अहमदोस सितारमेकर पॅरिसला जाऊन आले असते. पण वडील नाही म्हटले. “बाहेरची दुनिया पाहिलीस तर तू परत यायचा नाहीस” त्यांचे शब्द होते. आज ते सगळं आठवून ९९ वर्षांच्या अहमदोसचाचांच्या चेहऱ्यावर हसू पसरतं.

सितार बनवणाऱ्यांची त्यांची पाचवी पिढी. ते तेव्हा तिशीच होते. पॅरिसहून दोघी जणी सतार कशी बनवायची ते शिकायला त्यांच्या गावी पोचल्या होत्या. “काही लोकांशी बोलल्यावर त्या इथे आल्या आणि मी त्यांना शिकवायला सुरुवात केली,” अहमदोस चाचा सांगतात. मिरजेच्या सितारमेकर गल्लीतल्या त्यांच्या दुमजली बैठ्या घरात आम्ही त्यांच्याशी बोलत होतो. इथेच त्यांच्या किती तरी पिढ्या राहिल्या आहेत आणि सतार तयार करत आल्या आहेत. घराच्या तळमजल्यावर बसलेले चाचा आमच्याशी बोलत होते.

“त्या काळी आमच्या घरी संडास नसायचे,” ते सांगू लागतात. “एका दिवसात आम्ही संडास बांधून घेतला. आम्ही त्यांना आमच्यासारखं उघड्यावर जायला कसं सांगणार?” त्यांचं बोलणं सुरू आहे आणि मागून सतारीचे सूर जुळवायचा हलका आवाज कानावर पडतोय. गौस सितारमेकर काम करत असणार.

त्या दोघी फ्रेंच तरुणी नऊ महिने त्यांच्या घरी राहिल्या. पण शेवटच्या काही गोष्टी शिकण्याआधीच त्यांचा व्हिसा संपला. काही महिन्यांनी त्यांनी अहमदोस चाचांना राहिलेल्या गोष्टी शिकवण्यासाठी पॅरिसला यायचं निमंत्रण दिलं होतं.

पण आपल्या वडलांचा शब्द पाळून चाचा इथेच राहिले. सांगली जिल्ह्याच्या मिरजेत. हे गावच वाद्य तयार करण्याच्या कलेसाठी ओळखलं जातं. अहमदोस चाचांचं घराणं १५० वर्षांपासून, किमान सात पिढ्यांपासून या कामामध्ये गुंतलेलं आहे. आणि आज, वयाच्या ९९ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत.

Left: Bhoplas [gourds] are used to make the base of the sitar. They are hung from the roof to prevent them from catching moisture which will make them unusable.
PHOTO • Prakhar Dobhal
Right:  The gourd is cut into the desired shape and fitted with wooden sticks to maintain the structure
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः सतारीचा नाद घुमतो तो भोपळ्यातून. ओल, बुरशीपासून वाचवण्यासाठी हे भोपळे छताला अडकवून ठेवले आहेत. उजवीकडेः हवं त्या आकारात वाळलेला भोपळा कापून त्याला लाकडी पट्ट्या जोडून आकार दिला जातो

अहमदोस चाचांचं घर हीच त्यांची कार्यशाळा. आणि त्यांच्याच नाही तर या गल्लीतल्या जवळपास सगळ्याच घरांमध्ये छताला भोपळे लटकवलेले दिसतात.

सतारीचा तुंबा बनवण्यासाठी भोपळा वापरला जातो. मिरजेहून १३० किलोमीटरवर असलेल्या पंढरपूर भागात भोपळ्याची शेती होते. चवीला कडू असल्याने हा भोपळा भाजीसाठी वापरला जात नाही. त्याची लागवड करण्याचं एकमेव कारण म्हणजे सतार आणि तंबोरे. मिरजेचे सतारमेकर हे भोपळे विकत घेतात. उन्हाळ्यातच पंढरपुराला जाऊन भोपळ्यांचं बुकिंग केलं जातं. हिवाळ्यात भोपळे काढण्याच्या वेळी भाव जास्त असतो. भोपळे आणून पोटमाळ्याला किंवा छताला टांगून ठेवतात जेणेकरून ते ओल धरणार नाहीत. जमिनीवर ठेवले तर त्याला बुरशी लागून शकते. तसं झाल्यास त्याचा आवाज, ध्वनीलहरी आणि वाद्याच्या टिकाऊपणावर परिणाम होतो.

“पूर्वी आम्ही एका भोपळ्याला २००-३०० देत होतो. आता १,०००-१,५०० वाटेल तो भाव लागतो,” इम्तियाझ सितारमेकर सांगतात. ते हव्या त्या आकारात भोपळा कापून आतून कोरून साफ करतात. वाहतुकीचा खर्च वाढल्यानेही भोपळ्यांचा भाव वधारला आहे. आणखी एक कारण आहे. इम्तियाझ सांगतात की हाताने बनवलेल्या तंतुवाद्यांची मागणी आता घटत चाललीये त्यामुळे शेतकरीसुद्धा पूर्वीइतकी भोपळ्यांची लागवड करत नाहीयेत. त्याचाही परिणाम किंमतीवर झाला आहे.

तुंबा तयार झाला की लाकडी खोड जोडलं जातं आणि मग सतारीची कच्चा ढांचा तयार होतो. त्यानंतर नक्षीकाम सुरू. हे पूर्ण व्हायला किमान एक आठवडा लागतो. प्लास्टिकची स्टेन्सिल आणि हाताने वापरायचं ड्रिल मशीनचा वापर करून इरफान सितारमेकर यांच्यासारखे निष्णात कारागीर लाकूड कोरून त्यावर नक्षीकाम करतात. “अनेक तास सतत बाक काढून बसल्यामुळे पाठदुखी आणि इतरही किती तरी दुखणी येतात,” ४८ वर्षीय इरफान भाई म्हणतात. “अनेक वर्षं हेच काम केल्यावर ते कधी ना कधी निघणारच,” त्यांच्या पत्नी शाहीन सांगतात.

व्हिडिओ पहाः मिरजेचे सितारमेकर

“कला किंवा परंपरेविरोधात माझं अजिबात काही म्हणणं नाही,” शाहीन सितारमेकर म्हणतात. “माझ्या पतीला जी ओळख मिळाली आहे ती खूप मेहनतीने आणि कष्टाने मिळाली आहे.” शाहीन गृहिणी आहेत आणि त्यांची दोन मुलं आहेत. जितकी शारीरीक मेहनत या कामात आहे तितका मोबदला मात्र मिळत नाही असं त्यांचं स्पष्ट मत आहे. “माझे पती रोज जे कमवतील ते आमच्या ताटात पडतं. माझी या आयुष्याविषयी कसलीच तक्रार नाही पण किती तरी गरजा असतात ना,” आपल्या स्वयंपाकघरात उभ्या असलेल्या शाहीन सांगतात.

त्यांची दोघं मुलं आपल्या चुलत आजोबांकडून सतार वाजवायला शिकतायत. “चांगलं वाजवतात,” शाहीन म्हणतात. “मोठेपणी दोघंही नाव काढणार.”

काही सतारमेकर सतार बनवण्याच्या पूर्ण प्रक्रियेतलं ठराविकच काम करतात. कुणी फक्त भोपळा कापण्याचं, कुणी कलाकुसर, नक्षीकाम करण्याचं. त्यांना रोजावर काम मिळतं. नक्षीकाम आणि रंगकाम करणाऱ्यांना कामाप्रमाणे दिवसाचे ३०० ते ५०० रुपये मिळतात. काही जण मात्र आजही अगदी अथपासून इतिपर्यंत सगळं काम करून पूर्ण सतार एकट्याने तयार करतात. हाताने बनवलेल्या एका सतारीची किंमत आज ३० ते ३५ हजारांच्या घरात आहे.

घरातल्या स्त्रियांचा या कामात शक्यतो सहभाग नसतोच. “मी सांगतो ना, आज जर माझ्या मुली शिकायला लागल्या तर काही दिवसांत ही कला त्यांना जमेल. दोघी अभ्यासात चांगल्या पुढे आहेत याचा मला फार अभिमान वाटतो,” गौस म्हणतात. त्यांना दोन मुली आहेत. ५५ वर्षीय गौस अगदी लहान असल्यापासून सतारीचं पॉलिशिंग आणि फिटिंगचं काम करतायत. “कसंय, मुलींचं लग्न होऊन त्या सासरी जाणार. बरं सासरी सतार बनवत नसले तर त्यांची कला वायाच जाणार,” ते सांगतात. अगदी क्वचित मुली किंवा बाया खुंट्यांना पॉलिश करणे किंवा बाकी बारीक सारीक कामं करतात. मात्र पुरुषांची मानली गेलेली मेहनतीची कामं बायांनी केलेली आपल्या समाजात आवडणार नाहीत आणि मुलाकडच्यांनाही ते पसंत पडणार नाही अशी चिंता सगळ्यांच्याच मनात असते.

Left:  Irfan Sitarmaker carves patterns and roses on the sitar's handle using a hand drill.
PHOTO • Prakhar Dobhal
Right: Wood is stored and left to dry for months, and in some instances years, to season them
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः इरफान सितारमेकर हाताने वापरायच्या ड्रिल मशीनने सतारीच्या खोडावर गुलाब आणि इतर नक्षी कोरतायत. उजवीकडेः खोडासाठीचं लाकूड बरेच महिने वाळवलं जातं, कधी कधी तर कित्येक वर्षं लाकूड तसंच ठेवून जुनं केलं जातं

Left: Fevicol, a hammer and saws are all the tools needed for the initial steps in the process.
PHOTO • Prakhar Dobhal
Right: Imtiaz Sitarmaker poses with the sitar structure he has made. He is responsible for the first steps of sitar- making
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः सतार तयार करण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात फेविकॉल, हातोडी आणि करवत या तीनच गोष्टी पुरतात. उजवीकडेः सतारीचा तयार ढांचा घेऊन उभे असलेले एक सितारमेकर. सतार तयार करण्याच्या या पहिल्या कामाची जबाबदारी त्यांची असते

*****

एकोणिसाव्या शतकात मिरजेचे राजे श्रीमंत बाळासाहेब पटवर्धन यांच्या राज्यात सतार निर्मात्यांना खरी ओळख मिळाली. त्यांच्या काळात संगीताला राजाश्रय होता. आग्रा आणि वाराणसीहून ते किती तरी कलावंतांना मिरजेला बोलावून घेऊन त्यांच्या मैफली आपल्या दरबारात आयोजित करत असत. मात्र प्रवासामध्ये अनेकदा वाद्यांचं नुकसान व्हायचं आणि मग ती दुरुस्त करण्यासाठी कारागीर शोधावे लागायचे.

“शोधता शोधता ते मोहिनुद्दिन आणि फरीदसाहेब या दोघा भावांशी त्यांची गाठ पडली. दोघंही शिकलगार समाजाचे,” इब्राहिम सांगतात. सतार तयार करणाऱ्यांची त्यांची सहावी पिढी. शिकलगार महाराष्ट्रात इतर मागासवर्गीयांमध्ये गणले जातात. हा खरा लोखंडकाम करणारा, त्यातही हत्यारं, शस्त्रास्त्रं तयार करणारा समाज. “राजाच्या विनंतीवरून त्यांनी वाद्यं दुरुस्त करू पहायची तयारी दाखवली. आणि कालांतराने हाच त्यांचा मुख्य व्यवसाय झाला. त्यांचं आडनाव बदललं आणि शिकलगारचं सितारमेकर झालं.” आज मिरजेतले त्यांचे वंशज ही दोन्ही आडनावं वापरतात.

पण आजच्या नव्या पिढीला या व्यवसायात येण्यासाठी केवळ हा वारसा किंवा इतिहास पुरेसा नाहीये. शाहीन आणि इरफान यांची दोन्ही मुलं सतार बनवण्यासोबत ती वाजवायलाही शिकलेत.

विविध वाद्यांचे आवाज निर्माण करणारी सॉफ्टवेअर्स यायला लागल्यापासून गायकदेखील तंबोरा किंवा सतार वापरण्यापेक्षा ही यंत्रं वापरू लागली आहेत. त्याचा व्यवसायावर निश्चितच परिणाम झाला आहे. यंत्रावर तयार करण्यात येणारी सतारी स्वस्त असतात आणि त्याचाही सितारमेकर कारागिरांना फटका बसला आहे.

Left: Gaus Sitarmaker is setting the metal pegs on the sitar, one of the last steps in the process. The pegs are used to tune the instrument.
PHOTO • Prakhar Dobhal
Right: Japanese steel strings sourced from Mumbai are set on a camel bone clog. These bones are acquired from factories in Uttar Pradesh
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः गौस सितारमेकर सतारीवर धातूच्या खुंट्या बसवतायत, हे सतारीचं शेवटच्या टप्प्यातलं काम. या खुंट्या पिळून सतार सुरात लावून घेता येते. उजवीकडेः मुंबईहून आणलेल्या जपानी स्टीलच्या तारा उंटाच्या हाडाच्या घोडीवर बसवल्या जातात. ही हाडं उत्तर प्रदेशातल्या कारखान्यांमधून मागवली जातात

Left: Every instrument is hand polished  multiple times using surgical spirit.
PHOTO • Prakhar Dobhal
Right: (from left to right) Irfan Abdul Gani Sitarmaker, Shaheen Irfan Sitarmaker, Hameeda Abdul Gani Sitaramker (Irfan’s mother) and Shaheen and Irfan's son Rehaan
PHOTO • Prakhar Dobhal

डावीकडेः शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात येणारं स्पिरिट वापरून प्रत्येक वाद्य अनेक वेळा पॉलिश केलं जातं. उजवीकडेः (डावीकडून उजवीकडे) इरफान अब्दुल गनी सितारमेकर, शाहीन इरफान सितारमेकर, हमीदा अब्दुल गनी सितारमेकर (इरफान यांची आई) आणि शाहीन व इरफानचा मुलगा रेहान

काही तरी करून तगून राहण्यासाठी सितारमेकर आजकाल पर्यटकांसाठी छोट्या आकाराच्या सतारी तयार करतात. या भोपळ्यापासून नाही तर फायबरच्या असतात. एकदम आकर्षक रंगाच्या या सतारी ३,००० ते ५,००० रुपयांना विकल्या जातात.

या कलेची शासनाकडून म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. आणि फारशी मदतही केलेली नाही. कलावंतांसाठी विविध योजना असल्या तरी वाद्यं निर्मात्यांना मात्र तशी मान्यता मिळालेली नाही. “जर शासनाने आमची आणि आमच्या कष्टांची दखल घेतली तर आम्ही आणखी चांगली वाद्यं तयार करू. आर्थिक मदत मिळेल आणि मुळात आपल्या कामासाठी लोक आपल्याला ओळखतायत ही जाणीव त्यांना उभारी देईल” इब्राहिम म्हणतात. अहमदोस काकांसारख्या जुन्याजाणत्यांना मात्र आपण आपलं संपूर्ण आयुष्य या कलेला वाहून घेतलं याचा कसलाही खेद नाही. “आजही तुम्ही जर मला विचारलंत की तुम्हाला काही पैसापाणी हवंय का...नको, कधीच नकोय...कधीच,” ते म्हणतात.

इंटरनेटचा फायदा झालाय. आजकाल थेट वाद्यनिर्मात्यांकडूनच वाद्यं घेता येतात त्यामुळे दुकानदार किंवा मध्यस्थाचे पैसे वाचतात. बहुतेक गिऱ्हाईक भारतातलंच आहे मात्र परदेशातूनही काही जण वेबसाइटवरून संपर्क साधतायत.

हाताने सतार तयार करण्याची सगळी प्रक्रिया वरील व्हिडिओत पहा. आपल्याला काय काय समस्या भेडसावतायत हेही सितारमेकर यात आपल्याला सांगतायत.

Student Reporter : Swara Garge

স্বরা গার্গে ২০২৩-এর পারি ইনটার্ন ও পুণের এসআইএমসি প্রতিষ্ঠানে স্নাতকোত্তরের চূড়ান্ত বর্ষের ছাত্রী। দৃশ্যমাধ্যম-কেন্দ্রিক আখ্যান নির্মাতা স্বরা গ্রামীণ সংস্কৃতি, অর্থনীতি-সহ নানান বিষয়ে আগ্রহী।

Other stories by Swara Garge
Student Reporter : Prakhar Dobhal

প্রখর দোভাল ২০২৩ এর পারি ইন্টার্ন। তিনি পুণের এসআইএমসি প্রতিষ্ঠানে স্নাতকোত্তর স্তরে পড়াশোনা করছেন। প্রখর আলোকচিত্রী ও তথ্যচিত্র নির্মাতা। গ্রামীণ রাজনীতি, সংস্কৃতি ও অন্যান্য বিষয়ে আগ্রহী।

Other stories by Prakhar Dobhal
Editor : Sarbajaya Bhattacharya

সর্বজয়া ভট্টাচার্য বরিষ্ঠ সহকারী সম্পাদক হিসেবে পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ায় কর্মরত আছেন। দীর্ঘদিন যাবত বাংলা অনুবাদক হিসেবে কাজের অভিজ্ঞতাও আছে তাঁর। কলকাতা নিবাসী সর্ববজয়া শহরের ইতিহাস এবং ভ্রমণ সাহিত্যে সবিশেষ আগ্রহী।

Other stories by Sarbajaya Bhattacharya
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে