“मी सोनेरी बॉर्डर लावेन आणि त्याला काही चुण्या घालेन. आपण बाहीवर काही कटआऊट पण लावू शकतो, पण त्याचे आणखी ३० रुपये लागतील.”
शारदा
मकवाना हिचं तिच्या ग्राहकांशी नेहमीचं हे संभाषण आहे, काहींना बाहीची लांबी, लेसचा
प्रकार आणि पूर्ण पाठ उघडी असली तरी ब्लाउज नीट बांधून ठेवणाऱ्या नाड्यांना जोडलेल्या
गोंड्यांविषयी त्या माहिती देत असतात. “मी कापडापासून फुलंही बनवू शकते आणि तीही
शोभेसाठी जोडू शकते,” तिने
तिच्या कौशल्याविषयी कौतुकाने सांगितलं आणि ती हे काम कसं करते तेही दाखवलं.
शारदा आणि तिच्यासारख्या ब्लाउज शिवणाऱ्या स्थानिक स्त्रिया
कुशलगढच्या स्त्रियांच्या फॅशन सल्लागार आहेत. जवळपास सर्वच तरुण मुली आणि इतर वयोगटातील
स्त्रिया ज्या साड्या नेसतात, त्यांच्यासाठी ८० सेंटीमीटर कापडाचा ब्लाउजपीस लागतोच.
पुरुषप्रधान
समाजात जिथे स्त्रियांना सार्वजनिक सभांमध्ये बोलता येत नाही आणि जिथे लिंग गुणोत्तर
१००० पुरुषांमागे ८७९ स्त्रिया (राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण, NFHS-5) अशी
चिंताजनक परिस्थिती असलेल्या भागात, महिला त्यांच्या कपड्यांची आवडनिवड जपतायत ही एक
आनंदाची बाब आहे.
राजस्थानच्या
बंसवाडा जिल्ह्यातलं हे छोटंसं शहर शिवणकामाच्या दुकानांनी भरलेलं आहे. पुरुषांचे कपडे
शिवणारे शिंपी कपडे आणि पँट शिवतात आणि कुर्त्यासारखे लग्नाचे पोषाख बनवतात, तसेच हिवाळ्यातील
लग्नांसाठी वरांसाठी कोटदेखील शिवतात. दोन्हीही बाजूचे लोक हलके रंग वापरतात, अधूनमधून
हलका गुलाबी किंवा लाल रंग वापरतात त्यापेक्षा वेगळे रंग वापरण्याचे धाडस ते करत नाहीत.
दुसरीकडे साडी ब्लाउज शिवण्याची दुकानं मात्र विविध रंगांनी भरलेली असतात. गोल फिरणारे चकचकीत गोंडे आणि रंगीबेरंगी कपड्यांचे तुकडे इथे सर्वत्र पसरलेले दिसतात. “तुम्ही काही दिवसांनी इथे या जेव्हा लग्नाचा हंगाम सुरू होईल,” हे सांगताना या ३६ वर्षीय तरुणीचा चेहरा उजळतो आणि ती पुढे म्हणते, “मग मी कामात व्यस्त होईन.” तिला पावसाळ्याची चिंता असते कारण त्यानंतर कोणीही कपडे शिवायला बाहेर पडत नाही आणि तिचा व्यवसाय मंदावतो.
शारदाच्या अंदाजानुसार या लहानशा गावात कमीत कमी ४०० ते ५००
टेलर आहेत आणि या गावची लोकसंख्या १०,६६६ (जनगणना २०११) आहे. कुशलगढ तालुक्याची लोकसंख्या
मात्र ३ लाखांहून अधिक आहे आणि बांसवाडा जिल्ह्यातील हा सर्वात मोठा तालुका
आहे. शारदाकडे येणाऱ्या बाया २५ किलोमीटर दूरहून तिच्याकडे येतात. उकाला, बावलीपाडा,
रामगड आणि इतर गावांमधून ग्राहक माझ्याकडे येतात. शारदा सांगते की, तिच्याकडे येणाऱ्या
स्त्रिया कपडे, त्यांचं दैनंदिन जीवन, त्यांचं आरोग्य आणि मुलांचं भविष्य यावर बोलतात.
तिने सुरुवातीला सिंगर कंपनीचं एक मशीन घेतलं तेव्हा त्याची
किंमत ७,००० रुपये होती आणि दोन वर्षांनंतर साडी पिकोसारख्या छोट्या कामांसाठी तिने
उषा कंपनीचं सेकंड हॅण्ड मशीन विकत घेतलं ज्यावर प्रत्येक साडीमागे ती १० रुपये कमवते.
ती पेटीकोट आणि पटियाला सलवार-कुर्ता देखील शिवते आणि त्यामागे तिला ६० ते २५० रुपये
मिळतात.
शारदा ब्युटीशियन म्हणूनही काम करते. दुकानाच्या मागच्या बाजूला
तिने एक खुर्ची, एक मोठा आरसा आणि मेकअपचं काही सामान ठेवलं आहे. आयब्रो, व्हॅक्सिंग,
ब्लीचिंग आणि लहान मुलांचे केस कापणं ही सर्व कामं ती करते. या सगळ्यासाठी ती ३० ते
९० रुपये घेते. “स्त्रिया फेशिअल
करण्यासाठी मोठ्या पार्लरमध्ये जातात,” ती सांगते.
शारदा तुम्हाला कुशलगढच्या मुख्य बाजारपेठेत भेटते. इथे बरेच फलाट आहेत जिथून गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्यांसाठी दररोज ४० बस सुटतात. बांसवाडा जिल्ह्यातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात कारण इथे फक्त कोरडवाहू शेती आहे आणि उपजीविकेची इतर कोणतीही साधने नाहीत.
शहराच्या पांचाळ मोहल्यातल्या एका अरुंद रस्त्यावर, पोहे आणि
जिलेबी यांसारख्या सकाळच्या नाश्त्याची विक्री करणारी मिठाईची छोटी दुकानं आहेत. ह्या
दुकानांच्या गजबजलेल्या बाजारामागे शारदाचे शिवणकाम दुकान आणि ब्युटी पार्लर आहे.
या ३६
वर्षीय महिलेने आठ वर्षांपूर्वी तिचा पती गमावला; तो टॅक्सी ड्रायव्हर
होता आणि यकृताच्या आजाराशी तो झुंज देत होता. या आजारानेच त्याचा जीव घेतला. शारदा
आपल्या मुलांसोबत सासू-सासरे आणि दिराच्या कुटुंबासोबत राहते.
ती सांगते की एका लहानशा भेटीने तिचं आयुष्य बदलून
गेलं. “मी अंगणवाडीत एका मॅडमला भेटले होते, त्यांनी मला सांगितलं की,
सखी केंद्रात जा आणि काहीतरी नवीन कौशल्य अवगत कर.” हे केंद्र
म्हणजे, एक ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था होती, तिथे तरुण स्रिया नवीन कौशल्यं
शिकू शकत होत्या. इथल्या वेळा सोयीच्या होत्या त्यामुळे घरातली कामं आटोपल्यावर मी
तिथे जायचे, काही दिवस त्यांनी एक किंवा अर्धा तास शिकवलं. या केंद्रात प्रत्येक विद्यार्थ्याकडून
मासिक २५० रुपये शुल्क आकारले जायचे.
मला शिवणकाम आवडलं आणि आम्हाला खूप बारकाईने सर्व काही शिकवलं गेलं. शारदा पुढे सांगते की, ज्यांनी आम्हाला फक्त ब्लाउज शिवण्यापेक्षा अजून काही शिकण्याचा सल्ला दिला मी त्यांच्याकडून नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना म्हणाले, “तुम्हाला मला जे काही शिकवता येईल ते शिकवा आणि मी पंधरा दिवसात ते सर्व काही शिकले.” नवीन कौशल्यं मिळालेल्या या व्यवसायिकेने चार वर्षांपूर्वी स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतला.
“
कुछ और ही मजा है, खुद की कमाई
(स्वतःची कमाई
असण्यात काही वेगळीच अनुभूती आहे),” तीन मुलांची आई आम्हाला सांगते. दैनंदिन खर्चासाठी
तिला सासरच्यांवर अवलंबून राहायचे नव्हते. “मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे.”
तिची मोठी मुलगी, २० वर्षांची शिवानी बांसवाडा इथल्या एका महाविद्यालयात
परिचारिकेचं शिक्षण घेतेय, १७ वर्षांची हर्षिता आणि १२ वर्षांचा युवराज दोघंही कुशलगढच्या
शाळेत शिकतात. तिच्या मुलांना सरकारी शाळा जास्त आवडते त्यामुळे अकरावीत ते खासगी शाळेतून
सरकारी शाळेत जातील. “खासगी शाळांमध्ये अनेकदा शिक्षक बदलतात.” असं ती म्हणते.
शारदाचं लग्न वयाच्या १६ व्या वर्षी झालं आणि जेव्हा तिची मोठी
मुलगी वयात आली तेव्हा तिच्याही लग्नाची घाई केली गेली, पण शारदाला मुलीचं लग्न करायचं
नव्हतं. मात्र तिचं कुणीही ऐकलं नाही. आज ती आणि तिची मुलगी कागदावर अजूनही अस्तित्वात
असलेलं लग्न रद्द करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.
शारदाच्या शेजारचं दुकान रिकामं झाल्यावर तिने तिच्या मैत्रिणीला
तिचं शिवणकामाचं दुकान सुरू करायला सांगितलं. ती देखील एकल पालक आहे. “प्रत्येक महिन्यात कमाई कमी जास्त होते. पण मला स्वतःच्या पायावर
उभं राहायला मिळालं हे छान वाटतं.”