१९४९ साल होतं. १४ वर्षाचा जीबन कृष्ण पोद्दार आपल्या आई-वडील आणि आजीबरोबर बरिसाल जिल्ह्यातलं त्याचं घर सोडून पश्चिम बंगालला आला. नौखालीच्या भयंकर दंग्यांनंतर स्थलांतराची लाटच आली आणि पुढची कित्येक वर्षं लोक गाव सोडून जातच राहिले. घर सोडल्यानंतर दोन वर्षांनी पोद्दार कुटुंब अखेर सुंदरबनमध्ये स्थायिक झालं.

जीबनचं वय आता ८० च्या पुढे आहे. पावसाळी संध्याकाळ होती. घराच्या ओसरीत बसलेल्या जीबनदांच्या नजरेसमोर त्यांचा सगळा प्रवास झळकून गेला. ते पाथारप्रतिमा तालुक्यातल्या कृष्णदासपूरमध्ये कसे आले आणि आता हेच त्यांचं घर कसं झालं ते सगळं त्यांना आठवत होतं. “सगळीकडे हिंसेचा आगडोंब उसळला होता, त्यामुळे आम्हाला जावंच लागलं. माझी आई, उषा रानी पोद्दार तिचं नाव, तिने आमचा सारा पसारा १४ पोत्यांमध्ये बांधला. आम्ही जहाजाने खुलना शहरात (तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये) पोचलो. मग आगगाडीने बेनापोलला पोचलो. आम्ही सगळे पैसे आणि दागिने कपड्यात आणि इतर सामानात लपवून ठेवले होते.”

जीबनदांना आठवतं की त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना पश्चिम बंगालच्या नाडिया जिल्ह्यातल्या निर्वासितांच्या छावणीत नेण्यात आलं होतं. तिथे इतरही २०,००० नागरिक होते. त्यांच्यासोबत ते तिथे ११ महिने राहिले. निर्वासितांना दंडकारण्य (मध्य भारतातला बस्तरचा जंगलाचा प्रदेश), अंदमान बेटं आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये स्थायिक होण्यास सांगण्यात आलं.

“माझे वडील, शरत चंद्र पोद्दार. त्यांनी सुंदरबनची निवड केली,” जीबनदा सांगतात. “त्यांना स्वतःच्या मालकीची शेती करायची होती. मासे आणि शेती ही दोनच मुख्य आकर्षणं होती. दंडकारण्य आणि अंदमानची जंगलं निर्जन होती, त्यामुळे तिथे जगणं मुश्किल झालं असतं असा विचार त्यांनी केला असावा.”

हावड्याहून १५० कुटुंबं सुंदरबनला जायला निघाली. त्यातच जीबनदांचं कुटुंबही होतं. ते मथुरापूर तालुक्याला पोचले. तिथे भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्यांना शेतीसाठी जंगलं साफ करण्याचं काम सोपवलं. “आम्ही शेती सुरू केली, तेव्हा फार अवघड स्थिती होती. हा सगळा प्रदेश म्हणजे ६०% पाणी आणि ४०% जंगल. पिण्याचं पाणी शुद्ध नसायचं, किती तरी जण कॉलराने मरण पावले. १५ दिवसांतून एकदा डॉक्टर यायचा. आणि दुष्काळही होता. प्रचंड भूक आणि उपासमारीतून वाचलोय आम्ही.”

जीबनदांच्या वडलांना सरकारी कचेरीत नोकरी मिळाली. कर्मचाऱ्यांसाठी पंखा चालवणं हे त्यांचं काम. जीबनदांच्या आईने म्हशी पाळल्या होत्या आणि त्या दूध आणि अंडी विकत असत.

कालांतराने त्यांच्या कुटुंबाला कृष्णदासपूरमध्ये १० बिघे जमीन मिळाली. (पश्चिम बंगालमध्ये १ बिघा म्हणजे साधारण एक एकरचा तिसरा भाग) त्यांनी भाताची लागवड करायला सुरुवात केली. थोडा पैसा साठल्यावर त्यांनी अजून थोडी जमीन घेतली आणि गावात घर बांधलं. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या २६५३ इतकी नोंदवली आहे.

जीबनदा त्यांच्या बायको आणि ११ मुलांसोबत राहतात. २०१० च्या सुमारास ते गावातल्या पोस्ट ऑफिसमधून पोस्ट मास्टर म्हणून निवृत्त झाले. त्याच पोस्ट ऑफिसातून शिपाई म्हणून निवृत्त झालेले ६४ वर्षांचे प्रियरंजन दासदेखील मूळचे पूर्व बंगालमधले. ते दोन वर्षांचे असताना नौखालीतून त्यांच्या आई-वडलांसोबत १९५०च्या सुमारास इथे आले. “अन्नच नसायचं, त्यामुळे आम्ही देठं उकडून खात असू. कॉलऱ्याच्या भयंकर साथी पसरायच्या, किती तरी लोक गावं सोडून गेले, पण आम्ही इथेच राहिलो,” ते त्यांच्या आठवणी सांगतात.

१७६५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने बंगालचं प्रशासन आपल्या हातात घेतलं. त्यानंतर पश्चिम बंगालच्या काही भागातून, छोटा नागपूर आणि ओदिशातून किती तरी कुटुंबं सुंदरबनमध्ये आली. अमितेस मुखोपाध्याय (ले.लिव्हिंग विथ डिझास्टर्सः कम्युनिटीज अँड डेव्लपमेंट इन द इंडियन सुंदरबन्स) आणि अन्नू जलैस (ले. पीपल अँड टायगर्सः अँन अँथ्रोपोलॉजिकल स्टडी ऑफ द सुंदरबन्स ऑफ वेस्ट बेंगॉल, इंडिया) या दोघांनी लिहिलं आहे की इंग्रज राजवटीला महसूल वाढवायचा होता. त्यामुळे त्यांनी इथली जमीन ताब्यात घेऊन कसण्यासाठी भारतीय उपखंडाच्या वेगवेगळ्या भागातून मजूर इथे आणले.

सुंदरबनमध्ये काम करणाऱ्या टागोर सोसायटी फॉर रूरल डेव्हलपमेंट या स्वयंसेवी संस्थेचे रबी मोंडल सांगतातः “मेदिनीपूरचे दुष्काळ आणि पूर, बंगालची १९४७ ची फाळणी आणि १९७१ बांग्लादेशचं स्वातंत्र्ययुद्ध या सगळ्याचा परिणाम म्हणून  मोठ्या संख्येने लोक गावं सोडून बाहेर पडू लागले आणि त्यातले अनेक इथे सुंदरबनमध्ये येऊन स्थायिक झाले.”

१९०५ मध्ये आणखी एक स्थलांतर झालं. डॅनियल हॅमिल्टन हा स्कॉटिश व्यापारी सहकार चळवळीच्या माध्यमातून गोसाबा तालुक्यातल्या बेटांवर ग्रामीण पुनरुत्थानाचं काम करत होता. त्याने मजुरांना कसण्यासाठी जमीन भाडेपट्ट्यावर द्यायला सुरुवात केली. आजही अनेक स्थलांतरितांचे वंशज गोसाबामध्ये राहत आहेत आणि सुंदरबनच्या विकासातल्या हॅमिल्टनच्या योगदानाची त्यांना पूर्ण कल्पना आहे.

जोतीरामपूरमध्ये राहणारे ८० वर्षांचे रेवती सिंग मूळचे रांचीचे. त्यांचे आजोबा, आनंदमय सिंग हॅमिल्टनच्या सहकारी चळवळीचा भाग म्हणून १९०७ मध्ये गोसाबाला आले. “ते ट्रामने कॅनिंग ब्लॉकला आले. गोसाबाला बहुधा ते पायीच आले असणार. सध्या पायी हे अंतर १२ तासांचं आहे. कालांतराने हॅमिल्टनने मजुरांची ने आण करण्यासाठी छोट्या होड्यादेखील बांधल्या होत्या.”

तेव्हा इथली लोकसंख्या बरीच कमी होती असं रेवतींच्या ऐकिवात होतं, आणि तिथे सतत वाघ आणि मगरी हल्ले करत असत. यात आता काही फरक पडला आहे का? “आता वाघाचे हल्ले खूपच कमी झाले आहेत,” ते म्हणतात. “तेव्हाही फार काम मिळायचं नाही आणि आताही तीच गत आहे. मी भाताची लागवड करायचो पण मी ते सोडून दिलं. सगळ्या खाचरात नदीचं पाणी भरायचं.” रेवतींची तीन मुलं सध्या छोटी मोठी कामं करतात.

इथले अजून एक रहिवासी, लखन सरदार. त्यांचे आजोबा, भागल सरदारदेखील सहकार चळवळीतून रांचीहून इथे स्थलांतरित झाले होते. त्यांच्या सांगण्यानुसार, हॅमिल्टनच्या निमंत्रणाखातर विख्यात कवी व लेखक रवींद्रनाथ टागोरही १९३२ मध्ये गोसाबाला आले होते.


02-IMG_2147-US-'Maach and chaash brought us to Sundarbans%22.jpg

लखन आणि संध्या सरदारः १९०० च्या सुरुवातीच्या काळात लखन यांचे आजोबा रांचीहून गोसाबाला स्थलांतरित झाले.

सुंदरबनच्या रहिवाशांपैकी बरेच जण पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर भागातले आहेत. सततच्या पूर आणि दुष्काळामुळे मेदिनीपूरचे रहिवासी गावं सोडून इथे मजूर म्हणून किंवा शेती करायला येत राहिले. जोतिरामपूरचे ज्योतिर्मय मोंडल सांगतात की हॅमिल्टनच्या सहकारी चळवळीची सुरुवात व्हायच्या आधी त्याचे आजी-आजोबा मेदिनीपूरहून पायी सुंदरबनला आले होते. “माझ्या आजोबांनी राखणदाराचं काम घेतलं. काही वर्षांतच ते तापाने मृत्यू पावले. माझी आजी, दिगंबरी मोंडल घर चालवण्यासाठी इतरांच्या म्हशी राखायची, भाताचं पीक घ्यायची आणि तूप विकायची.”

मोहम्मद मोल्होर शेख गोसाबाच्या अरामपूर गावात लाकूड तोडायचं काम करून चरितार्थ सांभाळतात. त्यांचे पणजोबा, त्यांच्या दोन भावांसह मेदिनीपूरहून सुंदरबनला आले, तेही तब्बल १५० वर्षांपूर्वी. “लोखंडाच्या कांबींना पलिते लावून ते कसे वाघांना पळवून लावायचे त्याच्या सुरस कहाण्या आम्ही ऐकल्या आहेत. पण तेवढंच नाही त्यांनी भूक आणि दुष्काळाचा सामना कसा केला, भातशेतीचं सततचं नुकसान कसं सहन केलं याच्याही कहाण्या आम्हाला माहित आहेत.”



03-IMG_2154-US-'Maach and chaash brought us to Sundarbans%22.jpg

तब्बल १५० वर्षांपूर्वी मोहम्मद शेख यांचे पणजोबा मेदिनीपूरहून सुंदरबनला आले.


मेदिनीपूरने अजून एक स्थलांतराची लाट पाहिली आहे. पश्चिम बंगालचा १९४३चा दुष्काळ. एक्क्याहत्तर वर्षांच्या हरिप्रिया कार यांच्या सासरची मंडळी याच काळात गोसाबाला स्थलांतरित झाली. आता त्या ज्या जोतिरामपूरमध्ये राहतात, त्या गावाला त्यांच्या सासऱ्यांचं, जोतिराम कार यांचं नाव दिलं आहे. “जोतिराम आणि खेत्रमोहन हे दोघं भाऊ मेदिनीपूरहून सुंदरबनला आले. त्यांच्याबरोबर इतर २७ कुटुंबं इथे स्थायिक झाली. या सर्वांनी आसपासची जंगलं साफ केली आणि ते इथे वसले,” हरिप्रिया सांगतात.

हरिप्रिया आमच्याशी बोलत होत्या तेव्हा त्यांच्या घरात पूर्ण  अंधारून आलं होतं. थोड्याच वेळापूर्वी वीज गेली होती. जगण्याची साधनं इथे खरंच फार थोडी आहेत. वैद्यकीय सेवा मिळणं अवघड, आणि रस्ते जोडलेले नाहीत आणि एकूणच दळणवळणाची समस्या फार मोठी आहे. तरीही आज इथे राहणाऱ्यांच्या अडचणी त्यांच्या पूर्वजांइतक्या मोठ्या निश्चितच नाहीयेत. चांगल्या जीवनासाठीचा  संघर्ष सुरूच आहे, भूतकाळातल्या हाल अपेष्टा आणि अभावाची जाण ठेवत.


फोटोः ऊर्वशी सरकार

अनुवादः मेधा काळे


Urvashi Sarkar is an independent journalist and a 2016 PARI Fellow.

Other stories by Urvashi Sarkar
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Marathi Translations Editor at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale