नागी रेड्डी तमिळ नाडूचे रहिवासी आहेत, कन्नड बोलतात आणि त्यांना तेलुगु वाचता येते. डिसेंबर महिन्यातल्या एका सकाळी आम्ही काही किलोमीटर अंतर चालत जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांनी अगदी सहज “ते काय तिकडेच आहे” असं सांगितलं खरं पण ते तिकडे म्हणजे एका तुडुंब भरलेल्या तळ्याच्या काठाने, चिंचेच्या झाडापुढून, नीलगिरीची एक टेकडी ओलांडल्यावर, आमराईच्या खाली. राखणीला एक कुत्रा, केकाटणारं पिलू आणि जनावराचा गोठा होता अगदी तिथेच.

शेतकऱ्याला भेडसावणाऱ्या कटकटी आणि डोकेदुखी तर नित्याचीच पण नागी रेड्डींना एक गोष्ट इतकी सतावतीये की आता पिकं बदलावी की काय इथपर्यंत ते येऊन पोचलेत. आणि याला कारण ठरलेत तीन अजस्त्र, भयंकर वल्लीः मोट्टई वाल, मखना आणि गिरी.

शेतकऱ्यांना एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे. या तिघांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. अक्षरशः नाही. एकेकाचं वजन जर ४,००० ते ५,००० किलो असलं, तर नाहीच. चाल करून येणाऱ्या या हत्तींचं नेमकं वजन किती, त्यांची नेमकी उंची किती याचा तपास गावकऱ्यांनी लावलेला नाही, त्याबद्दल त्यांना माफ करू टाकू या.

आम्ही तमिळ नाडू आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवरच्या कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये आहोत. देनकनीकोट्टई तालुक्यातल्या नागी रेड्डींचा वडरा पालयम हा पाडा जंगलापासून, हत्तींपासून फार काही दूर नाही. सिमेंटचं पक्कं बांधकाम केलेल्या त्यांच्या ओसरीत आम्ही बसलोय ती देखील त्यांच्या शेतापासून हाकेच्या अंतरावर. ८६ वर्षांच्या नागी रेड्डींना गावकरी प्रेमाने नागण्णा म्हणतात. अत्यंत पौष्टिक अशी नाचणी ते पिकवतात. गेल्या तीन दशकांमध्ये शेतीमध्ये काय काय बदलत गेलं त्या सगळ्याचे ते साक्षीदार आहेत. आणि यातलं बरंच काही चांगलं, वाईट आणि अनेकदा तर विदारक आहे.

“मी लहान होतो तेव्हा आनई (हत्ती) नाचणीच्या हंगामात वासाला भुलून काही दिवस शेतात यायचे.” आणि आता? “आता सारखेच यायला लागलेत. पिकं आणि फळांवर ते ताव मारतात.”

यामागे दोन कारणं आहेत, नागण्णा तमिळमध्ये सांगतात. “१९९० नंतर या जंगलातल्या हत्तींची संख्या एकदम वाढली पण जंगलाचा आकार आणि झाडझाडोरा मात्र कमी झाला. त्यामुळे भूक लागल्यावर ते इकडे यायला लागले. आणि आपण कसं एखाद्या चांगल्या ठिकाणी खाऊन आलो की आपल्या मित्रमंडळींना सांगतो, तसंच त्यांचंही आहे,” त्यांनी दिलेल्या उपमेचा त्यांना खेद वाटतो आणि मला आश्चर्य.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः नागी रेड्डींच्या शेतात कापणीला आलेली नाचणी. उजवीकडेः हत्तींना हाकलून लावण्यासाठी वनखात्याने दिलेल्या एलईडी दिव्यांचा झोत मारून दाखवणाऱ्या आनंदरामूकडे पाहणारे नागण्णा

त्यांना परत जंगलात कसं काय पाठवायचं? “आम्ही कूचल म्हणजेच खूप मोठ्याने आवाज करतो. आणि प्रकाशाचा झोत टाकतो,” एलईडी विजेरीकडे बोट दाखवत ते सांगतात. आनंदरामू ज्यांना सगळे आनंदा म्हणतात ते आम्हाला वनखात्याने दिलेली विजेरी सुरू करून दाखवतात. एकदम मोठा झोत पडतो, वजनाला हलकी आणि स्वच्छ प्रकाश पाडणारी ही विजेरी आहे. “पण दोन हत्तीच परत जातात,” नागण्णा सांगतात.

“मोट्टई वाल नुसता वळतो, प्रकाशाच्या झोतापासून नजर हटवतो. खाणं सुरूच,” ओसरीच्या दुसऱ्या टोकाला जात, विजेरीकडे पाठ फिरवत आनंदा मोट्टल वाईची नक्कल करून दाखवतात. “सगळं खाणं होईस्तोवर मोट्टल वाई काही हलत नाही. जणू काही तो म्हणतोः तुम्ही तुमचं काम करा – विजेरीचा उजेड मारत बसा आणि मी माझं करतो – पोट भरेपर्यंत हादडतो.”

आता त्याचं पोटच भलं मोठं आहे त्यामुळे त्याला जे सापडेल ते तो हादडतो. पण नाचणीवर त्याचा विशेष जीव आहे. आणि फणससुद्धा फार आवडीचे. जर वरच्या फांद्यांपर्यंत सोंड पोचली नाही तर तो दोन पाय झाडावर ठेवून उभा राहतो आणि लांबलचक सोंडेने फणस तोडतो. आणि झाड जास्तच उंच असेल तर तो चक्क ते मोडून खाली पाडतो आणि फळांवर ताव मारतो. “मोट्टई वाल १० फूट उंच आहे,” नागण्णा सांगतात. “आणि जर तो दोन पायांवर उभा राहिला तर आणखी सहा ते आठ फूट उंची वाढते,” आनंदा सांगतात.

“पण एक आहे, मोट्टई वाल माणसांना कधीच काही करत नाही. तो मका खातो, आंबे फस्त करतो, वाटेत येतील ती पिकं तुडवून जातो. बरं, हत्तीच्या तडाख्यातून जे काही मागे राहील ते म्हणजे माकडं आणि रानडुकरांसाठी मेजवानी,” नागण्णा सांगतात. “आम्हाला डोळ्यात तेल घालून राखण करावी लागते. माकडांनी स्वयंपाकघराकडे होरा वळवला तर दूध आणि दही देखील गायब व्हायला वेळ लागणार नाही.”

“हे कमी म्हणून की काय, रानकुत्री आमच्या कोंबड्या फस्त करतात. आणि बिबटे येऊन राखणीवरचे कुत्रे पळवून नेतात. गेल्याच आठवड्यात...” असं म्हणत ते आपल्या बोटांनी बिबट्या कुठून कसा पसार झाला ते दाखवतात. माझ्या अंगावर काटा. सकाळचा गारवा होताच पण सतत अशा वातावरणात, जीव मुठीत धरून रहायचं म्हणजे काय या विचारानेच मी शहारले.

पण मग ते या सगळ्याला कसे सामोरे जातात? “आम्ही घरी खाण्यापुरती नाचणी करतो, अर्ध्या एकरावर,” आनंदा सांगतात. “८० किलोच्या पोत्याला २,२०० भाव मिळतो. त्यामुळे हातात काही पैसा येईल याची शक्यता नाही. त्यात अवकाळी पावसाचा फटका आहेच. जे काही उरेल ते जनावरांच्या तोंडी जातं,” ते सांगतात. “आमच्या एका रानात आता आम्ही नीलगिरी लावलीये. आणि इथल्या भागातले काही जण आता नाचणीऐवजी गुलाबाकडे वळलेत.”

हत्तींवर अजून तरी या फुलांची मोहिनी पडली नाहीये... अजून तरी...

PHOTO • M. Palani Kumar

आनंदरामू हत्ती येतात ती वाट दाखवतात. फळं आणि पिकं खायला हत्ती नेहमीच इथे येत असतात

*****

नाचणीच्या रानाशेजारी झुल्यावर मी थांबले होते
पोपटांना हाकलत असतानाच, तो आला
मी म्हटलं, “साहेब, जरा झोका तर द्या”
“हा घे,” म्हणत त्याने मला झोका दिला,
दोरीवरचा हात निसटल्याचा बहाणा करत मी त्याच्या छातीवर पडले
खरंच पडले असं वाटून त्याने मला घट्ट जवळ धरलं
शुद्ध हरपल्यासारखी मी पडून राहिले, तशीच

या प्रेमाने ओथंबलेल्या ओळी आहेत २००० वर्षांपूर्वीच्या कळिथ्थोकई या संगम काळातील एका कवितेतल्या. कपिळारने लिहिलेल्या. OldTamilPoetry.com हा संगम साहित्याचा अनुवाद प्रकाशित करणारा ब्लॉग चालवणाऱ्या चेंथिल नाथन यांचं म्हणणं आहे की या काव्यातला नाचणी किंवा इतर भरडधान्यांचा उल्लेख बिलकुल वावगा नाही.

“संगम साहित्यातल्या प्रेमकविता पाहिल्या तर नाचणी किंवा इतर तृणधान्याच्या शेतांच्या पार्श्वभूमीवर या कविता रेखाटल्याचं दिसतं,” चेंथिल नाथन सांगतात. “अगदी साधा शोध घेतला तरी लक्षात येईल की यात वेगवेगळ्या भरडधान्यांचा उल्लेख १२५ वेळा आलाय. भातापेक्षा जास्त. त्यावरून आपल्याला कळतं की संगम काळात (अंदाजे इस पूर्व २०० ते इस २००) या धान्यांना जास्त महत्त्व होतं. या धान्यांपैकी थिनईचा (राळे) उल्लेख सर्वात अधिक झाला आहे. आणि त्यानंतर वारागुचा उल्लेख येतो. (नाचणी किंवा कोदो).”

के. टी. अचया यांनी आपल्या इंडियन फूडः ए हिस्टॉरिकल कम्पॅनियन या पुस्तकात म्हटलं आहे की नाचणीचा उगम पूर्व आफ्रिकेत युगांडामध्ये झाला. हजारो वर्षांपूर्वी दक्षिण भारतात हे धान्य आलं. “तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेल्या कर्नाटकातल्या हल्लूर (इस पूर्व १८००) इथे” आणि “तमिळ नाडूच्या पइयमपल्ली (इस पूर्व १३९०)” इथे नाचणीचे अवशेष सापडले आहेत. हे ठिकाण नागण्णांच्या घरापासून २०० किलोमीटर अंतरावर आहे.

भारतात नाचणीच्या उत्पादनात तमिळ नाडूचा दुसरा क्रमांक आहे – कर्नाटक पहिल्या क्रमांकावर. दर वर्षी तमिळ नाडूमध्ये २.७४५ लाख मेट्रिक टन इतकी नाचणी पिकते. आणि राज्याच्या एकूण उत्पादनापैकी ४२ टक्के उत्पादन एकट्या कृष्णगिरी जिल्ह्यात होतं. नागण्णांचं गाव इथेच तर आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व कृषी संघटनेने नाचणीची काही ‘वैशिष्ट्यं’ नमूद केली आहेत. एक म्हणजे इतर द्विदल धान्यांसोबत आंतरपीक म्हणून नाचणी घेता येते. कमी खर्च आणि वरकस जमिनीतही नाचणींचं चांगलं उत्पन्न येतं.

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

नाचणीची ठुशी (डावीकडे) आणि दाणे. तमिळ नाडूत पिकणाऱ्या एकूण नाचणीपैकी ४२ टक्के उत्पादन कृष्णगिरी जिल्ह्यात होतं

असं असूनही नाचणीचं उत्पादन आणि तिची लोकप्रियता घसरणीला लागली आहे. हरित क्रांतीनंतर गहू आणि तांदूळ ही दोन धान्यं लोकांच्या थेट ताटात आली, सार्वजनिक धान्य वितरण यंत्रणेने त्याला हातभारच लावला. नाचणी मागे पडली यात नवलाचं ते काय?

गेल्या काही वर्षांत भारतभरात नाचणीच्या उत्पादनात बरेच चढ उतार झाल्याचे दिसतात. २०२१ साली देशात २० लाख टन नाचणीचं उत्पादन झालं. मात्र २०२२ सालासाठीचे प्राथमिक अंदाज पाहता त्यात घट होताना दिसते. २०१० साली १९ लाख ८० हजार टन असा आकडा होता. २०२२ आर्थिक वर्षासाठी प्राथमिक अंदाजानुसार एकूण उत्पादन १५ लाख २० हजार टन असण्याची शक्यता आहे.

धान फाउंडेशन ही सामाजिक संस्था भरडधान्यांविषयी काम करते. त्यांच्या म्हणण्यानुसार “पोषणमूल्यं अधिक असूनही आणि वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता असूनही भारतात नाचणीचं सेवन ४७ टक्क्यांनी कमी झालं आहे. गेल्या पन्नास वर्षांत इतर भरड धान्यांचा आहारातला वापरही ८३ टक्क्यांनी कमी झाला आहे.”

भारतात नाचणीचं सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या शेजारच्या कर्नाटकात “ग्रामीण कुटुंबांमध्ये २००४-०५ साली दर डोई महिन्याला १.८ किलो नाचणी खाल्ली जात होती. तोच आकडा २०११-१२ मध्ये १.२ किलो इतका कमी झाला आहे.”

हे पीक आजही तग धरून आहे कारण काही प्रदेशांमध्ये आणि काही समूहांमध्ये आजही नाचणी पिकवली आणि खाल्ली जातीये. कृष्णगिरी हा त्यातलाच एक जिल्हा.

*****

तुम्ही जितकी जास्त नाचणी पिकवाल, तितकी अधिक जनावरं तुम्ही पाळू शकता आणि आठवड्याची कमाईही वाढवू शकता. चारा नाही म्हणून लोकांनी आपली दुभती जनावरं विकलीत.
गोपाकुमार मेनन, लेखक आणि शेतकरी

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः गोल्लापल्ली गावात आपल्या शेतात नाचणीचा तुरा हातात घेतलेले गोपाकुमार मेनन. उजवीकडेः पावसाने भिजलेली नाचणीची ठुशी

मी नागण्णांच्या घरी गेले त्याच्या आदल्या रात्रीची गोष्ट. या भागात आमचा मुक्काम गोपाकुमार मेनन यांच्याकडे होता. त्यांनी मला हत्तीची एक भन्नाट गोष्ट सांगितली. डिसेंबर महिन्याची सुरुवात. आम्ही गोल्लापल्ली गावातल्या त्यांच्या घरी, गच्चीत बसलो होतो. सगळीकडे किर्र काळोख, थंडी आणि सगळंच फार मोहक. रातकिड्यांची किरकिर, गाणी मात्र सुरूच. त्यांचा तो आवाज कधी आश्वासक तर कधी चित्त विचलित करणारा.

“मोट्टई वाल या इथे आला होता,” तिथेच पलिकडे असलेल्या एका आंब्याच्या झाडाकडे बोट दाखवत ते सांगतात. “त्याला आंबे खायचे होते. पण फळ काही मिळेना. म्हणून त्यानं झाडच पाडलं.” मी आजूबाजूला पाहिलं तर सगळं हत्तीच्या आकाराचंच दिसू लागलं. “काळजी करू नका. तो इथे कुठे असता ना, तर तुम्हाला समजलं असतं,” गोपा म्हणतात.

पुढचा एक तासभर गोपा मला अशाच किती तरी कहाण्या सांगतात. ते वर्तणूक अर्थशास्त्रातले संसाधन व्यक्ती आहेत. एक लेखक आणि कॉर्पोरेट क्षेत्रातले संवादक. सुमारे १५ वर्षांपूर्वी त्यांना गोल्लापल्लीमध्ये काही जमीन विकत घेतली. त्यांचा विचार होता की शेती करावी. खरं तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की शेती करणं काही तितकंसं सहजसोपं नाही. सध्या ते दोन एकरात लिंबू आणि हुलग्याचं पीक घेतात. ज्यांची सगळी भिस्त केवळ शेतीवर आहे त्यांच्यासाठी तर हे गणित फारच अवघड आहे. विसंगत धोरणं, वातावरणातले बदल, धान्याला मिळणारा तुटपुंजा भाव आणि मानव-वन्यजीव संघर्षाने नाचणीसारख्या पारंपरिक पिकाची जबरदस्त हानी झाली आहे असं ते सांगतात.

“प्रस्तावित केलेले आणि नंतर मागे घेतलेले कृषी कायदे का उपयोगी नव्हते याचं उत्तम उदाहरण म्हणजे नाचणी,” गोपा सांगतात. “कायदा म्हणत होता की तुम्ही तुमचं पीक कुणालाही विकू शकता. तमिळ नाडूचंच उदाहरण घ्या. आता हे जर का शक्य होतं तर किती तरी शेतकऱ्यांनी नाचणी पिकवली असती का नाही? उलट ते छुप्या मार्गाने कर्नाटकात माल का घेऊन जातील? तिथे नाचणीला प्रति क्विंटल ३,३७७ रुपये इतका हमीभाव आहे. [तमिळ नाडूत मात्र आपल्याला याहून फारच कमी किंमत मिळत असल्याचं आनंदा सांगतात.]”

तमिळ नाडूच्या या भागात शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळतच नाहीये. आणि म्हणूनच काही शेतकरी आपला माल पळवून कर्नाटकात विक्रीसाठी नेतायत.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

गोल्लापल्लीच्या जरासं बाहेर शिवकुमार यांनी खंडाने शेती करायला घेतली आहे. तिथे मजूर नाचणी काढतायत

सध्या तमिळ नाडूच्या होसूर जिल्ह्यात आनंदा सांगतात त्याप्रमाणे, “एकदम चांगल्या दर्जाच्या नाचणीला ८० किलोला २,२०० रुपये भाव आहे आणि जरा कमअस्सल पीक असेल तर २,०००. थोडक्यात काय तर २५ ते २७ रुपये किलो.”

हा भाव त्यांना मध्यस्थाकडून जागेवर मिळतो. हाच मध्यस्थ पोत्यामागे त्याचा नफा काढणारच. आनंदाच्या अंदाजानुसार २०० रुपये तर नक्कीच. शेतकऱ्यांनी स्वतः बाजारात नाचणी विकली तर त्यांना चांगल्या मालाला २,३५० रुपये मिळू शकतात. पण आनंदा यांना त्यात काही गमक दिसत नाही. “मला माल लादायला, इथून घेऊन जायला पैसे पडणार. परत आडत आहे...”

कर्नाटकात तमिळ नाडूपेक्षा किमान हमीभावाची अंमलबजावणी बऱ्यापैकी झाल्याचं दिसतं. तरीही, तिथे देखील बऱ्याच शेतकऱ्यांना वेळेत धान्य खरेदी न झाल्यामुळे हमीभावाच्या ३५ टक्के कमी भाव मिळत आहे.

“सगळीकडे किमान हमीभावाची व्यवस्थित अंमलबजावणी करायला पाहिजे,” गोपा मेनन म्हणतात. “तुम्ही ३५ रुपये किलोने नाचणी विकत घ्यायला लागलात तर लोक का बरं पिकवणार नाहीत? पण तसं झालं नाही तर इथे जे घडतंय ते थांबवणं किंवा माघारी फिरणं शक्य नाही. लोक आता फूलशेती, टोमॅटो आणि श्रावण घेवड्याकडे वळायला लागलेत.”

गावातलेच त्यांचे शेजारी, पन्नाशीच्या आसपास असलेल्या सीनप्पांचं लक्ष आता अधिकाधिक टोमॅटो घेण्याकडे आहे. “लॉटरी आहे,” सीनप्पा म्हणतात. “सगळ्या शेतकऱ्यांना अशा एखाद्या शेतकऱ्याने भारावून टाकलंय ज्याला टोमॅटोतून ३ लाखाचा नफा झालाय. पण लागवडीचाच खर्च प्रचंड आहे. आणि भाव कधी वधारतात, कधी कोसळतात. रुपयाला किलो असा कवडीमोल किंवा कधी चक्क १२० रुपये किलो.”

सीनप्पांना हमीभाव मिळाला तर मात्र ते टोमॅटो घेणं थांबवून जास्त नाचणीच घेतील. “जितकी जास्त नाचणी पिकवाल तितकी जास्त जनावरं पाळू शकता. आणि आठवड्याची कमाईदेखील वाढेल. चारा नाही म्हणून लोकांनी जनावरं विकलीयेत.”

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः काढलेल्या नाचणीच्या जुड्या. नाचणीला दोन वर्षं काहीही होत नाही. उजवीकडेः चाऱ्याच्या गंजी

इथल्या लोकांसाठी नाचणी त्यांच्या रोजच्या आहाराचा भाग आहे. “पैसा लागणार असेल तरच नाचणी विकली जाते. दोन वर्षं तिला काहीही होत नाही. त्यामुळे लागेल तशी दळायची आणि वापरायची. इतर धान्यं एवढी टिकत नाहीत. त्यामुळे कसंय लागली तर लॉटरी, नाही तर भुईसपाट.”

या भागात अनेक आणि विविध प्रकारचे संघर्ष आपल्याला पहायला मिळतात. “इथे फूलशेती केली जाते ती मुख्यतः चेन्नईच्या बाजारपेठेसाठी,” गोपा मेनन म्हणतात. “तुमच्या बांधावर माल न्यायला गाडी येते आणि पैसे देऊन जाते. उलट नाचणी, जी सगळ्यात मोलाचं पीक आहे तिला मात्र अशी कुठलीही शाश्वती नाही. आणि देशी वाण असो, संकरित किंवा जैविक – सगळ्याला भाव एकच.”

“श्रीमंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतांना कुंपणं घालून वीजप्रवाह सोडलाय. आणि त्यामुळे हत्ती गरीब शेतकऱ्यांच्या रानांकडे वळलेत. श्रीमंत शेतकरी वेगळी पिकं घेतायत आणि गरीब शेतकरी नाचणी पिकवतायत.” आणि तरीही, गोपा म्हणतात, “इथले शेतकरी हत्तींबाबत खूपच सहनशील आहेत. त्यांची तक्रार काय आहे तर ते जितकं खातात ना त्याच्या दसपट नुकसान करतात. मी स्वतः मोट्टई वालला २५ फुटांवरून पाहिलंय,” ते म्हणतात. आणि पुन्हा एकदा हत्तींच्या रम्य कथा सुरू होतात. “इथल्या लोकांसारखा हा हत्तीदेखील फक्त एका राज्याचा रहिवासी नाहीये. तो रहिवासी तमिळ, मानद कन्नड आहे. मखना त्याचा प्रधान आहे. वीजप्रवाह असलेलं कुंपण पार करून कसं जायचं ते तो मखनाला शिकवतो.”

परत एकदा असं वाटायला लागतं की जणू काही मोट्टई वाल तिथेच गच्चीच्या शेजारी उभं राहून सगळं काही ऐकतोय. “मी आता होसुरला जाऊन गाडीमध्येच झोपेन म्हणते,” मी उसनं अवसान आणून म्हणते. गोपा चकित होतात. “मोट्टई वाल अगडबंब आहे, प्रचंड मोठा,” तो किती मोठा आहे ते त्यांच्या आवाजातून कळतंच. “पण तो गरीब बापडा आहे.” माझी त्याची गाठ पडू नये अशी मी मनोमन प्रार्थना करते. तोच काय कुठलाच हत्ती इतक्यात नाही भेटला तर बरंच. पण देवाजीच्या मनात काही तरी भलतंच होतं नक्की...

*****

इथल्या गावरान नाचणीचा उतारा कमी पडतो पण चव आणि पोषक मूल्यं या दोन्हीमध्ये ती वरचढ आहे.
कृष्णगिरीचे नाचणी पिकवणारे शेतकरी, नागी रेड्डी

PHOTO • M. Palani Kumar

डावीकडूनः नागण्णा (नागी रेड्डी), त्यांची सून प्रभा आणि मुलगा आनंदा वडरा पालयम पाड्यावरच्या आपल्या घराच्या ओसरीत. नागण्णा म्हणतात, “मला पाच प्रकारची नाचणी आठवते”

नागण्णांच्या तरुणपणात नाचणी पार त्यांच्या छातीपर्यंत उंच वाढायची. आणि ते चांगले उंचेपुरे आहेत – ५ फूट १० इंच आणि काटक. धोतर आणि बंडी, खांद्यावर पंचा गुंडाळलेला. हातात कधी कधी काठी. कुणाच्या भेटीगाठी घ्यायच्या असल्या तर अंगात पांढरा शुभ्र सदरा.

“मला पाच प्रकारची नाचणी आठवते,” ते म्हणतात. आपल्या घराच्या ओसरीतून नागण्णा घरादारावर, अंगणावर आणि अख्ख्या गावावरच नजर ठेवून असतात. “मूळची नाटु म्हणजेच गावरान नाचणी होती ना तिला चार-पाचच ठुशा यायच्या. उतार कमी पडायचा. पण चवीला आणि पोषणाला ती वरचढ होती.”

संकरित वाण १९८० च्या सुमारास यायला लागले. त्यांची नाव आद्याक्षरांसारखी – एमआर, एमआर – अशी असायची. आणि ठुशा जास्त असायच्या. उतारा जास्त यायला लागला. ८० किलोच्या पाच पोत्यांपासून थेट १८ पोत्यांपर्यंत. पण उतारा जास्त पडला म्हणून लगेच शेतकरी हुरळून जात नाहीत. कारण बाजारात विक्री करून नफा कमवावा अशा प्रमाणात नाचणी पिकवावी तर तितका भाव काही त्यांच्या मालाला मिळत नाही.

गेली ७४ वर्षं नागण्णा शेती करतायत, वयाच्या अगदी १२ व्या वर्षापासून. आणि आजवर त्यांनी कित्येक वेगवेगळी पिकं घेतली आहेत. “आमच्या कुटुंबाने आम्हाला लागणारं सगळं काही रानात पिकवलंय. शेतातल्या उसाचा गूळ केला जायचा. तीळ पिकायचा, त्याचंच लाकडी घाण्यावर तेल गाळलं जायचं. नाचणी, भात, हुलगे, मिरची, लसूण, कांदा... सगळी काही होतं रानात.”

आणि हे रान, शेतच त्यांची शाळा होतं. कारण भिंतीआतली शाळा लांबही होती आणि तिथपर्यंत पोचणं शक्यच नव्हतं. कारण घरी जितराब होतं, गाईगुरं आणि शेरडं. वेळ म्हणून नसायचा. सगळे जण फक्त कामात गुंतलेले असायचे.

नागण्णांचं एकत्र कुटुंब होतं, तेही भलं मोठं. मोजता मोजता ४५ जणांची यादी तयार होते. सगळे जण त्यांच्या आजोबांनी बांधलेल्या घरात एकत्र राहत असत. समोरच्याच गल्लीत हा वाडा पहायला मिळतो. १०० वर्षं जुनी इमारत, आत गोठा आणि जुनी बैलगाडी. आणि वर्षाची नाचणी साठवण्यासाठी ओसरीतच धान्याचं कोठार.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः नागण्णांच्या आजोबांनी बांधलेल्या घरातला गोठा. उजवीकडेः या ओसरीखाली धान्य साठवण्याचं कोठार बांधलेलं आहे

नागण्णा १५ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या कुटुंबात संपत्तीच्या वाटण्या झाल्या. थोडी जमीन आणि तेव्हा गोठा असलेली जागा नागण्णांच्या हिश्शाला आली. ती साफसूफ करून तिथे घर बांधण्याची जबाबदारी त्यांची. “त्या काळी सिमेंटच्या एका पोत्यासाठी ८ रुपये मोजायला लागायचे – केवढी मोठी रक्कम होती ती तेव्हा. मग आम्ही एका गवंड्याला ओप्पांडम म्हणजेच गुत्तं दिलं, १,००० रुपयात घर बांधून द्यायचं.”

पण ते घर पूर्ण व्हायला किती तरी वर्षं गेली. एक शेळी आणि गुळाच्या १०० ढेपा विकल्यावर एक भिंत बांधून झाली. बांधकामाचा सगळा माल बैलगाडीने यायचा. तेव्हा पैशाची चणचणच होती. नाचणीला मिळून मिळून किती तर पाडी ला आठ आणे मिळायचे. (तमिळ नाडूमध्ये पाडी हे धान्य मोजायचं जुनं माप आहे – ६० पाडी म्हणजे १०० किलो).

१९७० साली नागण्णांचं लग्न झालं. त्याआधी काही वर्षं ते अखेर या घरात रहायला आले. त्यानंतर इथे कसलेच आधुनिक बदल केलेले नाहीत. फक्त “इथे-तिथे थोडं फार काही तरी” सोडून, ते म्हणतात. त्यांच्या नातवाने त्याच्या काही करामती केल्या आहेत. टोकदार कशाने तरी त्याने कोनाड्याच्या खाली ‘दिनेश इज द डॉन’ असं कोरून ठेवलंय. त्या दिवशी सकाळी आम्हाला तो १३ वर्षांचा करामती पोरगा दिसला होता. शाळेत जाताना तो खरं तर डॉनपेक्षा शहाणा गंपूच जास्त वाटत होता. तोंडातल्या तोंडात आम्हाला रामराम करत तो पळून गेला होता.

तर या डॉन बनू पाहणाऱ्या दिनेशची आई प्रभा आमच्यासाठी चहा घेऊन आली. नागण्णा तिला थोडे हुलगे घेऊन यायला सांगतात. पत्र्याच्या डब्यात ती थोडे हुलगे आणते. डब्यात खुळखुळ्यासारखा त्यांचा आवाज येतो. याची कोळंबु (आमटी) कशी करायची ते नागण्णा आम्हाला सांगतात. कच्चेच खा, ते म्हणतात, “पारवयिल्ल [काही हरकत नाही].” आम्ही सगळेच मूठभर हुलगे घेतो. कुरकुरीत आणि चवदार लागतात ते. “भाजून खारवले की अजूनच छान लागतात,” नागण्णा म्हणतात. लागतच असणार. शंकाच नको.

शेतीत काय बदललंय, मी त्यांना विचारते. “सगळंच,” ते थेट उत्तर देतात. “काही बदल चांगले आहेत, पण लोकांचं पहा,” मान हलवत ते म्हणतात, “त्यांना आताशा कामच करावंसं वाटत नाही.” आज वयाच्या ८६ व्या वर्षी देखील ते रोज शेतात जातात आणि दररोज काय काय घडतंय, त्याचा कसा परिणाम होतोय याची त्यांना इत्थंभूत माहिती आहे. “आज तुमच्याकडे जमीन जरी असली तरी तुम्हाला कामाला मजूर मिळत नाहीत,” ते सांगतात.

PHOTO • M. Palani Kumar

घराच्या ओसरीत बसून नागण्णा त्यांच्या तरुणपणीच्या कहाण्या सांगतात

“लोक सांगतात की नाचणी झोडायला आता यंत्रं आलीयेत,” आनंदा म्हणतात. “पण यंत्राला कुठली ठुशी निब्बर आहे, आणि कुठली कोवळी ते समजतंय का? कधी कधी एकाच काडीला एक ठुशी वाळलेली असते आणि एक अजूनही दुधात असते. यंत्रात सगळंच भरडलं जातं. आणि त्यानंतर माल पोत्यात भरला की सगळा नास. बुरशी तर येणारच ना.” हाताने झोडायला वेळ लागतो, “पण धान्य टिकतंही जास्त.”

शिव कुमारच्या शेतात १५ बाया हाताने नाचणी झोडत होत्या. हातातल्या कोयता काखेत आणि ‘सुपरड्राय इंटरनॅशनल’ असं लिहिलेल्या टी-शर्टवर पंचा गुंडाळलेला शिवकुमार नाचणीबद्दल अगदी कळकळीने बोलतो.

गोल्लापल्लीच्या वेशीला लागूनच त्याने जमीन कसायला घेतलीये. आदल्या काही आठवड्यांमध्ये बराच पाऊस आणि वारा होता. २५ वर्षांचा शिवा अगदी मन लावून शेती करतो. पावसाने पिकाचं कसं नुकसान झालंय ते तो मला सांगतो. सगळं पीक वाऱ्यामुळे आडवं झालं. बायांनी जमिनीवर बसून, पिकं काढली आणि जुड्या बांधून ठेवल्या आहेत. उतार कमी होणार, तो म्हणतो. पण बायांची मजुरी मात्र एक दोन दिवसांनी वाढली. जमिनीसाठी द्यायचा खंड मात्र आहे तसा.

“एवढ्या जमिनीसाठी – दोन एकराहून थोडी कमी – मला खंडाची सात पोती नाचणी द्यावी लागते. उरलेली १२-१३ पोती मी घरच्यासाठी ठेवू शकतो किंवा बाजारात विकता येते.” पण तो म्हणतो, “कर्नाटकातल्यासारखा भाव मिळाला तरच फायदा होणार. आम्हाला तमिळ नाडूत किलोमागे ३५ रुपये तरी मिळायला पाहिजेत. लिहून घ्या तुम्ही,” तो मला सांगतो. आणि मीही त्याचं म्हणणं टिपून घेते.

तिथे नागण्णा, त्यांच्या परसात असलेला खळ्याचा मोठाला दगड दाखवतात. खळ्याला बैल जुंपून नाचणी भरडली जायची. शेणाने सारवून खळं तयार केलं जायचं. सावकाश, संथपणे ठुशा भरडल्या जायच्या. आणि मग दाणा आणि काड्या उफणणी करून वेगळं केलं जायचं. पूर्वी गोणपाटात आणि आता पांढऱ्या प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये धान्य साठवून घराच्या ओसरीतल्या कोठारांमध्ये साठवलं जायचं.

“या, आत या,” नागण्णा आम्हाला बोलावतात. “जेवायला बसा...”. प्रभाकडून काहीतरी कळेल या आशेने मी तिच्यामागे चुलीपाशी जाते.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः शिवकुमारन याने गोल्लापल्लीच्या वेशीला लागून खंडाने जमीन कसायला घेतली आहे. पावसाच्या तडाख्यातून वाचलेलं पीक काढायचं काम सुरू आहे. उजवीकडेः शिवाच्या रानात शेतमजूर महिला नाचणीची रास करण्याच्या कामात मग्न आहेत

*****

कबुतराच्या अंड्यासारखे नाचणीचे दाणे
पावसाच्या पाण्यावर पिकलेले
दुधा-मधात शिजवलेले
सशाचं लुसलुशीत मांस आगीवरती भाजलेलं
गणगोताबरोबरचं हे सुग्रास जेवण
‘पुरनाऊरू ३४’, अळथुर किळार यांचे संगम काव्य
अनुवादः चेंथिल नाथन

भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि लोह, ग्लुटेनचा अंश नसलेली नाचणी भरपूर टिकते, अगदी दोन वर्षांपर्यंत. अगदी २,००० वर्षांपूर्वी देखील तमिळ कुटुंबांमध्ये दुधा-मधात नाचणी शिजवून खीर केली जात होती. जोडीला मांस खाल्लं जायचं. आज नाचणी जेवणाचा भाग झालीये, तिच्यापासून वेगवेगळे उपाहार बनवले जातात, लहान मुलांसाठी मोठ्या प्रमाणात ती वापरली जाते. तमिळ नाडूच्या वेगवेगळ्या भागात नाचणीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कृष्णगिरीमध्ये रागी मुद्दे बनतात, त्यांना इथे काळी म्हणतात. प्रभा आम्हाला ते बनवूनही दाखवते.

आम्ही तिच्या स्वयंपाकघरात होतो. सिमेंटच्या छोट्याशा कट्ट्यावर स्टीलचा स्टोव्ह आहे. अल्युमिनियमच्या कढईत ती पाणी ओतते. एका हातात लाकडी दांडा आणि दुसऱ्या हातात वाटीभर नाचणीचं पीठ घेऊन ती तयारच असते.

तिला तमिळ येतं का? मी विचारते. काही तरी बोलायला सुरुवात होते. सलवार कमीझ घातलेली, मोजकेच दागिने ल्यालेली आणि चेहऱ्यावर किंचितसं हसू असलेली प्रभा मानेनेच नाही असं सांगते. पण तिला तमिळ बोललेलं कळतं. मग ती तमिळ मिश्रित कन्नडमध्ये म्हणते, “गेली १६ वर्षं मी हा पदार्थ बनवत आलीये.” म्हणजे ती १५ वर्षांची होती तेव्हापासून.

पाण्याला उकळी येते. त्यानंतर ती मोठं भांडंभर पीठ पाण्यात टाकते. करड्या रंगाचं मिश्रण तयार होतं. चिमट्याने कढई पकडून लाकडाच्या दांड्याने ती फटाफट ते मिश्रण ढवळायला लागते. हे काही साधं काम नाही. भरपूर शक्ती तर लागतेच आणि कौशल्यही. काही मिनिटातच उकड तयार होते आणि कढईत शिजून गोळा तयार होतो.

तिच्याकडे पाहत असताना माझ्या मनात येऊन जातं की कदाचित दोन हजार वर्षांपासून बाया हे असंच काही तरी शिजवत आल्या असणार.

“मी लहान होते ना तेव्हा खापराच्या भांड्यात आम्ही उकड काढायचो,” नागण्णा सांगतात. आणि त्याची चव आणखी जास्त चांगली लागायची, ते ठामपणे सांगतात. तेव्हा ते देशी वाणाची नाचणी खायचे म्हणून असणार, आनंदा म्हणतात. “घराबाहेरच वास नाकाचा ताबा घ्यायचा. घम घम वासनई ,” नाचणीचा वास खासच असायचा हे सांगायची त्यांची पद्धत. “आता संकरित वाणांचा वास तुम्हाला शेजारच्या खोलीत देखील यायचा नाही.”

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः प्रभाने तयार केलेली नाचणीची उकड. मध्यभागी आणि उजवीकडेः ग्रॅनाइटच्या पाट्यावर प्रभा गरमागरम उकडीचे मुद्दे म्हणजेच उंडे तयार करतीये

तिची सासरची मंडळी आहेत म्हणून की काय पण प्रभा मोजकंच बोलते. ती कोपऱ्यात असलेल्या ग्रॅनाइटच्या पाट्यापाशी कढई घेऊन जाते आणि त्यातली गरमागरम उकड त्यावर काढते. गरम उकड मळून घेते आणि हात ओला करून त्याचे पाट्यावर वळून गोल उंडे तयार करते.

थोडे मुद्दे झाल्यावर स्टीलच्या थाळ्यांमध्ये आम्हाला जेवण रांधलं जातं. “हे बघ, असं खायचं,” नागण्णा म्हणतात. एक उंडा कुस्करून हुलग्याच्या आमटीत बुडवून ते खातात. एका वाटीत प्रभा आमच्यासाठी परतलेली भाजी घेऊन येते. मस्त चविष्ट जेवण होतं ते. आणि पोटभरीचं.

शेजारच्या बारगुरमध्ये लिंगायत घरांमध्ये नाचणीच्या भाकरी केल्या जातात. बराच काळ आधी जेव्हा मी पार्वती सिद्धय्या या शेतकरी महिलेची भेट घेतली होती तेव्हा तिने अंगणातल्या चुलीवर माझ्यासाठी भाकरी बनवल्या होत्या. जाडजूड आणि चवीला एकदम मस्त अशा या भाकरी बरेच दिवस टिकतात. घरची गाईगुरं जंगलात चारायला जाताना राखुळी सोबत याच भाकरी घेऊन जात असत.

चेन्नई स्थित राकेश रघुनाथन खाद्यसंस्कृतीचा इतिहास आपल्यासमोर मांडतात. ते एका खाद्यपदार्थविषयक कार्यक्रमाचे सूत्रधारही आहेत. ते मला रागी वेल्ल अडई नावाचा एक पारंपरिक पदार्थ कसा होता ते सांगतात. हे एक गोड घावन असून त्यासाठी नाचणीचं पीठ, गूळ, नारळाचं दूध, चिमूटभर वेलची आणि सुंठेची पूड इतकंच साहित्य लागतं. “माझ्या आईला तिच्या आजीने ही अडई करायला शिकवलं. पूर्वी तंजावुर भागामध्ये हा पदार्थ बनायचा. कार्तिगई दीपम [दिवाळी] या दिवशी उपास सोडताना हा पदार्थ केला जायचा.” थोड्या तुपावर बनवलेली ही छान फुललेली घावनं पौष्टिकही असतात आणि हलकी. उपास सोडताना खायला एकदम योग्य.

पुडुकोट्टई जिल्ह्याच्या चिन्न वीरमंगलम गावात व्हिलेज कुकिंग चॅनेलचे सुप्रसिद्ध आचारी नाचणीचा आणखी एक मस्त पदार्थ बनवतातः काळी आणि सुकट. पारंपरिक पदार्थ पुनरुज्जीवित करणे ही त्यांच्या यूट्यूब वाहिनीची खासियत. “मी सात-आठ वर्षांचा होतो तेव्हापर्यंत नाचणी अगदी सर्रास असायची जेवणात. त्यानंतर मात्र ती ताटातून गायबच झाली. भाताचा प्रवेश झाला,” या वाहिनीचा सहसंस्थापक, ३३ वर्षीय सुब्रमण्यम मला फोनवर सांगतो.

दोन वर्षांपूर्वी त्यांनी टाकलेला एक व्हिडिओ तब्बल ८० लाख वेळा पाहिला गेला आहे. दीड कोटी लोक या वाहिनीचे सबस्क्रायबर आहेत म्हटल्यावर यात आश्चर्याची फारशी काही बाब नाही. या व्हिडिओमध्ये त्यांनी ग्रॅनाइच्या जात्यावर नाचणी कशी दळायची इथपासून ते झापाच्या द्रोणात ती कशी खायची अशा सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत.

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः गेल्या पन्नास वर्षांत नाचणीचं सेवन कमी झालं आहे. उजवीकडेः नागण्णांच्या परसातला नाचणीच्या खळ्यावर वापरला जाणारा दगड

यातला सगळ्यात रंजक भाग कोणता तर रागी मुद्दे बनवण्याचा. सुब्रमण्यम यांचे आजोबा, ७५ वर्षीय पेरियथंबी या सगळ्या प्रक्रियेवर बारीक नजर ठेवून आहेत. नाचणीच्या पिठात थोडा भात घालायचा, त्याचे उंडे करायचे, तांदळाचं पीठ लावलेल्या पाण्यात ते घालायचे, सगळ्यावर त्यांचं लक्ष आहे. हे खारे मुद्दे खाऱ्या माश्यांबरोबर खाल्ले जातात. चुलीत मासे भुजले जातात. वरून पूर्ण काळे झालेले मासे आतून छान खरपूस होतात. “रोजच्या जेवणात तोंडी लावायला फक्त कांदा आणि हिरवी मिरची इतकंच असायचं.”

भाताचे देशी वाण आणि भरड धान्याचं पोषक मूल्य या सगळ्याबाबत सुब्रमण्यम अगदी कळकळीने बोलतात. २०२१ च्या विधानसभा निवडणुकींच्या वेळी राहुल गांधी तमिळ नाडूमध्ये आले असता या दोघा भावांनी त्यांच्यावर चांगलीच छाप टाकली होती. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये जे पदार्थ आता विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत अशांना उजाळा दिला जातो, त्यांना नवं जीवदानच दिलं जातंय.

*****

जे शेतकरी रसायनं फवारतायत, ते त्यांचा नफा रुग्णालयांना दान करतायत
कृष्णगिरीत नाचणीची शेती करणारे आनंदरामु

नागण्णांच्या पाड्याभोवतीच्या शेतातून नाचणी का बरं गायब झाली याचा विचार करता तीन घटक प्रामुख्याने दिसून येतातः अर्थकारण आणि हत्ती याच्या जोडीला अलिकडच्या काळातले वातावरणातले बदल. पहिला घटक संपूर्ण राज्याला लागू पडतो. एक एकर नाचणी पिकवण्यासाठी लागवडीचा खर्च जवळपास १६ ते १८ हजार इतका आहे. “त्यात जर पाऊस आला किंवा हत्तींनी पिकं तुडवली तर मग काढणीच्या काळात सगळे जण मजुरांसाठी वणवण करत असतात. त्याचा २,००० रुपये खर्च वाढतो,” आनंदा सांगतात.

“तमिळ नाडूत ८० किलोच्या पोत्याला २,२०० भाव आहे. म्हणजे किलोमागे २७ रुपये ५० पैसे. चांगलं पिकलं तर १५ पोते नाचणी होते. आणि संकरित बियाणं वापरलं तर १८ पोते. पण,” आनंदा आपल्याला सावध करतात. “संकरित वाणाच्या कडब्याला जनावरं तोंडही लावत नाहीत. त्यांना फक्त गावरान नाचणी आवडते.”

आणि हे फार महत्त्वाचं आहे. नाचणीचा एक गाडीभर कडबा १५,००० रुपयांना विकला जातो. एका एकरात दोन गाड्या कडबा निघतो. ज्यांच्याकडे जनावरं आहेत त्यांना तर कडब्याची चिंता नसते. गंजी लावून ठेवल्या की वर्षभर वैरणीचा प्रश्न मिटतो. “आम्ही तर नाचणी देखील विकत नाही,” आनंदा सांगतात. “पुढच्या वर्षीचं पीक हातात येईतोवर नाहीच. आमचं सोडा आमच्याकडची कुत्री आणि कोंबड्याही याच धान्यावर असतात. सगळ्यांपुरता माल घरी पाहिजे ना.”

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः आनंदा आणि सोबत त्यांची शेरडं आणि मेंढरं. यांचं खाणं म्हणजे नाचणीचा कडबा. उजवीकडेः भरडून, उधळून साफ केलेली नाचणी नागण्णांच्या जुन्या वाड्यात प्लास्टिकच्या पोत्यांमध्ये भरून ठेवली आहे

थोडक्यात सांगायचं तर आनंदा जुनंच सत्य नव्याने सांगतायतः नाचणी या प्रदेशाच्या आणि इथल्या जनजीवनाच्या केंद्रस्थानी आहे. आणि केवळ ती पूर्वीपासून पिकते म्हणून नाही. हे पीक तगून राहतं, “जोखीम नाही,” आनंदा सांगतात. “दोन आठवडे पाऊस झाला नाही, पाण्याची ओढ बसली तरी चालतं. कीडही फारशी पडत नाही त्यामुळे आम्हाला टोमॅटो किंवा घेवड्यासारखं नाचणीवर फार काही फवारावं लागत नाही. आता जे शेतकरी रसायनं फवारतायत ना ते त्यांचा नफा रुग्णालयांना दान करतायत.”

तमिळ नाडू शासनाने नुकतीच एक नवीन कल्पना राबवायला सुरुवात केली आहे. राज्यातल्या रेशन दुकानांवर आता भरड धान्यं वितरित करायला सुरुवात झाली आहे. शिवाय, २०२२ सालासाठीच्या कृषी अर्थसंकल्पात या खात्याचे मंत्री एम आर के पनीरसेल्वम यांनी देखील एकूण १६ वेळा भरडधान्यांचा उल्लेख केला. (तांदूळ-भाताचा उल्लेख ३३ वेळा आला.) ही धान्यं अधिक लोकप्रिय व्हावीत यासाठी दोन विशेष क्षेत्रांची निर्मिती आणि जिल्हा पातळीवर उत्सव साजरे करण्याचा संकल्प सादर करण्यात आला. यासाठी ९२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या उत्सवांमधून “भरड धान्यांमधून मिळणाऱ्या पोषणमूल्यांविषयी जागरुकता निर्माण करणे” असा उद्देश आहे.

अन्न व कृषी संघटनेने देखील २०२३ हे भरड धान्यांचं आंतरराष्ट्रीय वर्ष जाहीर केलं आहे. ही कल्पना भारताने मांडली आहे. यामुळे देखील नाचणीसारख्या ‘पोषकधान्यां’कडे जगाचं लक्ष जाण्यास मदत होऊ शकेल.

नागण्णांच्या कुटुंबाला मात्र हे वर्ष खडतरच जाणार आहे. अर्ध्या एकरातून त्यांच्या हाती फक्त तीन पोती नाचणी आली आहे. उरलेली पावसाच्या तडाख्यात आणि वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात गेली. “नाचणी शेतात असली की रोज रात्री आम्हाला जागलीला शेतात जावं लागतं आणि मचाणावर बसून राखण करावी लागते,” आनंदा सांगतात.

आनंदांची बाकी भावंडं – तीन भाऊ आणि एक बहीण शेती करत नाहीत. जवळच्याच थल्ली शहरामध्ये चौघंही रोजंदारीने कामाला जातात. आनंदा मात्र शेतीत रमतात. “मी शाळेची पायरी तरी चढलो का? मी मस्त आंब्याच्या झाडावर चढून बसायचो आणि बाकी मुलांबरोबर घरी परत यायचो. मला सुरुवातीपासून फक्त हेच करायचं होतं,” रानातलं हुलग्याचं पीक पाहत फेरफटका मारत ते सांगतात.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः आपल्या शेतातलं हुलग्याचं पीक कसं आहे ते पाहणारे आनंदा. उजवीकडेः नागण्णांच्या शेतातलं मचाण नाचणीच्या हंगामात हत्तींवर नजर ठेवायला उपयोगी ठरतं

ते आम्हाला पावसाने कसं आणि किती नुकसान झालंय ते दाखवतात – सगळीकडे त्याच्या खुणा दिसतात. “मी माझ्या ८६ वर्षांच्या आयुष्यात असला पाऊस पाहिलेला नाही,” उद्विग्न होत नागण्णा म्हणतात. ते आणि पंचांग सांगतात की या वर्षी विशाखा नक्षत्रात पाऊस येणार आहे. “ ओरु मासम, माळइ, माळइ, माळइ. ” अख्खा महिना फक्त पाऊस, पाऊस आणि पाऊस. “आज जरा सूर्याने दर्शन दिलंय.” वर्तमानपत्रातल्या बातम्यांमध्ये त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळतो. २०२१ साली तमिळ नाडूमध्ये ५७% अतिरिक्त पाऊस झाल्याचं त्यात म्हटलं आहे.

आम्ही गोपांच्या शेताकडे जात असताना दोन वयस्क शेतकऱ्यांची गाठ पडते. खांद्यावर शाल, डोक्यावर टोपी आणि छत्री घेऊन दोघं रानाकडे निघाले होते. एकदम अस्खलित कन्नडमध्ये ते नाचणीची शेती किती घटलीये ते आम्हाला सांगतात. गोपा दुभाषाचं काम करतात.

७४ वर्षीय के. राम रेड्डी खात्रीने सांगतात की काही दशकांपूर्वीच्या तुलनेत आता नाचणीचं क्षेत्र निम्म्यावर आलं आहे. “घरटी दोन एकर. इतकीच नाचणी आम्ही आता करतोय.” बाकी रानात फक्त टोमॅटो आणि घेवडा. त्यातही जी नाचणी पेरतात ती नुसती “हायब्रीड, हायब्रीड, हायब्रीड,” ६३ वर्षीय कृष्णा रेड्डी ठासून सांगतात.

नाटु रागी शक्ती जास्ती [गावरान नाचणीच शक्ती जास्त],” दंडाची बेटकुळी दाखवत राम रेड्डी म्हणतात. आपण तरुणपणी गावरान नाचणीच खाल्लीये आणि त्यामुळेच आजही आपली तब्येत अशी ठणठणीत असल्याचं त्यांचं स्पष्ट मत आहे.

या वर्षींच्या पावसावर मात्र ते चांगलेच नाराज आहेत. “फार वाईट,” रेड्डी पुटपुटतात.

आपल्याला कसलीही नुकसान भरपाई मिळेल याची त्यांना खात्री नाही. “कशामुळेही नुकसान होऊ दे, लोकांचे हात ओले केल्याशिवाय आम्हाला काहीही मिळत नाही. आणि जमिनीचा पट्टा पण आमच्या नावावर असायला लागतो.” त्यामुळे खंडकरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची कसलीच आशा नाही.

PHOTO • Aparna Karthikeyan
PHOTO • Aparna Karthikeyan

डावीकडेः गोल्लापल्लीमध्ये कृष्णा रेड्डी आणि राम रेड्डी (लाल टोपी घातलेले). उजवीकडेः हत्तींनी तुडवलेल्या पिकांचे फोटो आनंदा दाखवतायत

आणि हे काही वाटतं तितकं सरळसोपं नाही. नागण्णांना त्यांच्यात भावाने फसवलंय. कसं ते आनंदा आम्हाला प्रत्यक्षात करूनच दाखवतात. आधी एका दिशेला चार पावलं चालत जातात आणि नंतर विरुद्ध दिशेला चार. “जमिनीची वाटणी त्यांनी अशी केली. इतकी पावलं तुझी आणि इतकी पावलं माझी. आमचे वडील काही शिकलेले नाहीत. ते राजी झाले. आमच्याकडे फक्त चार एकर जमिनीची कागदपत्रं आहेत.” प्रत्यक्षात ते किती तरी जास्त जमीन कसतायत. पण अधिकृतरित्या त्यांच्या ताब्यात असलेल्या चार एकरांपलिकडे त्यांना नुकसान भरपाईसाठी दावासुद्धा करता येत नाही.

तिथे त्यांच्या ओसरीत आम्ही बसलो असताना ते आम्हाला काही फोटो आणि कागदपत्रं दाखवतात. कुठे हत्तीनी पिकं तुडवली तर कुठे डुकरांनी. एक झाड मोडून टाकलं होतं आणि पिकांची नासधूस. मोडून पडलेल्या फणसाच्या झाडापुढे उंचेपुरे, व्यथित नागण्णा उभे आहेत.

“शेतीत पैसा कमवता येतो का? एखादी छान गाडी विकत घेता येते? किंवा चांगले कपडे? कमाई इतकी कमी आहे. आणि माझ्या नावाने जमीन असूनसुद्धा मी हे म्हणतोय,” नागण्णा म्हणतात. त्यांनी बाहेर जायचे कपडे घातलेत, पांढरा सदरा, नवं धोतर, डोक्याला टोपी, मास्क आणि रुमाल. “चला, माझ्याबरोबर देवळात चला,” ते आम्हाला सांगतात. आणि आम्ही खुशीत त्यांच्यासोबत निघतो. ते देनकनीकोट्टई तालुक्यातल्या एका देवळात उत्सवाला निघाले होते. अर्ध्या तासाचा प्रवास, पण ‘स्टार’ म्हणजेच चकचकीत रस्त्यावरचा.

नागण्णा आम्हाला एकदम चोख दिशा सांगतात. हा सगळा भाग कसा बदलत चाललाय याची ते आम्हाला इत्थंभूत माहिती देतात. गुलाबाची शेती करणाऱ्यांनी प्रचंड कर्जं काढलीयेत, ते म्हणतात. सणासुदीच्या काळात त्यांना किलोमागे ५० ते १५० रुपये भाव मिळतो. गुलाबाची खासियत सुगंध किंवा रंग नसून हत्तींना ही आवडत नाहीत ही असल्याचं पहिल्यांदाच माझ्या लक्षात आलं.

PHOTO • M. Palani Kumar
PHOTO • M. Palani Kumar

डावीकडेः देनकनकोट्टईला मंदिरातल्या एका उत्सवासाठी निघालेले नागण्णा. उजवीकडेः उत्सवाची सुरुवात यात्रेने होते, त्यासाठी सर्वात अग्रभागी असलेला हत्ती दुसऱ्या मंदिरातून इथे आणण्यात आला होता

मंदीर जसजसं जवळ यायला लागलं तशी रस्त्याची गर्दी वाढायला लागली. मोठी यात्रा निघते आणि गंमत म्हणजे अग्रभागी हत्ती होता. “आपल्याला हत्तीदादा भेटणार,” नागण्णा म्हणतात. ते आम्हाला मंदिरातल्या अन्नछत्रात नाश्ता करायला बोलावतात. तिथल्या खिचडीचा आणि भजीचा स्वाद केवळ स्वर्गीय. तमिळ नाडूच्याच दुसऱ्या एका मंदिरातून आणलेला हत्ती माहुत आणि पुजाऱ्याबरोबर येता झाला. “ पाळुत आनई ,” म्हातारी हत्तीण, नागण्णा म्हणतात. ती अगदी सावकाश, संथपणे चालत होती. हातातले मोबाइल फोन उंचावत लोक अक्षरशः शेकड्याने फोटो काढत होते. जंगलापासून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर हत्तीचं हे एक वेगळंच रुप होतं.

घराच्या ओसरीत गळ्याभोवती पंचा गुंडाळून उकिडवे बसलेले आनंदा काय म्हणाले होते ते एकदम मला आठवतं, “एक-दोन हत्ती आले ना तर आमची काहीच हरकत नसते. पण तरुण नर असतात ना, त्यांना कशाचंच भय नाही. कुठलंही कुंपण घाला ते त्याच्यावरून बिनधास्त उडी टाकतात आणि खायला सुरुवात करतात.”

आनंदांना त्यांची भूकही कळते. “अर्धा किलो अन्नासाठी आपण किती उठाठेवी करतो. हत्तींनी काय करायचं? त्यांना रोज २५० किलो खाणं लागतं! आम्हाला एका फणसाच्या झाडापासून ३,००० किलो उत्पन्न मिळू शकतं. पण ज्या वर्षी हत्तीच सगळं काही फस्त करतात तेव्हा देवच आपल्या दारी येऊन गेला असं मानायचं, बस्स,” ते हसतात.

तरीही, त्यांची फार मनापासून एक इच्छा आहे. रानात ३०-४० पोती नाचणी काढायचीच. “ सेयनम, मॅडम. ” करणारच बघा.

मोट्टई वालची मर्जी असू दे रे बाबा...

या संशोधन प्रकल्पास अझीम प्रेमजी युनिवर्सिटी, बंगळुरूकडून संशोधन सहाय्य कार्यक्रम २०२० अंतर्गत अर्थसहाय्य मिळाले आहे.

शीर्षक छायाचित्रः एम. पलानी कुमार

अनुवादः मेधा काळे

Aparna Karthikeyan
aparna.m.karthikeyan@gmail.com

Aparna Karthikeyan is an independent journalist, author and Senior Fellow, PARI. Her non-fiction book 'Nine Rupees an Hour' documents the disappearing livelihoods of Tamil Nadu. She has written five books for children. Aparna lives in Chennai with her family and dogs.

Other stories by Aparna Karthikeyan
Photographs : M. Palani Kumar

M. Palani Kumar is Staff Photographer at People's Archive of Rural India. He is interested in documenting the lives of working-class women and marginalised people. Palani has received the Amplify grant in 2021, and Samyak Drishti and Photo South Asia Grant in 2020. He received the first Dayanita Singh-PARI Documentary Photography Award in 2022. Palani was also the cinematographer of ‘Kakoos' (Toilet), a Tamil-language documentary exposing the practice of manual scavenging in Tamil Nadu.

Other stories by M. Palani Kumar