रोज पहाटे, एक मशीनवर चालणारी देशी नाव ब्रह्मपुत्रेतील चालाकुरा चार बेटावरून निघते. दुधाने भरलेले प्लास्टिक आणि अॅल्युमिनियमचे कॅन घेऊन या बोटी तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या धुबरी शहरात रोज पोचतात.
चालाकुरा चार ब्रह्मपुत्रेतल्या अनेक अस्थायी आणि रेतीने तयार झालेल्या बेटांपैकी एक. (चार बेटांसंबंधी पारीवर अधिक वाचा वाळूचा किल्ला,‘चार’-निवासींचा संघर्ष) ही बोट दुपारी परत येते आणि अजून दूध घेऊन परत धुबरीच्या दिशेने निघते.
हे सगळं दूध दक्षिण आसामच्या धुबरी जिल्ह्यातल्या चार बेटावरच्या मोंडल कुटुंबाच्या डेअरीतनं येतंय. त्यांच्याकडे ५० दुभती जनावरं आहेत. रोज या डेअरीत १००-१२० लिटर दूध निघतं. “जेव्हा आमच्या दुभत्या गायी आणि म्हशी भरपूर दूध देत असतात तेव्हा तर दिवसाला १८०-२०० विटर दूध निघतं,” ४३ वर्षांचे तमेझुद्दिन मोंडल सांगतात. धुबरी शहरात दुधाला लिटरमागे ४० रुपये भाव मिळतो.





