“हे बघा, रडणं थांबवा. करू आपण काही तरी. मी बघते, मदत मिळेल तुम्हाला लागलीच,” सुनिता भोसले सांगते. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातल्या कणसेवाडी गावातून हा फोन आला होता.
ऐंशी वर्षांच्या शांताराम चव्हाणांना काही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. का तर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या रानात बांध घातला म्हणून. त्यांच्या लेकीने, पिंटीने त्यांना अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेलं. चाळिशीच्या पिंटीलाच सुनिता फोनवर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होती.
त्यानंतर तिने अहमदनगरच्या एका कार्यकर्त्याला फोन लावला. “त्या चव्हाणला परत मारलंय. आताच्या आता पोलिस चौकीत जावा. ३०७ खाली [भारतीय दंड विधानानुसार खुनाचा प्रयत्न] तक्रार दाखल करायला सांगा. आणि काय होतंय ते मला कळवत चला,” सुनिता त्यांच्याशी बोलते आणि फोन ठेवते.
दोन क्षण शांत बसलेली सुनिता संतापून म्हणते, “कसं काय करू शकतात ते असं? अहो, त्याची स्वतःची जमीन आहे. दुसऱ्यांदा घडलंय हे. आधीच त्यांनी त्याचा एक हात मोडलाय. आता काय जीव घेऊन शांत बसणारेत का काय?”
शांताराम चव्हाणांप्रमाणे सुनिता भोसलेदेखील फासे पारधी समाजाची आहे – आदिवासी विभागाने अनुसूचित जमात म्हणून या जमातीची नोंद केली आहे. या समुदायाने कित्येक दशकांपासून भेदभाव आणि हिंसा सहन केली आहे.








