बैदेही आणि तिचा नवरा गेल्या दशकभराहून अधिक काळ तेलंगणात संगारेड्डी जिल्ह्यामधल्या वीटभट्टीवर काम करतायत. गुम्माडिडाला तालुक्यात डोमाडुगू गावात ही वीटभट्टी आहे. ओडिशाच्या नुआपाडा जिल्ह्यातल्या कुरुमपुरी पंचायतीतून दर वर्षी ते इथे येतात. ‘‘शेठकडून २० हजार रुपये उचल घेतली होती आम्ही,’’ बैदेही सांगते. वीटभट्टीचा मालक त्यांना जेवणासाठी दिवसाला ६० रुपये देतो. “शेठला सांगा ना, निदान ८० रुपये तरी द्या. झोपी जाताना पोट अर्धं तरी भरू दे बाबा.”
२०१७ मध्ये तेलंगणातल्या रंगारेड्डी, संगारेड्डी आणि याडद्री भुवनगिरी जिल्ह्यातल्या वीटभट्ट्यांना मी भेट दिली होती, तेव्हा बैदेहीच्या कुटुंबाला भेटलो होतो.
यापूर्वी अनेक वर्षं मी स्थलांतराचा अभ्यास करत होतो, त्याचं रिपोर्टिंग करत होतो. कालाहांडी (आता त्याचं विभाजन होऊन नुआपाडा जिल्हा तयार झालाय) आणि त्याच्या लगतचा बोलंगिर (किंवा बालंगिर, आता याचंही विभाजन झालंय आणि सोनेपूर हा जिल्हा तयार झालाय, पण त्याला आता सुवर्णपूर म्हणतात) या जिल्ह्यांतून होणाऱ्या स्थलांतराचा हा अभ्यास होता. १९९० च्या दरम्यान मला या भागातून चार प्रकारे स्थलांतर होतंय, असं दिसून आलं होतं.
एक, (आता छत्तीसगडची राजधानी असलेल्या) रायपूर शहरात रोजंदारीवर मजुरी, रिक्षा ओढण्यासाठी, हॉटेलमध्ये साफसफाईचं काम किंवा इतर कोणत्याही प्रकारची मजुरी करण्यासाठी लोक स्थलांतर करत. दुसरं, काही जण शेतीसाठी बारगड, संबलपूर अशा सिंचनाच्या चांगल्या सोयी असलेल्या ठिकाणी जात. तिसरं, दिल्ली, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये तरुण बांधकाम मजूर म्हणून काम करण्यासाठी जात असत आणि चौथं, काही कुटुंबं आंध्र प्रदेशात (नंतर ओडिशाच्या किनारपट्टीवरही) वीटभट्टीवर काम करण्यासाठी स्थलांतर करत असत.

















