“कोलकाता, जयपूर, दिल्ली किंवा बॉम्बे, बांबूचे पोलो बॉल इथून देउलपूरहूनच जायचे,” रणजीतबाबू माल सांगतात. भारतात कुठे कुठे पोलो खेळलं जायचं त्या शहरांची यादीच ते देतात.
पश्चिम बंगालच्या देउलपूर या शहरातले
७१ वर्षीय रणजीतबाबू गेली चाळीस वर्षं गुआदुआ बांबूच्या मूलस्तंभापासून पोलोचे चेंडू तयार करतायत. या
मुळांना इथे बंगाली भाषेत बान्सेर घोड़ा असं म्हणतात. या मुळांच्या आधारेच बांबू
मजबूत वाढतो आणि पसरतो. आज अशा पद्धतीने बांबूच्या मुळापासून चेंडू बनवणारे ते
शेवटचे ‘शिल्पकार’ म्हणजे कारागीर असून त्यांच्या सांगण्यानुसार ही कला काळाच्या
पडद्याआड गेली आहे.
पण पोलो हा खेळ खेळला जात होता त्या
१६० वर्षांच्या काळात हे बांबूचे चेंडू फक्त देउलपूरहमध्येच बनत होते. सुरुवातीला
सैन्यदल आणि राजेरजवाड्यांमध्येच हा क्रीडाप्रकार खेळला जात होता. गंमत म्हणजे
जगातलं पहिलं पोलो क्लब १८५९ साली आसामच्या सिलचरमध्ये सुरू करण्यात आलं आणि दुसरं
१८६३ साली कोलकात्यात. आज खेळला जाणारा पोलो हा खेळ खरं तर मैतेइ समुदायाच्या
सागोल कांग्जेई या खेळाची नवी आवृत्ती. आणि मैतेई लोक हा खेळ बांबूच्या चेंडूंनी
खेळायचे.
१९४० च्या आसपास देऊलपूर गावामध्ये
सहा-सात कुटुंबांच्या हाताखाली एकूण १२५ कारागीर हे काम करत होते आणि दर वर्षी
जवळपास एक लाखांहून अधिक चेंडू तयार होत होते. “आमच्या कुशल शिल्पकारांना पोलोची
बाजारपेठ कळायची,” रणजीतबाबू म्हणतात. हावडा जिल्ह्याच्या सर्वे अँड सेटलमेंट
रिपोर्ट या इंग्रजकालीन अहवालातील नोंदी त्यांच्या बोलण्याला दुजोरा देणाऱ्या
आहेतः “भारतामध्ये केवळ देउलपूर या गावीच पोलो चेंडू तयार होतात असं दिसून येतं.”
रणजीतबाबूंची पत्नी मिनोतीदी सांगतात की “पोलो चेंडू तयार
करण्याचा व्यवसाय इथे इतका भरभराटीत होती की माझ्या वडलांनी मी केवळ १४ वर्षांची
असताना माझं इथे लग्न करून दिलं.” आत साठी पार केलेल्या मिनोतीदी अगदी दहा
वर्षांपूर्वीपर्यंत या कामात हातभार लावत असत. हे कुटुंब माल समाजाचं असून पश्चिम
बंगालमध्ये त्यांची नोंद अनुसूचित जातींमध्ये करण्यात येते. रणजीतबाबूंचं अख्खं
आयुष्य देउलपूरमध्येच गेलं आहे.
आम्ही
त्यांच्या घरी होतो. माडुर गवताच्या चटईवर बसून रणजीतबाबू जुन्या वर्तमानपत्रातली
आणि मासिकातली कात्रणं चाळत होते. “जर लुंगी घातलेला कुणी तुम्हाला पोलो बॉल तयार
करतानाचा फोटो मिळाला तर तो खात्रीने मीच असणार,” ते अगदी अभिमानाने मला सांगतात.
सुभाष बाग परिसरातल्या आपल्या
कारखान्यात रोजचं काम सुरू असायचं. टेप रेकॉर्डरवर महंमद रफीची गाणी सुरू असायची.
“मी एक हाडाचा रफी भोक्तो (भक्त) आहे. मी त्यांच्या गाण्यांच्या कॅसेट तयार करून
घेतल्या होत्या,” ते हसत हसत म्हणतात. कोलकात्याच्या फोर्ट विल्यम भागातले पोलो
खेळणारे सैन्यातले अधिकारी त्यांच्याकडे पोलो बॉल विकत घ्यायला यायचे. “गान शूने
पोचोंडो होये गे छिलो. शोब कॅसेट निये गेलो [ती गाणी त्यांनी ऐकली आणि त्यांना ती
फार आवडली. सगळ्या कॅसेट घेऊन गेले],” ते सांगतात.
देउलपूरसाठी पोलो बॉलची निर्मिती एक
अभिमानाची बाब ठरू शकली कारण इथे गुआदुआ बांबू अगदी सहज मिळतो. हावडा जिल्ह्याच्या
या कोपऱ्यात अगदी रग्गड उत्पादन होणाऱ्या या बांबूला इथे घोड़ो बांस म्हणतात. या प्रकारचा बांबू क्लंपिंग म्हणजे
छोटे छोटे कोंब एकत्र येऊन वाढतो. या प्रक्रियेमुळे जमिनीखाली लांब आणि टणक मूळखोड
तयार होतं आणि त्यापासूनच पोलोचे चेंडू तयार केले जातात.
“प्रत्येक जातीच्या बांबूमध्ये अशा
प्रकारचं मूळ तयार होत नाही. पोलो चेंडू तयार करण्यासाठी जितकं वजन आणि आकार
पाहिजे तो सगळ्या बांबूत मिळत नाही,” रणजीतबाबू सांगतात. प्रत्येक चेंडू अगदी
बारकाईने तयार करावा लागत असे.
इंडियन
पोलो असोसिएशन
च्या मानकाप्रमाणे चेंडूचा व्यास ७८-९० मिमी आणि वजन १५० ग्रॅम
असावं लागतं.
१९९० पर्यंत पोलोचे चेंडू
बांबूपासूनच बनत होते. “हळूहळू अर्जेंटिनाहून आयात केलेल्या फायबरग्लासच्या
चेंडूंनी यांची जागा घ्यायला सुरुवात केली,” रणजीतबाबू सांगतात.
फायबरग्लासचे चेंडू जास्त टिकाऊ
असतात आणि त्यांची किंमतही या चेंडूंच्या तुलनेत बरीच जास्त असते. पण “पोलो आजही
प्रोचूर धोनी लोकांचा [गर्भश्रीमंत] खेळ आहे त्यामुळे जास्त खर्चाची कुणाला काय
फिकीर?” रणजीतबाबू म्हणतात. पण बाजारपेठेतल्या या बदलामुळे देउलपूरच्या या कलेला
उतरती कळा लागली. “२००९ च्या आधी इथे किमान १००-१५० कारागीर काम करत असायचे,” ते
म्हणतात. “२०१५ उजाडलं तोपर्यंत पोलो चेंडू तयार करणारा मी एकटा कारागीर उरलो.” पण
हे चेंडू घेणारं तर एकही जण आता नाही.
*****
हातात कोयता घेऊन मिनोतीदी त्यांच्या ‘बांसेर बागान’ म्हणजेच बांबूच्या बेटाकडे निघतात. त्यांच्या मागे मी आणि रणजित बाबू. घरापासून अंदाजे २०० मीटरवर त्यांची ६ कठ्ठा जमीन आहे. त्यात ते घरच्यासाठी फळं, भाज्या करतात. जास्त माल आला तर गावातल्या विक्रेत्यांना विकतात.
“बांबूचं खोड कापायचं आणि जमिनीच्या
खालून मूळखोड काढायचं,” मिनोतीदी ही प्रक्रिया समजावून सांगतात. देऊलपूरचा सरदार
समाज हे काम करायचा. रणजित त्यांच्याकडून हे मूळखोड घेऊन यायचे. २-३ किलोला २५ ते
३२ रुपये भाव असायचा.
आणल्यानंतर हे स्तंभ चार महिने
उन्हात वाळवले जातात. “ना शुकले, काचा ओबोष्ठा-ते बॉल चिट-के जाबे. टेढा बेका होइ
जाबे [नीट सुकलं नाही तर बॉलला चिरा पडतात आणि आकारही वेडावाकडा होता],” रणजितबाबू
सांगतात.
त्यानंतर १५-२० दिवस तळ्यात भिजत
घालायचे. “रोद-ए पाका [गरम भाजलेलं] मूळखोड मऊ करायचं असेल तर ते भिजवून ठेवावं
लागतं – नाही तर ते कापताच यायचं नाही,” अगदी निष्णात कारागीर असलेले रणजीतबाबू
सांगतात. “त्यानंतर पुन्हा १५-२० दिवस मूळखोड सुकत ठेवायचं. त्यानंतरच त्याचं काही
बनवता येतं.”
मूळखोडाला आकार देण्यासाठी कटार,
कुऱ्हाड आणि छोटी करवत या हत्यारांच्या मदतीने
वेड्यावाकड्या मूळखोडाला दंडगोल आकार दिला जातो. “आणि हे सगळं उकिडवं बसून केलं
जातं,” रणजीतबाबू सांगतात. इतकी वर्षं सातत्याने हे काम केल्यामुळे त्यांना
पाठदुखी जडली आहे आणि ते अगदी हळू चालतात. “पोलो खेळासाठी आमच्या पाठीचं भरीत
झालं,” ते म्हणतात.
“मूळखोडामधून दंडगोल निघाला की
त्यातून छिन्नीच्या मदतीने गोल आकाराचा चेंडू तयार केला जातो. मूळखोड मोठं असेल तर
एकातून तीन-चार चेंडू निघतात,” रणजीत सांगतात. त्यानंतर ते हातभर आकाराच्या
रेंद्याचा वापर करून चेंडू गुळगुळीत करतात.
हावडा जिल्ह्याच्या या प्रांतात घोड़ो बान्स म्हणजेच ग्वादुआ प्रकारचा बांबू विपुल प्रमाणात मिळत असल्याने देउलपूरला या चेंडूंमुळे ख्याती मिळाली
एक जुना चेंडू दाखवत मिनोतीदी सांगतात, “घरकामाच्या मध्ये शिरीष पेपर निये बॉल आमि माझताम [सँडपेपरने बॉल घासून एकदम गुळगुळीत करायचा]. त्यानंतर तो पांढरा रंगवायचा. कधी कधी आम्ही त्याच्यावर शिक्काही मारायचो.”
एका चेंडूचं काम पूर्ण होण्यासाठी
२०-२५ मिनिटं लागायची. “एका दिवसात आम्ही दोघं मिळून २० बॉल पूर्ण करायचो आणि २००
रुपये कमवायचो,” रणजीतबाबू सांगतात.
या कामासाठी लागणारं कौशल्य, ज्ञान
आणि अगदी त्यातले बारकावे सगळं काही असूनही इतक्या वर्षांमध्ये रणजीतबाबूंना या
कामातून फारसा नफा कधीच मिळाला नाही. कारखान्यात चेंडू तयार करत असताना त्यांना
नगामागे ३० पैसे मिळायचे. २०१५ उजाडलं तोपर्यंत नगामागे १० रुपये असा दर होता.
“देऊलपूरमध्ये एक चेंडू ५० रुपयांना
विकला जायचा,” ते सांगतात. कलकत्ता पोलो क्लबच्या वेबसाइटवरची माहिती पाहिली तर
लक्षात येतं की या शिल्पकार म्हणजेच कारागिरांच्या मेहनतीवर बख्खळ नफा कमवला जात
होता.
वेबसाइटवर या चेंडूंचं वर्णन “पश्चिम
बंगालच्या ग्रामीण हस्तउद्योगांमध्ये तयार करण्यात आलेले बांबूपासून बनलेले विशेष
चेंडू” असं करण्यात आलं असून सध्या त्यांची किंमत १५० रुपयाला नग अशी आहे.
रणजीतबाबूंच्या मजुरीच्या १५ पट जास्त.
“पोलोच्या एका सामन्यासाठी २५-३०
चेंडू लागतात.” आणि इतके जास्त का त्याचं कारणही लगेचच सांगतात. “मूळखोडाचं वजन
कमी जास्त भरतं. सामन्यात सतत सतत टोलवला गेल्यावर त्याचा आकार बिघडतो, कधी चिरा
पडतात.” फायबरग्लासचे चेंडू मात्र जास्त काळ टिकतात. “एका सामन्यात तीन किंवा चार
बास होतात,” ते म्हणतात.
१८६० च्या दशकाच्या सुरुवातीला कलकत्ता पोलो क्लबची स्थापना झाली आणि तिथून ३० किलोमीटरवर असलेल्या देऊलपूरमध्ये पोलोचे चेंडू तयार करण्याच्या व्यवसायाची भरभराट झाली. पण या चेंडूंना असलेली मागणी घटू लागली. २०१५ पर्यंत क्लबने चेंडू मागवणं पूर्णच थांबवलं होतं.
*****
रणजीतबाबूंसाठी खेळ आणि खिलाडूवृत्ती
दोन्ही अगदी नैसर्गिक आहेत. ते देऊलपूर प्रगती संघ या गावातल्या क्रीडा मंडळासाठी
फूटबॉल आणि क्रिकेट खेळायचेय ते या मंडळाचे पहिले सचिव देखील होते. “वेगवान बॉलर
आणि फूटबॉलमध्ये चांगला डिफेंडर म्हणून, खूब नाम था हमारा गांव में,” ते म्हणतात.
ते सुभाष बाग यांच्या कारखान्यात काम
करू लागले. देऊलपूरमध्ये पहिल्या प्रथम बांबूचे चेंडू तयार करण्याचा मान
सुभाषबाबूंच्या आजोबांना जातो. आज ५५ वर्षांचे असलेले सुभाषबाबू देऊलपूर आणि
पोलोमधला अखेरचा दुवा आहेत. पण ते आता पोलो मॅलेट बनवतायत.
पन्नास वर्षांपूर्वी देऊलपूरच्या
लोकांसाठी प्रपंच चालवण्यासाठी जी काही कामं उपलब्ध होती त्यातलं एक होतं पोलोचे
चेंडू बनवणं. “झरीर काज (जरीकाम), बीडी बांधा (विड्या वळणं) आणि पोलोचे चेंडू बनवणं.
पोटापाण्याचं पहायचं, पोराबाळांना मोठं करायचं म्हणून आम्ही हे सगळं काही केलंय,”
मिनोतीदी सांगतात. “
शोब ओल्पो पैशार काज छिलो. खूप कोष्टो होये छिलो
[ही
सगळी फुटकळ मजुरीची कामं होती. आम्ही फार कष्ट काढले आहेत],” रणजीतबाबू म्हणतात.
“आता इथून चार किलोमीटरवरच्या धुलागढ
चौरस्त्यापाशी अनेक कारखाने आलेत,” ते म्हणतात. देऊलपूरच्या लोकांना आता जरा बरी
कामं मिळतायत याचं त्यांना समाधान आहे. “आजकाल घरटी एक जण तरी पगारदार आहे. आजही
काही जण घरी झरीकाम करतायत अजून,” मिनोतीदी म्हणतात. २०११ च्या जनगणनेनुसार देऊलपूरमध्ये
३,२५२ लोक विविध उद्योगांसाठी घरबसल्या काम करत होते. (हा आकडाही १२
वर्षांपूर्वीचा आहे).
रणजीतबाबू आणि मिनोतीदी यांच्यासोबत
त्यांचा मुलगा, ३१ वर्षीय सौमित आणि सून सुमोना राहते. सौमित कोलकात्याजवळ एका
सीसीटीव्ही तयार करणाऱ्या कंपनीत कामाला आहे तर सुमोना पदवीचं शिक्षण घेत आहे.
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही तरी नोकरी मिळावी अशी आशा आहे.
*****
“माझ्यासारख्या शिल्पकारांनी या कलेसाठी झोकून काम केलं आहे, पण बदल्यात आम्हाला मात्र पोलो खेळाडूंकडून किंवा शासनाकडून काहीही मिळत नाही,” रणजीतबाबू सांगतात.
२०१३ साली पश्चिम बंगाल शासनाने
युनेस्कोच्या सहयोगाने राज्यभरात
ग्रामीण हस्तकला केंद्र प्रकल्प
सुरू केला.
पारंपरिक हस्तकलांना प्रोत्साहन देणे असा याचा हेतू होता. प्रकल्पाचा सध्या तिसरा
टप्पा सुरू असून राज्यभरातल्या ५०,००० कारागिरांचा यामध्ये समावेश आहे. पण बांबूपासून
पोलो चेंडू तयार करणाऱ्या एकाही कारागिराचा यात समावेश नाही.
“आमची कला अशीच मरून जाऊ नये म्हणून २०१७-१८
साली आम्ही नोबोन्नाला [शासकीय मुख्यालय] गेलो होतो. आम्ही आमची परिस्थिती काय आहे
ते सांगितलं, अर्ज केले, सगळं केलं पण काहीही घडलं नाही,” रणजीत सांगतात. “आमची
आर्थिक परिस्थिती कशी असेल? काय खायचं? आमची कला आणि आमची उपजीविकाच नाश पावलीये...आम्ही
त्यांना सांगितलं.”
“कुणास ठाऊक, पोलोचे चेंडू दिसायला
देखणे नसतात. त्यामुळे फारसं कुणी त्याबद्दल बोलत नसावं,” क्षणभर थांबत रणजीतबाबू
पुढे म्हणतात, “... आमच्याबद्दल तरी कुणी काही विचार केलाय?”
दुपारच्या स्वयंपाकासाठी मिनोतीदी बाटा
म्हणजेच रोहू मासा खवले काढून साफ करत होत्या. रणजीतबाबूंचं बोलणं ऐकून तिथूनच
त्या म्हणाल्या, “आपण इतके सगळे कष्ट काढलेत, आमच्या कामाची कुठे ना कुठे नोंद
घेतली जाईल अशी आशा आहे माझ्या मनात.”
रणजीतबाबू मात्र तितके आशावादी नाहीत.
“अगदी काही वर्षांपर्यंत पोलोची दुनिया आमच्यासारख्या कारागिरांवर अवलंबून होती.
पण किती झटक्यात त्यांची पावलं फिरली,” ते म्हणतात. “कधी काळी अस्तित्वात असलेल्या
या कलेचा पुरावा म्हणजे मी तेवढा उरलोय.”