जंगलाच्या राजाला कुणी वाट पहायला लावत नसतं.
सिंह यायला निघाले होते. थेट गुजरातमधून. आणि त्यांना इथे काही त्रास होऊ नये म्हणून बाकी सगळ्यांनी आपापला पसारा तिथून हलवला होता.
सगळं सुरळित सुरू होतं. मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यातल्या पैरासारख्या गावांना मात्र हे सगळं कसं पार पडणार याची खात्री नव्हती.
“जंगलचा राजा येणार, हा सगळा प्रदेश प्रसिद्ध होणार. आम्हाला गाइड म्हणून नोकऱ्या मिळणार. इथे आम्ही दुकानं आणि खानावळी चालवू शकू. आमची सगळीच भरभराट होणार.” सत्तरी पार केलेले रघुलाल जाटव कुनो अभयारण्याबाहेर अगारा गावी आमच्याशी बोलत होते.
“आम्हाला चांगली, पाण्याची जमीन मिळणार, पक्के रस्ते, गावाला अखंड वीज आणि सगळ्या सुविधा,” रघुलाल सांगतात.
“अशी सगळी वचनं या सरकारने आम्हाला दिली होती. काय सांगायचं?” ते म्हणतात.
आणि या वचनांवर विश्वास ठेवून पैरा आणि इतर २४ गावातल्या मिळून १,६०० कुटुंबं कुनो अभयारण्यातली आपली घरं सोडून बाहेर पडली. यातले बहुतेक सहरिया आदिवासी होते तसंच दलित आणि इतर मागासवर्गीयही होते. अज्ञातवासातला त्यांचा प्रवास तसा घाईघाईतच झाला.
ट्रॅक्टर आले आणि पिढ्या न् पिढ्या जंगलात राहत असलेल्या या लोकांनी आपला सगळा पसारा घाईघाईत गुंडाळला आणि राहती घरं सोडली. नुसती घरं नाही. गावातले हापसे, विहिरी, प्राथमिक शाळा आणि पिढ्या न् पिढ्या कसलेल्या जमिनीदेखील मागे राहिल्या. गुरं सोडून दिली. जंगलच नाही तर त्यांना पुरेसा चारा कसा मिळणार या चिंतेने त्यांचा भार उचलला नाही.
तेवीस वर्षं उलटली, सिंह अजून येतातच आहेत.


















