वरसोवा जेट्टीवर काही दिवसांपूर्वी एक दिवस सकाळी रामजीभाई खाडीच्या काठावर बसले होते. मी त्यांना विचारलं ते काय करतायत. “टाइमपास,” ते म्हणतात. “मी एवढा घरी नेणार आणि खाणार.” नुकत्याच पकडलेल्या एका छोट्या टेंगड्याकडे बोट दाखवत ते म्हणाले. बाकीचे मच्छीमार आदल्या रात्री खाडीत टाकलेली जाळी साफ करत होते – त्यांच्या जाळीत मासे नाही भरपूर प्लास्टिकच घावलं होतं.

“खाडीत मासे धरणं आजकाल जवळ जवळ अशक्य झालं आहे,” भगवान नामदेव भांजी म्हणतात. त्यांच्या आयुष्याची ७० हून अधिक वर्षं मुंबई के वेस्ट वॉर्डाच्या वरसोवा कोळीवाडा या मच्छिमार गावात गेली आहेत. “आम्ही लहान होतो ना तेव्हा इथले किनारे अगदी मॉरिशससारखे होते. पाण्यात नाणं टाकलं ना तर ते आरपार दिसायचं... पाणीच तेवढं नितळ होतं.”

भगवान यांच्या शेजाऱ्यांच्या जाळ्यात जी काही मासळी घावतीये – आणि आता जाळी समुद्रात खोलवर टाकली जातायत – ती देखील आकाराने लहान आहे. “पूर्वी आम्हाला मोठे पापलेट मिळायचे, पण आता फक्त लहान घावतायत. त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम झालाय,” भगवान यांच्या सूनबाई, ४८ वर्षीय प्रिया भांजी म्हणतात. गेली २५ वर्षं त्या मच्छी विकतायत.

इथल्या जवळ जवळ प्रत्येकाकडे मिळेनाशा झालेल्या किंवा लहान होत चाललेल्या मासळीच्या कहाण्या आहेत. या कोळीवाड्यात १,०७२ कुटुंबं राहतात आणि इथल्या ४,९४३ व्यक्ती मासेमारीत सहभागी आहेत (२०१० समुद्री मासेमारी जनगणना). आणि याची त्यांच्याकडची कारणं अगदी स्थानिक पातळीवरचं प्रदूषण ते जागतिक तापमान वाढ अशी आहेत. आणि या दोन्हीचा एकत्रित परिणाम वरसोव्यात पहायला मिळत असून वातावरणातल्या बदलांचे परिणाम शहराच्या किनाऱ्यांपर्यंत पोचल्याचंच त्यातून दिसून येतं.

Bhagwan Bhanji in a yard where trawlers are repaired, at the southern end of Versova Koliwada
PHOTO • Subuhi Jiwani

ट्रॉलर्सची दुरुस्ती होते त्या यार्डात वरसोवा कोळीवाड्याच्या दक्षिणेच्या टोकाला भगवान भांजी उभे आहेत

किनाऱ्याजवळ, आणि मालाडच्या खाडीत (वरसोव्यापाशी ही खाडी समुद्राला मिळते) सुमारे वीस वर्षांपूर्वीपर्यंत या कोळीवाड्याच्या मच्छिमारांना भिंग आणि पाला अगदी सहज मिळत होते. आज मात्र माणसाचा हस्तक्षेप या मासळीच्या मुळावर उठलाय.

आजूबाजूच्या वस्त्यांमधून वाहत येणाऱ्या १२ नाल्यांमधला कसलीही प्रक्रिया न केलेला मैला, उद्योगांचं आणि वरसोवा आणा मालाड पश्चिम या दोन नगरपालिकांच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून बाहेर पडणारं दूषित पाणी या सगळ्यामुळे भगवान यांच्या स्मृतीतलं नितळ, स्वच्छ पाणी गढूळलंय. “समुद्री जीवनच संपल्यात जमा आहे. हे सगळं प्रदूषण तब्बल २० समुद्री मैलापर्यंत पोचतं. सगळ्यांचा मैला, घाण आणि कचऱ्यामुळे स्वच्छ खाडीचं आता गटार झालंय,” भगवान म्हणतात. कोळी समाजाचा इतिहास, संस्कृती आणि स्थानिक राजकारणाचं त्यांचं ज्ञान सर्वांनाच सुपरिचित आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत ते त्यांच्या दिवंगत भावाच्या दोन बोटींची सगळी कामं करत होते – मच्छी सुकवणं, जाळी बांधणं, दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवणं, इत्यादी.

गढूळ पाणी म्हणजे खाडीत आणि किनाऱ्याजवळच्या पाण्यामध्ये विरघळलेल्या प्राणवायूचं प्रमाण कमी आणि सोबत शौचातील जीवाणू – अशा पाण्यात मासे जिवंत राहू शकत नाहीत. २०१० साली राष्ट्रीय पर्यावरणीय अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार “मालाड खाडीची स्थिती चिंताजनक आहे कारण खाडीत ओहोटीच्या वेळी विरघळलेला प्राणवायूच नाही... भरतीच्या वेळी स्थिती जरा बरी होती...”

महासागरांचं प्रदूषण आणि वातावरणातल्या बदलांचे एकत्रित असे दूरगामी परिणाम होतायत. विकासाची वाढती कामं, समुद्राचं आणि किनारी भागांचं प्रदूषण (ज्यातलं तब्बल ८०% प्रदूषण भूभागातून झालं आहे) आणि वातावरणातल्या बदलांचा समुद्री प्रवाहांचा होणारा परिणाम यामुळे समुद्रातील मृत प्रदेशांमध्ये (प्राणवायू नसणारे प्रदेश) वाढ होईल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या इन डेड वॉटरः मर्जिंग क्लायमेट चेंज विथ पोल्यूशन, ओव्हर-हार्वेस्ट आणि इनफेस्टेशन गल द वर्ल्ड्स फिशिंग ग्राउंड्स या शीर्षकाच्या पुस्तकात म्हटलं आहे. “... प्रदूषणाचे परिणाम आणखीनच वाढतात जेव्हा किनारी भागात बांधकाम वाढल्याने खारफुटीची वनं आणि इतर अधिवास उद्ध्वस्त होतात...”

Left: Struggling against a changing tide – fishermen at work at the koliwada. Right: With the fish all but gone from Malad creek and the nearby shorelines, the fishermen of Versova Koliwada have been forced to go deeper into the sea
PHOTO • Subuhi Jiwani
Left: Struggling against a changing tide – fishermen at work at the koliwada. Right: With the fish all but gone from Malad creek and the nearby shorelines, the fishermen of Versova Koliwada have been forced to go deeper into the sea
PHOTO • Subuhi Jiwani

डावीकडेः बदलत्या लाटांशी सामना – कोळीवाड्यात कामात मग्न मच्छीमार. उजवीकडेः मालाडची खाडी आणि जवळच्या किनाऱ्यांजवळचे मासे जवळपास संपून गेले असल्याने वरसोवा कोळीवाड्याच्या मच्छिमारांवर खोल समुद्रात जाण्याची वेळ आली आहे

मुंबईत देखील रस्ते, इमारती आणि इतर प्रकल्पांसाठी खारफुटीची वनं मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आली आहेत. माशांच्या प्रजननासाठी खारफुटीची वनं फार मोलाची आहेत. २००५ सालच्या इंडियन जर्नल ऑफ मरीन सायन्सेसनुसार, “खारफुटींच्या वनं समुद्री जीवनासाठी आधारभत आहेतच पण त्यासोबत किनाऱ्याची धूप रोखली जाते आणि समुद्रातल्या तसंच खाडीतल्या जीवांसाठी प्रजनन, अन्न आणि पिलांच्या वाढीलाही ही वनं मदत करतात.” या निबंधात पुढे असं नमूद केलं आहे की १९९० ते २००१ अशा केवळ ११ वर्षांत फक्त मुंबईच्या उपनगरांमध्ये ३६.५४ चौ.कि.मी. खारफुटी नष्ट झाली आहे.

“मासे अंडी घालायला किनाऱ्यावर [खारफुटीत] यायचे, पण आता ते शक्यच नाही,” भगवान सांगतात. “आपल्याला शक्य होतं ना तितकी सगळी खारफुटी आपण नष्ट करून टाकलीये. फार कमी वनं राहिली आहेत. उपनगरातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या इमारती, आणि इथल्या सगळ्या वसाहती, लोखंडवाला घ्या किंवा आदर्श नगर, सगळीकडे आधी खारफुटीची जंगलं होती.”

परिणामी, गेल्या अनेक वर्षांत मालाडची खाडी आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवरून मासे गायब झालेत आणि त्यामुळे वरसोवा कोळीवाड्याच्या मच्छिमारांना खोल दर्यात जाण्यावाचून पर्याय नाही. पण खोल समुद्रातही पाण्याचं वाढतं तापमान, चक्रीवादळांच्या संख्येत झालेली वाढ आणि ट्रॉलर्सने बेसुमार मासेमारी केल्यामुळे त्यांच्या धंद्याला फटका बसला आहे.

“पूर्वी, त्यांना मासेमारीसाठी खोल समुद्रात [किनाऱ्यापासून २० किलोमीटरहून आत] जावं लागायचं नाही कारण किनाऱ्याची परिसंस्था समृद्ध होती,” केतकी भाडगावकर सांगते. समुद्रकिनाऱ्यांचं प्रदूषण आणि वातावरणातल्या बदलांचे वरसोव्याच्या कोळीवाड्यावर काय परिणाम होत आहेत हे अभ्यासणाऱ्या बॉम्बे ६१ या वास्तुविशारदांच्या गटाची ती प्रणेती आहे. “मासेमारीसाठी खोल समुद्रात जावं लागत असल्यामुळे मासेमारी आर्थिकदृष्ट्या परवडणारी राहिलेली नाही. कारण मोठ्या नौकांसाठी जास्त खर्च येतो, जास्त लोक लागतात, इत्यादी. आणि एवढं करून जाळ्यात जास्त मासळी घावेल याची काही मच्छिमारांना शाश्वती नाही.”

Photos taken by Dinesh Dhanga, a Versova Koliwada fisherman, on August 3, 2019, when boats were thrashed by big waves. The yellow-ish sand is the silt from the creek that fishermen dredge out during the monsoon months, so that boats can move more easily towards the sea. The silt settles on the creek floor because of the waste flowing into it from nallahs and sewage treatment facilities
PHOTO • Dinesh Dhanga
Photos taken by Dinesh Dhanga, a Versova Koliwada fisherman, on August 3, 2019, when boats were thrashed by big waves. The yellow-ish sand is the silt from the creek that fishermen dredge out during the monsoon months, so that boats can move more easily towards the sea. The silt settles on the creek floor because of the waste flowing into it from nallahs and sewage treatment facilities
PHOTO • Dinesh Dhanga

३ ऑगस्ट २०१९ रोजी मोठमोठ्या लाटांनी बोटींना झोडपून काढलं तेव्हा वरसोवा कोळीवाड्याच्या दिनेश धंगांनी काढलेली छायाचित्रं. जी पिवळसर माती दिसतीये तो सगळा गाळ आहे. कोळी लोक पावसाळ्याच्या महिन्यात नावा समुद्रात सहजपणे नेता याव्यात म्हणून हा गाळ उपसून काढतात. नाल्यातनं आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून वाहत येणाऱ्या कचऱ्यामुळे हा सगळा गाळ खाडीच्या तळाशी बसतो.

खोल समुद्रातली मासेमारी अरबी समुद्राचं तापमान वाढत असल्यामुळे बेभरवशाची झाली आहे – १९९२ ते २०१३ या दरम्यान दर दशकात समुद्राचं पृष्ठभागाचं तापमान ०.१३ अंश सेल्सियसने वाढलं असल्याचं जिओग्राफिकल रीसर्च लेटर्स मधील एका निबंधात म्हटलेलं आहे. याचा समुद्री जीवनावर परिणाम झाला आहे असं डॉ. विनय देशमुख सांगतात. ते चाळीसहून अधिक वर्षं या संस्थेच्या मुंबई शाखेमध्ये कार्यरत होते. “टारली, जो प्रामुख्याने दक्षिणेकडे सापडतो तो उत्तरेकडे यायला लागलाय. आणि बांगडा, हाही दक्षिणेकडे जास्त सापडतो तो जास्त खोल पाण्यात [२० मीटरहून खोल] जायला लागलाय.” उत्तर अरबी समुद्र आणि खोल समुद्राचं पाणी अजूनही त्या मानाने थंड आहे.

मुंबई आणि महाराष्ट्राच्या समुद्राचं तापमान वाढण्याची घटना जागतिक पातळीवर एकमेकांत गुंतलेल्या प्रक्रियांचा एक भाग आहे. २०१४ साली आंतरशासकीय वातावरण बदल मंचाच्या (आयपीसीसी) अंदाजानुसार १९७१ ते २०१० या काळात, दर दशकात जगभरातल्या महासागरांतील पाण्याच्या वरच्या ७५ मीटर पट्ट्याचं तापमान ०.०९ ते ०.१३ अंश सेल्सियसने वाढलं असावं.

समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे काही माशांमध्ये जीवशास्त्रीय बदल घडून येत आहेत – जे लक्षणीय आणि “अपरिवर्तनीय आहेत,” डॉ. देशमुख म्हणतात. “जेव्हा पाणी त्या मानाने थंड होतं आणि तापमान सुमारे २७ अंशापर्यंत होतं तेव्हा मासे उशीरा परिपक्व व्हायचे. पाणी जसंजसं कोमट व्हायला लागलं तसं मासे लवकर परिपक्व व्हायला लागले. म्हणजेच कमी वयातच त्यांच्या शरीरात स्त्रीबीजं आणि पुरुषबीजं तयार व्हायला लागली. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा माशाच्या शरीराची वाढ मंदावते. बोंबील आणि पापलेटच्या बाबतीत हे आज आपल्याला स्पष्टपणे दिसून यायला लागलंय.”

तीस एक वर्षांपूर्वी पूर्ण वाढ झालेला पापलेट अंदाजे ३५०-५०० ग्रॅम भरायचा आणि आज तोच केवळ २००-२८० ग्रॅम भरतो असं डॉ. देशमुख आणि स्थानिक मच्छिमारांचं निरीक्षण आहे. पाण्याचं तापमान वाढल्यामुळे आणि इतर कारणांमुळे त्यांचा आकार छोटा होत चाललाय.

तीस वर्षांपूर्वी पूर्ण वाढ झालेल्या पापलेटचं वजन ३५०-५०० ग्रॅम भरायचं, आज मात्र ते फक्त २००-२८० ग्रॅमवर आलंय –तापमान वाढ व इतर घटकांमुळे माशाचा आकार कमी झालाय

व्हिडिओ पहाः कचरा भरलेल्या खाडीतली मासेमारी

पण डॉ. देशमुख यांच्या मते अतिरेकी मासेमारी हे जास्त जबाबदार आहे. बोटींची संख्या तर वाढलीच हे पण ट्रॉलर्स (ज्यातले काही कोळीवाड्यातल्या लोकांचेही आहेत) आणि इतर मोठ्या बोटी समुद्रात जास्त काळ थांबू लागल्यायत. २००० साली या बोटी ६-८ दिवस समुद्रावर असायच्या, नंतर ही संख्या १०-१५ वर पोचली आणि आता या बोटी १६-२० दिवस खोल समुद्रात असतात. समुद्रातल्या सध्याच्या मासळीवर याचा निश्चितच ताण पडला आहे. आणि समुद्राच्या तळाची संपूर्ण परिसंस्थाच ट्रॉलिंगमुळे बिघडली आहे. कारण “ते तळ खरवडून काढतात, वनस्पती उपटून टाकतात आणि त्यामुळे या जिवांची नैसर्गिकरित्या वाढ होऊ शकत नाही.”

२००३ साली महाराष्ट्रात मासेमारीने कळस गाठला, तेव्हा ४.५ लाख टन मासळी जाळ्यात आल्याची नोंद आहे जी १९५० पासून नोंद झालेल्या अतिहासातली सर्वात जास्त मासळी आहे. पण अतिरेकी मासेमारी सुरू झाल्यापासून मात्र दर वर्षी एकूण मासेमारी रोडावत चालली आहे – २०१७ साली ३.८ लाख टन मासळी पकडली गेली.

“अतिरेकी मासेमारी आणि समुद्राचा तळ ढवळून काढणारं ट्रॉलिंग यामुळे माशांचे अधिवास उद्ध्वस्त होत आहेत आणि सागरी जैवविविधतेच्या कळीच्या केंद्रांच्या निर्मितीलाच धोका निर्माण झाला आहे, ज्यातून वातावरणातील बदलांचा आघात जास्त तीव्र होत जाईल.” इन डेड वॉटर या पुस्तकात हे नमूद केलंय. हे पुस्तक पुढे सांगतं की माणसाच्या कर्माचा परिणाम (ज्यात प्रदूषण आणि खारफुटीची कत्तल समाविष्ट आहे) वाढत्या समुद्र पातळीमुळे आणि वादळांच्या वाढत्या संख्येमुळे व तीव्रतेमुळे जास्तच घातक होणार आहे.

अरबी समुद्रात हे दोन्ही अनुभवायला मिळतंय – आणि म्हणूनच वरसोवा कोळीवाड्यातही. “...माणसाच्या हस्तक्षेपामुळे अरबी समुद्रावर मोसमाच्या शेवटी शेवटी येणाऱ्या अतितीव्र चक्रीवादळांची शक्यता वाढली आहे...” नेचर क्लायमेट चेंज मध्ये २०१७ साली प्रकाशित झालेला एक निबंध सांगतो.

Extensive land reclamation and construction along the shore have decimated mangroves, altered water patterns and severely impacted Mumbai's fishing communities
PHOTO • Subuhi Jiwani

जमिनी तयार करण्यासाठी टाकलेले मोठमोठाले भराव आणि किनाऱ्यालगतचं बांधकाम खारफुटीच्या मुळावर उठलंय, पाण्याचे प्रवाह आटलेत आणि याचे मुंबईच्या मच्छीमार समुदायावर गंभीर परिणाम झालेत

वादळांचा सर्वात जास्त परिणाम मच्छिमारांवर होतो, असं आयआयटी मुंबईच्या वातावरण अभ्यास विभागाचे प्रमुख प्रा. डी. पार्थसारथी यांचं निरीक्षण आहे. “घावणारी मासळी कमी झाल्यामुळे कोळ्यांना खोल समुद्रात जावं लागतं. पण त्यांच्या [काही] बोटी खोल समुद्रासाठी बनलेल्या नाहीत. त्यामुळे जेव्हा वादळं किंवा चक्रीवादळं येतात तेव्हा त्यांनाच सर्वात मोठा फटका बसतो. मासेमारी दिवसेंदिवस जास्तच बेभरवशाची आणि धोकादायक बनत चाललीये.”

समुद्राची पातळी वाढणं ही याच्याशी संबंधित असणारी आणखी एक समस्या आहे. गेल्या ५० वर्षांत भारताच्या किनारपट्टीवर समुद्राची पातळी ८.५ सेंटीमीटरने– किंवा वर्षाला १.७ मिमीने वाढली आहे (नोव्हेंबर २०१९ मध्ये राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारने ही माहिती दिली आहे). जागतिक स्तरावर समुद्राची पातळी यापेक्षा अधिक जास्त वेगाने वाढत आहे – गेल्या २५ वर्षात वर्षाकाठी ३ ते ३.६ मिमी. आयपीसीसीतील आकडेवारी आणि २०१८ सालच्या प्रोसीडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस (अमेरिका) या शीर्षकाच्या एका निबंधात ही माहिती मिळते. या वेगाने २१०० पर्यंत जगभरातील किनाऱ्यावर समुद्राची पातळी ६५ सेंटीमीटर इतकी वाढण्याची शक्यता आहे – अर्थात हा वेग प्रदेशानुसार भिन्न आहे. भरती-ओहोटी, गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचं परिवलन अशा अनेक घटकांचा त्यावर प्रभाव पडतो.

डॉ. देशमुख धोक्याची घंटा वाजवतात आणि म्हणतात की समुद्राची पातळी वाढणं “वरसोव्यासाठी अधिकच धोक्याचं आहे कारण हे ठिकाण खाडीच्या मुखाला आहे आणि कोळी बांधवांनी कुठेही त्यांच्या बोटी उभ्या केल्या तरी त्यांना असणारा वादळी हवामानाचा धोका टळू शकत नाही.”

वरसोवा कोळीवाड्यातल्या अनेकांनी समुद्राची पातळी वाढताना पाहिलीये. हर्षा राजहंस तापके गेली ३० वर्षं मच्छी विकतायत. त्या म्हणतात, “कसंय, मासळी कमी मिळतीये, आणि लोकांनी [स्थानिक आणि बिल्डर] भराव टाकून आम्ही जिथे पूर्वी मच्छी सुकवायचो त्या जमिनी ताब्यात घेतल्यायत. आणि तिथे [रेतीवर] घरं बांधायला सुरुवात केलीये. या भराव टाकण्याच्या प्रकारामुळे खाडीतलं पाणी वाढलंय. किनाऱ्याजवळ आम्हाला ते दिसतंय ना.”

Harsha Tapke (left), who has been selling fish for 30 years, speaks of the changes she has seen. With her is helper Yashoda Dhangar, from Kurnool district of Andhra Pradesh
PHOTO • Subuhi Jiwani

हर्षा तापके (डावीकडे), गेली ३० वर्षं मच्छी विकतायत, त्यांच्या डोळ्यासमोर झालेल्या बदलांबद्दल त्या सांगतात. त्यांच्यासोबत त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या आंध्र प्रदेशच्या कुर्नूल जिल्ह्यातल्या यशोदा धांगर

आणि मग जेव्हा या शहरात प्रचंड मोठी अतिवृष्टी होते तेव्हा या सगळ्याचा – खारफुटी तुटणं, खाडीत भराव टाकून इमारती बांधणं, समुद्राची पातळी वाढणं आणि इतरही अनेक कारणांचा – कोळी समाजावर होणारा एकत्रित परिणाम प्रचंड असतो. उदाहरणार्थ, ३ ऑगस्ट २०१९ रोजी मुंबईमध्ये २०४ मिमी पाऊस झाला – गेल्या दहा वर्षातला तिसरा सर्वात अधिक पाऊस – आणि भरतीच्या लाटा ४.९ मीटरपर्यंत (सुमारे १६ फूट) उसळल्या. त्या दिवशी वरसोवा कोळीवाड्यात धक्क्याला उभ्या असणाऱ्या अनेक लहान बोटी या माऱ्यात झोडपून निघाल्या आणि कोळी बांधवांचं फार मोठं नुकसान झालं.

“कोळीवाड्याच्या त्या भागात [जिथे बोटी उभ्या असतात] भराव टाकलाय, मात्र त्या दिवशी जसं पाणी वाढलं ना तसं गेल्या सात वर्षांत कधीच वाढलं नव्हतं,” दिनेश धांगा सांगतात. वरसोवा मासेमारी लघु नौका संघटना या १४८ बोटींवर काम करणाऱ्या २५० मच्छीमारांच्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. “भरतीच्या वेळीच वादळ आलं, त्यामुळे पाणी दुपटीने वाढलं. काही बोटी बुडाल्या, काही मोडल्या. कोळ्यांची जाळी गेली आणि बोटींच्या इंजिनमध्ये पाणी शिरलं.” प्रत्येक बोटीची किंमत ४५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. आणि जाळ्याची किंमत अडीच हजारांवर जाते.

या सगळ्याचा वरसोव्याच्या कोळी बांधवांच्या उपजीविकेवर मोठा परिणाम झाला आहे. “घावणारी मासळी ६५-७० टक्क्यांनी कमी झालीये,” प्रिया भांजी सांगतात. “आता आम्ही बाजाराला १० टोकऱ्या घेऊन जातोय ना, आधी [वीस वर्षांपूर्वी] २० टोकऱ्या नेत होतो. लई फरक पडलाय.”

एकीकडे मासळी कमी झालीये आणि दुसरीकडे बंदरावर ठोक बाजारात जिथे बाया मासळी विकत घेतात तिथे मात्र भाव वाढलेत – त्यामुळे त्यांचा नफा कमी कमीच होत चाललाय. “पूर्वी आमची सगळ्यात मोठी मच्छी, फूटभर लांब [पापलेट] ५०० रुपयाला विकायची. आणि आता तेवढ्या पैशात सहा इंचाचा पापलेट विकतोय आम्ही. पापलेटचा आकार कमी झालाय आणि भाव मात्र वधारलाय,” प्रिया सांगतात. त्या आठवड्यातले तीन दिवस मच्छी विकतात आणि दिवसाला ५०० ते ६०० रुपयांची कमाई करतात.

Left: Dinesh Dhanga (on the right right) heads an organisation of around 250 fishermen operating small boats; its members include Sunil Kapatil (left) and Rakesh Sukacha (centre). Dinesh and Sunil now have a Ganapati idol-making workshop to supplement their dwindling income from fishing
PHOTO • Subuhi Jiwani
Left: Dinesh Dhanga (on the right right) heads an organisation of around 250 fishermen operating small boats; its members include Sunil Kapatil (left) and Rakesh Sukacha (centre). Dinesh and Sunil now have a Ganapati idol-making workshop to supplement their dwindling income from fishing
PHOTO • Subuhi Jiwani

डावीकडेः दिनेश धांगा (उजवीकडे) छोट्या बोटी असणाऱ्या २५० मच्छिमारांची संघटना चालवतात. त्यांच्या सदस्यांपैकी सुनील कापतीळ (डावीकडे) आणि राकेश सुकचा (मध्यभागी). मासेमारीतून मिळणाऱ्या घटत्या कमाईला जोड म्हणून दिनेश आणि सुनील यांनी आता गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरू केलाय

घटत्या कमाईला जोड म्हणून अनेक मच्छिमार कुटुंबांनी इतर कामं करायला सुरुवाता केलीये. प्रियाचे पती विद्युत केंद्र शासनाच्या अकाउंट्स खात्यात नोकरी करायचे (तिथून ते निवृत्त झाले आहेत), त्यांचा भाऊ गौतम एअर इंडियामध्ये स्टोअर व्यवस्थापक म्हणून काम करतो, त्याची बायको अंधेरीच्या बाजारात मच्छी विकते. “आता त्यांना ऑफिसात नोकऱ्या कराव्या लागतायत [कारण आता मासेमारीचा भरोसा नाही],” प्रिया सांगतात. “मी दुसरं काही करू शकत नाही, मला याचीच सवय पडलीये.”

४३ वर्षीय सुनील कापतीळ यांच्या कुटुंबाकडे छोटी नाव आहे आणि त्यांनी देखील कमाईचे इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काही महिन्यांपूर्वी, त्यांनी आपले मित्र दिनेश धांगा यांच्यासोबत गणपतीच्या मूर्ती तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. “पूर्वी आम्ही मासेमारीसाठी तासभराच्या अंतरावर समुद्रात जायचो पण आता आम्हाला २-३ तास पुढे जावं लागतं. आम्ही एका दिवसात २-३ पेटी मासळी घेऊन परत यायचो. पण आता कशी बशी एक पेटी भरते...” सुनील सांगतात. “कधी कधी दिवसाला १००० रुपये मिळतात, कधी कधी ५० रुपयांचीही कमाई होत नाही.”

तरीही, वरसोवा कोळीवाड्यातले अनेक जण आजही पूर्णवेळ मासेमारी करतायत, मच्छी विकतायत. समुद्राची पातळी वाढतीये, तापमान वाढतंय, अतिरेकी मासेमारी होतीये, प्रदूषण आहे, खारफुटी नष्ट होतायत, इतरही अनेक कारणं आहेत – आणि या सगळ्यामुळे जाळ्यात घावणारी मासळी कमी होतीये, मच्छीचा आकारही खुरटत चाललाय. २८ वर्षीय राकेश सुकचाला घरच्यांना हातभार लावण्यासाठी आठवीनंतर शाळा सोडावी लागली. तो मात्र आजही पूर्णपणे मासेमारीवरच अवलंबून आहे. तो सांगतोः “आमचा आजा आम्हाला एक गोष्ट सांगायचाः जंगलात जर का तुमच्यासमोर सिंह उभा ठाकला तर तुम्हाला त्याला तोंड द्यावंच लागतं. तुम्ही पळायला लागलात तर तो तुम्हाला खाणार. आणि तुम्ही जिंकलात तर तुम्ही खरे शूर. तसंच, आपण दर्याला सामोरं जायचं असतं ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे.”

नारायण कोळी, जय भाडगावकर, निखिल आनंद, स्टॅलिन दयानंद आणि गिरीश जठार यांनी केलेल्या सहाय्याबद्दल त्यांचे आभार.

साध्यासुध्या लोकांचं म्हणणं आणि स्वानुभवातून वातावरण बदलांचं वार्तांकन करण्याचा देशपातळीवरचा पारीचा हा उपक्रम संयुक्त राष्ट्रसंघ विकास प्रकल्पाच्या सहाय्याने सुरू असलेल्या उपक्रमाचा एक भाग आहे

हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा

अनुवादः मेधा काळे

Reporter : Subuhi Jiwani

Subuhi Jiwani is a writer and video-maker based in Mumbai. She was a senior editor at PARI from 2017 to 2019.

Other stories by Subuhi Jiwani
Editor : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi

P. Sainath is Founder Editor, People's Archive of Rural India. He has been a rural reporter for decades and is the author of 'Everybody Loves a Good Drought' and 'The Last Heroes: Foot Soldiers of Indian Freedom'.

Other stories by P. Sainath
Series Editors : Sharmila Joshi

Sharmila Joshi is former Executive Editor, People's Archive of Rural India, and a writer and occasional teacher.

Other stories by Sharmila Joshi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale