“वर्षभरात आमची किती तरी जनावरं बिबट्याच्या तोंडी जातात. ते रात्री येऊन पिलं उचलून घेऊन जातात,” शेरडं राखणारे गौर सिंग ठाकूर सांगतात. तिथला स्थानिक भुटिया कुत्रा शेरूसुद्धा त्यांना काहीही करू शकत नाही, ते म्हणतात.
हिमालयाच्या गंगोत्री पर्वतरांगांमध्ये आमची त्यांच्याशी गाठ पडली. उत्तरकाशी जिल्ह्यातल्या सौरा गावातल्या सात कुटुंबांची मेंढरं ते राखतात. गौर सिंगसुद्धा २,००० मीटर खाली असलेल्या या गावाचेच रहिवासी आहेत. वर्षातले नऊ महिने ते ही मेंढरं राखतात. तसा त्यांचा करारच झालेला आहे. पाऊस येवो किंवा बर्फ, त्यांना घर सोडून बाहेर पडावंच लागतं. मेंढर चारायची, मोजायची आणि सुखरुप परत आणायची.
“इथे बघा, ४०० मेंढरं आणि १०० शेरडं असतील,” डोंगरउतारावर चरत असलेल्या जित्राबाकडे पाहत ४८ वर्षांचे हरदेव सिंग ठाकूर म्हणतात. “जास्त पण असतील,” नक्की आकडा किती हे काही ते खात्रीने सांगू शकत नाहीत. हरदेव गेली १५ वर्षं मेंढरं राखतायत. “काही मेंढपाळ आणि हाताखाली काम करायला माणसं दोन आठवड्यांसाठी येतात. माझ्यासारख्या काही जणांना हे काम आवडतं, आणि ते जास्त काळ थांबतात,” ते सांगतात.
ऑक्टोबर महिना सुरू आहे. उत्तराखंडच्या गढवाल हिमालयातल्या गंगोत्री पर्वतरांगांमध्ये, चुली टॉप या विस्तीर्ण गवताळ पट्ट्यातलं गवत बोचऱ्या वाऱ्यांवर डुलतंय. एकमेकांना ढुसण्या देत जाणाऱ्या मेंढरांसोबत जाणाऱ्या मेंढपाळांनी थंडीपासून बचाव म्हणून अंगावर ब्लँकेट लपेटून घेतली आहेत.









