‘गांधी आणि नेहरूंना कळून चुकलं होतं की घटना आणि कायदे लिहिण्याचं काम आंबेडकरांशिवाय पूर्ण होणार नव्हतं. फक्त त्यांच्याकडेच ती क्षमता होती. त्यांनी या कामाची भीक नाही मागितली.’

शोभाराम गहरवार, जादुगर बस्ती, अजमेर, राजस्थान

“आम्ही बाँब बनवायचो त्या जागेला इंग्रजांनी वेढा दिला होती. अजमेरजवळच्या एका जंगलात, डोंगरात. तिथे जवळच एक ओढा होता. तिथे एक वाघ पाणी प्यायला यायचा. तो यायचा आणि निघून जायचा. आम्ही कधी कधी हवेत बार काढायचो. त्याला कळलं होतं की पाणी प्यायचं आणि निघून जायचं. नाही गेला तर आम्ही हवेत नाही तर त्याच्यावर गोळी झाडू शकतो हे त्याला समजलं होतं.”

“तर, इंग्रजांना आमच्या या ठिकाणाविषयी खबर मिळाली होती. ते आमच्या मागावर होते. आता तो काळच इंग्रज राजवटीचा होता ना. वाघ यायचा त्याच वेळी आम्ही काही बाँब फोडले. आम्ही म्हणजे माझ्या सहकाऱ्यांनी. मी नव्हतो त्यात कारण मी फार लहान होतो तेव्हा.”

“वाघ पाणी न पिताच पळून गेला. पण नुसता पळाला नाही तो इंग्रज पोलिसांच्या मागे लागला. सगळेच पळायला लागले. आणि वाघ पाठलाग करत होता. काही जण डोंगराच्या कड्यावरून खाली पडले. काही जण रस्त्यात कोसळले. त्या सगळ्या सावळ्या गोंधळात दोन पोलिस मरण पावले. त्या दिवासपासून पोलिसांची तिकडे परत यायची हिंमत झाली नाही. त्यांना आमची भीती बसली होती. वो तोबा करते थे.”

त्या सगळ्यात वाघाच्या केसालाही धक्का लागला नाही. दुसऱ्या दिवशीसुद्धा तो तसाच पाणी प्यायला आला.

हा सगळा प्रसंग सांगत होते शोभाराम गहरवार. वय ९६. ज्येष्ठ आणि जाणते स्वातंत्र्यसैनिक. १४ एप्रिल २०२२ रोजी आम्ही अजमेरमध्ये त्यांच्या घरी बोलत होतो. जवळपास शंभर वर्षांपूर्वी ज्या दलित वस्तीत ते जन्मले, आजही ते तिथेच राहतायत. अधिक चांगल्या घरात रहायला जावं असं काही त्यांना कधी वाटलं नाही. दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या गहरवार यांच्यासाठी ते बिलकुल अवघड नव्हतं. १९३० आणि १९४० च्या दशकात इंग्रजांविरोधातला लढा कसा होता त्यांचं अगदी तपशिवलवार चित्र ते आमच्यासमोर साकारतात.

Shobharam Gehervar, the last Dalit freedom fighter in Rajasthan, talking to PARI at his home in Ajmer in 2022
PHOTO • P. Sainath

शोभाराम गहरवार, राजस्थानातले अखेरचे दलित स्वातंत्र्यसैनिक. अजमेरमध्ये आपल्या घरी, २०२२

Shobharam lives with his sister Shanti in Jadugar Basti of Ajmer town . Shanti is 21 years younger
PHOTO • Urja

शोभारामजी आपली बहीण शांती हिच्यासोबत अजमेरच्या जादुगर बस्तीत राहतात. ते बहिणीहून २१ वर्षांनी मोठे आहेत

त्यांची बाँब बनवायची फॅक्टरी नक्की होती तरी कशी?

“अरे, जंगल होतं ते. फॅक्टरी नव्हती काही... फॅक्टरी में तो कैंची बनती है. इथे आम्ही [भूमीगत क्रांतीकारक] बाँब बनवत होतो.”

“एक दिवस,” ते सांगतात, “चंद्रशेखर आझाद आले होते.” १९३० साल संपता संपता किंवा १९३१ च्या सुरुवातीची ही घटना असणार. वर्ष किंवा महिना नक्की सांगता येत नाही. “नक्की तारीख वगैरे मला विचारू नका,” शोभारामजी सांगतात. “सगळ्या गोष्टी होत्या माझ्याकडे. सगळ्या नोंदी, कागद, बातम्या, इथे घरी ठेवल्या होत्या. १९७५ साली पूर आला आणि माझ्या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या.”

१९२८ साली चंद्रशेखर आझाद आणि भगत सिंग यांनी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची पुनर्रचना केली. २७ फेब्रुवारी १९३१ अलाहाबादमधल्या अल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज पोलिसांनी गोळीबार केला तेव्हा आझाद यांच्या पिस्तुलात शेवटची गोळी उरली होती. तीच झाडून त्यांनी आत्महत्या केली. इंग्रजांच्या हाती जिवंत सापडायचं नाही ही त्यांनी घेतलेली शपथ त्यांनी पूर्ण केली आणि ते ‘आझाद’च राहिले. मृत्यूसमयी त्यांचं वय होतं २४ वर्षं.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अल्फ्रेड पार्कचं नाव चंद्रशेखर आझाद पार्क असं करण्यात आलं.

९८ वर्षीय गहरवार स्वतःला गांधीजी आणि डॉ. आंबेडकर या दोघांचे अनुयायी मानतात. ते म्हणतात, ‘ज्याची मूल्यं मला पटली, मी त्याच्या मार्गाने गेलो’

व्हिडिओ पहाः राजस्थानातील स्वातंत्र्यसैनिक ९८ वर्षीय गहरवार । ‘गांधी किंवा आंबेडकर अशी निवड मी का करावी?’

“आझाद इथे [बाँब तयार व्हायचे तिथे] आले, आम्हाला भेटले,” अजमेरमध्ये शोभारामजी आम्हाला सांगतात. “आमचे बाँब जास्त चांगले कसे होतील ते त्यांनी आम्हाला सांगितलं. बाँब बनवायचा वेगळा फॉर्म्युला त्यांनी आम्हाला सांगितला. जिथे स्वातंत्र्यसैनिक काम करायचे तिथे जाऊन त्यांनी टिळा देखील लावला. नंतर ते आम्हाला म्हणाले की त्यांना वाघ पहायचाय. वाघाची झलक हवी असेल तर तुम्हाला रात्री थांबावं लागेल.”

“तर, वाघ आला आणि गेला. आम्ही हवेत गोळी झाडली. चंद्रशेखरजींनी आम्हाला विचारलंसुद्धा की आम्ही गोळी का झाडली म्हणून. आम्ही त्यांना सांगितलं की वाघाला माहितीये की आम्ही त्याला इजा पोचवणार नाही. त्यामुळे तो येतो आणि निघून जातो.” अशा रितीने वाघाला पाणी पिता येत होतं आणि हे क्रांतीकारकही सुरक्षित रहायचे.

“पण मी तुम्हाला सांगत होतो त्या दिवशी, वाघाच्या आधी इंग्रज पोलिस पोचले होते. आणि सांगितलं ना, नुसता गोंधळ उडाला होता. हल्लकल्लोळ.”

त्या सगळ्या गोंधळात किंवा त्यानंतरच्या घटनांमध्येही आपण नव्हतो असं शोभारामजी सांगतात. पण ते या सगळ्या प्रसंगांचे साक्षीदार होते. आझाद इथे आले तेव्हा आपलं वय जास्तीत जास्त पाच वर्षं असेल असं शोभारामजी सांगतात. त्यांनी वेशांतर केलं होतं. आमचं काम फक्त त्यांना जंगलातल्या आमच्या बाँब बनवण्याच्या तळावर घेऊन जाणं इतकंच होतं. आम्ही दोघं मुलं त्यांना आणि त्यांच्या एका सहकाऱ्याला आमच्या तळावर घेऊन गेलो.”

सगळं छान जुळवून आणलं होतं. एक काका आपल्या दोघा पुतण्यांना घेऊन बाहेर निघाला होता, बस्स.

“आझाद यांनी आमचा तळ पाहिला. ती काही फॅक्टरी नव्हती. त्यांनी आमची पाठ थोपटली. आणि म्हणाले, ‘आप तो शेर के बच्चे है.’ तुम्ही शूरवीर आहात. मरणाची भीती नाहीये मनात.” आमच्या घरचे लोकही म्हणायचे, ‘मेलात तरी हरकत नाही. तुम्ही जे काही करताय ते स्वातंत्र्यासाठी करताय’.”

‘Don’t ask me about exact dates,’ says Shobharam. ‘I once had everything, all my documents, all my notes and records, right in this house. There was a flood here in 1975 and I lost everything'
PHOTO • Urja

नक्की तारीख वगैरे मला विचारू नका ,’ शोभाराम जी सांगतात. सगळ्या गोष्टी होत्या माझ्याकडे. सगळ्या नोंदी, कागद, बातम्या, इथे घरी ठेवल्या होत्या. १९७५ साली पूर आला आणि माझ्या सगळ्या गोष्टी वाहून गेल्या

*****

“गोळी लागली. पण जीव गेला नाही किंवा मी जायबंदी झालो नाही. गोळी पायाला लागून गेली. ही पहा.” उजव्या पायाला गुडघ्याखाली जिथे गोळी लागली तिथली खूण ते आम्हाला दाखवतात. गोळी पायात शिरली नसली तरी जोरात लागली असणार. “मी चक्कर येऊन पडलो. त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये नेलं,” ते सांगतात.

हे सगळं घडलं १९४२ मध्ये. तेव्हा ते ‘मोठे’ होते. मोठे म्हणजे १६ वर्षांचे. थेट रस्त्यावरच्या लढ्यात भाग घेत होते. आणि आज, वयाच्या ९६ व्या वर्षी सुद्धा शोभाराम गहरवार एकदम ठणठणीत आहेत. सहा फूट उंच, ताठच्या ताठ आणि कार्यरत. अजमेरमध्ये आपल्या घरी ते आमच्याशी बोलत होते. आयुष्याची नव्वद वर्षं किती धावपळीची होती ते त्यांच्या बोलण्यातून समजतं. त्यांना गोळी लागली तो प्रसंग सुरू होता.

“सभा होती आणि एक जण इंग्रजांविरोधात जरा जास्त बोलून गेला. मग काय, पोलिसांनी काही स्वातंत्र्यसैनिकांना पकडलं. त्यांना विरोध केला आणि पोलिसांनाच चोप दिला. हे सगळं घडलं स्वतंत्रता सेनानी भवनात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही या जागेला हे नाव दिलं. त्या आधी खास असं काही नाव नव्हतं.”

“तिथे सभा व्हायच्या आणि स्वातंत्र्य सैनिक लोकांना चले जाव चळवळीबद्दल सांगायचे. इंग्रज राजवटीचा मुखवटा फाडायचे. अजमेरच्या कानाकोपऱ्यातून रोज ३ वाजता लोक तिथे गोळा व्हायचे. आम्हाला कधी कुणाला बोलवावं लागलं नाही. आपणहून लोक यायचे. तिथेच ते ज्वलंत भाषण झालं आणि गोळ्या झाडल्या गेल्या.”

“मी हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलो. त्यानंतर पोलिस आले. त्यांनी त्यांचं काम केलं आणि काही तरी लिहून घेतलं. पण मला अटक केली नाही. म्हणालेः ‘त्याला गोळी लागलीये. इतकी शिक्षा त्याच्यासाठी पुरेशी आहे.’”

The freedom fighter shows us the spot in his leg where a bullet wounded him in 1942. Hit just below the knee, the bullet did not get lodged in his leg, but the blow was painful nonetheless
PHOTO • P. Sainath
The freedom fighter shows us the spot in his leg where a bullet wounded him in 1942. Hit just below the knee, the bullet did not get lodged in his leg, but the blow was painful nonetheless
PHOTO • P. Sainath

१९४२ साली पायाला गोळी लागली ती जागा शोभारामजी दाखवतायत. गुडघ्याच्या अगदी खाली गोळी लागली, ती पायात घुसली नाही तरी प्रचंड वेदना झाल्या होत्या

पोलिस काही मनाने इतके चांगले नव्हते, ते म्हणतात. गुन्हा दाखल केला असता तर पोलिसांनाच मान्य करावं लागलं असतं की त्यांनी शोभारामजींवर गोळी झाडली. बरं, त्यांनी काही भडकाऊ भाषण दिलं नव्हतं. किंवा कुणावर काही हिंसा केली नव्हती.

“इंग्रजांना त्यांच्या प्रतिमेवर डाग नको होता,” ते म्हणतात. “आम्ही मेलो असतो तरी त्यांना तसूभरही फरक पडला नसता. एवढ्या वर्षांचा लढा होता. लाखो लोक मेले. त्यानंतर स्वातंत्र्य मिळालंय. कुरुक्षेत्रात कसं सूर्यकुंड योद्ध्यांच्या रक्ताने भरलं होतं. तुम्ही ही गोष्ट विसरू नका. आपल्याला हे स्वातंत्र्य सहज मिळालं नाहीये. त्यासाठी आम्ही आमचं रक्त सांडलंय. कुरुक्षेत्रावर सांडलं होतं त्याहून खचित जास्त. सगळीकडे लढा सुरू होता. फक्त अजमेर नाही. तिथे मुंबई, कलकत्ता [आता कोलकाता]... सगळीकडे.”

“पायाला गोळी लागली त्यानंतर मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला,” ते सांगतात. “या लढ्यात मी जगेन वाचेन, कुणास ठाऊक? सेवेसाठी स्वतःचं आयुष्य द्यायचं आणि प्रपंच चालवायचा या दोन्ही गोष्टी मला जमल्या नसत्या.” शोभारामजी आपल्या बहिणीसोबत राहतात. शांती, त्यांची मुलं आणि नातवंडं असा त्यांचा परिवार आहे. त्यांचं वय ७५ वर्षं आहे. शोभारामजी त्यांच्याहून २१ वर्षांनी मोठे आहेत.

“एक गोष्ट सांगू?” शांती आम्हाला विचारतात. अगदी शांत आवाजात, स्पष्ट बोलतात. “आज मी आहे म्हणून हा माणूस जिवंत आहे. मी आणि माझ्या मुलांनी अख्खं आयुष्य याची काळजी घेतलीये. मी २० वर्षांची असताना माझं लग्न झालं. काही वर्षातच संसार अर्ध्यावर टाकून माझे पती वारले. तेव्हा मी फक्त ४५ वर्षांचे होते. मी यांची एवढी काळजी घेतलीये. आणि मला खरंच त्याचा अभिमान आहे. आता माझी नातवंडं, नातसुना त्यांचं हवं नको पाहतात.”

“मध्यंतरी ते खूप आजारी होते. मरणाच्या दारातून परत आलेत ते. २०२० साली. मी त्यांना कुशीत घेऊन त्यांच्यासाठी देवाचा धावा केला. आज तुम्हाला ते जिवंत आणि ठणठणीत दिसतायत.”

Shobharam with his family outside their home in Ajmer. In his nineties, the over six feet tall gentleman still stands ramrod straight
PHOTO • P. Sainath

शोभाराम गहरवार आपल्या कुटुंबासोबत अजमेरच्या आपल्या घराबाहेर. सहा फूट उंच आणि शंभरी जवळ आली तरी आजही ताठच्या ताठ

*****

असो. त्या जंगलातल्या तळावर बाँब बनायचे, त्यांचं पुढे व्हायचं तरी काय?

“जिथे गरज असायची, तिथे आम्ही जायचो. आणि गरज तर भरपूरच होती. मी देशाच्या सगळ्या कानाकोपऱ्यात जाऊन आलोय बहुतेक. बाँब घेऊन. आम्ही शक्यतो रेल्वेने प्रवास करायचो. स्टेशनवरून इतर वाहनांनी. इंग्रज पोलिसांनासुद्धा आमची भीती होती.”

हे बाँब कसे दिसायचे?

“हे असे [हाताची बंद ओंजळ करून सांगतात.] एवढ्या आकाराचे. ग्रेनेडसारखे. बरेच प्रकार असायचे. बाँब फुटायला किती वेळ लागतो त्यानुसार प्रकार असायचे. काही लगेच फुटायचे. काही चार दिवसांनंतर. आमचे नेते होते ते सगळं काही समजावून सांगत असत. बाँब कसा ठेवायचा, वगैरे. त्यानंतरच ते आम्हाला पाठवायचे.”

“त्या काळी आम्हाला मोठी मागणी होती! मी कर्नाटकात जाऊन आलोय. मैसूर, बंगळुरू, सगळ्या ठिकाणी. कसंय, चले जाव चळवळ आणि स्वातंत्र्यलढ्यात अजमेर हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. आणि बनारस [वाराणसी]. गुजरातेत बरोडा, मध्य प्रदेशात दमोह. लोकांचं लक्ष अजमेरकडे असायचं. इथे चळवळ जोरात सुरू आहे असं म्हणत लोक आमच्या पावलावर पाऊल टाकत संघर्ष करत होते. अर्थात इतरही खूप लोक लढत होते.”

रेल्वेने प्रवास करायचे तरी कसे? आणि पकडले जाणार नाहीत याची काय खात्री? पोस्टात पत्रं उघडून वाचली जायची. ते टाळण्यासाठी हे लोक नेत्यांची पत्रं गुप्तपणे एकमेकांना पोचवतात असा इंग्रजांना संशय असायचा. काही तरुण बाँबसुद्धा घेऊन जातात याचा त्यांना वास लागला होता.

The nonagenarian tells PARI how he transported bombs to different parts of the country. ‘We travelled to wherever there was a demand. And there was plenty of that. Even the British police were scared of us'
PHOTO • P. Sainath
The nonagenarian tells PARI how he transported bombs to different parts of the country. ‘We travelled to wherever there was a demand. And there was plenty of that. Even the British police were scared of us'
PHOTO • P. Sainath

देशाच्या कानाकोपऱ्यात आपण बाँब कसे पोचवले हे शोभाराम गहरवार अगदी तपशिलवार आम्हाला सांगतात. ‘जिथे मागणी असायची तिथे आम्ही जायचो. आणि मागणी भरपूर होती. इंग्रज पोलिस सुद्धा आम्हाला घाबरून होते’

“त्या काळी पोस्टात पत्रं उघडून वाचली जायची. ते टाळण्यासाठी आमच्या नेत्यांनी तरुण मुलांचा एक गट तयार केला होता. एका ठिकाणाहून दुसरीकडे पत्रं कशी पोचवायची हे त्यांनी आम्हाला शिकवलं होतं. ‘हे पत्र आंबेडकरांना नेऊन द्यायचंय, बडोद्यात.’ किंवा अजून कुठे तरी दुसऱ्या कुणाला. आम्ही लघवीच्या जागी पत्रं ठेवायचो आणि जायचो.”

“इंग्रज पोलिस आम्हाला थांबवून चौकशी करायचे. आम्ही रेल्वेत दिसलो तर मग प्रश्न असायचाः ‘तुम्ही तर एकीकडे जाताय असं सांगितलंत. आणि आता भलतीकडेच निघालायत.’ आता असं होणार हे आम्ही आणि आमची नेते मंडळी पुरतं ओळखून होतो. त्यामुळे जर आम्हाला बनारसला जायचं असेल तर आम्ही काही अंतर अलिकडेच उतरायचो.”

“डाक बनारसला पोचवायची हे आम्हाला सांगितलेलंच असायचं. आमच्या नेत्यांचा सल्ला असायचाः ‘शहराच्या जरासं बाहेर साखळी ओढायची आणि गाडीतून उतरायचं.’ आणि आम्ही तसंच करायचो.”

“त्या काळी वाफेवर चालणारी इंजिनं असायची. आम्ही इंजिनमध्ये जायचो आणि ड्रायव्हरवर पिस्तुल रोखायचो. ‘आम्ही आधी तुला मारू आणि मग स्वतः मरू,’ त्याला धमकवायचो. मग तो आम्हाला जागा मिळवून द्यायचा. सीआयडी, पोलिस सगळे येऊन शोध घेऊन जायचे. गाडीच्या डब्यात बसलेले प्रवासी तेवढे त्यांना दिसायचे.”

“आम्हाला सांगितलं होतं तसंच आम्ही एका ठिकाणी उतरलो. गाडी बराच वेळ थांबून राहिली. त्यानंतर काही स्वातंत्र्यसैनिक अंधारात घोडे घेऊन आले. आम्ही घोड्यांवर बसलो आणि पसार झालो. गंमत म्हणजे रेल्वे बनारसला पोचण्याआधी आम्ही तिथे पोचलो होतो.”

Former Prime Minister Indira Gandhi being welcomed at the Swatantrata Senani Bhavan
PHOTO • P. Sainath

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचं स्वतंत्रता सेनानी भवनात स्वागत करण्यात आलं होतं

“माझ्या नावावर वॉरंट निघालं होतं. बाँब घेऊन जात असताना आम्ही पकडले गेलो. आम्ही बाँब फेकून दिले आणि तिथून सटकलो. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आणि तपासले. काय प्रकारची स्फोटकं वापरली होती ते पाहिलं. आणि आमच्या मागेच लागले. अजमेर सोडून दुसरीकडे जायला हवं असा आम्ही निर्णय घेतला. मला [तत्कालीन] बॉम्बेला पाठवण्यात आलं.”

मुंबईत त्यांना कुणी बरं आसरा दिला? कुणी लपवून ठेवलं?

“पृथ्वीराज कपूर,” ते अगदी अभिमानाने सांगतात. १९४१ चा काळ म्हणजे या महान अभिनेत्याच्या कारकीर्दीचा सुवर्णकाळ. १९४३ साली इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा) स्थापन झाली त्याचे ते संस्थापक असल्याचं सांगितलं जातं. पण त्याचा पुरावा नाही. मुंबईमध्ये नाट्य आणि सिनेक्षेत्रातले काही आघाडीचे कलाकार आणि स्वतः पृथ्वीराज कपूर स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी होते, हरतऱ्हेने मदत करत होते.

“त्यांनी आम्हाला नंतर त्रिलोक कपूर यांच्याकडे पाठवलं. त्यांचे कुणी तरी नातेवाईक असावेत. त्यांनी नंतर हर हर महादेव सिनेमात काम केलं होतं बहुतेक.” त्रिलोक कपूर पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे बंधू हे शोभारामजींना माहित नसावं. त्या काळात तेही एक यशस्वी कलाकार होते. १९५० मध्ये आलेल्या हर हर महादेव या चित्रपटाने गल्ल्यावरही उत्तम कामगिरी केली होती.

“पृथ्वीराज यांनी काही काळ त्यांची गाडी आम्हाला दिली होती. आम्ही शहरात भटकलो होतो. जवळ जवळ दोन महिने मी तिथे राहिलो. त्यानंतर आम्ही माघारी आलो. इतर कामांसाठी आमची इथे गरज होती. ते वॉरंट तुम्हाला दाखवता आलं असतं तर... माझ्या नावावर निघालं होतं. इतर काही तरुण कार्यकर्त्यांच्या नावाने पण वॉरंट काढली होती.”

“पण १९७५ साली पूर आला आणि सगळं वाहून गेलं,” अतिशय दुःखी होत ते म्हणतात. “माझी सगळी कागदपत्रं गेली. प्रमाणपत्रं गेली. त्यातली काही तर जवाहरलाल नेहरूंनी दिली होती. ते कागद जर तुम्ही पाहिले  असते ना तुम्ही वेडेच झाला असतात. पण सगळं, म्हणजे सगळं वाहून गेलं.”

*****

Shobharam Gehervar garlands the statue in Ajmer, of one of his two heroes, B. R. Ambedkar, on his birth anniversary (Ambedkar Jayanti), April 14, 2022
PHOTO • P. Sainath
Shobharam Gehervar garlands the statue in Ajmer, of one of his two heroes, B. R. Ambedkar, on his birth anniversary (Ambedkar Jayanti), April 14, 2022
PHOTO • P. Sainath

शोभाराम गहरवार १४ एप्रिल २०२२ रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी यांच्या पुतळ्याला हार घालतायत. गांधीजी आणि बाबासाहेब हे दोघंही त्यांचे आदर्श आहेत

“गांधी आणि आंबेडकरांमध्ये एकाचीच निवड का बरं करायची? मी दोघांचा अनुयायी असू शकतो ना?”

आम्ही अजमेरच्या आंबेडकर पुतळ्याजवळ उभे होतो. या महामानवाची आज १३१ वी जयंती. आम्ही शोभारामजींना तिथे घेऊन आलो होतो. शोभारामजी सच्चे गांधीवादी. आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालावा अशी त्यांची फार इच्छा होती. तिला मान देऊन आम्ही तिथे पोचलो. या दोन महामानवांविषयी त्यांची भूमिका मला जाणून घ्यायची होती आणि ती संधी होती आता.

त्यांच्या घरी आम्ही बोलत असतानाही हा मुद्दा आला होता. तोच त्यांनी आम्हाला परत पण वेगळ्या शब्दांत सांगितला. “कसंय, आंबेडकर आणि गांधी दोघांनीही फार मोठं काम कार्य केलंय. गाडी चालवायची तर दोन चाकं लागतात ना. त्यात कसला विरोधाभास? कसले मतभेद? महात्म्याच्या विचारातलं काही मला पटलं, मी त्या मार्गाने गेलो. आंबेडकरांच्या शिकवणीतल्या काही गोष्टी योग्य वाटल्या, मी त्या स्वीकारल्या.”

त्यांच्या सांगण्यानुसार गांधी आणि आंबेडकर दोघंही अजमेरला आले होते. आंबेडकर आले तेव्हा, “आम्ही रेल्वे स्टेशनवर त्यांना हार घातला होता. पुढे जाणाऱ्या गाड्या अजमेरला थांबायच्या. तेव्हाच आंबेडकर इथे आले होते.” त्यांची भेट झाली तेव्हा शोभारामजी अगदी लहान होते.

“१९३४ साली महात्मा गांधी इथे आले होते. मी खूप लहान होतो तेव्हा. आपण आता बसलोय ना इथे. याच जादुगर बस्तीत.” शोभारामजी तेव्हा आठ वर्षांचे असतील.

“आंबेडकरांचं विचाराल तर आमच्या नेत्यांनी दिलेली पत्रं घेऊन बडोद्याला [आता वडोदरा] त्यांच्याकडे गेलो होतो. पोलिस पोस्टात आमची पत्रं उघडून वाचायचे. त्यामुळे आम्ही महत्त्वाचे कागद आणि पत्रं स्वतः घेऊन जायचो. तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर थापटलं होतं आणि विचारलं होतं, ‘तू अजमेरला राहतोस का?’”

Postcards from the Swatantrata Senani Sangh to Shobharam inviting him to the organisation’s various meetings and functions
PHOTO • P. Sainath
Postcards from the Swatantrata Senani Sangh to Shobharam inviting him to the organisation’s various meetings and functions
PHOTO • P. Sainath
Postcards from the Swatantrata Senani Sangh to Shobharam inviting him to the organisation’s various meetings and functions
PHOTO • P. Sainath

स्वतंत्रता सेनानी संघाच्या विविध बैठका, कार्यक्रमांसाठी शोभाराम गहरवार यांना निमंत्रित करणारी पोस्टकार्डं

शोभारामजी कोली समाजाचे आहेत हे त्यांना माहित होतं?

“हो. मी त्यांना सांगितलं. पण ते त्याविषयी फार काही बोलले नव्हते. त्यांना या गोष्टी समजायच्या. ते उच्चविद्याविभूषित होते. काही लागलं तर मला लिही असंही ते म्हणाले होते.”

दलित आणि हरिजन या दोन्ही संज्ञा शोभारामजींना मान्य आहेत. ते म्हणतात, “जर कुणी कोली असेल तर काय हरकत आहे? आपण आमची जात का लपवायची? हरिजन म्हणा किंवा दलित, काय फरक पडतो? तुम्ही कोणत्याही नावाने त्यांचा उल्लेख केलात तरी ते अनुसूचित जातीचेच असणार आहेत.”

शोभारामजींचे आई-वडील मजुरी करायचे. बहुतेक वेळा रेल्वेच्या प्रकल्पांवर काम असायचं.

“आम्ही सगळे दिवसातून एकदाच जेवायचो, पण घरचं कुणीही कधी दारूला शिवलंही नाही,” शोभारामजी सांगतात.   “भारताचे [माजी] राष्ट्रपती रामनाथ कोविंद” आपल्या समाजाचे असल्याचं सांगून ते म्हणतात, “ते अखिल भारतीय कोली समाज [या संघटनेचे] अध्यक्षसुद्धा होते.”

शोभारामजींचा समाज शिक्षणापासून कायमच वंचित राहिला आहे. कदाचित याच कारणामुळे ते बरंच उशीरा शाळेत जायला लागले. “हिंदुस्तानात वरच्या जातीचे, ब्राह्मण, जैन आणि इतर समाजाचे लोक इंग्रजांचे गुलाम बनले. आणि हे लोक अस्पृश्यता पाळायचे.”

“लक्षात घ्या, अनुसूचित जातीच्या बहुतेक लोकांनी इस्लामचा स्वीकार केला असता. काँग्रेस आणि आर्य समाजाचे लोक नसते तर हे झालंच असतं. जर आपण आपलं वागणं बदललं नसतं तर आपल्याला स्वातंत्र्यही मिळालं नसतं.”

The Saraswati Balika Vidyalaya was started by the Koli community in response to the discrimination faced by their students in other schools. Shobharam is unhappy to find it has been shut down
PHOTO • P. Sainath

इतर शाळांमध्ये मुलांबाबत भेदभाव केला जातो म्हणून कोली समाजाने स्वतः सरस्वती बालिका विद्यालयाची स्थापना केली. आता ती शाळा बंद पडलीये हे पाहून शोभाराम गहरवार अस्वस्थ झाले

The school, which once awed Mahatma Gandhi, now stands empty and unused
PHOTO • P. Sainath

एके काळी गांधीजींनी ज्या शाळेचं कौतुक केलं ती आज बंद, ओस पडलीये

“अस्पृश्यांच्या मुलांना कुणीही शाळेत घ्यायचं नाही. लोक सरळ म्हणायचे, हा कंजार आहे, हा डोम आहे, वगैर वगैरे. आम्हाला बाहेर ठेवलं जात होतं. मी पहिलीत गेलो तेव्हा ११ वर्षांचा होतो. तेव्हाचे आर्य समाजी लोक ख्रिश्चन धर्माविरोधात उभे होते. लिंक रोड भागातले आमच्या जातीच्या लोकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. मग, हिंदू धर्माच्या काही पंथांनी आमचा स्वीकार करायला सुरुवात केली. दयानंद अँग्लो वेदिक [डीएव्ही] शाळांमध्येसुद्धा आम्हाला प्रवेश मिळायला लागला होता.”

पण भेदभाव संपला नव्हता त्यामुळे कोली समाजाने आमची स्वतःची शाळा सुरू केली.

“गांधी तिथेच, सरस्वती बालिका विद्यालयात आले होते. आमच्या समाजातल्या जाणत्या लोकांनी शाळा सुरू केली होती. आजही ती शाळा सुरू आहे. आमचं काम पाहून गांधीजीसुद्धा प्रभावित झाले होते. ‘तुम्ही उत्तम काम केलं आहे. तुम्ही माझ्या अपेक्षांहून जास्त काम केलं आहे’,” ते सांगतात.

“आम्ही कोली समाजाने शाळा सुरू केली असली तरी इतर जातीची मुलंसुद्धा शाळेत शिकत होती. कसंय ही सगळीच मुलं अनुसूचित जातीची होती ना. त्यानंतर, इतर समाजाचीही मुलंसुद्धा शाळेत यायला लागली. आणि त्यानंतर अगरवाल लोकांनी शाळेवर कब्जा केला. नोंदणी आमच्याच नावाने होती. पण त्यांनी सगळं व्यवस्थापन हातात घेतलं.” ते आजही शाळेत जातात. कोविड-१९ च्या महासाथ पसरली आणि शाळा बंद झाल्या तोपर्यंत तर नक्कीच.

“हो. मी आजही जातो. पण आज तेच [वरच्या जातीचे] लोक सगळा कारभार पाहतायत. त्यांनी तर आता बी एड कॉलेजसुद्धा सुरू केलंय.”

“मी फक्त नववीपर्यंत शिकलो. आज मला त्या गोष्टीची फार खंत वाटते. माझे तेव्हाचे मित्र स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज प्रशासकीय अधिकारी झालेत. काही जण खूप मोठे झाले. मी मात्र सेवेत रमून गेलो.”

Former President of India, Pranab Mukherjee, honouring Shobharam Gehervar in 2013
PHOTO • P. Sainath

माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते शोभाराम गहरवार यांना २०१३ साली सन्मानित करण्यात आलं होतं

शोभारामजी दलित आहेत. ते स्वतःला सच्चे गांधीवादी मानतात. डॉ. आंबेडकरांवर त्यांची अपार श्रद्धा आहे. ते म्हणतातः “मी दोन्हीकडे होतो, गांधीवाद आणि क्रांतीवाद [गांधींनी दाखवलेला मार्ग आणि क्रांतीकारी चळवळ]. दोन्हींचा जवळचा संबंध आहे.” मुळातून गांधीवादी असूनही ते तीन राजकीय विचारधारांशी संलग्न होते.

शोभारामजींच्या मनात गांधींबद्दल प्रेम आणि आदर असला तरीही ते काटेकोरपणे त्यांची समीक्षा करतात. खास करून आंबेडकरांच्या संदर्भात.

“आंबेडकरांचं तगडं आव्हान समोर होतं त्यामुळे गांधी घाबरून गेले. शेड्यूल्ड कास्टवाले लोक बाबासाहेबांसोबत जातील अशी त्यांच्या मनात भीती होती. नेहरूंचंही तेच. जो व्यापक लढा उभा राहिला होता तो कमजोर होईल असं त्यांना वाटत होतं. अर्थात, ते अतिशय समर्थ होते याची त्यांना पुरेपूर जाणीव होती. देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हा वाद विकोपाला जाईल का अशी सगळ्यांना भीती वाटत होती.”

“त्यांना कळून चुकलं होतं की घटना आणि कायदे लिहिण्याचं काम ते आंबेडकरांशिवाय पूर्ण होणार नव्हतं. फक्त त्यांच्याकडेच ती क्षमता होती. त्यांनी या कामाची भीक नाही मागितली. उलट आंबेडकरांनी आपल्या कायद्यांची चौकट तयार करण्याचं काम करावं अशी विनंती बाकीच्यांनी केली होती. या जगाची निर्मिती करणाऱ्या ब्रह्मदेवासारखं त्यांचं काम होतं. किती हुशार आणि विद्यावंत माणूस होता तो. पण आपण हिंदुस्तानी लोक मात्र भयंकर वागलो त्यांच्याशी. १९४७ च्या आधी आणि नंतरही आपण त्यांना फार वाईट वागवलं. स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातूनही आपण त्यांना वगळून टाकलं. माझ्यासाठी मात्र ते प्रेरणास्रोत आहेत, अगदी आजही.”

शोभारामजी आणखी एक गोष्ट सांगतात, “मी मनाने पुरता काँग्रेसवाला आहे. खराखुरा काँग्रेसवाला.” आणि याचा अर्थ असा की पक्ष सध्या ज्या दिशेने जात आहे त्याबद्दल ते त्यांची रोखठोक मतं आहेत. त्यांच्या मते देशाचं सध्याचं नेतृत्व “या देशाला हुकुमशाहीकडे घेऊन जातंय.” आणि म्हणूनच काँग्रेस पक्षाने उभारी घ्यायला पाहिजे. हा देश आणि संविधानाचं रक्षण करायला पाहिजे.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची ते तोंडभर स्तुती करतात. “त्यांना लोकांबद्दल आस्था आहे. आम्हा स्वातंत्र्यसैनिकांचाही ते विशेषत्वाने विचार करतात.” राजस्थानात स्वातंत्र्यसैनिकांना मिळणारं पेन्शन देशभरात सगळ्यात जास्त आहे. मार्च २०२१ साली गेहलोत सरकारने त्यात वाढ करून ते ५०,००० केलं आहे. केंद्राकडून देण्यात येणारी सर्वात जास्त रक्कम रु. ३०,००० इतकी आहे.

शोभारामजी आपण गांधीवादीच असल्याचं सांगतात. तेही कधी? तर आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून येत असताना.

“हे बघा, मला ज्यांचे विचार आवडले, मी त्यांच्या मार्गावर गेलो. ज्यांचे विचार मान्य होते त्या सगळ्यांच्या विचारांचा मी मागोवा घेतला. मला त्यात कधी काही वावगं वाटलं नाही.”

*****

‘This [Swatantrata Senani] bhavan was special. There was no single owner for the place. There were many freedom fighters, and we did many things for our people,’ says Gehervar. Today, he is the only one looking after it
PHOTO • Urja

‘हे भवन अगदी खास आहे. या जागेचा एक कुणी मालक नाही. किती तरी स्वातंत्र्यसैनिक मिळून आम्ही लोकांसाठी किती तरी कामं करत होतो,’ गहरवार सांगतात. आज या जागेचा सांभाळ करणारे ते एकटेच उरले आहेत

शोभाराम गहरवार आम्हाला स्वतंत्रता सेनानी भवनाकडे घेऊन जातात. अजमेरच्या वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकांचं हे भेटीचं ठिकाण. हे भवन अगदी गजबजलेल्या बाजारपेठेत आहे. नव्वदी पार केलेले गहरवार झपाझप पावलं टाकतात. त्यांना गाठणं आम्हाला अवघड जातं. रस्त्यावरच्या बेशिस्त गर्दीला न जुमानता ते एका बोळात शिरतात. त्यांना आजही काठीची गरज भासत नाही. चालण्याचा वेग आम्हाला लाजवेल असा.

या संपूर्ण भेटीदरम्यान एक प्रसंग मात्र असा येतो जेव्हा शोभारामजी अस्वस्थ होतात, घडलेल्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. त्यांना अपार अभिमान असलेल्या शाळेपाशी आम्ही गेलो असता तिथे चक्क ‘सरस्वती स्कूल बंद पडा है’ अशी सूचना भिंतीवर रंगवलेली दिसली. शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आलं होतं. कायमसाठी, तिथला रखवालदार आणि आजूबाजूचे लोक सांगतात. भविष्यात ही जागा म्हणजे ‘पैशाची खाण असलेला भूखंड’ इतकीच उरणार कदाचित.

स्वतंत्रता सेनानी भवनात शोभारामजी आपल्या विचारात गढून जातात. जुन्या आठवणींमध्ये रमतात.

“१५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर भारताचा ध्वज फडकला तेव्हा आम्हीही इथे तिरंगा फडकावला. आम्ही नववधूसारखं हे भवन सजवलं होतं. सगळे स्वातंत्र्यसैनिक इथे गोळा झालो होतो. तेव्हा आम्ही सगळे तरुण होतो. आनंदीआनंद होता.”

“हे भवन अगदी खास आहे. या जागेचा एक कुणी मालक नाही. किती तरी स्वातंत्र्यसैनिक मिळून आम्ही लोकांसाठी किती तरी कामं करत होतो. कधी कधी आम्ही दिल्लीला जायचो, नेहरूंची भेट घ्यायचो. नंतरच्या काळात इंदिरा गांधींनाही भेटायचो. आज, त्यातलं कुणीही या जगात नाही.”

“इतके मोठे मोठे स्वातंत्र्यसैनिक होते इथे. त्यातले किती तरी क्रांतीच्या बाजूने होते. आणि इतर अनेक सेवेच्या बाजूने.” अनेकांची नावं ते सांगू लागतात.

“डॉ. सरदानंद, वीर सिंग मेहता, राम नारायण चौधरी. राम नारायण चौधरी म्हणजे दैनिक नवज्योतीचे संपादक दुर्गा प्रसाद चौधरींचे थोरले बंधू. अजमेरमधलं भार्गव कुटुंब होतं. मुकुट बिहारी भार्गव संविधान समितीचे सदस्य होते. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली समितीने राज्यघटना लिहिली. यातलं कुणीही आता हयात नाही. गोकुळभाई भट्ट थोर स्वातंत्र्यसैनिक होते. ‘राजस्थान के गांधीजी’ होते ते.” गोकुलभाई काही काळ सिरोही संस्थानाचे मुख्यमंत्री होते. पण स्वातंत्र्यलढ्यासाठी आणि सेवाभावाने त्यांनी सत्ता सोडून दिली.

The award presented to Shobharam Gehervar by the Chief Minister of Rajasthan on January 26, 2009, for his contribution to the freedom struggle
PHOTO • P. Sainath

२६ जानेवारी २००९ रोजी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल शोभाराम गहरवार यांना हे मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला

स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कणभरही सहभाग नव्हता हे शोभारामजी अगदी ठासून सांगतात.

“वो? उन्होंने तो उंगली भी नही कटाई.”

स्वतंत्रता सेनानी भवनाच्या भवितव्याचा मात्र त्यांना घोर लागला आहे.

“माझं वय झालंय. मी काही रोज इथे येऊ शकत नाही. तब्येत बरी असली तर मात्र मी नेमाने इथे येतो. तासभर बसतो. इथे येणाऱ्या लोकांना भेटतो. शक्य होईल तसं त्यांच्या अडचणी सोडवायला मदत करतो.”

“माझ्यासोबत आता कुणीही नाहीये. आजकाल मी एकटाच असतो. बहुतेक सगळे स्वातंत्र्यसैनिक मरण पावलेत. जे कुणी हयात आहेत ते आता दमलेत, अंथरुणाला खिळून आहेत. मी एकटा या स्वतंत्रता सेनानी भवनाचं काम पाहतोय. आजही मला या जागेबद्दल अपार प्रेम आहे. तिचं जतन करण्याचा माझा प्रयत्न आहे. पण मी इथे येतो आणि माझे डोळे भरून येतात. माझ्यासोबत कुणीही नाहीये आता.”

“मी मुख्यमंत्री अशोक गेहलोतांना पत्र लिहिलंय. दुसऱ्या कुणी बळकावण्याच्या आता या भवनाचा कारभार हातात घ्या अशी त्यांना विनंती केलीये.”

“या जागेचं मूल्य करोडोंच्या घरात आहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात आहे. किती तरी जण मला गळ घालण्याचा प्रयत्न करतात, ‘शोभारामजी, तुम्ही एकटे किती पुरे पडणार? आमच्या ताब्यात द्या. आम्ही करोडो रुपये रोख द्यायला तयार आहोत’. मी इतकंच सांगतो. मी मेल्यानंतर या जागेचं काय हवं ते करा. काय करणार? त्यांचं म्हणणं मी कसे ऐकू, सांगा? या स्वातंत्र्यासाठी लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिलाये. या पैशाचं मी काय करणार?”

“एक गोष्ट लक्ष देऊन ऐका. कुणालाही आमची फिकीर उरलेली नाही. स्वातंत्र्यसैनिकांबद्दल कुणी काही विचारतही नाही. आम्ही या स्वातंत्र्यासाठी कसे लढलो, ते कसं मिळवलं हे शाळेतल्या मुलांना कळेल असं एकही पुस्तक आज नाही. आमच्याबद्दल लोकांना काही माहित तरी आहे का?”

ही कहाणी मधुश्री प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘अखेरचे शिलेदारः भारतीय स्वातंत्र्यलढ्याचं पायदळ’ या मराठी आवृत्तीत प्रकाशित झाली आहे.

P. Sainath

পি. সাইনাথ পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়ার প্রতিষ্ঠাতা সম্পাদক। বিগত কয়েক দশক ধরে তিনি গ্রামীণ ভারতবর্ষের অবস্থা নিয়ে সাংবাদিকতা করেছেন। তাঁর লেখা বিখ্যাত দুটি বই ‘এভরিবডি লাভস্ আ গুড ড্রাউট’ এবং 'দ্য লাস্ট হিরোজ: ফুট সোলজার্স অফ ইন্ডিয়ান ফ্রিডম'।

Other stories by পি. সাইনাথ
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে