“पाणी परत थांबेल आहे,” आपली बांबूची काठी टेकत टेकत शेताकडे जाताना धर्मा गरेल म्हणतात. “यो जून महिना ईचित्रच झालाय. २-३ तास पाणी पडतो. कधी टिपकलतो तं कधी जोर धरतो. मंगा सहन नाय होय असा गरमा. जमीन सुखी ठाक प़डते. त्यातूच ई माती कोरडी. रोपा जगायची कशी?”
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातल्या गरेलपाडा या १५ वारली कुटुंबांच्या पाड्यावरती आपल्या एक एकर शेतात ८० वर्षांचे धर्मा गरेल भातशेती करतात. २०१९ च्या जूनमध्ये त्यांनी लावलेला भात पूर्ण वाळून गेला. तेव्हा ११ दिवसांमध्ये फक्त ३९३ मिमी पाऊस झाला (महिन्याच्या सरासरी ४२१.९ मिमीपेक्षाही कमी).
त्यांचं साळीचं बी उगवूनदेखील आलं नाही – बी, खत, ट्रॅक्टरचं भाडं आणि बाकी गोष्टींवर खर्च केलेले १०,००० रुपये वाया गेले.
“ऑगस्ट महिना उजाडला तेव्हा कुठे जमीन जरा गार व्हायला लागली. दुसर्यांदा पेराय घेतला तं हाती पीक लागंल, ना काय तरी फायदा होल असा वाटत होता,” धर्मांचा मुलगा, ३८ वर्षीय राजू सांगतो.
जून तसा कोरडाच गेला, त्यानंतर जुलै महिन्यात मात्र भरपूर पाऊस झाला – १५८६.८ मिमी जो एरवीच्या ९४७.३ मिमीपेक्षाही जास्त होता. त्यामुळे मग गरेल कुटुंब दुबार पेरणीवर आशा ठेवून होते. ऑगस्ट उजाडला आणि पावसाचा जोर चांगलाच वाढला – पार ऑक्टोबरपर्यंत तो तसाच राहिला. ठाणे जिल्ह्यातल्या सातही तालुक्यांमध्ये ११६ दिवसात अतिरिक्त १२०० मिमी पाऊस पडला.
“सप्टेंबर महिन्यापर्यंत पडला तेवढा पाणी पिकाला बस होता. आता आपले माणूस पण पोट फुट तव पर्यात खात नाय, म बारिक रोपाचा काय सांगायचा?” राजू म्हणतो. ऑक्टोबरच्या पावसाने गरेल कुटुंबांच्या शेतात पाणी साचलं. “आम्ही सप्टेंबरच्या शेवटी भातं कापायला सुरुवात केली होती आणि भारं बांधून ठेवलं होतं,” राजूची बायको, ३५ वर्षांची सविता सांगते. “बाकीचा भात कापायचा होता. ५ ऑक्टोबरनंतर अचानक पाण्यानी जोर धरला. आम्ही कापलेल भात कसा-बसा करून घरात आणला, पण काही मिनिटीत आख्खा शेत पाण्याशी भरला..”
ऑगस्टच्या दुबार पेरणीचा ३ क्विंटल भात गरेल कुटुंब कसं तरी करून वाचवू शकले. एरवी त्यांचा एका पेऱ्यातच ८-९ क्विंटल भात निघायचा.












