१९८० पासून जामनगर आणि आसपासच्या परिसरात उद्योगांचा झपाट्याने विकास झाला आहे. “मीठ उद्योग किंवा तेलाच्या जेट्टी आहेत त्याचा परिणाम बघा किंवा इतरही प्रकारचं औद्योकीकरण सुरूच आहे,” ऋतुजा सांगतात. “त्यांच्या कामासाठी त्यांना जमीन मिळण्यात फारशा अडचणी येतच नाहीत – ईझ ऑफ बिझनेस! पण पशुपालकांना आपल्या पोटापाण्याच्या धंद्यासाठी जमीन हवी असते तेव्हा मात्र हे खातं एकदम कर्मठपणे वागतं. आणि खरं तर संविधानाच्या कलम १९ (ज) च्या हे पूर्ण विरोधात आहे. हे कलम प्रत्येक नागरिकाला व्यवसाय स्वातंत्र्य देतं म्हणजेच कोणताही व्यवसाय, धंदा किंवा उद्योग करण्याचा अधिकार देतं.”
सागरी उद्यानाच्या आतल्या भागात चराईवर बंदी असल्यामुळे उंटपाळांना वन खात्याकडून त्रास देण्याच्या घटना वारंवार घडतात. अशा त्रासाचा अनुभव घेतलेले मालधारी म्हणजे आदम जाट. ते सांगतात, “दोनेक वर्षांपूर्वी मला उंटांना इथे चारलं म्हणून वनखात्याने ताब्यात घेतलं आणि माझ्याकडून २०,००० रुपये दंड घेतला.” इतर पशुपालकही असेच इतर अनुभव सांगतात.
“२००६ च्या केंद्र सरकारच्या कायद्याची फारशी काही मदत होत नाहीये,” ऋतुजा मित्रा सांगतात. वन हक्क कायदा, कलम ३ (१) (घ) नुसार गुरे चराई आणि भटक्या, पशुपालक जमातींना हंगामी जंगल वापराचा हक्क देण्यात आला आहे.
“असं असलं तरीही मालधारींना फॉरेस्ट गार्ड वारंवार उंटांच्या चराईवरून शिक्षा करतात आणि पकडल्यावर त्यांना अनेकदा २०,००० ते ६०,००० रुपये इतका दंड भरावा लागतो,” त्या सांगतात. वन हक्क कायद्याअंतर्गत अशा समुदायांच्या हक्कांच्या रक्षणासाठी अनेक उपाय सांगितले आहेत मात्र ते सगळे केवळ कागदावरच राहतात.
पिढ्या न् पिढ्या इथे राहणाऱ्या, इतर कुणाही पेक्षा इथल्या परिसराची खडा न् खडा माहिती असणाऱ्या पशुपालकांना सामील न करता केवळ खारफुटीचं जंगल वाचवण्याचे, वाढवण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. “हा प्रदेश काय आहे, इथल्या निसर्गाचं तंत्र आम्हाला समजतं. आणि खारफुटीचं संवर्धन करण्याचं सरकारचं धोरण आहे ना, त्याच्या आम्ही बिलकुल विरोधात नाही,” जगाभाई रबारी सांगतात. “आमचं इतकंच म्हणणं आहेः कुठलंही धोरण तयार करण्याआधी एकदा आमचं म्हणणं तर ऐकून घ्या. अन्यथा या प्रदेशात राहणारी १,२०० माणसं तर देशोधडीला लागतीलच पण या उंटांचा जीवही धोक्यात येईल.”