कृष्णाजी भरीत केंद्रात कोणीच रिकाम्या हाती बसलेले दिसत नाही.
दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाच्या काही तास आधी आणि जळगाव रेल्वे स्थानकावर लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्याआधी, दररोज सुमारे ३०० किलो वांग्याचं भरीत इथं बनतं, पॅक केलं जातं आणि नियोजित ठिकाणी पोहोचवलं जातं. जळगाव शहरातल्या जुन्या बीजे मार्केट परिसरात हे उपहारगृह आहे आणि जिथे मजुरांपासून उद्योगपतींपर्यंत, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून उमेदवारापर्यंत सगळ्या स्तरातील लोक भरीत घेण्यासाठी येतात.
रात्रीच्या जेवणाच्या अगदी आधी, कृष्णाजी भरीत गृहात वांगी साफ करून कापली, भाजली, सोलली, कुस्करली जातात. त्यांना फोडणी देऊन नीट शिजवून पॅक केली जातात. उपहारगृहाच्या बाहेर तीन स्टीलच्या रेलिंग्जच्या रांगेत पुरुष उभे असतात, जुन्या काळातल्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहांच्या तिकीट खिडकीच्या बाहेर असलेल्या रेलिंगसारख्या या रेलिंग दिसतात.
या सगळ्या कामात महत्त्वाची भूमिका असते ती इथल्या १४ महिलांची.
या संपूर्ण प्रक्रियेचा त्या कणा आहेत. त्या दररोज तीन क्विंटल वांग्याचं भरीत शिजवतात, जे देशभरात ‘बैंगन का भरता’ म्हणून ओळखले जाते. जळगाव जिल्हा प्रशासनाने या अविरत चालणाऱ्या उपहार गृहाचा निवडणूक जनजागृतीचा व्हिडीओ शूट केल्यानंतर, त्यांचे चेहरे आता सर्वत्र ओळखले जाऊ लागले आहेत.
१३ मे रोजी जळगाव लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत महिलांची मतदानाची टक्केवारी सुधारण्याच्या उद्देशाने या व्हिडिओमध्ये कृष्णाजी भरीत इथे काम करणाऱ्या महिलांना त्यांच्या हक्काबद्दल काय माहिती आहे आणि त्या दिवशी त्यांच्या मताधिकाराचा वापर करण्याच्या प्रक्रियेबद्दल त्यांना काय समजले याबद्दलची चर्चादेखील दाखवण्यात आली आहे.
मीराबाई नरल कोंडे सांगतात की, “जेव्हा आम्ही मतदान यंत्रासमोर उभे राहतो, आमच्या बोटावर शाई लावली जाते तेव्हा त्या एका क्षणासाठी आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त असतो.” मीराबाईंचे कुटुंबीय एक छोटं केशकर्तनालय चालवतात. या उपहारगृहातून मिळणारा त्यांचा पगार घरातील उत्पन्नातला महत्त्वाचा वाटा आहे. त्या सांगतात, “आम्ही पती, पालक, मालक किंवा एखाद्या नेत्याची मदत न घेता मशीनसमोर आमच्या आवडत्या उमेदवाराची निवड करू शकतो.”
कृष्णाजी भरीत यांच्या स्वयंपाकघरातील भरीत उत्पादन वांग्याच्या हंगामात म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत ५०० किलोपर्यंत पोहोचते. हिवाळ्यामध्ये स्थानिक बाजारपेठेत सर्वोत्तम वांगी येतात. ताज्या कुटलेल्या आणि तळलेल्या मिरच्या, धणे, भाजलेले शेंगदाणे, लसूण आणि खोबरे यांची चव या पदार्थाची खासियत आहे असे या महिलांचे म्हणणे आहे. ३०० रुपयांपेक्षा कमी दरात असल्याने अनेक कुटुंबं एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त भरीत विकत घेऊ शकतात. इथे येण्यासाठी लागणारे भाडेदेखील परवडणारे आहे.
१० x १५ फूटांच्या स्वयंपाकघरात चार शेगड्यांची भट्टी सुरू असते, ज्यामध्ये दाल-फ्राय, पनीर मटर आणि इतर जवळपास ३४ प्रकारचे शाकाहारी पदार्थ इथे बनतात. या सर्व पदार्थांमध्ये भरीत आणि शेव भाजी मात्र अव्वल ठरतात. शेव भाजी म्हणजे बेसनापासून बनवलेली कुरकुरीत शेव आणि रस्सा.
या सर्व प्रक्रियेविषयी संभाषण सुरू असताना, आम्ही त्यांचे राहणीमान आणि हे सर्व त्यांना किती परवडते याकडे वळलो तेव्हा बोलताना ह्या स्त्रिया लाजल्या नाहीत. ४६ वर्षीय पुष्पा रावसाहेब पाटील यांना प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अनुदानित स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ घेता आला नाही. कारण त्यांच्याकडे पुरेशी कागदपत्रे नव्हती.
६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उषाबाई रामा सुतार यांचं स्वतःच घर नाही. “लोकांना मूलभूत सुविधा मिळायला हव्येत, नाही?” काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर आपल्या मूळ गावी परतलेली ही विधवा तिची व्यथा सांगत होती. “सर्व नागरिकांना राहण्यासाठी घरे असावीत” असं त्यांचं म्हणणं आहे.
इथं काम करणाऱ्या बहुतांश महिला भाड्याच्या घरात राहतात. ५५ वर्षीय रझिया पटेल सांगतात की, त्यांच्या घराचं भाडं ३५०० रुपये आहे जे त्यांच्या मासिक उत्पन्नाचा सुमारे एक तृतीयांश इतकं आहे. “प्रत्येक निवडणुकीत आम्ही 'महंगाई'बद्दलची आश्वासनं ऐकतो,” असं त्या म्हणतात. “निवडणुकीनंतर सगळ्यात वस्तूंच्या किमती वाढतच जातात.”
स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आणि इतर कोणताही पर्याय नसल्यानं आम्ही हे काम करत असल्याचं या स्त्रिया सांगतात. उषाबाई सुतार २१ वर्षे, संगीता नारायण शिंदे २० वर्षे, मालुबाई देविदास महाले १७ वर्षे आणि उषा भीमराव धनगर १४ वर्षांपासून हे काम करतायत आणि त्यांच्यासारख्या अनेकांनी इथे काम केलं आहे.
त्यांच्या दिवसाची सुरुवात साधारण ४० ते ५० किलो वांगी तयार करून होते, ज्याचा पहिला टप्पा त्या दिवसभरात हाताळतात. वांगी वाफवून, भाजून, सोलून घेतात. साल काढून आतील मांसल भाग कुस्करण्याचं काम आधी करावे लागते. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे हाताने सोलले व ठेचले जातात. हा ठेचा गरम तेलात बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदा यांसोबत परतला जातो आणि त्यानंतर त्यात कुस्करलेली वांगी टाकली जातात. या स्त्रिया दररोज किती तरी किलो कांदा चिरतात.
कृष्णाजी भरीत हे केवळ स्थानिकांचे आवडते नाही; दूरच्या गावातील आणि तालुक्यातील लोकांचे देखील हे आवडते ठिकाण आहे. उपहारगृहाच्या आत असलेल्या नऊ प्लास्टिकच्या टेबलांवर बसून जेवण करणाऱ्यांपैकी काही लोक २५ ते ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचोरा आणि भुसावळ इथून आलेले होते.
कृष्णाजी भरीत दररोज १,००० पार्सल बाहेरगावी पाठवतात, ज्यात डोंबिवली, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा जवळपास ४५० किलोमीटरपर्यंत दूर असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.
अशोक मोतीराम भोळे यांनी २००३ मध्ये स्थापन केलेल्या कृष्णाजी भरीतचे नाव एका स्थानिक धर्मगुरुंनी सुचवले. ज्यांनी त्यांना सल्ला दिला होता की, शाकाहारी पदार्थांचे उपहारगृह फायदेशीर ठरेल. येथील भरीत हा एक अस्सल पारंपरिक घरगुती पदार्थ आहे जो लेवा पाटील समाजातील लोकांची खासियत आहे असे देवेंद्र किशोर भोळे यांनी सांगितले.
लेवा-पाटील, उत्तर महाराष्ट्रातील खान्देश प्रांतातील सामाजिक-राजकीयकदृष्ट्या प्रमुख समुदाय आहे, हा समुदाय त्यांची स्वतःची बोलीभाषा, पाककला आणि संस्कृती असे वेगळेपण जपणारा कृषीप्रधान समुदाय आहे.
वांग्याच्या भाजीचा सुगंध उपहारगृहात दरवळत असताना महिलांनी जेवणासाठी पोळी-भाकरी आणायला सुरुवात केली. या महिला दररोज सुमारे २,००० पोळ्या आणि सुमारे १,५०० भाकरी बनवतात.
लवकरच रात्रीच्या जेवणाची वेळ होईल आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या श्रमिकांसाठी भरीतचे पार्सल पॅक करायला सुरुवात करतील.