"३५० रुपयांना लावतो. आता आणखी भाव करू नका, आधीच कोरोनापायी काही कमाई होईना गेलीये," प्रकाश कोकरे एका गिऱ्हाइकाशी सौदा करत होते. त्यांनी एक ढवळं कोकरू उचललं आणि जमिनीवरच्या वजन काट्यावर ठेवलं. "तीन किलो," त्यांनी रू. २०० प्रति किलोवर अडून बसलेल्या दोन ग्राहकांना सांगितलं. "लई कमी सांगताय, पर मलाच पैशाची नड हाय," ते कोकरू त्याच्या नव्या मालकांकडे सुपूर्द करुन प्रकाश म्हणाले.
"जाऊ द्या, काय करणार?" ते मला म्हणाले. वाडा तालुक्यातील देसाईपाड्यात जूनच्या अखेरच्या आठवड्यात दुपारी एका माळावर माझी त्यांची भेट झाली. कोविड-१९ टाळेबंदी लागून तीन महिने उलटले होते.
प्रकाश यांच्यासह आणखी सहा कुटुंबं दोन दिवस महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील त्या माळावर मुक्कामाला होती. सगळे भटक्या पशुपालक धनगर समाजातले. काही बाया पिलं इथंतिथं जाऊ नयेत म्हणून नायलॉनचं कुंपण घालत होत्या. धान्याने भरलेली पोती, ॲल्युमिनयमची भांडी, प्लास्टिकच्या बादल्या आणि इतर वस्तू माळावर विखुरल्या होत्या. काही मुलं कोकरांसोबत खेळत होती.
कोकरं, बकरे व मेंढ्या विकणं – जसं प्रकाश यांनी नुकतंच भाव करून विकलं – हे या धनगर समूहांसाठी उदरनिर्वाहाचं मुख्य साधन आहे. या सात कुटुंबांकडे २० घोडी धरून सुमारे ५०० जितराब आहे. ते मेंढ्या पाळतात आणि पैशाच्या किंवा धान्याच्या बदल्यात त्या विकतात. शेळ्या सहसा आपल्या कुटुंबाच्या वापरासाठी लागणारं दूध काढायला ठेवल्या जातात आणि एखाद्या वेळी बकरे मटण विक्रेत्यांना विकल्या जातात. कधीकधी त्यांचं जितराब कुरणांवर चरतं आणि त्यांच्या लेंड्यांच्या बदल्यात जमिनीचे मालक या कुटुंबांची काही दिवस खाण्यापिण्याची आणि राहण्याची सोय करतात.
"आम्ही फकस्त मेंढा विकतो अन् मेंढी ठेऊन घेतो," या मेंढपाळांचे म्होरके ५५ वर्षीय प्रकाश म्हणाले. "शेतकरी आमच्याकडून मेंढरं विकत घेतात कारण शेतावर चरायला ती कामी येतात. त्यांच्या लेंड्यांमुळं जमीन सुपीक होते."











