“लॉकडाऊनच्या काळात आम्हाला खूप तणावातून जावं लागलं. कोविड-१९च्या सर्वेक्षणाबरोबरच एप्रिल ते जुलै या तीन महिन्यात मी २७ बाळंतपणं हाताळली आहेत. सुरुवातीच्या तपासण्यांपासून ते प्रसूतीसाठी आईला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाईपर्यंत, मी कायम सोबत होते,” उस्मानाबाद जिल्ह्यातील निळेगावच्या आशा कार्यकर्ती (अक्रेडिटेड सोशल हेल्थ एक्टीव्हिस्ट), तनुजा वाघोले सांगत होत्या.
मार्चच्या अखेरीस लॉकडाऊन लागू झाल्यापासून, पहाटे ४ वाजता उठून, घरातली कामं आणि नवऱ्याचा आणि दोन मुलांचा स्वयंपाक करून तनुजा घराबाहेर पडत होत्या. (त्यांची नेहमीची वेळ सकाळी ७.३०ची होती). “मी जर सकाळी ७.३०ला घरातून बाहेर पडले नाही, तर मला कोणीच भेटणार नाही. कधी कधी तर फक्त आम्ही भेटू नये, आमच्या सूचना ऐकाव्या लागू नये म्हणून लोक सकाळी लवकर घरातून निघून जातात,” त्या सांगत होत्या.
आशाचं काम खरं तर महिन्यातले १५-२० दिवस, दिवसातून केवळ ३-४ तास असतं. परंतु २०१० पासून आशा म्हणून काम करीत असलेल्या ४० वर्षीय तनुजा सध्या दिवसातून सहा तास कामावर असतात आणि तेही जवळपास दररोज.
सात एप्रिलपासून तुळजापूर तालुक्यातील निळेगावात कोविड-१९ सर्वेक्षणाला सुरुवात झाली. तेव्हापासून तनुजा त्यांच्या सहकारी आशा, अलका मुळे यांच्यासह त्यांच्या गावातील ३०-३५ घरांना दररोज भेटी देत आहेत. “आम्ही घरोघरी जातो आणि कोणाला ताप किंवा करोनाची इतर कोणती लक्षणे आहेत का हे तपासतो,” त्या सांगतात. जर कोणाला ताप असेल तर त्यांना पॅरासिटामोलच्या गोळ्या दिल्या जातात. जर त्यांना करोनाची लक्षणे असतील तर २५ किलोमीटरवर अणदूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला माहिती दिली जाते. (यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातून कोणाला तरी कोविडची चाचणी करण्यासाठी पाठवलं जातं; जर चाचणीत कोविडची लागण झाल्याचं निदान आलं तर त्या व्यक्तीला तुळजापूरच्या ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण आणि उपचारासाठी पाठवले जातं.)
गावातली सगळी घरं तपासायला अशा कार्यकर्त्यांना जवळपास १५ दिवस लागतात, त्यानंतर त्या पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतात. निळेगावच्या वेशीवर दोन तांडे आहेत. पूर्वी भटक्या असलेल्या आणि अनुसूचित जमातीत मोडणाऱ्या लमाण समुदायाची ही वस्ती. तनुजा यांच्या अंदाजानुसार मूळ गाव आणि तांडे मिळून एकूण लोकसंख्या ३,०००च्या आसपास आहे. (२०११च्या जनगणनेनुसार निळेगावात ४५२ घरे आहेत.)












