उदरनिर्वाहाचे साधन म्हणून त्यांनी कधीच आंबेडकरी गीताकडे पाहिले नाही. पण आज वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांचा उदरनिर्वाहच अवघड होऊन बसला आहे. आता ते थकले आहेत. एकुलता एक मुलगा २००५ साली अपघातात मरण पावला. त्यावेळी सुनेसह तीन नातवंडांचा सांभाळ त्यांना करावा लागला. पुढे सुनेने वेगळा संसार मांडला. त्यांनी तिच्या स्वातंत्र्याचा आदर करत आपलं राहतं घर सोडून दुसरीकडे जागा शोधली. नगरपालिकेकडून मिळालेल्या दहा बाय दहाच्या घरात ते सध्या राहतात. लोककलावंत म्हणून जे अल्प मानधन मिळते त्यात वृद्ध आणि अपंग पत्नी ६५ वर्षीय देवबाई साळवे कसेबसे जीवन जीवन जगत आहेत. कितीही हाल अपेष्टा असल्या तरी आंबेडकरी चळवळ, भीमगीतं आणि संगीताप्रती असलेली त्यांची निष्ठा तसूभरही कमी झालेली नाही.
आज आंबेडकरी चळवळीत चळवळीला समांतर अशी नव्या प्रकारच्या गीतांची परंपरा निर्माण झालेली आहे. परंतु ती काहीशी बाजारू आणि उथळ बनली आहे. परंतु “अलिकडची लोक केवळ बिदागीसाठी, प्रसिद्धीसाठी या शाहिरीचा बाजार मांडतायत. ते पाहून काळजाला घरं पडतात,” दादू म्हणतात.
शाहीर दादू साळवेंना या गीतांबद्दल बोलताना पाहणे, तोंडपाठ असलेली गाणी त्यात प्रेमाने गाताना ऐकणे, बाबासाहेब आणि वामनदादांविषयी त्यांची श्रद्धा अनुभवणे हा मनाला उभारी देणारा अनुभव असतो.
दादू साळवे यांच्या आवाजातील भीमगीते उदासीनता आणि नैराश्यावर मात करण्याचे सामर्थ्य आपल्याला देतात. सामाजिक उदासीनतेवर भीमगीत सर्वात मोठे औषध आहे. हा इलाज आहे. महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने जे नवे जागरण होऊ घातले होते त्या जागरणाचा उगवतीचा अविष्कार म्हणूनच दादू साळवे यांच्या शाहीरीचा विचार करणे अपरिहार्य आहे. जी दलित शाहीरी पुढे नव्या सामाजिक विचारांनी सिद्ध झाली. त्याची नोंद म्हणून दादू साळवे यांच्या योगदानाची, त्यांच्या रचनेची लक्षणीयता अटळ आहे. भीम गीतांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचे व जीवनाचे वर्णन करून त्यांना प्रोत्साहन देणारे, आपण विषम समाजव्यवस्थेपुढे हार मानणार नाही याची जाणीव करून देते. अजूनही काळ बदललेला नाही. आंबेडकरी शाहीर पैसा आणि वैयक्तिक वाढीसाठी काम करत नाहीत हेच दादू साळवे यांचे गाणे आपल्याला सांगत राहते.
मुलाखत संपत येते आणि दादू जरासे मागे रेलतात. काही नवीन गीतांबद्दल विषय काढताच ते अगदी उत्साहात म्हणतात, “आजही कुणी मला गाणी वाचून दाखवू द्या, मी गायला तयार आहे.”
आंबेडकरी चळवळीचा हा शिपाई आजही आपला आवाज आणि पेटी घेऊन न्याय, समानता आणि निर्णायक सामाजिक बदलासाठी काम करायला सज्ज आहे.
हा लेख आणि चित्रफिती 'Influential Shahirs, Narratives from Marathwada’ (मार्गदर्शक शाहीर, मराठवाड्याची गीते-कथने) या मालिकेतील असून इंडिया फौंडेशन फॉर द आर्ट्स तर्फे राबवण्यात येणाऱ्या संग्रह व वस्तूसंग्रह कार्यक्रमाचा भाग आहेत. पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियासोबत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पास गोइथ इन्स्टिट्यूट/मॅक्स मुलर भवन दिल्ली यांचे आंशिक अर्थसहाय्य लाभले आहे.