ती चार लहानगी मुलं अस्वस्थपणे बसली होती, त्यांच्या मुख्याध्यापकांनीच त्यांनी तिथे जायला सांगितलं होतं. त्यांच्या शिष्यवृत्तीचा सवाल होता – आणि हो, त्यांच्या गुणवत्तेमुळे किंवा ती नसल्यामुळे काही हे ओढवलं नव्हतं. मुख्याध्यापकांनी त्यांना पाठवलं होतं ते त्यांच्याच भल्यासाठी, शिक्षा म्हणून नव्हे. आणि ते जिथे होते, ती काही त्यांची वर्गखोली नव्हती. आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या अगदी गरीब मंडलांपैकी एक असणाऱ्या अमडागुरमध्ये लवकरच नाटकाचा दुसरा अंक सुरू होणार होता.
१६ जानेवारी रोजी पारीने एक कहाणी प्रसिद्ध केली, अमडागुरच्या सरकारी प्राथमिक शाळेत पाचवीत शिकणाऱ्या जे इंदू या दलित मुलीची आणि इतर चार विद्यार्थ्यांची. या पाचही जणांना त्यांच्या शिष्यवृत्तीला मुकावं लागणार होतं कारण आधार कार्डांवर त्यांची नावं चुकीची लिहिली गेली होती. इंदूचं नाव ‘हिंदू’ असं आलं होतं आणि तिच्या घरच्यांनी दुरुस्तीसाठी अर्ज केल्यानंतर ‘दुरुस्त’ कार्डावर परत तसंच नाव होतं.







