१ एप्रिल २०२२ नेहमीसारखाच उजाडला. रमा पहाटे ४.३० वाजता उठली, जवळच्या विहिरीवर पाणी आणायला गेली, कपडे धुतले, झाडलोट केली आणि नंतर आईबरोबर कांजी पिऊन कामावर जायला म्हणून तयार झाली. गावापासून २५ किलोमीटरवर, दिंडिगल जिल्ह्याच्या वेदसंदुर तालुक्यातल्या नाची ॲपरल या कंपनीत कामाला निघाली. दुपार झाली आणि रमा आणि तिच्यासोबतच्या कामगार महिलांचं नाव इतिहासात कायमचं कोरलं गेलं. गेली दीड वर्षं त्या काम करत असलेल्या कपड्यांच्या कारखान्यात होत असलेला लैंगिक छळ थांबावा यासाठी त्या संघर्ष करत होत्या.
“खरं सांगू, मला तर वाटतंय की आम्ही अशक्य कोटीतलं काही तरी केलंय,” रमा म्हणते. ईस्टमन एक्सपोर्ट्स ग्लोबल क्लोदिंग (नाची ॲपरलची तिरुप्पुरस्थित कंपनी) आणि तमिळ नाडू टेक्स्टाइल अँड कॉमन लेबर युनियन (टीटीयूसी) यांनी त्या दिवशी एका करारावर सह्या केल्या. आणि करार कसला तर तमिळ नाडूच्या दिंडिगल जिल्ह्यातल्या ईस्टमन एक्सपोर्ट्स संचलित कपड्यांच्या कारखान्यांमध्ये होत असलेला लिंगाधारित भेदभाव आणि छळ संपवण्याचा. हाच तो दिंडिगल करार.
आणि मैलाचा दगड ठरणाऱ्या या कराराचा भाग म्हणून बहुराष्ट्रीय एच अँड एम या फॅशन ब्रँड्ने टीटीयूसी-ईस्टमन एक्सपोर्ट यांच्यातल्या कराराला पाठिंबा देण्यासाठी, तो अंमलात आणण्यासाठी एका ‘एन्फोर्सेबल ब्रँड अग्रीमेंट’ किंवा 'इबीए'वर सह्या केल्या. ईस्टमन एक्सपोर्टची नाची ॲपरल ही कंपनी स्वीडनमध्ये मुख्यालय असणाऱ्या या कंपनीसाठी कपडे तयार करते. एच अँड एमने सही केलेला हा करार आजवर जगभरात झालेला असा दुसराच करार आहे, ज्याद्वारे फॅशन उद्योगातला लिंगाधारित भेद दूर करण्याचा निर्धार केला गेला आहे.
रमा टीटीयूसीची सदस्य आहे. दलित स्त्रियांच्या नेतृत्वातली ही कापड कामगार महिलांची युनियन आहे. रमा नाची ॲपरलमध्ये गेल्या चार वर्षांपासून काम करत आहे. “मला वाटलंच नव्हतं की व्यवस्थापन आणि ब्रँड [एच अँड एम] दलित स्त्रियांच्या युनियनबरोबर असा काही करार करतील म्हणून,” ती म्हणते. “आता त्यांनी एकदम योग्य पाऊल उचललं असलं तरी आधी मात्र अनेक घोर चुका केल्या आहेत.” एच अँड एमने युनियनसोबत केलेला करार हा भारतामध्ये सही केलेला पहिला इबीए आहे. हा कायद्याचं पाठबळ असलेला करार आहे. ईस्टमन एक्सपोर्ट्सने टीटीयूसीला दिलेला शब्द जर पाळला नाही तर एच अँड एम कंपनीला त्यांना दंड करावा लागेल.
या सगळ्या घटना घडल्या, ईस्टमन करार करायला तयार झालं ते जयश्री कथिरवेल या २० वर्षीय दलित कापड कामगार महिलेवरच्या बलात्कार आणि खुनाच्या घटनेला तब्बल एक वर्षं उलटून गेल्यानंतर. कारखान्यातला वरच्या जातीचा एक पर्यवेक्षक अनेक महिने तिचा लैंगिक छळ करत होता. जानेवारी २०२१ मध्ये तिचा खून करण्यात आला. आणि या पर्यवेक्षकावरच या गुन्ह्याचा आरोप दाखल करण्यात आला आहे.
जयश्रीच्या खुनाने चांगलीच खळबळ माजली. ईस्टमन एक्सपोर्ट कंपनीवर बरीच आगपाखड करण्यात आली. एच अँड एम, गॅप आणि पीव्हीएचसारख्या तयार कपडे विकणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांना कपडे तयार करून पुरवणारी ही भारतातली सर्वात मोठी कंपनी आहे. जयश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू झालेल्या 'जस्टिस फॉर जयश्री' आंदोलनाचा भाग म्हणून जागतिक स्तरावर कामगार संघटनांच्या संघांनी, कामगार आणि महिला संघटनांनी मागणी केली होती की “कु. कथिरवेल हिच्या कुटुंबावर दंडात्मक कारवाई करणाऱ्या ईस्टमन एक्सपोर्टवर फॅशन ब्रँड्सनी कारवाई करावी”.







