"हमें
पता नहीं हमारा बेटा कैसे मरा, कंपनी ने हमें बताया
भी नही” नीलम यादव म्हणतात.
तेहतीस वर्षांची नीलम सोनिपत मधील राई या गावात आपल्या घरी उभी होती. आपल्यावर खिळलेल्या सगळ्या नजरा टाळत बोलत होती. सहा महिन्यांपूर्वी राम कमल हा तिचा पुतण्या खाद्य पदार्थाच्या फॅक्टरीतील एसी रिपेअर युनिट मध्ये काम करत असताना मृत्यू पावला. लग्न झाल्यापासून, म्हणजेच २००७ पासून तिने त्याला अगदी पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं होतं.
२९ जून २०२३. नेहमीसारखा निवांत दिवस. स्वच्छ ऊन पडलं होतं. तिच्या दोन
मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत सासरे शोभनाथ यांचं जेवण झालं होतं. त्या दिवशी डाळ -भात बनवला होता. ती स्वयंपाकघर स्वच्छ करत होती आणि सासरे दुपारची
वामकुक्षी घेण्यासाठी आडवे पडले होते.
दुपारी
एकच्या सुमारास दारावरची बेल वाजली. तिने
हात धुतले, दुपट्टा नीट केला आणि
कोण आलंय हे बघायला ती दरवाजाकडे गेली. निळ्या गणवेशातील दोन माणसं हातात
बाईकच्या चाव्या खेळवत उभे होते. ते दोघे
राम कमलच्या कंपनीत काम करणारे आहेत, तिच्या लक्षात आलं. त्यांच्यापैकी एकाने तिला सांगितलं, "रामला इलेक्ट्रिक शॉक
लागलाय आणि तुम्ही जिल्हा रुग्णालयात लगेच चला."
“मी त्यांना सारखं विचारत
होते की तो बरा आहे ना, शुद्धीत आहे ना? ते फक्त
म्हणाले की तो शुद्धीत नाहीये," हे सांगत असताना तिच्या
स्वरांत कंप होता. बससाठी वेळ न दवडता त्याच माणसांना बाईकवर रुग्णालयात घेऊन चला अशी विनंती तिने आणि तिचे सासरे शोभराम यांनी केली. वीस मिनिटांत ते तिथे पोचले.
नीलमचे पती आणि रामचे काका मोतीलाल यांना नीलमने फोनवर हे सांगितलं तेव्हा तेही कामावर होते. ते रोहतकमधल्या समचानात बांधकामाच्या साईटवर काम करत होते आणि ही घटना समजल्यावर स्कूटरवर २० किमी अंतर अर्ध्या तासात पार करून रुग्णालयात पोचले.
“त्यांनी त्याला शवविच्छेदन कक्षात ठेवलं होतं,” रामचे आजोबा, पंच्याहत्तरी पार केलेले शोभनाथ सांगत होते. त्याची काकू नीलम रडवेली होऊन तो प्रसंग आठवत होती . “मी त्याच्याकडे बघूच शकले नाही. त्यांनी त्याला काळ्या कपड्यात लपेटलं होतं. मी फक्त त्याचं नाव घेत राहिले," ती सांगते.
*****
दिवंगत रामला त्याच्या आई- वडिलांनी, गुलाब आणि शीला यादव यांनी काका-काकूंकडे राहण्यासाठी पाठवलं होतं. त्यावेळी तो फक्त सात वर्षांचा होता आणि
मोतीलाल त्याला उत्तर प्रदेशच्या आझमगड जिल्ह्यातील निझामाबाद तालुक्यातल्या त्याच्या घरून इथे घेऊन आला होता . “आम्हीच त्याचं पालनपोषण केलं होतं," मोतीलाल सांगतात.
राम कमल जानेवारी २०२३ पासून त्या फॅक्टरीत काम करत होता. महिन्याला २२,००० रु. पगार होता. निम्मा पगार तो आपल्या घरी पाठवायचा. तिथे आई-वडील, बायको आणि आठ महिन्यांची मुलगी असं त्याचं चार लोकांचं कुटुंब होतं.
“त्याची
लहान मुलगी आहे. तिचा तोच आधार होता. आता
तिचं कसं होणार ? कंपनीने तिच्याबद्दल साधं विचारलंही नाही," शोभनाथ
सांगतात. कंपनीचे मालक अजूनही कुटुंबाला भेटायला आलेले नाहीत.
राम गेला त्याच्या आदल्या रात्री घरी आला नव्हता असं नीलम सांगते. "कामात व्यस्त आहे असं तो म्हणाला होता. गेला त्या आधी सलग २४ तास तो कामावर होता.” कुटुंबाला त्याच्या कामाच्या वेळा माहीत नसायच्या, बऱ्याचदा त्याचं खाणंही व्हायचं नाही. बऱ्याचदा फॅक्टरीच्या परिसरातच तो झोपायचा. “आमचा मुलगा खूप कष्टाळू होता,” मोतीलाल सांगतात. हे सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. रिकाम्या वेळात रामला आपल्या मुलीला व्हिडिओ कॉल करायला आवडायचं.
फॅक्टरीतील
इतर कर्मचाऱ्यांकडून त्यांना समजलं की राम कुलिंग पाईपलाईनची दुरुस्ती करत होता. हे काम करत असताना त्याच्याकडे कुठलीही सुरक्षेची साधनं किंवा उपकरणं नव्हती.
“तो जेव्हा एसी पाईप स्प्रे आणि पकड घेऊन हे काम करायला गेला, तेव्हा त्याने साधी स्लीपरही पायात घातली नव्हती आणि त्याचे हात ओले होते. जर कंपनीच्या मॅनेजरने त्याला सावध केलं असतं तर आज त्यांच्यावर एक तरुण कामगार गमावण्याची वेळ आली नसती,” त्याचे काका मोतीलाल म्हणतात.
ही घटना घडल्यावर दुसऱ्याच दिवशी रामचे वडील, गुलाब यादव मुलाचे अंतिम विधी करायला सोनिपतला आले. काही दिवसांनी ते कंपनीने केलेल्या अक्षम्य निष्काळजीपणाविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी हरियाणातील राई पोलीस स्टेशनला गेले. सुमित कुमार या अधिकाऱ्याकडे या घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवली गेली. त्याने या प्रकरणात कुटुंबाचं मन वळविण्याचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं होतं.
“पोलिसांनी आम्हाला एक
लाख रु. घेऊन ही तक्रार मागे घेण्यास सांगितलं पण आम्ही असं केलं नाही. आता आम्ही कोर्ट केस करू,” मोतीलाल सांगतात.
गेल्या वीस वर्षांत सोनिपत एक औद्योगिक क्षेत्र म्हणून नावारुपाला येत असतानाच इथल्या कारखान्यांमध्ये कामगारांचे मृत्यू होण्याच्या घटना सर्रास घडत आहेत. इथले बहुतेक कामगार उत्तर प्रदेश, बिहार आणि दिल्लीचे आहेत
पोलीस या प्रकरणात फारसं काही करणार नाहीत हे लक्षात आल्यावर मोतीलाल यांनी या घटनेला एक महिना उलटून गेल्यावर कोर्टात केस दाखल करायचं ठरवलं. संदीप दहिया या वकिलाने राईच्या कामगार न्यायालयात ही केस दाखल करण्यासाठी आवश्यक कागद तयार करण्याचे केवळ १०,००० रुपये घेतले. महिन्याला अवघे ३५,००० कमावणाऱ्या कुटुंबासाठी ही रक्कम खूपच जास्त होती. “आमच्यासमोर याशिवाय दुसरा कुठला पर्यायही नव्हता आणि यासाठी न्यायालयाच्या किती चकरा माराव्या लागतील याची कल्पनाही नव्हती,” मोतीलाल सांगतात. सध्या कुटुंबाचं पोट भरण्याची सगळी जबाबदारी त्यांच्या एकट्याच्या खांद्यावर येऊन पडली आहे.
गुलाब आणि मोतीलाल यांना राम ज्या स्कुटीवरून घरापासून १० किमी अंतरावर
असणाऱ्या फॅक्ट्रीत जायचा ती बाईक मिळवून देण्यातही पोलीस फारशी मदत करू शकले नाहीत. कंपनीकडून ती बाईक
मागण्याआधी मोतीलाल ने पोलीस स्टेशनला फोन केला होता. तेव्हा पोलीस अधिकाऱ्याने
प्रत्यक्ष साईटवर असणाऱ्या पर्यवेक्षकाशी या संदर्भात बोलायला सांगितलं. तथापि त्याने मोतीलाल यांची मागणी धुडकावून लावली. “जेव्हा आम्ही बाईक आणायला गेलो तेव्हा त्या पर्यवेक्षकाने 'आम्ही हे प्रकरण मिटवत का नाही? आम्ही त्यांच्याविरुद्ध
केस का फाईल केली' असे प्रश्न विचारायला सुरुवात केली."
मोतीलाल यांना रामचं कामगार ओळखपत्र कुठे होतं हे माहीत
नव्हतं. “या केसच्या प्राथमिक चौकशी अहवालात ( FIR ) रामची नोंद कंत्राटी
कामगार अशी करण्यात आली होती. परंतु त्याचा पगार मुख्य कंपनीकडून व्हायचा. त्याची कामगार
म्हणून नियमित नियुक्ती झाल्याबाबतचं ओळखपत्र
त्याच्याकडे होतं परंतु ते ओळखपत्र आम्हाला
कंपनीने दिले नाही.” तसेच कंपनीने त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आम्हाला अद्यापही पाहायला
दिलं नसल्याचं नमूद केलं.
पर्यवेक्षकाचा असा दावा होता की "हा त्या मुलाचा निष्काळजीपणा
होता. त्याने यापूर्वीही एसीच्या देखभाल-दुरुस्तीचं काम केलं होतं. त्याचे हात
आणि पाय ओले होते आणि त्यामुळेच त्याला इलेक्ट्रिक शॉक बसला.” त्याने यात कंपनीचा काही दोष होता ही बाब मुळीच मान्य केली नाही.
राम कमलच्या शवविच्छेदन अहवालात असं नमूद केलं होतं की त्याच्या “डाव्या हाताच्या करंगळीच्या वरच्या भागावर इलेक्ट्रिक शॉकची जखम होती.” पण त्याचे कुटुंबीय याबाबत साशंक आहेत. कारण राम उजव्या हाताने काम करत असल्यामुळे असं असण्याचं काही कारण नव्हतं. नीलम सांगत होती "इलेक्ट्रिक शॉक नंतर सामान्यतः लोकांच्या अंगावर भाजल्याच्या खुणा असतात. त्यांचा चेहरा काळवंडतो. रामचा चेहरा अगदी नेहमीसारखा दोसत होता."
फॅक्टरी कामगारांच्या मृत्यूच्या घटना सोनिपत मध्ये सर्रास होत होत्या. गेल्या काही दशकांमध्ये सोनिपत औद्योगिक केंद्र म्हणून उदयाला आलं होतं. सन २०११ च्या जनगणनेनुसार अनेक कामगार बिहार, दिल्ली व उत्तर प्रदेश मधून स्थलांतरित होऊन इथे कामाला आले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार जवळपासच्या फॅक्टरी मधून प्रत्येक महिन्याला किमान पाच कामगार जखमी झाल्याच्या केसेस असतात. “जखमी कामगारांच्या केसेस अनेकदा पोलीस स्टेशनला नोंदवल्याही जात नाहीत, त्यात काहीतरी तडजोड होते,”असं पोलिसांचं म्हणणं आहे.
आता
रामची केस कोर्टात दाखल झाली आहे. इथे वाटाघाटीची योग्य संधी आहे असं दहियांचं म्हणणं आहे. “किती तरी लोक
मरतात. त्यांना नंतर कोण विचारतं? ही भारतीय दंड संहितेअंतर्गतच्या
कलम ३०४ ची केस आहे आणि मी त्या लहानगीच्या भविष्यासाठी लढणार आहे,” असा युक्तिवाद ते करतात. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ अंतर्गतच्या केसेस “खून या सदरात न मोडणारा सदोष मनुष्यवध" या कारणाखाली नोंदवल्या जातात.
अनेक आर्थिक आणि भावनिक आव्हानं समोर असतानाही
रामचं कुटुंब मागे हटलेलं नाही. शोभनाथ सांगतात, "ही दुर्घटना त्यांच्या घरी घडली असती तर त्यांनी काय केलं असतं? आम्हीही तेच करतोय,” आणि पुढे असंही म्हणतात "जो गेला आहे तो वापस येणार नाही. कंपनीने या घटनेबाबत पुरेसा मोबदला
नाही दिला तरी चालेल. पण न्याय मिळायला हवा.”