“तसंही आमची कामं कमीच झाली होती,” जगमोहन सांगतात. गेल्या वर्षी राज्य शासनाने लाकूड आणि भुश्शावर चालणाऱ्या भट्ट्या बंद करण्याचे आदेश काढले त्या संदर्भात दिल्लीच्या पश्चिमेला असलेल्या उत्तम नगर वसाहतीत कुंभारकाम करणारे जगमोहन सांगतात. “त्यामुळे काही जण कमी प्रमाणावर वस्तू बनवतायत, काही फक्त माल विकतायत आणि इतरांनी हे कामच सोडलंय. आणि आता ही महामारी आणि टाळेबंदी आमचा जो खरा विक्रीचा काळ असतो तेव्हाच आमच्या मुळावर आलीये [मार्च ते जुलै].”
जगमोहन (वरील शीर्षक छायाचित्रात, ते आडनाव लावत नाहीत) ४८ वर्षांचे आहेत आणि गेल्या ३० वर्षांपासून कुंभार काम करतायत. “एक चांगली गोष्ट होती ती म्हणजे, या वर्षी माठांना चांगली मागणी होती. कारण लोक फ्रीजमधलं पाणी प्यायला घाबरत होते [कोविडसंबंधी भीतीमुळे]. पण टाळेबंदीच्या काळात आमच्याकडची माती संपली, पुरेसा माल आणता आला नाही.” एक कुंभार घरच्यांच्या मदतीने २-३ दिवसांत मिळून साधारणपणे १५०-२०० माठ बनवतो.
या वस्तीत सगळ्या गल्ल्यांमध्ये मातीचे ढीग लागलेले दिसतात – आणि काम जोरात सुरू असतं तेव्हा तर कुंभाराची चाकांचे आणि घरांमधून आकार देण्यासाठी माठांना थापटण्याचे. घराच्या अंगणांमध्ये, छोट्या कारखान्यांमध्ये हजारो माठ, पणत्या, मूर्ती आणि इतरही अनेक वस्तू सुकायला ठेवलेल्या असतात. सुकल्यावर त्यांना गेरुचा हात मारला जातो. त्यानंतर आव्यात मडकी वगैरे भाजली जातात. इथल्या घरांच्या गच्चीवर या भट्ट्या बांधल्या आहेत. बाहेरच्या बाजूला किती तरी गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत. इथूनच गिऱ्हाईक आणि विक्रेते माल विकत घेतात.
प्रजापती कॉलनी किंवा कुम्हार गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीत ४००-५०० कुटुंबं राहत असावीत, या वस्तीचे प्रधान, हरकिशन प्रजापती सांगतात. “उत्तर प्रदेश आणि बिहारचे अनेक कुंभार आणि त्यांचे मदतनीस कामच नाही त्यामुळे गावी परतले आहेत,” ६३ वर्षीय प्रजापती सांगतात. १९९० साली राष्ट्रीय पुरस्कार आणि २०१२ साली शिल्प गुरू पुरस्काराचे मानकरी आहेत.










