हिरा निनामा आणि कल्पना रावल, दोघी ३५ वर्षांच्या आहेत. एकीमेकींपासूनचं अंतर १५ किलोमीटर, पण मुलगा हवा ही दोघींची इच्छा मात्र सारखीच. “आई-वडलांना मुलींचा काय फायदा?” बांसवाडा जिल्ह्यातल्या सेवना गावी मी हिराला भेटले तेव्हा ती म्हणाली. “वारस हवाच – किमान एक तरी मुलगा पाहिजेच,” याच जिल्ह्यातल्या वाका गावी कल्पना म्हणते.

२०१२ पासून गेल्या ७ वर्षांत हिराने सहा मुलींना जन्म दिलाय. गृहिणी असलेली हिरा अधून मधून शेतात मजुरी करते. सर्वात धाकटी मुलगी काही महिन्यांची आहे. “सहव्यांदा मुलगीच झालीये, मला कुणी सांगितलंच नाही. पण माझ्या सासूचं रडणं मी ऐकलं आणि माझ्याही डोळ्याला धारा लागल्या. माझ्या नवऱ्यापेक्षाही मी जास्त रडले असेन,” ती सांगते.

“मला दुसरी मुलगी झाली, तेव्हापासून मी बाबाजींकडे जातीये. ते एका नारळावर मंत्र टाकतात. मग तो फोडून त्यातलं पाणी मी पिते. त्यांचं म्हणणंय मी माझ्या आईपेक्षा जास्त कमनशिबी आहे,” स्वतः पाच बहिणींमधली सर्वात धाकटी असणारी हिरा म्हणते.

१२३७ लोकसंख्या असलेल्या सेवना गावची रहिवासी हिरा भिल आदिवासी आहे. ती निरक्षर आहे. एकामागून एक अनेक बाळंतपणं झालेल्या तिच्या आणि तिच्यासारख्याच इतर बायांना आरोग्याच्या बाबतीत मोठी किंमत मोजावी लागते – वयाच्या मानाने ती खूप अशक्त, वयस्क दिसते, तिचं शरीर सारखं ठणकत असतं आणि मनावरही सारखं दडपण असतं.

Niranjana Joshi, the ANM at the health sub centre administers the first ever vaccines to Hira Ninama’s fifth daughter
PHOTO • Puja Awasthi
Hira Ninama with her 40-day old daughter at the Health sub centre at Sewna
PHOTO • Puja Awasthi

सेवना उपकेंद्राच्या नर्सबाई निरंजना जोशी हिरा निनामाच्या सहाव्या मुलीला पहिल्या लसी टोचतायत

याच कारणामुळे राजस्थानात मातामृत्यूच्या प्रमाणात २०११-१३ ते २०१४-१६ या काळात केवळ १८.३ टक्के घट झाली आहे. देशासाठी हे प्रमाण २२ टक्के आहे. ‘२०१४-१६ या काळातील मातामृत्यूंसंबधी विशेष वार्तापत्रा ’त ही आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे (मे २०१८ मध्ये भारताच्या महारजिस्ट्रार कार्यालयातर्फे प्रकाशित). म्हणजे, भारतात दर १,००,००० जिवंत जन्मांमागे १३० माता मृत्यू होतात, राजस्थानात हे प्रमाण १९९ इतकं आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या (यूएनडीपी) स्त्री सक्षमीकरण तालिकेच्या आर्थिक आणि राजकीय जीवनात स्त्रियांचा सहभाग तसंच आर्थिक संसाधनांवर स्त्रियांची मालकी या निकषांवरही राजस्थानाची कामगिरी वाईट आहे. २००९ साली महिला व बाल विकास मंत्रायलयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही असं नमूद केलं आहे की आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक संसाधनांसंबंधी स्त्रिया आणि पुरुषांमधील विषमता मोजणाऱ्या यूएनडीपी च्या लिंगभाव विकास निर्देशांकांवरही राजस्थान “सातत्याने सुमार कामगिरी” केली आहे.

होणाऱ्या बाळांचं लिंग आपल्यावर अवलंबून नाही हे काही हिराला पटत नाही असं सेवना उपकेंद्रात नर्स म्हणून काम करणाऱ्या आणि आरोग्यासंबंधी हिरा मदतीसाठी ज्यांच्याकडे जाते त्या निरंजना जोशी सांगतात. शेतमजुरी आणि बांधकाम मजूर म्हणून काम करणारा आपला नवरा खेमाकडून होणारा शारिरीक आणि शाब्दिक छळ, आपल्या मुलींकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष हे भोग तिने आता स्वीकारले आहेत.

हिरा आणि कल्पना राहतात त्या बांसवाडा जिल्ह्यातली तीन चतुर्थांश लोकसंख्या भिल आदिवासींची आहे. दर १००० पुरुषांमागे ९८० स्त्रिया असं लिंग गुणोत्तर आहे. राज्याच्या १००० पुरुषांमागे ९२१ स्त्रिया (जनगणना, २०११) या प्रमाणापेक्षा हे खूपच जास्त आहे. पण राज्याच्या ६६.११ टक्के साक्षरतेच्या तुलनेत इथली निम्म्याहून थोडीच अधिक (५६.३३) जनता साक्षर आहे. आणि राज्यातल्या १० पैकी ७ स्त्रियांनी काही तरी शिक्षण घेतलं असताना बांसवाडामध्ये मात्र हे प्रमाण १० पैकी ४ इतकं कमी आहे.

Kalpana Rawal (blue saree) is leading a women’s group in her village to promote women’s health
PHOTO • Puja Awasthi
Kalpana Rawal (blue saree) is leading a women’s group in her village to promote women’s health
PHOTO • Puja Awasthi

कल्पना रावल (निळ्या साडीत) त्यांच्या गावात महिलांच्या आरोग्याविषयी जाणीवजागृतीचं काम करणाऱ्या गटाच्या प्रमुख आहेत, पण शिक्षण किंवा जागृतीतून महिलांचं आरोग्य सुधारतंच असं काही नाही

पूर्वापारपासून मनात ठाण मांडून बसलेल्या या विचारांना कल्पना आणि इतर काही जणी आव्हान देत आहेत. कल्पना रावल समाजाच्या आहेत (जनगणनेत अनुसूचित जात म्हणून नोंद), त्यांचं शिक्षण ८ वीपर्यंत झालं आहे आणि बांसवाडा जिल्ह्याच्या घालकिया पंचायतीतल्या वाका या १,३९७ लोकसंख्या असणाऱ्या गावी त्या राहतात. नुकत्याच सुरू झालेल्या ‘ताजो परिवार’ (स्थानिक बगाडी भाषेत ‘निरोगी परिवार’) या गटाच्या स्थानिक शाखेच्या त्या प्रमुख आहेत. आपल्या समाजात माता आरोग्याविषयी जाणीव जागृती करणाऱ्या या गटात २५ सदस्य आहेत. दिल्लीस्थित प्रिया या संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने सुरू केलेल्या ‘अपना स्वास्थ्य, अपनी पहल’ (आपलं आरोग्य, आपली सुरुवात) या उपक्रमाचा भाग म्हणून ताजो परिवारांची सुरुवात करण्यात आली आहे. माता आरोग्याविषयी माहितीचा प्रसार, बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्यात सुधारणा आणि पंचायतीच्या कामाला बळकटी देणं असे या कामाचे उद्देश आहेत.

ताजो परिवाराचं काम अनेक अभ्यासांच्या निष्कर्षांवर आधारित आहेत. हे अभ्यास दाखवतात की ज्या समुदायांमध्ये आरोग्याला पुरेसं महत्त्व दिलं जात नाही त्या समुदायातल्या बाया ‘आरोग्यसेवांचा लाभ घेण्यात कमी’ पडतात. मार्च २०१८ मध्ये प्रियाने दोन जिल्ह्यातल्या (बांसवाडा व गोविंदगढ) १८०८ स्त्रियांबरोबर केलेल्या एका अभ्यासात असं दिसून आलं की बांसवाडातल्या १० पैकी ७ स्त्रियांना माता आणि बाल आरोग्यासंबंधी माहिती देणारं वा समुपदेशन करणारं असं कुणीच नव्हतं आणि अचानक काही आजारपण आलं तर एक तृतीयांश स्त्रियांकडे पैसेही नव्हते. तसंच, दर पाचातल्या तीन जणींचं स्वतःच्या आरोग्य किंवा पोषणासंबंधीच्या निर्णयांवर कसलंही नियंत्रण नव्हतं.

“आमची लोकं फार विखुरलेली आहेत. आम्ही घरोघरी जाऊन निरोधचं वाटप करतो, लसीकरणासाठी लोकांना बोलावतो, जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून साधे खबरदारीचे उपाय सांगतो आणि इतरही बरंच काही,” ताजो परिवारचं काम कल्पना सांगतात. बांसवाडा आणि गोविंदगढ तालुक्याच्या १८ पंचायतींमध्ये हे गट सध्या काम करतायत. प्रत्येक गटात सरासरी २० सदस्य आहेत, सगळ्या स्वेच्छेने काम करतात.

कल्पना ‘मनरेगा सखी’ देखील आहेत (या योजनेसाठी लोकांची नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे नियुक्त). त्या म्हणतात की स्त्रिया निमूटपणे सगळं सहन करतात. “खूप रात्र झाली असली तर त्या रुग्णवाहिकाही बोलावणार नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचं सोडून [इथून ३ किमीवर घालकियालमध्ये] त्या झोला छाप डॉक्टरकडे जाणं पसंत करतात, जो त्याच्याकडची औषधं किराणा मालाच्या दुकानात ठेवून जातो,” त्या सांगतात.

Kalpana Rawal’s and her husband Gorak Nath
PHOTO • Puja Awasthi
Members of the Tajo Parivar believe they can overcome tradition barriers to health seeking behaviour
PHOTO • Puja Awasthi

डावीकडेः ‘मला माहितीये की आम्हाला मूल नाही यात माझ्या बायकोचा काही दोष नाहीये,’ कल्पनाचे पती गोरख नाथ म्हणतात. उजवीकडेः ताजो परिवाराच्या सदस्य वाका गावात

पण शिक्षण आणि जागृतीतून स्त्रियांचं आरोग्य सुधारतंच असं काही नाही. कल्पनाचं स्वतःचंच उदाहरण पाहिलं तर कळून येतं की समज बदलण्याच्या कामाला खूप वेगवेगळे पदर आहेत आणि ते एक अवघड काम आहे. २० वर्षांपूर्वी त्यांचं आणि गोरखनाथ (तेही मनरेगा मित्र आहेत) यांचं लग्न झालं, त्यांना मूल नाही – ज्यामुळे गोरखनाथ यांच्या घरच्या तीन बिघा [१ बिघा – ०.४ एकर] वडिलोपार्जित जमिनीत वाटा मिळण्यासाठी ते पात्र आहेत का नाही यावरून मोठा वादंग उसळला आहे.

मूल न होण्याचं कारण शोधण्यासाठी कल्पना आणि गोरखनाथ दोघांच्या वैद्यकीय तपासण्या झाल्या आहेत. कल्पनाच्या बाबतीत कसलीही शारीरिक कारणं आढळून आली नाहीत, मात्र गोरख नाथ यांच्या तपासणीत शुक्राणूंचं प्रमाण कमी असल्याचं आढळलं. तरीही, हे माहित असूनही कल्पनाला असं वाटत राहिलं की त्यांच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तर कदाचित त्यांना मूल होऊ शकेल. “माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न करायचं ठरवलं तर माझी काय हरकत असणार? वंशाला दिवा मिळाला तर चांगलंच आहे, किमान एक तरी मुलगा हवाच,” त्या सखेद म्हणतात.

गोरख नाथ मात्र वेगळा विचार करतात. “मला माहितीये की आम्हाला मूल नाही यात माझ्या बायकोचा काही दोष नाही,” ते म्हणतात. “मी दुसरं लग्न करण्याचा विचारही केलेला नाही. ती मागे लागली तरी काही फरक पडत नाही. आमच्या समाजातली म्हातारी मंडळी आणि माझ्या घरच्यांनाही असंच वाटतं की मूल जन्माला घालणं ही बाईचीच जबाबदारी आहे. मात्र मला माहितीये ना की दोघं सारखीच जबाबदार आहेत.”

मात्र, जाणीव जागृती करणं आणि लोकांचे समज बदलण्याचं काम ही बायांचीच प्राथमिक जबाबदारी आहे असं त्यांना वाटतं. “बायांशी अशा [बाळंतपणासारख्या] विषयावर बोलायला गडी कचरतात,” ते म्हणतात. “हे काम बायांनीच केलेलं चांगलंय.”

कल्पनाला मात्र माहितीये की संपूर्ण समाजाने ठरवलं तरच असले समज बदलू शकतात. “आपण स्वतःच पुढाकार घ्यायला पाहिजे,” त्या म्हणतात.

अनुवादः मेधा काळे

Puja Awasthi

Puja Awasthi is a freelance print and online journalist, and an aspiring photographer based in Lucknow. She loves yoga, travelling and all things handmade.

Other stories by Puja Awasthi
Translator : Medha Kale

Medha Kale is based in Pune and has worked in the field of women and health. She is the Translations Editor, Marathi, at the People’s Archive of Rural India.

Other stories by Medha Kale