"सर, काही गिऱ्हाईक आलेत. त्यांना काय हवं ते बघू का? माझे इअरफोन चालू आहेत, मी तुमचं बोलणं ऐकत राहीन." आपल्या ठेल्याभोवती भाज्या विकत घ्यायला जमलेल्या गिऱ्हाईकांकडे लक्ष देण्याआधी काही काळ स्वतःला अनम्यूट करून मुझफ्फरने बिचकत त्याच्या मास्तरांची परवानगी घेतली. स्मार्टफोनवर सुरू असलेल्या विज्ञानाच्या तासाला परत जाण्यापूर्वी तो एकदा मोठ्याने ओरडला "ताजी… सब्जी ले लो…"

१५ जून रोजी मुझफ्फर शेखच्या ऑनलाईन वर्गाचा पहिला दिवस होता. "मागे सतत ट्रॅफिकचा आवाज, गिऱ्हाईकांची कलकल ऐकू येत होती. मला वर्गात लक्ष द्यावं की भाज्या विकाव्या हेच कळत नव्हतं," इयत्ता ८वीत असलेला १४ वर्षीय मुझफ्फर म्हणाला. त्या दिवशी सकाळी १०:०० च्या सुमारास उत्तर मुंबईच्या मालाडमधील मालवणी वस्तीत वर्दळीच्या वेळी आपल्या ठेल्यावर वांगी, बीट, काकडी अन् पत्ताकोबी इत्यादी भाज्या विकत त्याने त्या ऑनलाईन वर्गाला 'हजेरी' लावली.

मुझफ्फरने त्या वर्गासाठी एका मित्राकडून काही तासांसाठी फोन मागितला होता. त्याच्याकडे स्वतःचा फोन नाहीये. "त्याच वेळी माझा मोठा भाऊ, मुबारक, [इयत्ता ९ वीचा विद्यार्थी] हासुद्धा त्याच्या मित्राच्या घरी ऑनलाईन क्लासमध्ये होता. पप्पा कामावर गेले होते. मला ठेला बंद ठेवता आला नसता. आम्ही तीन महिन्यांनी नुकतंच १० जूनला [काम] पुन्हा सुरू केलं होतं," तो म्हणतो.

त्याचे वडील, इस्लाम, यांनी जानेवारीत हा ठेला भाड्याने घेतला होता. कुटुंबाचे खर्च वाढत होते आणि त्यांना कमाईचं आणखी एक साधन हवं होतं. चाळिशीचे असलेले इस्लाम ट्रकवर क्लीनर म्हणून कामाला होते, पण पगार कमी असल्याने त्यांनी ते काम सोडून दिलं (जूनमध्ये मात्र ते काम पुन्हा सुरू केलं). त्याची आई, ३५ वर्षीय मोमिना, हेअरक्लिप तयार करते आणि गाऊन शिवते. या सात जणांच्या कुटुंबात दोन वर्षीय हसनैन, आणि दोन मुली, इयत्ता ७ वीत असलेली फरझाना, वय १३ आणि इयत्ता ६ वीत असलेली अफसाना, वय १२ देखील आहेत.

पण ठेला भाड्याने घेण्याच्या दोन महिन्यांच्या आतच २५ मार्च रोजी कोविड-१९ टाळेबंदी झाली आणि या कुटुंबाचा तेजीत असलेली भाज्यांचा धंदा बंद झाला. "आधी पप्पाच ठेला सांभाळायचे," मुझफ्फर म्हणतो. तेव्हा तो आणि १७ वर्षांचा मुबारक सकाळी ७:०० ते १२:०० दरम्यान शाळेत जायचे. शाळा झाल्यावर दोघंही मुलं आपल्या वडिलांना बाजारात भाज्या विकण्यात मदत करायचे.

Mubarak Sheikh and his brother Muzzafar (in white) have been trying to juggle attending online classes and selling vegetables on a handcart
PHOTO • Jyoti
Mubarak Sheikh and his brother Muzzafar (in white) have been trying to juggle attending online classes and selling vegetables on a handcart
PHOTO • Jyoti

मुबारक शेख आणि त्याचा भाऊ मुझफ्फर ( पांढऱ्या कपड्यांत ) यांची ऑनलाईन वर्गात लक्ष आणि ठेल्यावर भाज्या विकणं अशी कसरत सुरू आहे

"मागल्या वर्षापर्यंत आम्ही मोठ्या मुश्किलीने [महिन्याला] ५,००० रुपये कमवायचो," मोमिना म्हणतात. त्यांना पुष्कळदा नातलग व शेजाऱ्यांच्या भरवशावर राहावं लागायचं. मोमिनाला शेजारच्यांकडून एक शिलाई मशीन मिळाली, तेव्हा त्या हेअरक्लिप तयार करण्यासोबत गाऊन शिवून थोडे पैसे कमावू लागल्या, अंदाजे रू. १,०००. पण टाळेबंदीमुळे त्यांचीही कमाई बंद झाली. "किराणा, लाईट बिल, पाणी, शाळेची फी देणं मुश्किल झालं," ती म्हणते. "म्हणून आम्ही भाज्या विकायला सुरुवात केली, पण या लॉकडाऊननं सारं काही बरबाद करुन टाकलं."

शेख कुटुंबियांप्रमाणे असंघटित क्षेत्रात कामाला असणाऱ्या, रोजंदारीवर जगणाऱ्या भारतातील अनेक स्थलांतरित कुटुंबांना टाळेबंदीचा जबर फटका बसला आहे. "किरकोळ व्यापारी, फेरीवाले आणि रोजंदार यांना एप्रिलमध्ये टाळेबंदीचा प्रचंड फटका बसला आहे. या महिन्यात ज्या १२.१५ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या, त्यांपैकी ९.१२ कोटी लोक हे रोजंदार आहेत," असं सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) च्या ऑगस्ट २०२० मधील एका वृत्तात नमूद केलंय.

टाळेबंदी दरम्यान पुष्कळ जण आपल्या गावी परतताना दिसत होते – आणि शेख कुटुंबियांच्याही मनात आपल्या गावी परत जाण्याचा विचार आला. ते १९९९ मध्ये उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील बालापूर गावाहून कामाच्या शोधात मुंबईला आले होते. गावात ते शेतमजुरी करायचे. त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन नव्हती. "आम्ही आमच्या गावी जाण्याचा विचार केला," मोमिना म्हणतात, "पण कुठल्याच ट्रेन किंवा बसचं तिकीट मिळेना. मग आम्हाला पायी चालत किंवा टेंपोतून जाणाऱ्या लोकांचे जे हाल झाले त्या सगळ्या बातम्या कळल्या. आम्हाला असा धोका नको होता. म्हणून आम्ही परिस्थिती पहिल्यासारखी होईपर्यंत इथेच रहायचं ठरवलं."

आई-वडील दोघांकडे काम नव्हतं म्हणून मुझफ्फर आणि मुबारक यांनी एप्रिलच्या सुरुवातीला कडक संचारबंदी आणि टाळेबंदीमध्ये अधूनमधून भाज्या विकण्याचा प्रयत्न केला. "हवालदाराने मुबारकच्या कोपराला लाठी मारली," मुझफ्फर म्हणाला. "तो घराजवळच्या बाजारात गर्दी आवरत होता. नंतर आम्ही मालवणीमध्ये महिनाभर दुसऱ्या एका भाजीवाल्याकडे काम केलं." या कामाचे दोघांनाही मे महिन्याच्या अखेरपर्यंत दिवसाला रू. ५० मिळाले.

जूनपासून टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होऊ लागले तसे या मुलांनी पुन्हा ठेला भाड्यावर घेतला. ठेल्याचं आणि (ठोक बाजारात जाण्यासाठी) टेंपोचं भाडं, भाज्यांचा खर्च जाता त्यांच्या हाती महिन्याचे एकूण रु. ३,०००-४,००० यायचे.

'We have one simple mobile. So we borrowed khala’s mobile', says Mubarak, here with his mother Momina (who stitches gowns and makes hairclips for an income) and sister Afsana
PHOTO • Jyoti
'We have one simple mobile. So we borrowed khala’s mobile', says Mubarak, here with his mother Momina (who stitches gowns and makes hairclips for an income) and sister Afsana
PHOTO • Jyoti

' आमच्याकडे एक साधा मोबाईल आहे . म्हणून आम्ही खालाचा मोबाईल मागितला ,' मुबारक सांगतो , सोबत आई मोमिना ( गाऊन शिवून आणि हेअरक्लिप तयार करून कमाई करते ) आणि बहीण अफसाना

तोपर्यंत इस्लामदेखील ट्रकवर क्लीनरच्या कामावर रुजू झाले, आणि पूर्वीसारखे महिन्याला रू. ४,००० कमावू लागले. "ते [दर २-३ दिवसांनी] मुंबईबाहेर ९-१० ट्रिप करतात," मोमिना म्हणतात. "मधल्या वेळेत घरी येतात, २-३ तास आराम करतात अन् लगेच पुढच्या ट्रिपवर निघतात. दिवसरात्र काम करतात ते."

मोमिना यांनीही साधारण याच वेळी आपलं काम पुन्हा सुरू केलं, पण महिन्याचे काहीच दिवस. "जुलैपासून मला थोडं काम मिळू लागलंय, पण ते महिन्याचे १० दिवसच पुरतं, मार्चच्या आधी निदान २० दिवस तरी असायचं," त्या म्हणतात. "सप्लायर म्हणाला की पुष्कळ कारखाने तोट्यात गेल्याने बंद पडलेत, म्हणून ऑर्डर कमी आहेत."

त्यांच्या पोटापाण्याचा विषय हळूहळू मार्गी लागला असला तरी मुझफ्फर आणि मुबारकची शाळा मात्र बंदच होती.  मालवणीतील अंबुजवाडी झोपडपट्टीतील त्यांच्या घराहून एखाद किलोमीटर दूर असलेली गुरुकुल इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज एका समाजसेवी संस्थेतर्फे चालवण्यात येते आणि तिथे बालवाडी ते इयत्ता १२ वीपर्यंत ९२८ विद्यार्थी शिकतात. चालू शैक्षणिक वर्षासाठी शाळेने जूनमध्ये वर्ग सुरू केलेत – ऑनलाईन वर्ग.

"आमच्याकडे एक साधा मोबाईल आहे. म्हणून आम्ही खालाचा [मावशी] मोबाईल मागितला," मुबारक सांगतो. पण चार भावंडांना एक मोबाईल पुरेसा नसतो, खासकरून जेव्हा त्यांचं वेळापत्रक सारखं असतं. म्हणून, त्यांच्या लहान बहिणी अंबुजवाडीहून अंदाजे दोन किलोमीटर दूर असलेल्या मनपाच्या एम.एच.बी. उर्दू स्कूलमध्ये शिकणाऱ्या फरझाना आणि अफसाना आपल्या ऑनलाईन वर्गांसाठी एका मैत्रिणीच्या घरी जातात.

मुझफ्फर आणि मुबारक आळीपाळीने भाज्यांचा व्यवसाय सांभाळतात आणि मागून आणलेल्या मोबाईलवर ऑनलाईन वर्गात हजेरी लावतात. पहिलाच ऑनलाईन वर्ग भर बाजारात घेतला तेव्हाचा अनुभव पुन्हा यायला नको म्हणून अंबुजवाडी झोपडपट्टीतील आपल्या एका खोलीच्या घरातच बसतात. तरीही दररोज ६ ते ७ तास काम (केवळ रविवारी सुटी असते) आणि सुमारे तीन तास अभ्यासावर लक्ष देणं म्हणजे दिव्यच आहे.

दररोज दोघंही भाऊ आळीपाळीने इतर विक्रेत्यांसोबत एका टेंपोतून अंबुजवाडीहून सुमारे ४० किलोमीटर लांब नवी मुंबई, वाशीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) भाज्या विकत घ्यायला जातात. अगोदर जानेवारी महिन्यात इस्लाम यांनी ठेला भाड्याने घेतला तेंव्हा मुलं आपल्या वडिलांसोबत जायची. "आम्ही रात्री १२ वाजता निघतो, आणि पहाटे ५-५:३० पर्यंत घरी परत येतो," मुझफ्फर सांगतो. "बहुतेक वेळी मीच जातो, मुबारक नीट भाव करत नाही. ७:३० पर्यंत आम्ही ताज्या भाज्या स्वच्छ धुवून ठेला लावतो."

PHOTO • Jyoti

' मला वर्गात लक्ष द्यावं की भाज्या विकाव्यात हेच कळत नव्हतं ,' मुझफ्फर आपल्या ऑनलाईन शिक्षणाच्या पहिल्या दिवसाबद्दल सांगतो

रात्रभर ठोक बाजारात काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दुपारी ऑनलाईन वर्गात जागं राहून लक्ष देणं म्हणजे मोठं कष्टाचं काम आहे. "क्लास चालू असताना डोळे जड होतात. पण मी डोळ्यावर पाणी मारून किंवा डोकं हलवून झोप घालवतो," मुबारक म्हणतो.

१५ ते २० किलो भाज्यांनी भरलेली जड हातगाडी हलवणं हेदेखील दमवून टाकणारं काम आहे. "खांदे दुखतात, हातांची जळजळ होते. लिहिताना हात दुखतात," मालवणीच्या अरुंद बोळींमधून आपली गाडी रेटत रेटत मुझफ्फर म्हणतो. "आम्ही आळीपाळीने काम करतो. आज [२८ नोव्हेंबर] सकाळी मुबारकचा क्लास आहे. म्हणून मी कामावर आलो. माझा क्लास दुपारी १:३० वाजता आहे."

त्याच्या शाळेतील पुष्कळ विद्यार्थ्यांना अशाच अडचणी येतायत. गुरुकुल इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक मुख्याध्यापक फरीद शेख म्हणतात, "आमचे सुमारे ५० विद्यार्थी हॉटेल व बांधकामाच्या ठिकाणी काम करतात, भाज्या विकतात. काम केल्यामुळे ते पुष्कळदा थकलेले किंवा झोपळलेले असतात. त्यांना क्लासमध्ये लक्ष देणं कठीण जातं."

"मालवणी, धारावी, मानखुर्द आणि गोवंडीच्या झोपडपट्ट्यांमधील बरीच मुलं लॉकडाऊन दरम्यान कामं करू लागली. ती अजूनही काम करतायत," प्रथम या मुंबईस्थित समाजसेवी संस्थेचे कार्यक्रम प्रमुख नवनाथ कांबळे म्हणतात. ही संस्था झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाकरिता काम करते. "ऑनलाईन वर्गांसाठी यंत्राचा अभाव आणि बेरोजगार पालक ही त्यामागची मुख्य कारणं आहेत."

१७ वर्षीय रोशनी खान ही त्यांच्यापैकीच एक होय. तीसुद्धा अंबुजवाडीत, शेख यांच्या घराहून अंदाजे १० मिनिटांच्या अंतरावर राहते. ती गुरुकुल शाळेत इयत्ता १०वीत शिकते, आणि ऑनलाईन वर्गांसाठी एक सेकंडहॅण्ड मोबाईल विकत घेता यावा म्हणून तिने एका केकच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिचे वडील साबीर हे वेल्डिंगचं काम करतात तर आई रुखसाना घरकाम; दोघंही १९७०च्या दशकात बिहारच्या माधेपुरा जिल्ह्यातील कलोटहा गावातून मुंबईला आले होते.

Along with online school, Roshni Khan continues to work at a cake shop to support her family, including her mother Ruksana and sister Sumaira (right)
PHOTO • Jyoti
Along with online school, Roshni Khan continues to work at a cake shop to support her family, including her mother Ruksana and sister Sumaira (right)
PHOTO • Jyoti

ऑनलाईन शाळेसोबत रोशनी खान आपल्या कुटुंबाला आधार म्हणून एका केकच्या दुकानात काम करते . तिची आई रुखसाना आणि बहीण सुमैरा ( उजवीकडे )

"पप्पांकडे साधा मोबाईल होता," रोशनी म्हणते. "त्यांचं काम मार्च महिन्यात थांबलं होतं, म्हणून मोबाईल [स्मार्टफोन] विकत घेणं शक्य नव्हतं." ती अंबुजवाडीहून पाच किलोमीटर लांब असलेल्या मालाड (पश्चिम) येथे एका दुकानात मफिन पॅक करून विकते व केकची सजावट करते. "मला माझ्या मैत्रिणीने मार्चमध्ये या जॉबबद्दल सांगितलं होतं, म्हणून मी काम सुरू केलं," जवळच्या शेअर ऑटोरिक्षा स्टँडवर जाताना रोशनी सांगते. तिला रोज कामावर जाताना रू. २० सवारी द्यावी लागते.

रोशनीने मेच्या मध्यात आपल्या रू. ५००० पगारातून रू. २५०० खर्च करून एक सेकंडहॅण्ड फोन विकत घेतला. नंतरही पालकांना घर चालवायला आधार म्हणून ती काम करत राहिली.

पण सकाळी ११:०० ते सायं ६:०० ही तिची कामाची वेळ आणि शाळेचं वेळापत्रक एकाच वेळी असतं. "कधीकधी आठवड्यातून २-३ वेळा दुपारचे क्लास हुकतात," ती म्हणते. "मी हुकलेले धडे स्वतः वाचते अन् माझ्या टीचरकडून फोनवर शंका विचारून घेते."

सात तास उभं राहून काम करून रोशनी दमून जाते. "मी इतकी थकून जाते की, होमवर्क पूर्ण करू शकत नाही. बरेचदा जेवण न करताच झोपी जाते. कधीकधी मला वाटतं, आपण तर असंही [नोकरी मिळवून] कमाई करतो, मग शिकायची काय गरज आहे?" ती विचारते.

नवनाथ कांबळे यांच्या मते शिक्षणातील रस नाहीसा होणं, हे सामान्य आहे. "कामावर जाणाऱ्या झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाची फार आवड नसते. अन् चांगलं शिक्षण मिळालं नाही की बालमजुरीचं प्रमाण वाढू लागतं."

रोशनीला तीन लहान बहिणी आहेत – इयत्ता ७वीत असलेली रिहाना, इयत्ता ५वीत असलेली सुमैरा आणि ४थीत असलेला रिझवान, तिघंही एम.एच.बी. शाळेत जातात. "ते ऑनलाईन क्लाससाठी आपल्या मित्रांच्या घरी जातात कारण मी मोबाईल कामावर घेऊन जाते," ती म्हणते.

'I feel so tired, I cannot finish homework', says Roshni. 'Sometimes I feel I already [have a job and] earn, so why do I need to study?'
PHOTO • Jyoti
'I feel so tired, I cannot finish homework', says Roshni. 'Sometimes I feel I already [have a job and] earn, so why do I need to study?'
PHOTO • Jyoti

' मी इतकी थकून जाते की , होमवर्क पूर्ण करू शकत नाही ,' रोशनी म्हणते . कधीकधी मला वाटतं , आपण तर असंही [ नोकरी मिळवून ] कमाई करतो , मग शिकायची काय गरज आहे ?'

त्यांच्या पालकांनी सप्टेंबरच्या मध्यात काम सुरू केलं, पण पूर्वीइतकं काम मिळेना झालंय. "मी अगोदर चार घरी कामाला जायची, आता फक्त एकाच घरी काम करते. बाकी कोणीच मला अजून बोलावलं नाही," रुखसाना म्हणतात. त्यामुळे त्यांना मार्चनंतर महिन्याला रू. ४,००० ऐवजी जेमतेम रू. १,००० मिळतायत.

"रोशनीच्या बाबांना आता फक्त [रू. ४०० रोजीवर] १५ दिवसच काम मिळतं, मार्च अगोदर ते मालवणी मजूर नाक्यावर उभे राहायचे तेव्हा त्यांना २५ दिवस काम मिळायचं," रुखसाना म्हणतात. अर्थात रोशनीचा वाटा धरूनही त्यांचं एकूण मासिक उत्पन्न रु. १२,००० इतकं घसरलंय. टाळेबंदीपूर्वी रोशनी काम करत नव्हती तेव्हा त्यांचं उत्पन्न अंदाजे रू. १४,००० होतं.

"कमाई कमी झाली पण खर्च नाही," रुखसाना म्हणतात. किराणा, शाळेची फी, विजेची बिलं, गॅस सिलेंडर, आणि धान्य इत्यादी वस्तूंवर खर्च वाढतच गेला (त्यांच्याकडे राशन कार्ड नाही आणि त्यासाठी अर्ज करणं काही त्यांच्याकडून झालेलं नाही).

यामुळे आपल्या मुलीवर आर्थिक जबाबदारी आलीये त्यामुळे रुखसाना चिंतेत आहेत. "रोशनी अजून लहान आहे. मला तिची काळजी वाटते," त्या म्हणतात. "तिच्यावर खूप मोठी जिम्मेदारी आलीय."

दरम्यान, मुझफ्फर व मुबारकप्रमाणे रोशनीची काम आणि ऑनलाईन वर्ग अशी कसरत चालू आहे. शहरातील शाळा (किमान) ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, असं बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलंय.

"आम्ही काम अन् अभ्यास दोन्हीही करायला तयार आहोत, कितीही तास का असेना. पण मी शिकायचं कधीच थांबवणार नाही," असं म्हणून मुझफ्फर पुढच्या ऑनलाईन वर्गात जायला घरी निघतो. "असंही आम्हाला आता थकून गेल्यावर अभ्यास करायची सवय झालीये, इथून पुढेही तसंच काही तरी करू."

Jyoti is a Senior Reporter at the People’s Archive of Rural India; she has previously worked with news channels like ‘Mi Marathi’ and ‘Maharashtra1’.

Other stories by Jyoti
Translator : Kaushal Kaloo

Kaushal Kaloo is a graduate of chemical engineering from the Institute of Chemical Technology in Mumbai.

Other stories by Kaushal Kaloo