कारदगा गावात एखादं मूल जन्माला आलं की पहिली खबर सोमाक्कांना जाते. ९,००० लोकसंख्येच्या या गावात मेंढीच्या लोकरीचे कंडे करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी त्या एक. वाळ्यासारखा असणारा कंडा शुभ मानला जातो आणि नव्या बाळाच्या मनगटात घातला जातो.
“मेंढरं चारा हुडकत रानोमाळ
हिंडत्याती. थंडी नको, वारा नको. कितकाली लोकं भेटत्याती त्यांना,” पन्नाशीच्या
सोमाक्का पुजारी सांगतात. आणि म्हणूनच मेंढ्या काटक असल्याचं मानलं जातं आणि
त्यांच्या लोकरीपासून बनवलेला कंडा बांधला की बाळाला नजर लागत नाही.
धनगर बाया पूर्वापारपासून हे कंडे
तयार करत आल्या आहेत. कारदगा गावात आज धनगरांची मोजकी आठ कुटुंबंच ही कला जोपासून
आहेत. “निम्म्या गावाला घातलं आहे,” सोमाक्का सांगतात. कारदगा महाराष्ट्र आणि
कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या बेळगावी जिल्ह्यात आहे आणि इथले अनेक जण
सोमाक्कांसारखंच मराठी आणि कन्नड दोन्ही भाषा बोलतात.
“सगळ्या जाती-धर्माची लोकं येतात
आमच्यापाशी कंडा घ्यायला,” सोमाक्का सांगतात.
लहानपणी आई कंडे बनवायची ते सोमाक्का
मन लावून पहायच्या. किस्नाबाई बनकर म्हणजे त्यांची आई लई भारी कंडे बनवायच्या. “ती
लोकरीचा केस न् केस निवडून घ्यायची आने मंगच कंडा बनवाया सुरुवात करायची,” त्या
सांगतात. अगदी पातळ लोकर निवडून घेतल्याने ती वळायला सोपी जाते. मेंढी पहिल्यांदा
भादरली की तीच लोकर वापरायची कारण ती जरा भरड असते. “शंभर मेंढरात एकाचीच लोकर
कामी येते बगा,” सोमाक्का सांगतात.
सोमाक्का आपले वडील अप्पाजी बनकर यांच्याकडून कंडा कसा करायचा ते शिकल्या. १०
वर्षांच्या सोमाक्कांनी ही कला शिकायला दोन महिने लागले. तेव्हापासून गेली चाळीस
वर्षं त्या हे काम करतायत, ही कला जोपासतायत. पण आजकाल ती अस्ताला जात असल्याची
खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवते. “आजकालची तरणी पोरं मेंढरं चारायला बी नेईनात.
त्यांच्या लोकरीपासून काही करतात हे त्यांना समजावं तर कसं?”
सोमाक्का सांगतात, “एक मेंढी भादरली की १-२ किलो लोकर निघते.” त्यांच्याकडे मेंढरं आहेत आणि घरची गडी माणसं वर्षातून दोनदा मेंढ्या भादरतात. शक्यतो, दिवाळी आणि बेंदूर असतो तेव्हा. त्यासाठी कातरभुनी नावाची लोखंडी कातर वापरली जाते. एक मेंढी भादरायला १० मिनिटं लागतात आणि शक्यतो सकाळीत हे काम केलं जातं. त्यानंतर लोकरीचा केस न् केस तपासून खराब झालेली लोकर फेकून दिली जाते.
एक कंडा करायला सोमाक्कांना १०
मिनिटं पुरी होतात. आज सोमाक्का वापरतायत ती लोकर २०२३ साली दिवाळीत काढली होती.
“लेकरांसाठी नीट जपून ठेवलीये,” त्या सांगतात.
कंडा वळायला सुरुवात करण्याआधी
सोमाक्का लोकरीत काही धूळ किंवा घाण असली तर ती साफ करतात. त्यानंतर एकेक केस वळून
त्याला गोल आकार दिला जातो. बाळाच्या मनगटाच्या आकाराप्रमाणे कंडा किती लहान-मोठा
करायचा ते ठरतं. एकदा गोल आकार तयार झाला की त्या आपल्या तळव्यावर चोळून चोळून
कंडा एकदम घट्ट वळतात.
क्षणाक्षणाला त्या तयार होत असलेला
कंडा पाण्यात बुडवून घेतात. “जितकं पाणी लावाल तितका कंडा मजबूत होतोया,” त्या
सांगतात. लोकर खेचत, वळत आणि तळव्यावर चोळत चोळत त्या कंड्याला आकार देतात.
“एक ते तीन वर्षापर्यंतची लेकरं कंडा घालतात,” त्या सांगतात. तीन वर्षांपर्यंत
कंडा चालतो. त्याला काही होत नाही असं त्या सांगतात. महाराष्ट्रात धनगरांचा समावेश
भटक्या जमाती-ब या प्रवर्गात केला गेला आहे तर महाराष्ट्रात ते इतर
मागासवर्गीयांमध्ये समाविष्ट आहेत.
सोमाक्कांचे पती बाळू पुजारी वयाच्या १५ व्या वर्षापासून मेंढ्यांमागे जातायत. आज वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी मेंढरं चारणं थांबवलंय. गावातल्या आपल्या मालकीच्या दोन एकरात ते ऊस घेतात आणि शेती करतात.
सोमाक्कांचा थोरला मुलगा, ३४ वर्षीय
माळू पुजारी आता मेंढ्यांमागे जातो. बाळूमामा सांगतात की त्यांच्या मुलाकडे आता ५०
हून कमी जितराब आहे. “१० वर्षांखाली आमच्याकडे २०० जितराब होतं,” ते सांगतात.
आताशा कारदगा गावाच्या सभोवतालची माळरानं आकसत गेल्याचा हा परिणाम असल्याचं
त्यांचं म्हणणं आहे.
आता वाडाच कमी झाल्यामुळे लोकरवाली,
न भादरलेली मेंढरं मिळणं मुश्किल झालं आहे. परिणामी गावात कंडा करणारे आणि
कंड्यांची संख्याही कमी व्हायला लागली आहे.
सोमाक्का आणि बाळूमामा मेंढरं
चारणीसाठी पार १५१ किलोमीटरवरच्या विजापूरपर्यंत आणि २२७ किलोमीटरवर असलेल्या
सोलापूरपर्यंत जायचे. सोमाक्कांना आजही तो काळ नीट आठवतो. “आम्ही इतकं दूरवर
चालायचो की मोकळं रान म्हणजे आमचं घर होतं.” अगदी दहा वर्षांपूर्वीपर्यंत आयुष्य
कसं होतं ते सोमाक्का सांगतात. “रोजच खुल्या आभाळाखाली निजायचं. वर पाहिलं की
चंद्र न् चांदण्याच असायच्या सोबतीला. चार भिंतीच्या या बंद घरात तसलं काही नाही
बगा.”
सोमाक्का कारदगा आणि आसपासच्या गावांमध्ये शेतात कामाला सुद्धा जायच्या. काही
शेतं तर पार १० किलोमीटर लांब होती. त्या रोज पायी जायच्या आणि यायच्या. “विहिरी
खोदायचं, दगडं उचलायचं सुद्धा काम केलंय,” त्या सांगतात. १९८० च्या दशकात त्यांना
विहिरीच्या कामावर दिवसाला चार आणे मजुरी मिळायची. “अहो त्या काळात २ रुपयांना
किलोभर तांदूळ मिळत होता,” त्या सांगतात.
कंडा बनवणं सोपं असेल असं पाहून वाटतं खरं पण ते तितकं सहज साधं नाही. अनेकदा कंडा वळत असताना लोकरीचे बारीक केस नाका-तोंडात जातात. खोकल्याची उबळ येते, शिंका येतात. बरं, यात पैसा नाही काहीच. कंडा तयार करून तसाच बांधला जातो. कुणीही त्याचे पैसे देत नाही. शिवाय चराऊ कुरणं आणि माळरानं कमी झाल्यामुळे त्याचाही परिणाम झाला आहेच.
सोमाक्कांनी लेकराच्या हातावर कंडा
बांधला की घरचे लोक त्यांना आहेर करतात. हळद-कुंकू, टॉवेल-टोपा, पान-सुपारी, साडी
आणि झंपर तसंच नारळ देऊन ओटी भरली जाते. “काही काही जण थोडे पैशे देतात,” सोमाक्का
सांगतात. आपण स्वतः कंडा बांधण्याचे काहीही पैसे मागत नसल्याचं त्या स्पष्ट करतात.
“ही कला पैसा करण्यासाठी नाहीच,” त्या म्हणतात.
आजकाल काही जण चक्क काळा धागा घालून त्याचे कंडे करून विकू लागलेत. अगदी १०
रुपयांपासून बाजारात मिळू लागलेत. “असली कंडा मिळणंच मुश्किल झालंय,” सोमाक्कांचा
धाकटा मुलगा, रामचंद्र सांगतो. तो देवळात पुजाऱ्याचं काम करतो आणि शेती पाहतो.
सोमाक्कांची मुलगी, २८ वर्षांची महादेवी त्यांच्याकडून कंडा बनवायला शिकली आहे. “आजकाल कुणाला करायचं नाहीये हे काम,” सोमाक्का सांगतात. एक काळ असा होता जेव्हा धनगराच्या प्रत्येक बाईला कंडा वळता यायचा, त्या सांगतात.
मेंढीच्या लोकरीपासून धागे वळायचं
कामही सोमाक्कांना येतं. मांडीवर लोकर वळून धागा तयार केला जातो. पण या कामात
मांडीला चांगलंच पोळतं, म्हणून त्या लाकडी टकळी वापरतात. तयार लोकरीचे धागे
सनगरांना विकले जातात. सनगर त्याच्या घोंगड्या विणतात. घोंगड्याची किंमत पार १,०००
रुपयांपर्यंत जात असली तरी सोमाक्का मात्र लोकरीचे धागे फुटकळ ७ रुपये किलो भावाने
विकतात.
कोल्हापूरच्या पट्टण कोडोली गावात
ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात विठ्ठल बिरदेवाची यात्रा भरते. त्या यात्रेमध्ये
लोकरीची आणि सुताची खरेदी-विक्री होते. सोमाक्का यात्रेची तयारी फार आधीपासून
करतात. यात्रेच्या आदल्या दिवशी जवळपास २,५०० धागे तयार करतात. “पाय सुजून येतात
बगा,” त्या म्हणतात. सोमाक्का डोक्यावरच्या टोपल्यात १० किलो सूत घेऊन १६ किलोमीटर
अंतर पायी चालत जातात. आणि या सगळ्या कष्टाचे त्यांना मिळतात ९० रुपये.
इतकं सगळं असूनही कंडा करण्याचा त्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. “मी ही प्रथा जिवंत ठेवलीये, त्याचं मला लई भारी वाटतं,” त्या सांगतात. भंडाऱ्याने मळवट भरलेल्या सोमाक्का म्हणतात, “मोकळ्या रानात शेळ्या-मेंढ्यांमध्ये माझा जन्म झालाय. आता डोळे मिटेस्तोवर ही कला मी अशीच जतन करणार आहे.”
ग्रामीण कारागिरांवरील या लेखमालेला
मृणालिनी मुखर्जी फौंडेशनचे अर्थसहाय्य मिळाले आहे.