जम्मू काश्मीरच्या बांदीपूर जिल्ह्यातील वजीरिथल गावात शमीना बेगम (वयवर्षे २२) आपल्या दुसऱ्या मुलाच्या जन्माची आठवण सांगते, “त्या दिवशी संध्याकाळी पाणमोट फुटली तेव्हा मला खूप त्रास होत होता. तीन दिवसांपासून बर्फ पडत होता. जेव्हा जेव्हा असं होतं, तेव्हा अनेक दिवस ऊन पडत नाही आणि आमचे सोलर पॅनेल काम करत नाहीत.” वजीरिथल हे एक असं गाव आहे, जिथं अनेक दिवस ऊन पडत नाही किंवा कधीतरीच पडतं, तरीही इथली माणसं विजेसाठी केवळ सौर उर्जेवर अवलंबून आहेत.
शमीना पुढं म्हणते, “आमच्या घरी अंधार होता, फक्त रॉकेलचा एक दिवा जळत होता. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी माझ्या शेजार-पाजारचे आपापले कंदील घेऊन घरी आले. पाच दिव्यांच्या प्रकाशामुळे माझ्या खोलीत जरा उजेड पडला आणि कसं तरी करून माझ्या आईच्या मदतीने मी बाळंत झाले आणि रशिदाचा जन्म झाला.” ती एप्रिल २०२२ ची रात्र होती.
बडुगाम ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणारं वजीरिथल हे सर्वात सुंदर गावांपैकी एक आहे. शमीनाच्या घरापर्यंत पोहचण्यासाठी श्रीनगरवरुन १० तासांचा प्रवास करावा लागतो, तुमची गाडी गुरेझ दरीतून जाणाऱ्या राझदान खिंडीत खडबडीत रस्ते आणि अर्धा डझन चौक्या पार करत साडेचार तासांचा प्रवास करून जाते. शेवटी दहा मिनिटं चालत जावं लागतं. शमीनाच्या घरापर्यंत पोहोचण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.
गुरेझ खोऱ्यात वसलेलं हे गाव नियंत्रण रेषेपासून काही मैलांवर आहे. इथे एकूण २४ कुटुंबं राहतात. त्यांची घरं देवदाराच्या लाकडांनी बनलेलं आहे आणि घर उबदार ठेवण्यासाठी आतील भिंती मातीने सारवलेल्या आहेत. इकडं घराचे मुख्य दरवाजे याकच्या जुन्या शिंगांनी सजवले जातात. काही ठिकाणी याकच्या खऱ्या शिंगांनी सजावट केलेली आहे, तर काही ठिकाणी लाकडापासून बनवलेल्या हिरवा रंगाची बनावट शिंगे लावण्यात आली आहेत. घराच्या जवळपास सगळ्याच खिडक्यांमधून सीमेपलीकडची दृश्ये पाहता येतात.
संध्याकाळचं शेवटचं ऊन घेत, शमीना तिच्या घरासमोरील लाकडाच्या ढिगाऱ्यावर तिच्या दोन मुलांसहबसली आहे. दोन वर्षांचा फरहाज आणि चार महिन्यांची रशिदा (नावे बदलली आहेत). ती म्हणते, "माझी आई म्हणते, की माझ्यासारख्या नवजात मातांनी रोज सकाळ-संध्याकाळ आपल्या नवजात बाळासोबत उन्हं घेत बसायला पाहिजे." अजून ऑगस्ट आहे. खोरं अजून बर्फाच्या चादरीने लपेटलेलं नाहीये. पण तरीही, आकाश अनेकदा ढगाळलेलं असतं, अधून-मधून पाऊस पडतो आणि कित्येक दिवस सूर्यप्रकाश नसतो, ऊनही पडत नाही आणि वीजही नसते.
वजीरिथलचा रहिवासी मोहम्मद अमीन, वय २९ म्हणतो, "फक्त दोन वर्षांपूर्वीच, २०२० मध्ये, आम्हाला तालुका कार्यालयाकडून सौर पॅनेल मिळाले आहेत. तोपर्यंत आमच्याकडे फक्त बॅटरीवर चालणारे दिवे आणि कंदील असायचे. पण हेसुद्धा [सौर पॅनेल] आमच्या समस्यांवर तोडगा काढू शकलेले नाहीत."
अमीन सांगतो, "बडुगाममधील इतर गावांमध्ये जनरेटरद्वारे ७ तास वीज मिळते, आणि इथं आमच्याकडे १२ व्होल्टची बॅटरी आहे. ती सोलर पॅनेलद्वारे चार्ज केली जाते. बॅटरीच्या मदतीने जास्तीत जास्त दोन दिवस आम्ही सगळे आमच्या घरात दोन बल्ब लावू शकतो आणि आमचे फोन चार्ज करू शकतो. पण जर सलग दोन दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडला किंवा बर्फवृष्टी झाली, तर सूर्यप्रकाश येत नाही आणि मग आम्हाला वीजही मिळत नाही.”
इकडे सहा महिन्यांचा कडक हिवाळा असतो इतका बर्फ पडतो की तिथल्या लोकांना ऑक्टोबर ते एप्रिल दरम्यान, १२३ किमी दूर असलेलं गंदरबल किंवा सुमारे १०८ किमी दूर असलेलं श्रीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये स्थलांतर करावं लागतं. शमीनाची शेजारीण, आफरीनचं बोलणं ऐकून असं वाटतं, की जणू हिवाळ्यात होणारी गावाची अवस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहू शकतेय. "ऑक्टोबरच्या मध्यात किंवा अखेरीस आम्ही गाव सोडायला सुरुवात करतो. नोव्हेंबरनंतर इथं राहणं खूप कठीण आहे." माझ्या डोक्याकडे बोट दाखवत ती म्हणाते, “ज्या ठिकाणी तुम्ही उभ्या आहात, ती जागा इथपर्यंत बर्फाने झाकलेली असते."
याचा अर्थ, दर सहा महिन्यांनी आपलं घर सोडून एखाद्या नवीन ठिकाणी राहणं आणि हिवाळा संपल्यानंतर पुन्हा आपल्या घरी परत येणं. काही लोकं [गंदरबल आणि श्रीनगरमध्ये] त्यांच्या नातेवाईकांकडे तर काही लोकं सहा महिने भाड्याने घर घेऊन राहतात. शमीनाने गडद लाल-तपकिरी [मरून] रंगाची लोकरी फिरन घातली होती. "दहा फूट उंच बर्फाच्या भिंतीशिवाय इथं काहीही दिसत नाही. जोपर्यंत हिवाळा सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही मोठ्या मुश्किलीने गावाबाहेर जातो."
शमीनाचा नवरा गुलाम मूसा खान, वय २५ रोजंदारीवर मजुरी करतो. हिवाळ्यात त्याला कधीच काम नसतं. शमीना सांगते, "जेव्हा आम्ही वजीरिथलमध्ये असतो, तेव्हा ते बडगामच्या आजूबाजूला आणि अधूनमधून बांदीपोरा शहरात काम करतात. ते मुख्यतः रस्ते बांधणीच्या प्रकल्पांमध्ये काम करतात, परंतु कधी कधी त्यांना बांधकामाच्या ठिकाणीही काम मिळतं. जेव्हा त्यांना काम असतं, तेव्हा ते दररोज साधारण ५०० रुपये कमवतात. पण, पावसाळ्यात त्यांना महिन्यातून ५ ते ६ दिवस घरी बसावं लागतं." त्ती सांगते, की गुलाम मुसा कामानुसार महिन्याला १०,००० रुपये कमावतो.
ती पुढे सांगते, "पण जेव्हा आम्ही गंदरबलला जातो, तेव्हा ते ऑटोरिक्षा चालवतात. ते रिक्षा भाड्याने घेतात आणि श्रीनगरला जातात, जिथं हिवाळ्यात दूर-दूरवरून पर्यटक येतात. तिथं ते साधारण १०,००० रुपये कमावतात. पण तिथं आम्हाला बचत करता येत नाही. वजीरिथलपेक्षा गांदरबलमध्ये वाहतूकीच्या सुविधा अधिक चांगल्या आहेत.
शमीना म्हणते, "आमच्या मुलांना तिथंच [गंदरबलमध्ये] राहायची इच्छा आहे. तिथं त्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ खायला मिळतात. तिथं विजेचीही कोणतीही अडचण नाही. पण आम्हाला तिथं भाडे द्यावं लागतं. जोपर्यंत आम्ही इथं [वजिरीथल] राहतो, तोपर्यंत आम्ही बचत करत राहतो." गंदरबलमध्ये किराणा मालावर ते जेवढा खर्च करतात, तेवढं त्यांचा भार अधिक वाढतो. वजीरिथलमध्ये शमीना किमान एक किचन गार्डन (परसबाग) तयार करते, ज्यातून त्यांच्या कुटुंबाच्या भाजीपाल्याची गरज भागवली जाते. आणि ते इथं ज्या घरात राहतात ते त्यांचं स्वतःचं घर आहे. गंदरबलमध्ये घर भाड्याने घेतल्यामुळे त्यांना महिन्याला ३००० ते ३५०० रुपये खर्च करावे लागतात.
शमीना ‘पारी’शी बोलताना म्हणते, "आता उघडच आहे, की तिथली घरं इकडच्या घरांइतकी मोठी नाहीत, पण तिथं चांगले दवाखाने आहेत आणि रस्ते तर आणखीनच चांगले आहेत. तिथं सगळं काही मिळतं, पण त्यासाठी पैसा खर्च करावा लागतो. पण हेच शेवटी खरं की ते आमचं घर नाही." या खर्चांमुळेच त्यांना लॉकडाऊनमध्ये वजीरीथलला परत यावं लागलं. त्या दरम्यान शमीना पहिल्यांदाच आई होणार होती आणि तिसरी तिमाही चालू होती.
शमीना हसत हसत म्हणते, “जेव्हा मार्च २०२० मध्ये टाळेबंदी (लॉकडाऊन) जाहीर केली गेली, तेव्हा माझा सातवा महिना चालू होता आणि फरहाज माझ्या पोटात होता. महासाथीतलं बाळ आहे तो. एप्रिलच्या दुसऱ्या महिन्यात आम्ही एक गाडी भाड्याने घेतली आणि आमच्या घरी परत आलो. कारण कोणत्याही कमाईशिवाय गंदरबलमध्ये राहणं कठीण होत चाललं होतं. घराचं भाडं आणि जेवणाचा खर्च तर कमी होत नाही ना."
"त्या काळात पर्यटकांचं येणं बंद झालं होतं. माझे पती काहीच कमावत नव्हते. माझी औषधं आणि किराणा सामानासाठी आम्हाला आमच्या नातेवाईकांकडून उसने पैसे घ्यावे लागले. मात्र, आम्ही त्यांचे पैसे परत केले आहेत. आमच्या घरमालकाकडे स्वतःची गाडी होती आणि माझी परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आम्हाला १,००० रुपयांच्या भाडं आणि डिझेलचा खर्च घेऊन आम्हाला गाडी वापरायला दिली. म्हणून आम्ही घरी परत येऊ शकलो."
वझिरीथलमध्ये केवळ अनियमित वीजपुरवठ्याची समस्या नाही, तर गावातील रस्त्यांची दुरवस्था आणि आरोग्याशी निगडीत सुविधांचा अभाव देखील आहे. वजीरीथलपासून पाच किलोमीटर अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आहे, परंतु तिथं साधं बाळंतपण करण्यासाठीही सोयी-सुविया नाहीत. कारण मुळात पुरेसे आरोग्य कर्मचारीच नाहीत आणि पुष्कळ पदं रिक्त पडली आहेत.
वजीरिथल येथील एक अंगणवाडी सेविका रजा बेगम, वय ५४ विचारतात, "बडगम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच परिचारिका (नर्स) आहे. त्या प्रसूती कुठं करतील? कितीही आणीबाणीची परिस्थिती असो, गर्भपात असो किंवा गर्भ पडलेला असो (मिसकॅरेज), प्रत्येक बाबतीत धावत-पळत गुरेझला जावं लागतं. आणि जर कुणाला एखाद्या ऑपरेशनची गरज असेल तर त्यांना श्रीनगरच्या लाल देद हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. म्हणजे गुरेझपासून १२५ किमी. लांब आणि ह्या अशा हवेत तिथं पोहोचण्यासाठी तब्बल ९ तास लागू शकतात."
शमीना सांगते की गुरेझमधील कम्युनिटी हेल्थ सेंटर [CHC] पर्यंतचा रस्ता खूपच खराब आहे. शमीना २०२० मधील तिच्या गरोदरपणातील अनुभव सांगते, “रुग्णालयात जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी, दोन्ही वेळेस दोन तास लागतात आणि रुग्णालयात [CHC] ज्या प्रकारची वागणूक मला मिळाली..! एका स्वच्छता कर्मचाऱ्याने मला बाळंतपणात मदत केली. ना प्रसूतीदरम्यान, ना प्रसूतीनंतर. कुणीही डॉक्टर एकदाही मला तपासायला आला नाही.”
गुरेझ मधलं प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) आणि सामुदायिक आरोग्य केंद्र (CHC) या दोन्हींमध्ये दीर्घकाळापासून सामान्य चिकित्सक (जनरल फिजिशियन), स्त्री-रोग आणि बाल-रोग विशेषज्ञ यांसारखी अनेक महत्त्वाची पदं रिक्त आहेत. राज्याच्या प्रसारमाध्यमांमध्ये (मिडिया) याची जोरदार चर्चा आहे. रजा बेगमच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त प्रथमोपचार आणि एकस-रे (क्ष-किरण) सुविधा उपलब्ध आहेत, या व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीसाठी रुग्णांना ३२ किमी. दूरवर असलेल्या गुरेझमधील सामुदायिक आरोग्य केंद्रात जायला सांगितलं जातं.
मात्र, गुरेजच्या सामुदायिक आरोग्य केंद्राची अवस्था फारच बिकट आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या अहवालानुसार, (सप्टेंबर २०२२ मध्ये सोशल मीडियावर प्रसारित) असं नमूद केलं आहे, की तालुक्यात ११ आरोग्य अधिकारी, ३ दंतवैद्यक, १ जनरल डॉक्टर, १ बालरोगतज्ञ आणि १ प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञांसह ३ विशेष तज्ञांची पदं रिक्त आहेत. नीती आयोगाच्या अहवालात मात्र आरोग्य निर्देशांकांच्या स्थितीत, रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेत सुधारणा झाली आहे असं नमूद केलं आहे.
आफरीन, वय ४८ शमीनाच्या घरापासून ५-६ घरांच्या अंतरावर राहतात. त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात. काही काही शब्द उर्दूतील घेऊन त्या काश्मिरी भाषेत मला त्यांची कहाणी सांगतात, “मे २०१६ मध्ये, जेव्हा बाळंतपणासाठी मला गुरेझच्या सीएचसीमध्ये जावं लागलं होतं, तेव्हा माझे पती मला त्यांच्या पाठीवर घेऊन गाडीपर्यंत घेऊन गेले. अर्थातच मी पाठीला पाठ लावून पाठुंगळी बसले. तिथून ३०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या सुमो गाडीपर्यंत जाण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. गाडीदेखील आम्ही भाड्याने घेतली होती. ही पाच वर्षांपूर्वीची घटना आहे, पण परिस्थिती अजूनही तशीच आहे. आता तर आमच्या दाईंचं पण वय झालं आहे आणि त्या नेहमी आजारी असतात.”
आफरीन ज्या दाईबद्दल बोलत आहेत, त्या म्हणजे शमीनाची आई. शमीना एका वयस्क बाईकडे बोट दाखवते. आमच्यापासून १०० मीटर अंतरावर एका लहान मुलाला आपल्या मांडीवर घेऊन गात होत्या, "माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर मी ठरवलं होतं की भविष्यात घरीच बाळंतपण करायचं. दुसऱ्या बाळंतपणाच्या वेळी मला प्रसूतीच्या कळा सुरु झाल्या, तेव्हा माझा जीव वाचणं कठीण झालं होतं. आई होती म्हणून निभावलं. ती एक दाई आहे आणि गावातल्या अनेक महिलांची तिने सुखरुप बाळंतपणं केली आहेत."
शमीनाची आई, जानी बेगम, वय ७१ या तपकिरी रंगाच्या फिरन परिधान करून घराबाहेर बसल्या आहेत. डोकंही स्कार्फने झाकलेलं आहे. गावातल्या बहुतेक बाया घराच्या अंगणात बसलेल्या दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून त्यांच्या अनुभवाची जाणीव होते. त्या सांगतात, "मी गेली ३५ वर्षं हे काम करत आहे. खूप वर्षापूर्वी, जेव्हा माझी आई बाळंतपणं करण्यासाठी बाहेर जायची, तेव्हा ती मला मदत करू द्यायची. ती काम करताना मी निरीक्षण केलं, सराव केला आणि सगळं शिकले. आपण इतरांना मदत करू शकतो हा त्याचा आशीर्वादच मानायचा."
जानी यांनी त्यांच्या हयातीत बरेच बदल पाहिले आहेत, पण ते फारच सावकाश होतायत आणि पुरेसेही नाहीत. त्या म्हणतात, "आजकाल बाळंतपणात धोका कमी असतो, कारण आता महिलांना लोहाच्या गोळ्या आणि इतर आवश्यक पोषक आहार दिला जातो. पण पूर्वी असं नव्हतं. होय, काही बदल नक्कीच झाला आहे, पण तरीही इथं इतर गावांसारखी परिस्थिती नाही. आमच्या मुली आता शिकतायत, पण आजही चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधांपर्यंत आम्ही पोचू शकूच असं नाही. आमच्याकडे रुग्णालये तर आहेत, पण आयत्या वेळी तिथं तातडीने पोहोचण्यासाठी रस्ते नाहीत."
जानी सांगतात, की गुरेझमधले सार्वजनिक आरोग्य केंद्र खूप लांब आहे आणि तिथं जायचं म्हणजे ५ किलोमीटर चालत जावं लागतं. इतकं चालल्यानंतर आपल्याला तिथं जाण्यासाठी एखादं सार्वजनिक वाहन मिळू शकतं. अर्धा किलोमीटर चालत गेल्यानंतर खाजगी वाहन मात्र मिळू शकतं. पण त्यासाठीचा खर्चही खूप होतो.
जानी सांगतात, “दुसऱ्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये शमीना खूपच अशक्त झाली होती. आमच्या अंगणवाडी सेविकेच्या सांगण्यावरून आम्ही तिला दवाखान्यात नेण्याचा विचार करत होतो, पण त्या दरम्यान माझा जावई कामाच्या शोधात बाहेरगावी गेला होता. इथं एखादं खाजगी वाहन /सवारी मिळणं फार अवघड आहे. जर काही वाहन मिळालंच तरी गरोदर बाईला उचलून घेऊन जावं लागतं.”
जानीचं उदाहरण देत आफरीन ठामपणे सांगतात, "त्यांच्या पश्चात आमच्या गावातील बायांचं काय होईल? मग आम्हाला कुणाचा आधार आहे?" संध्याकाळची वेळ आहे. शमीना रात्रीच्या जेवणाची तयारी करण्यासाठी तिच्या घराबाहेरच्या झुडुपांमध्ये अंडी शोधते आहे. ती म्हणते, "कोंबड्या त्यांची अंडी लपवून ठेवतात. अंडा करी बनवण्यासाठी मला अंडी शोधावी लागतील, नाहीतर आज रात्री पुन्हा राजमा-भातच खावा लागेल. जंगलाच्या मधोमध घरं असणारं आमचं गाव दुरुन खूप साजरं दिसतं. पण जवळ येऊन बघितलं की लक्षात येईल, की आमची आयुष्यं किती खडतर आहेत ते!”
पारी आणि काउंटरमीडिया ट्रस्टने पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या सहाय्याने ग्रामीण भारतातील किशोरी आणि तरुण स्त्रियांसंबंधी एक देशव्यापी वार्तांकन उपक्रम हाती घेतला आहे. अत्यंत कळीच्या पण परिघावर टाकल्या गेलेल्या या समूहाची परिस्थिती त्यांच्याच कथनातून आणि अनुभवातून मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
हा लेख पुनःप्रकाशित करायचा आहे? कृपया [email protected] शी संपर्क साधा आणि [email protected] ला सीसी करा