“माझं शिक्षण पूर्ण झालं की, मला ऑफिसर व्हायचंय – होम गार्ड,” १४ वर्षांची संध्या सिंग सांगते. तिचा १६ वर्षांचा भाऊ शिवम, सैन्यदलात नोकरी करण्याची आशा मनात बाळगून आहे आणि तो तिच्या वयाचा होता तेव्हापासून ‘ट्रेनिंग’ करतोय. “मी दररोज पहाटे ४ वाजता उठतो आणि माझा व्यायाम करतो,” तो सांगतो. “सैन्यासाठीच्या ट्रेनिंगचं मी काहीही विचारलं तरी यूट्यूब मला सांगतं – लटकायचं कसं [बारवरती], पुशअप कसे काढायचे, आणि तसेच इतर प्रकार.”
उत्तर प्रदेशच्या जलाऊं जिल्ह्यातल्या बिनौरा या त्यांच्या गावी आपल्या घराच्या छतावरून ते माझ्याशी फोनवर बोलत होते. २१ मे रोजी ही दोन्ही भावंडं आंध्र प्रदेशच्या कालिकिरी गावाहून घरी परतली. त्यांचे आई-वडील तिथे काम करत होते. “आम्ही घरी आलो तेव्हा इथे काहीही नव्हतं. आणि आम्ही पण रिकामेच आलो होतो,” त्यांची आई, ३२ वर्षांची रामदेकली सांगते. “त्या रात्री आम्ही उपाशी पोटीच झोपलो.”
शिवम ७१ टक्के मिळवून दहावी पास झाल्याचं रामदेकलीने ८ जुलै रोजी अगदी अभिमानाने सांगितलं. ११ वी-१२ वीच्या प्रवेशासंबंधी विचारताच तिचा आवाज बदलला. “ऑनलाइन शाळा कशी करायची याची आमच्या पोरांना चिंता लागलीये. आम्ही [आंध्राला] परत गेलो तर हा फोन पण आमच्याबरोबर जाईल. मग इथे उत्तर प्रदेशात शिवम ऑनलाइन कसा शिकणार? आणि आम्ही इथे राहिलो तर त्याच्या शिक्षणाचा खर्च कसा उचलणार?” ती विचारते. तिची दोन्ही मुलं खाजगी शाळेत शिकतात आणि प्रत्येकाची वर्षाची फी १५,००० रुपये आहे.
काहीच महिन्यांपूर्वी आंध्राच्या चित्तूरमधल्या कालिकिरी गावात रामदेकली आणि तिच्या नवऱ्याच्या, ३७ वर्षीय बीरेंद्र सिंगच्या पाणीपुरीच्या तीन गाड्या होत्या. संध्या त्यांच्यासोबत होती आणि शिवम त्याच्या आजी-आजोबांबरोबर, जलाऊं जिल्ह्यातल्या बरदार गावी. हे कुटुंब पाल जमातीचं आहे, जिचा समावेश भटक्या जमातीत केला गेला आहे.









