यो न्हान तमासो मत समझो, पुरखा की अमर निसानी छे !
ही काही निव्वळ करमणूक नाहीये. हा आमच्या पूर्वजांचा वारसा आहे.
अशा शब्दांत कोटामधल्या संगोड गावातले दिवंगत कवी सूरजमल विजय यांनी राजस्थानच्या हाडोती भागातल्या न्हाण उत्सवाचं वर्णन केलं आहे.
“कोणतंही सरकार करोडो रुपये खर्चूनही असा उत्सव आयोजित करू शकणार नाही. आमच्या गावातले लोक स्वेच्छेने, आपल्या संस्कृतीसाठी ज्याप्रकारे काम करतात तसं कोणीच करू शकणार नाही,” असं गावातले सराफ रामबाबू सोनी म्हणाले.
‘अंघोळ’ असा शाब्दिक अर्थ असलेला ‘न्हाण’ हा सण एकत्रित स्वच्छतेचं प्रतीक आहे. त्याला होळीच्या सणाचा संदर्भ आहे. या उत्सवाचे संयोजन संपूर्णपणे संगोड गावातल्या रहिवाशांकडून केलं जातं. उत्सवाच्या काळात हे ग्रामस्थ आपलं रोजचं कामकाज सोडून एका वेगळ्याच भूमिकेत शिरतात, त्यासाठीची रंगभूषा आणि वेशभूषादेखील स्वतःची स्वतःच करतात.
“सुमारे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी मुघल बादशहा शहाजहानच्या काळात संगोडमध्ये विजयवर्गीय महाजन होऊन गेले. ते शहाजहानची चाकरी करत होते. चाकरी सोडताना त्यांनी शहाजहानकडे गावात न्हाण उत्सव साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हापासून संगोडमध्ये हा उत्सव साजरा केला जाऊ लागला,” अशी माहिती रामबाबू सोनी यांनी दिली.
गावातल्या कलाकारांचं नृत्य, जादूचे प्रयोग आणि कसरती पाहायला आसपासच्या खेड्यांमधले हजारो लोक येतात. देवी ब्रम्हमणीच्या पूजेने या उत्सवाला सुरुवात होते. पूजेनंतर सर्वांना घूघरीचा (उकडलेले चणे) प्रसाद दिला जातो.
जादूगार सत्यनारायण माली यांनी जाहीर केलं की सगळ्यांना जादू पाहायला मिळणार आहे. यात तलवार गिळणे आणि यासारखे अनेक अचंबित करणारे प्रयोग पाहायला मिळतील. एक माणूस कागदाचे तुकडे गिळेलआणि नंतर आपल्या तोंडातून ५० फूट लांब दोरी बाहेर काढेल.
उत्सवाच्या शेवटी बादशहा की सवारी निघते. यात एक सामान्य गावकरी बादशहा होतो आणि त्याची गावातून राजेशाही थाटात मिरवणूक काढली जाते. गेली ६० वर्ष रामबाबूंच्या कुटुंबातली व्यक्ती बादशहाची भूमिका वठवत आहे. रामबाबू म्हणाले, “माझ्या वडलांनी २५ वर्ष ही भूमिका केली आणि आता गेली ३५ वर्षं मी हा वारसा पुढे चालवतोय. ही राजाची भूमिका एखाद्या चित्रपटातल्या प्रमुख भूमिकेइतकीच महत्त्वाची आहे. हाही एक चित्रपटच आहे.”
उत्सवाच्या दिवशी जो कोणी बादशहाची भूमिका करेल त्याला बादशहाप्रमाणेच आदर मिळतो.
हो. फक्त या एकाच दिवसापुरता, आजच्या दिवसासाठी तो राजा आहे असं एक प्रेक्षक म्हणतो.