महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांमधल्या बायांची ही समृद्ध कला आणि त्यांची जगण्याची काटक वृत्ती यांचं प्रतीक असणाऱ्या या ओव्या पीपल्स अर्काइव ऑफ रुरल इंडिया (पारी) आपल्या वेबसाइटद्वारे सगळ्या जगासमोर आणत आहे. आणि याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जागतिक महिला दिन, ८ मार्च २०१७च्या सन्मानार्थ आम्ही हा संग्रह प्रकाशित करत आहोत.
ओव्यांच्या संग्रहाची मूळ संकल्पना स्व. हेमा राइरकर आणि गी पॉइटवँ यांची. हे दोघंही सामजिक कार्यकर्ते, नावाजलेले तज्ज्ञ आणि सेंटर फॉर को-ऑपरेटिव रिसर्च इन सोशल सायन्सेस, पुणे या संस्थेचे संस्थापक. वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी दोघांनी मिळून महाराष्ट्रातली तब्बल १,१०,००० लोकगीतं कागदावर उतरवली.
१९९० च्या शेवटी शेवटी बर्नार्ड बेल या उपक्रमात सहभागी झाले. फ्रेंच नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रीसर्च इथे अभियंता असणारे आणि नंतर संख्याशास्त्र आणि गणितीय पद्धती वापरून संगीताचा अभ्यास करणारे बेल या उपक्रमामध्ये सामील झाले आणि त्यांनी ही लोकगीतं, त्यांची संबंधित टिपणं आणि तब्बल १२० तासांचं ध्वनीमुद्रण असा एक मोठा दस्तावेज उभा केला. हा सगळा संग्रह गुरगाव, हरयाणा इथल्या अर्काइव्ज अँड रीसर्च सेंटर फॉर एथ्नोम्युझिकॉलॉजी इथे जतन करण्यात आला आणि नंतर तो फ्रान्समधल्या एक्झ ऑन प्रोवॉन्समधल्या स्पीच अँड लँग्वेज डेटा रिपॉझिटरी इथे डॉ. बेल यांच्या देखरेखीखाली हलवण्यात आला. पुढे ओपन अर्कायवल इनफर्मेशन सिस्टिम्ससाठी हा ओव्यांचा संग्रह एक उत्तम नमुना ठरला. इतकंच नाही तर डिजिटल ह्युमॅनिटीज म्हणजेच साहित्य, इतिहासासारख्या शाखा आणि डिजिटल माध्यमं यांचा संयोग करणाऱ्या विद्याशाखेच्या वाढीसाठी या संग्रहाने वाट आखून दिली.
१९९३ ते १९९८ दरम्यान ओवी संग्रह प्रकल्पाला युनेस्को, नेदरलंडचे विकास सहकार्य खाते आणि स्वित्झर्लंडच्या चार्ल्स लिओपोल्ड मेयर फौडेशन फॉर प्रोग्रेस ऑफ ह्यूमनकाइंड या संस्थांचे अर्थसहाय्य मिळाले.
प्रा. बेल सांगतात, “ओव्यांच्या संग्रहाचं दस्तावेजीकरण, संपादन आणि अनुवाद पूर्ण करणं आणि ते मुक्त प्रवेश (ओपन अॅक्सेस) मंचावर प्रकाशित करणं ही माझी हेमा राइरकर आणि गी पॉइटवँ यांच्याशी असणारी वैयक्तिक बांधिलकी होती. २०१५ च्या जानेवारीमध्ये पुण्यात ओव्यांसंबंधी काम करणाऱ्या काही अनुभवी व्यक्तींना मी काही उपकरणं देणगी म्हणून दिली. आणि त्यानंतर हा उपक्रम नव्याने सुरू झाला. हा सगळा संग्रह प्रकाशित करण्यासाठी आम्ही एक कच्चा आराखडा तयार केला. यासाठी सगळ्या संग्रहाची नव्याने जुळणी आणि वेगवेगळ्या देवनागरी संकेतनांतून (encoding) लिखितांचं अनु संकेतन (transcoding) करणं यासाठी मोठी गुंतवणूक आवश्यक होती.”
पारीने यात भाग घेतला आणि काही जुन्या आणि नव्या सहकाऱ्यांच्या मदतीने हा प्रकल्प परत एकदा सुरू झाला. गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्थेच्या माजी दस्तावेज अधिकारी आशा ओगले यांनी रजनी खळदकर व जितेंद्र मैड या त्यांच्या सहकाऱ्यांसोबत अनुवाद न केलेल्या ७०,००० ओव्या हाती घेतल्या. या सर्वांचं मराठी भाषेचं आणि गावाकडच्या जगण्याचं सखोल ज्ञान यामुळे या अनुवादांना एक अनोखा आणि अनमोल संदर्भ मिळाला.
२०१६ मध्ये अशोका विद्यापीठाबरोबर भागीदारी सुरू झाली. तिथले राज्यशास्त्राचे प्राध्यापक जिल वेर्नियर्स यांनी यात पुढाकार घेतला. २०१६-१७ चे यंग इंडिया फेलो – मेहेरीश देवकी, स्नेहा माधुरी आणि पूर्णप्रज्ञा कुलकर्णी सध्या अनुवादांचं परीक्षण आणि संग्रहासाठी मदत करत आहेत. पारीच्या व्यवस्थापकीय संपादक नमिता वाईकर ओवी प्रकल्पाच्या पारीसाठीच्या प्रमुख आहेत तर अमेरिकन इंडिया फौंडेशन क्लिंटन फेलो, ऑलिव्हिया वॉरिंग संग्रहाच्या अभिरक्षणासाठी (curation) सहयोग देत आहेत.
या प्रकल्पामध्ये ज्यांचं फार मोलाचं योगदान आहे अशा काहींचा उल्लेख करावाच लागेल. भीमसेन नाणेकर (मुलाखती), दत्ता शिंदे (संशोधन सहभाग), मालविका ताळुदकर (छायाचित्रणकार), लता भोरे (डेटा एंट्री) आणि गजराबाई दरेकर (अनुलेखन).
ओव्या सादर करणाऱ्या प्रमुख कलावंत आणि प्रकल्पातल्या एक सहभागी गंगूबाई अंबोरेंच्या निवडक चित्रफिती आणि छायाचित्रं अँड्रियेन बेल यांची आहेत.
पारीतर्फे आपल्या सर्वांना हे हार्दिक निमंत्रण. हा संग्रह पहा, त्याचा अभ्यास करा, त्याचा आनंद घ्या. पुढले काही महिने, खरं तर काही वर्षं आम्ही हा संग्रह टप्प्या-टप्प्याने प्रकाशित करणार आहोत. पारीचे आम्ही सर्व ओवी संग्रहामध्ये सामील असलेल्या सर्वांचे मनापासून आभारी आहोत. या टप्प्यावर महाराष्ट्राच्या खेडोपाडीच्या अगणित अनाम बायांच्या आयुष्यांची आणि त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेणं भाग आहे. खेद इतकाच की त्यांची नोंद घेण्यासाठी ना कुठला दस्तावेज आहे ना कोणची गीतं...
ध्वनीफीत – ओवी गाताना गंगूबाई