छाया उबाळेंना जात्यावर आई गायची ती गाणी आणि ओव्या आठवतात. घर, कुटुंब, नातीगोती आणि त्यातल्या सुखदुःखाची गाणी ती गायची

“माझी आई खूप सारी गाणी गायाची. पण आज माझ्या काही ती ध्यानात नाहीत,” पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या त्यांच्या गावी आम्ही त्यांना भेटलो होतो. जात्यावरच्या ओव्यांच्या संग्रहासाठी ओव्या गायलेल्या अनेक जणींना पुन्हा जाऊन भेटण्याच्या आमच्या प्रयत्नात आम्ही सविंदणे गावात पोचलो होतो. तिथल्या पवार कुटुंबाला भेट द्यायला गेलो तेव्हा तिथे सगळा गोतावळा जमला होता. मुलं, मुली, सुना आणि लेकरं.

पण ज्यांना भेटायला गेलो त्या गीता पवार मात्र तिथे नव्हत्या. आम्ही गेलो चार वर्षांपूर्वीच त्यांचं निधन झालं होतं. मग त्यांनी गायलेल्या ओव्या आणि गाणी त्यांच्या मुलीला छाया उबाळेंना आठवतायत का ते आम्ही विचारायचं ठरवलं. गीताबाईंच्या तसबिरीशेजारी त्यांची चांदीची जोडवी आजही जपून तशीच ठेवली आहेत. ४३ वर्षीय छायाताईंनी ती आम्हाला अगदी प्रेमाने दाखवली.

थोडा वेळ आपल्या आईच्या ओव्या आठवण्याचा प्रयत्न केल्यानंतर छायाताईंनी आम्हाला चार ओव्या गाऊन दाखवल्या. शिवाय दोन गाणी पण त्या गायल्या. आणि अगदी सुरुवातीला त्यांनी दोनच ओळीत भद्र राज्याच्या अश्वपती राजाची मुलगी असलेल्या सावित्रीची गोष्ट गायली. हा पुढच्या गाण्याचा गळा होता.

PHOTO • Samyukta Shastri
PHOTO • Samyukta Shastri

डावीकडेः छाया उबाळे आपल्या आईच्या तसबिरीसह. गीताबाई हरिभाऊ पवार २०१३ साली निवर्तल्या. उजवीकडेः गीताबाईंचा फोटो आणि जोडवी

PHOTO • Samyukta Shastri

गीताबाई पवारांचं कुटुंबः डावीकडून उजवीकडेः सून नम्रता, मुलगा शहाजी, नातू योगेश उबाळे. मुलगी छाया उबाळे, भाचा अभिषेक माळवे आणि धाकटा मुलगा नारायण पवार

पहिल्या गाण्यामध्ये एकशे एक आणि पाच पांडवांना स्मरुन सुरुवात होते. घरची बाई एकटीने मोठ्या खटल्यासाठी राबत असते. दळण कांडण करत असते त्याबद्दल त्या गातात. त्यानंतर आपले मायबाप म्हणजे पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणीच असल्याचं गाताना छायाताईंचा कंठ दाटून येतो. गालावरून अश्रू ओघळू लागतात. आणि अचानक त्याच क्षणी पावसाचे थेंब घरच्या पत्र्यावर वाजू लागतात.

पंचमीच्या सणाला भावाला धाडून द्या असा निरोप देणारी गिरिजा म्हणजे ही बहीण भाऊ येतो तेव्हा त्याचे पाय धुते. तुला कुणाचा जाच आहे का या भावाच्या प्रश्नावर ती इतकंच म्हणते की जाच काहीच नाही. फक्त चार दीर आणि चार जावा आहेत. एवढ्या सगळ्यांच्या मागण्या पुरवता पुरवता मी हा त्रास कसा सहन करू?

या नंतरच्या चार ओव्या तान्ह्या बाळावरचं प्रेम आणि त्याच्यासाठी कुणी कुणी काय आणलंय यावरच्या आहेत. मामा आणि मावशी अंगी आणि टोपडं घेऊन आलेत. त्याला भूक लागलीये त्यामुळे त्याला वाटीत दहीभात खाऊ घालू असंही ओवीत येतं.

आधीच्या गीताने डोळे भरून आले असले तरी पुढच्या गाण्याने मात्र आमच्या गप्पांचा शेवट अगदी हसत हसत होतो. सासूला खूश करणं हे कोणत्याही सुनेसाठी किती अवघड आहे हे सांगणारं धमाल गाणं छायाताई गातात. कारण ही सासू म्हणजे कडू कारलं असते. कितीही आणि कसंही शिजवा कडू ते कडूच.

व्हिडिओ पहाः कडू कारल्याची भाजी

गाणं ऐकाः गिरिजा आसू गाळिते

लोकगीतः

गिरीजा आसू गाळिते

भद्र देशाचा अश्वपती राजा पुण्यवान किती
पोटी सावित्री कन्या सती केली जगामध्ये किर्ती

एकशेएक कौरव आणि पाची पांडव

साळी का डाळी का गिरीजा कांडण कांडती
गिरिजा कांडण कांडती, गिरिजा हलक्यानं पुसती
तुमी कोण्या देशीचं? तुमी कोण्या घरचं?
आम्ही पंढरपूर देशाचं, काय विठ्ठलं घरचं
विठ्ठल माझा पिता, रुक्मिनी माझी माता
एवढा निरोप काय, सांगावा त्या दोघा
पंचमी सणाला काय ये बंधवा न्यायाला

ए बंधवा, ए बंधवा, तुझं पाऊल धुईते
गिरिजा पाऊल धुईते, गिरिजा आसू जी गाळिते
तुला कुणी बाई नि भुलिलं, तुला कुणी बाई गांजिलं
मला कुणी नाही भुलिलं, मला कुणी नाही गांजिलं
मला चौघे जण दीर, चौघे जण जावा
एवढा तरास मी कसा काढू रे बंधवा

ओव्या

अंगण-टोपडं सीता घालिती बाळाला
कोणाची लागी दृष्ट, काळं लाविती गालाला

अंगण-टोपडं  हे बाळ कुणी नटविलं
माझ्या गं बाळाच्या मामानं पाठविलं
माझ्या गं योगेशच्या मामानं पाठविलं

अंगण-टोपडं गं बाळ दिसं लाल-लाल
माझ्या गं बाळाची मावशी आली काल

रडतया बाळ त्याला रडू नको देऊ
वाटीत दहीभात त्याला खायला देऊ

लोकगीतः

सासू खट्याळ लई माझी

सासू खट्याळ लई माझी सदा तिची नाराजी
गोड करू कशी बाई कडू कारल्याची भाजी (२)

शेजारच्या गंगीनं लावली सासूला चुगली
गंगीच्या सांगण्यानं सासूही फुगली
पोर करी आजी-आजी, नाही बोलायला ती राजी

गोड करू कशी बाई कडू कारल्याची भाजी
सासू खट्याळ लई माझी  सदा तिची नाराजी

गायिकाः छाया उबाळे

गावः सविंदणे

तालुकाः शिरुर

जिल्हाः पुणे

ही गाणी व सोबतची छायाचित्रं २०१७ साली ऑक्टोबर महिन्यात टिपण्यात आली आहेत.

पोस्टरः सिंचिता पर्बत

हेमा राइरकर आणि गी पॉइत्वाँ यांनी सुरू केलेल्या जात्यावरच्या ओव्या या मूळ प्रकल्पाबद्दल वाचा .

নমিতা ওয়াইকার লেখক, অনুবাদক এবং পিপলস আর্কাইভ অফ রুরাল ইন্ডিয়া, পারির নির্বাহী সম্পাদক। ২০১৮ সালে তাঁর ‘দ্য লং মার্চ’ উপন্যাসটি প্রকাশিত হয়েছে।

Other stories by নমিতা ওয়াইকার
PARI GSP Team

পারি গ্রাইন্ডমিল সংগস্ প্রজেক্ট টিম: আশা ওগালে (অনুবাদ); বার্নার্ড বেল (ডিজিটাইজেশন, ডেটাবেস নির্মাণ, রূপায়ণ এবং রক্ষণাবেক্ষণ); জিতেন্দ্র মেইদ (প্রতিলিপি এবং অনুবাদ সহায়ক); নমিতা ওয়াইকার (প্রকল্প প্রধান এবং কিউরেশন); রজনী খলাদকর (ডেটা এন্ট্রি)

Other stories by PARI GSP Team
Translator : Medha Kale

পুণে নিবাসী মেধা কালে নারী এবং স্বাস্থ্য - এই বিষয়গুলির উপর কাজ করেন। তিনি পারির মারাঠি অনুবাদ সম্পাদক।

Other stories by মেধা কালে