सुनीता भुरकुटेंची मातृभाषा आहे कोलामी पण कपाशीची शेती करणाऱ्या सुनीताताई दिवसभर मराठीतच जास्त बोलतात. कपास विकायची तर बाजाराची भाषा यायला पाहिजे ना, त्या म्हणतात.
यवतमाळ जिल्ह्यातलं हे कोलाम आदिवासी कुटुंब घरी
कोलामीमध्येच बोलायचं. सुनीताला आजही आठवतं की सुर देवी पोड या त्यांच्या माहेरी
सगळे कोलामीच बोलायचे. गावात बोलली जाणारी मराठी बोलायचीच अडचण होती. त्यांनी कुठे
कधी शाळाच पाहिली नाही. ते तोडकं मोडकं बोलायचे, त्या सांगतात.
पण त्यांच्या कुटुंबातले जास्तीत जास्त लोक बाजारात कापूस
विकायला जाऊ लागले आणि हळूहळू त्यांनी मराठी शिकायला सुरुवात केली. आज भुलगड या
त्यांच्या पोडावरचे सगळे कोलाम आदिवासी बहुभाषिक झाले आहेत. मराठी बोलतायत,
हिंदीतली काही वाक्यं आणि कोलामी तर त्यांना येतेच.
कोलामी ही द्रविडी भाषा असून महाराष्ट्र,
आंध्र प्रदेश, तेलंगण आणि छत्तीसगडमध्ये ती बोलली जाते. युनेस्कोच्या
जगातील
धोक्यात असलेल्या भाषांच्या नकाशानुसार
कोलामी भाषा खात्रीलायकरित्या धोक्यात
असल्याची नोंद केली आहे. याचा अर्थ असा की लहान मुलं आता ही भाषा मातृभाषा म्हणून
शिकत नाहीत.
पण आमची भाषआ कमी होत नाही. आम्ही वापरतात,
४० वर्षीय सुनीता ताई सांगतात.
महाराष्ट्रामध्ये कोलाम आदिवासींची लोकसंख्या १,९४,६७१ इतकी आहे (भारतातील अनुसूचित जमातींचे सांख्यिकीय विश्लेषण, २०१३) पण यातले निम्म्याहून कमी लोकांचं कोलामी आपली मातृभाषा असल्याचं म्हणणं आहे.
आमची मुलं शाळेत जायला लागल्यावर मराठी शिकायला
लागले. ती भाषा अवघड नाही, पण कोलामी अवघड आहे, सुनीता ताई सांगतात. शाळेत आमची
भाषा बोलणारे मास्तरच नाहीत. त्या दुसरीपर्यंत शाळेत गेल्या आणि तिथेच मराठी
शिकल्या. पण वडील वारले आणि त्यांना शाळा सोडायला लागली.
सुनीता ताईंना आम्ही भेटलो तेव्हा आपल्या तीन
एकराच्या रानात त्या कापूस वेचत होत्या. हंगाम संपण्याआधी कापूस वेचायला पाहिजे,
असं म्हणत असताना त्यांचे दोन्ही हात मात्र अगदी एका तालात कापूस वेचत असतात. एका
मिनिटाच्या आत त्यांची
ओड्डी
पूर्ण भरून गेली.
कपाशीचे हे दोन तास राहिलेत, सुनीता ताई
सांगते. त्यांनी साडीवरून एक शर्ट घातलाय.
रेक्का
आणि
गड्डी
साडीला
चिकटतात आणि साडी फाटते. रेक्का म्हणजे कापसाच्या फुलाचं दळ आणि गड्डी म्हणजे
कपाशीच्या रानात उगवणारं तण.
सूर्य माथ्यावर यायला लागतो आणि सुनीता ताई
एक सेलांगा काढतात. सेलांगा म्हणजे डोक्यावर बांधण्यासाठी वापरला जाणारा सुती
कपडा. पण शेतात काम करताना सगळ्यात जास्त महत्त्वाची असते ती ओड्डी. एखादं लांबकं
सुती कापड खांद्यावरून घेऊन कंबरेला बांधून त्याची पाठीवर एक मोठी झोळी तयार करतात.
दिवसभरात वेचलेला कापूस या झोळीत टाकला जातो. मध्ये कधी तरी घेतलेली क्षणभर
विश्रांती सोडली तर सुनीता ताई सात-आठ तास कापूस वेचायचं काम करतात. कधी तरी
विहिरीपाशी जाऊन
ईर
म्हणजेच पाणी पिऊन येतात.
ऑक्टोबर २०२३ मध्ये कापूस वेचायला सुरुवात झाली. हंगाम संपेपर्यंत (जानेवारी २०२४) सुनीता ताईंना १५ क्विंटल कापूस काढला होता: “कापूस काढायचा कसलाच त्रास नाही. मी शेतकऱ्याच्याच कुटुंबातली आहे.”
वयाच्या २० व्य़ा वर्षी सुनीता ताईंचं लग्न
झालं. त्यानंतर १५ वर्षांनंतर २०१४ साली त्यांचे नवऱ्याचं निधन झालं. “तीन दिवस
ताप आला होता त्यांना.” तब्येत खूपच खराब झाली तेव्हा सुनीता ताईंनी त्यांना
यवतमाळच्या जिल्हा रुग्णालयात नेलं. “सगळं काही अचानक झालं. ते कशाने गेले,
आजपर्यंत कळालं नाही.”
त्यांच्या पदरात दोन मुलं. “माणूस गेला
तेव्हा अर्पिता आणि आकाश दहाच वर्षांचे होते. कधी कधी शेतात एकटीला जायला भीती
वाटायची.” त्यांना मराठी चांगली बोलता येते त्यामुळे बांधाला लागून असलेल्या
शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसायला मदत झाली असं त्यांना वाटतं. “शेतात किंवा
बाजारात गेलं की त्यांच्याच भाषेत बोलायला लागतं ना? आमची भाषा त्यांना कशी
कळणार?” त्या विचारतात.
त्या शेती करतच होत्या. पण
बाजारात जाऊन कापूस विकायचं काम पुरुषांचंच असल्यामुळे त्यामध्ये त्यांनी भाग
घ्यायला बऱ्याच लोकांचा विरोध होता. “मी फक्त कापूस वेचते. आकाश जातो विकायला,”
त्या सांगतात.
सुनीता ताईंची मातृभाषा कोलामी आहे पण दिवसातला बराच वेळ त्या मराठीच बोलतात. ‘कापूस विकायचा तर बाजारची भाषा यायला पाहिजे,’ त्या सांगतात
*****
कोलाम आदिवासींची नोंद विशेष बिकट परिस्थितीतीत आदिवासी समूह म्हणून करण्यात आली असून महाराष्ट्रात त्यांच्यासह इतर केवळ दोन जमाती – कातकरी आणि माडिया गोंड – या गटात मोडतात. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही कोलाम आदिवासी राहतात.
महाराष्ट्रातले कोलाम स्वतःला ‘कोलावर’ किंवा ‘कोला’ म्हणतात. त्याचा अर्थ बांबू किंवा लाकडाची काठी असा होतो. वेताच्या टोपल्या, चटया, सुपं इत्यादी करणं हा त्यांचा परंपरागत व्यवसाय.
सुनीता ताई सांगतात, “मी लहान होते तेव्हा माझे आई-वडील वेडुर [बांबू]पासून रोजच्या वापरातल्या वेगवेगळ्या वस्तू बनवायचे, ते मी पाहिलंय.” डोंगरदऱ्यांमधून ते हळूहळू पठारी प्रदेशात रहायला आले तसं जंगलापासूनचं अंतर वाढलं. “माझ्या माय-बापाला काही ते काम यायचं नाही,” त्या सांगतात. आणि त्यांनाही नाहीच.
शेती हीच त्यांची उपजीविका आहे. “माझी शेती आहे पण आजसुद्धा जर पिकलं नाही तर मला दुसऱ्याच्या रानात मजुरीला जावं लागेल,” त्या म्हणतात. कोलाम समुदायाच्या इतरांचंही असंच मत आहे. बहुतेक सगळे शेतमजूर म्हणून काम करतात आणि शेतीसाठी घेतलेली तसंच इतर कर्जं फेडणं त्यांच्यासाठी अवघड बनत चाललंय. सुनीता ताईंनी जून २०२३ मध्ये पेरणीच्या वेळी ४०,००० रुपये कर्जाने घेतले होते ते अजून त्यांना फेडायचेत.
“कापूस विकला की जून महिन्यापर्यंत दुसरं काहीच काम नसतं. मे महिन्यात सगळ्यात जास्त हाल होतात,” त्या म्हणतात. त्यांचा १५ क्विंटल कापूस निघालाय आणि त्याला किलोमागे ६२-६५ रुपये भाव मिळेल. “म्हणजे अंदाजे ९३,००० रुपये होतात. सावकाराचं कर्ज आणि त्यावरचं २०,००० रुपये व्याज परत केलं तर अख्ख्या वर्षासाठी माझ्या हातात केवळ ३५,००० रुपये राहतील.”
गावातले दुकानदार त्यांना छोटंमोठं कर्ज देतात पण पावसाळा सुरू होण्याच्या आत ते फेडावं लागतं. “इसका ५०० दो, उस का ५०० यह सब करते करते सब खतम! कुछ भी नही मिलता... सारे दिन काम करो और मरो!” ओशाळवाणं हसतात आणि दुसरीकडे मान वळवतात.
तीन वर्षांपूर्वी सुनीता ताई रासायनिक शेती
सोडून जैविक शेतीकडे वळल्या. “मी मिश्र-पीक शेतीकडे वळले,” त्या म्हणतात. त्यांना
मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, तीळ, स्वीट कॉर्न आणि तुरीचं बी मिळालं होतं. त्यांच्या
गावात बायांनीच ही बी-बँक सुरू केली आहे. शेतात मूग आणि तूर घेतल्याने गेल्या
वर्षी मे आणि जून महिन्यात हाताला काम नसलं तरी त्यांचं धकून गेलं.
पण एक अडचण आलीच. तूर चांगली
आली पण बाकीची पिकं काही फारशी हाती लागली नाहीतः “रानडुकरांनी सगळा नास केला,”
सुनीता ताई सांगतात.
*****
सांजा व्हायला लागल्यावर सुनीता ताई वेचलेल्या कापसाची मुडी बांधू लागतात. दिवसभराचं त्यांचं ठरलेलं काम पूर्ण झालंय. शेवटच्या काही तासात त्यांना सहा किलो कापूस निघालाय.
दुसऱ्या दिवसासाठीचं त्यांचं काम ठरलंय.
वेचलेल्या कापसातून केसरा (कचरा) आणि वाळलेली रेक्का काढून टाकायची. त्यानंतरच्या
दिवशी बाजारात नेण्यासाठी कापूस तयार ठेवायचा.
“दुसरा काही विचार करायला वेळ कुठे आहे?” कोलामी भाषा आता अस्तंगत होऊ घातलेल्या भाषांपैकी एक आहे यावर त्या म्हणतात. जेव्हा सुनीता ताई आणि त्यांच्या समुदायाला मराठी येत नव्हतं तेव्हा सगळे म्हणत होते, “मराठीत बोला, मराठीत बोला.” आणि आता आमची भाषा अस्तंगत व्हायला लागलीये तर, “सगळे म्हणतायत कोलामीत बोला,” असं म्हणून त्या हसू लागतात.
“आम्ही आमची भाषा बोलतो. आमची मुलं पण,” त्या म्हणतात. “आम्ही बाहेर कुठे गेलो तरच आम्ही मराठी बोलतो. घरी परत आल्यावर आम्ही आमचीच भाषा बोलतो.”
“आपली भाषा आपलीच राहिली पाहिजेय कोलामी
कोलामी आणि मराठी मराठीच असली पाहिजे. ते गरजेचं आहे.”
प्रेरणा ग्राम विकास संस्था, माधुरी खडसे आणि आशा करेवांचे आभाऱ. तसंच साईकिरण टेकम यांचेही आभार.
भारतभरातल्या अनेक भाषा आज लोप पावत आहेत. या भाषा बोलणाऱ्या समुदायांचं जगणं टिपत आणि सामान्य माणसांच्या शब्दांत नोंदवून ठेवण्याचं काम पारीने हाती घेतलं आहे.