“मी सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही,” नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या अहिवंतवाडीच्या ५० वर्षीय कुंदाबाई गांगुडे सांगतात. दुपारचे १.३० वाजायला आले होते. “माझ्या गावची माणसं आली की मगच मी जेवेन.”
कुंदाबाई इतर काही स्त्रिया आणि पुरुषांसोबत मिळून ५० शेतकऱ्यांसाठी भात शिजवत होत्या. हे सगळे मागील आठवड्यात झालेल्या लाँग मार्च मधल्या मोर्चेकऱ्यांसाठी जेवण बनवायला त्यांच्या तालुका तुकड्यांआधी पुढे आले होते. जवळच, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील सोनजांब गावातून आलेल्या गंगुबाई भवर (शीर्षक छायाचित्रात दिसून येणाऱ्या) वांगे - बटाटे शिजवत होत्या. "आमच्या तालुक्यातले शेतकरी सोबत धान्य, पीठ-मीठ अन् भाज्या घेऊन आलेत," त्या म्हणाल्या.
२१ फेब्रुवारी रोजी नाशिकहून ११ किमी पायी चालत गेल्यावर दुपारी २:३०च्या सुमारास नाशिक तालुक्यातील विल्होळी गावाहून एखाद किमी दूर शेतकऱ्यांनी जेवायला थांबा घेतला. ते आपल्या गावांतून २० फेब्रुवारीला नाशिकला येऊन पोहोचले होते. (शासनाच्या प्रतिनिधींसोबत दीर्घकाळ चर्चा केल्यावर आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होतील अशी शासनाकडून लेखी हमी आल्यावर मार्च आयोजित करणाऱ्या अखिल भारतीय किसान सभेने २१ फेब्रुवारीला उशिरा रात्री आंदोलन मागे घेतलं.)
२०१८ मध्ये नाशिक ते मुंबई झालेल्या लॉंग मार्च दरम्यानसुद्धा महादेव कोळी या अनुसूचित जमातीच्या कुंदाबाईंनी आपल्या गावातील मंडळींसाठी जेवण बनवलं होतं.
![](/media/images/IMG_20190221_132501.width-1440.jpg)
' आम्ही सगळ्या [नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील] वेगवेगळ्या गावांतून आलो आहोत. मागच्या लॉंग मार्चच्या वेळी आमची गट्टी जमली ,' धान्य निवडता निवडता बाया सांगतात
या वेळीदेखील शेतकऱ्यांनी गावामध्ये सगळा शिधा गोळा करून टेम्पो आणि इतर वाहनांमधून सोबत आणला होता. मागच्या लाँग मार्चसारखंच या वेळीही त्यांनी सगळी कामं आपापसात वाटून घेतली होती. काही जणी धान्य निवडत होत्या, बाकी भाकरीसाठी पीठ मळत होत्या, काही चुलीपाशी तर काही भांडी घासण्याचं काम करत होते.
त्यातलेच एक म्हणजे नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या निरगुडे करंजळी गावचे पांडुरंग पवार. जवळ जवळ दीड तास ते चुलीसाठी लाकडं फोडत होते. पांडुरंग शेतमजूर आहेत आणि दिवसाकाठी १० तासांचं काम केल्यानंतर त्यांना २०० रुपये मजुरी मिळते. ते कोकणा या आदिवासी समुदायाचे आहेत.
ते पुन्हा एकदा मोर्चाला का आले आहेत असं विचारल्यावर ते म्हणाले, “सरकारने दिलेलं एकही वचन पाळलेलं नाही. आम्हाला रेशन मिळत नाही. आमच्यापाशी जमीन नाही. आम्ही दुसरं काय करणार?” ते असंही म्हणाले की जर या वेळीदेखील सरकारने शब्द पाळला नाही तर ते तिसऱ्यांदा देखील मोर्चाला यायला तयार आहेत. तेव्हा तर आम्ही “आमचा सगळा बारदाना, पोरं, जनावरं घेऊन येऊ. आता काही आम्ही हटणार नाही...”
![](/media/images/IMG_4882.width-1440.jpg)
नाशिक जिल्ह्याच्या निरगुडे करंजळी गावच्या पांडुरंग पवारांनी सामुदायिक जेवणाची तयारी म्हणून चुलीसाठी लाकडं फोडून ठेवली होती
![](/media/images/IMG_4889.width-1440.jpg)
आपल्या तालुक्यातल्या इतर शेतकऱ्यांच्या शोधात, जेवणाची वेळ झाली
![](/media/images/IMG_20190221_133333.width-1440.jpg)
चुलीचा जाळ लागत असताना, नाका-तोंडात धूर जात असताना स्वयंपाक करणं तितकंसं सोपं नव्हतं
![](/media/images/IMG_4847.width-1440.jpg)
कुंदाबाई गांगुडेंनी या मोर्चामध्ये अगदी सुरुवातीला काही जेवणं रांधली, २०१८ च्या लाँग मार्चच्या वेळी देखील त्यांनी हे काम केलं होतं
![](/media/images/IMG_4874.width-1440.jpg)
काही शेतकरी मसाले भात बनवत होते
![](/media/images/IMG_20190221_143637.width-1440.jpg)
बाकी काही आपल्या आंदोलक मित्रांना जेवण वाढत होते
![](/media/images/IMG_5024.width-1440.jpg)
रात्रीच्या अंधारात एलईडी विजेरीच्या उजेडात शेतकऱ्यांनी भाजी बनविली
अनुवादः कौशल काळू