करायला शिकवलं. या मुलांसाठी हा अगदी आगळा अनुभव होता. आणि गेली २२ वर्षं, कलिमन विरलगल [मातीची बोटं] ही आपली कला शाळा सुरू केल्यापासून ते असंख्य मुलांना असेच अनुभव देतायत. आजारी आहेत म्हणून बसून राहिलेत असं अण्णांच्या बाबतीत कधीच झालेलं नाही. आजारपणावरचा रामबाण उपाय म्हणजे मुलांसोबत काम. त्यासाठी ते कधीही अगदी एका पायावर तयार.
तीस वर्षांपूर्वी, १९९२ साली अण्णांनी चेन्नई फाइन आर्ट्स कॉलेजमधून फाइन आर्टस या विषयातली पदवी घेतली. “माझ्या वरच्या वर्गात असलेले विद्यार्थी म्हणजे, चित्रकार, तिरु तमिलसेल्वन,” ते सांगतात, “वेशभूषाकार, श्री. प्रभाकरन, चित्रकार श्री. राजमोहन ज्यांनी कॉलेजच्या काळात कायम माझ्या पाठीशी उभे होते. पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी मला खूप मदत केलीये. टेराकोटा शिल्पकलेतला एक कोर्स पूर्ण केल्यानंतर मी कलाविषयक कामांमध्ये काही करून पहावं यासाठी चेन्नईच्या ललित कला अकादमीत प्रवेश घेतला.” स्वतःच्या मूर्तीशाळेतही काही वर्षं त्यांनी काम केलं.
“मी केलेल्या वस्तू विकल्या जायल्या लागल्या. पण माझ्या लक्षात आलं की त्या सामान्य माणसापर्यंत काही पोचत नाहीयेत. तेव्हाच मी ठरवलं की साध्यासुध्या माणसांसोबत कलेचे प्रयोग करायचे. आणि तमिळ नाडूचे पंचप्रदेश [डोंगर, समुद्रकिनारे, वाळवंटं, जंगल आणि पठारं] हीच माझी कर्मभूमी असेल. मग मी माझ्या मुलांसोबत मातीची खेळणी आणि इतर काही वस्तू बनवायला सुरुवात केली.” त्यांनी मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या – कागदी मुखवटे, मातीचे मुखवटे, मातीच्या वस्तू, रेखाटनं, चित्रं, काचेवरचं रंगकाम आणि ओरिगामी.