दुपारची वेळ होती. महाराष्ट्राच्या उल्हासनगरमध्ये पावसाची रिपरिप जराशी थांबली होती.
उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारापर्यंत एक रिक्षा जाते आणि थांबते. आपल्या डाव्या हातात लाल-पांढऱ्या रंगाची काठी घेतलेले ज्ञानेश्वर रिक्षातून खाली उतरतात. त्यांच्यामागून त्यांची पत्नी अर्चना ज्ञानेश्वर यांच्या खांद्यावर हात ठेवत उतरतात. त्यांच्या पायातल्या स्लिपरनी जमिनीवरचं चिखलाचं पाणी उडतं.
ज्ञानेश्वर ५०० रुपयांच्या दोन नोटा शर्टाच्या खिशातून काढतात आणि त्यातली एक रिक्षावाल्याला देतात. तो सुटे परत देतो. स्पर्शाने कोणतं नाणं आहे ते पाहत ज्ञानेश्वर म्हणतात, “पाच रुपये.” नाणं खिशात टाकून हाताने चाचपून ते खिशातच पडल्याची खात्री करतात. ३३ वर्षीय ज्ञानेश्वर तीन वर्षांचे असताना डोळ्याला झालेल्या व्रणामुळे त्यांची दृष्टी गेली.
उल्हासनगरच्या हॉस्पिटलमध्ये अर्चना डायलिसिस उपचार घेण्यासाठी येतात. अंबरनाथ तालुक्याच्या वांगणीमध्ये त्यांचं घर आहे. तिथून २५ किलोमीटर प्रवास करून इथे यायला एका खेपेचे ४८०-५२० रुपये होतात. “मी माझ्या मित्राकडून [या खेपेसाठी] १,००० रुपये उसने घेतलेत,” ज्ञानेश्वर सांगतात. “दर वेळीच [हॉस्पिटलला येताना] मला पैसे उसने घ्यावे लागतात.” हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावरच्या डायलिसिस सेंटरकडे दोघे जायला निघतात. सावकाश, एकेक पाऊल अगदी जपून टाकत.
अर्चना अंशतः अंध आहेत. या वर्षी मे महिन्यात मुंबईच्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वोपचार रुग्णालयात त्यांना जुनाट किडनीविकार असल्याचं निदान झालं होतं. “तिच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत,” ज्ञानेश्वर सांगतात. २८ वर्षीय अर्चना यांना आठवड्यातून तीन वेळा डायलिसिस करून घ्यावं लागतं.
“किडनी आपल्या शरीरासाठी अत्यावश्यक असणारा अवयव आहे – रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि शरीरातील अतिरिक्त पाणी किडनीमार्फत बाहेर टाकलं जातं. किडन्या निकामी झाल्या तर रुग्ण जिवंत रहावा यासाठी एक तर प्रत्यारोपण करावं लागतं किंवा नियमित डायलिसिस करून घ्यावं लागतं,” डॉ. हार्दिक शहा सांगतात. ते उल्हासनगरच्या सेंट्रल हॉस्पिटलमध्ये मूत्रपिंडविकार तज्ज्ञ आहेत. भारतात दर वर्षी एंड स्टेज रीनल डिसीज (ईएसआरडी) या आजाराचे २.२ लाख नव्या रुग्णांची नोंद होते. डायलिसिस उपचारांमध्ये ३.४ कोटी सत्रांची मागणी निर्माण होते.









