२००७ साली पोलामारासेट्टी पद्मजा हिला लग्नात घरून हुंड्यात २५ तुळम् (२५० ग्रॅम) सोनं मिळालं होतं. "माझ्या नवऱ्यानं ते सगळं मोडलं आणि खर्चून टाकलं. तेव्हा त्याला मी पण नकोशी झाले होते," ३१ वर्षीय पद्मजा म्हणते. पोटापाण्यासाठी ती आता घड्याळं दुरुस्त करते.
पद्मजा यांच्या नवऱ्याने थोडं थोडं करून सगळे दागिने मोडले, आणि दारूवर उडवले. "मला स्वतःचं अन् माझ्या घरच्यांचं, खासकरून माझ्या मुलांचं पोट भरावं लागलं," ती सांगते. २०१८ मध्ये तिचा नवरा घरदार सोडून गेला तेव्हापासून ती घड्याळं दुरुस्त करतेय – आणि आंध्र प्रदेशातील विशाखपट्टणम शहरात हे काम करणारी ती कदाचित एकमेव महिला असावी.
तेव्हापासून ती एका छोट्या घड्याळाच्या दुकानात दरमहा रू. ६,००० पगारावर काम करते. पण मार्चमध्ये कोविड-१९ टाळेबंदी सुरू झाली, तेव्हा तिच्या कमाईला फटका बसला. तिला त्या महिन्यात अर्धाच पगार मिळाला, आणि एप्रिल व मे महिन्यात तर काहीच नाही.
"मागे टाकलेल्या पैशातून कसंबसं मेपर्यंत भाडं भरलं," पद्मजा म्हणते. ती आपली मुलं अमन, वय १३ आणि राजेश, वय १० यांच्यासह शहराच्या कंचरपालेम वस्तीत राहते. "माझ्या मुलांना शाळेत पाठवता येईल अशी आशा आहे. त्यांनी माझ्यापेक्षा [इयत्ता १०वी] जास्त शिकावं, असं वाटतं."
पद्मजाच्या पगारावर पूर्ण घर अवलंबून आहे, तिचे आईवडीलही. तिचा बेरोजगार नवरा काडीचीही आर्थिक मदत करत नाही. "तो अजूनही येत राहतो, पण पैशाची चणचण असेल तेव्हाच," पद्मजा म्हणते. तो आला की ती त्याला राहू देते.
"घड्याळ दुरूस्त करणं शिकायचं अचानकच ठरलं," तिला आठवतं. "माझा नवरा निघून गेला, तेव्हा मी सुन्न झाले होते. मी खूप कचखाऊ होते अन् मैत्रिणी म्हणाल तरी अगदी मोजक्याच. मला काय करावं ते कळेना, तेव्हा एका मित्रानं मला हे सुचवलं." तिच्या मैत्रिणीचे भाऊ, एम. डी. मुस्तफा, यांनी पद्मजाला घड्याळं कशी दुरुस्त करायची ते शिकवलं. त्यांचं विशाखपट्टणमच्या वर्दळीच्या जगदंबा जंक्शन भागात घड्याळाचं दुकान आहे, याच भागातल्या एका दुकानात पद्मजा काम करते. सहा महिन्यांत तिने हे कौशल्य आत्मसात केलं.










