३० एप्रिल २०२३. हिमालयाच्या धौलाधार रांगांमधल्या धरमशाला नगरीत पहिला वहिला प्राइड मोर्चा निघाला.
‘तुमचं, माझं, तिचं, त्याचं आणि त्यांचंही आहे हे घर’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन लोक मुख्य बाजारपेठेतून मॅकलॉइडगंजमधल्या दलाई लामा मंदिराच्या दिशेने पायी निघाले. धरमशालातली ही तिबेटी लोकवस्ती. तिथून पुढे हा मोर्चा कोतवाली बझार या अगदी वर्दळीच्या बाजारपेठेकडे गेला. समलिंगी, उभयलिंगी, इंटरसेक्स, अलैंगिक, पारलिंगी आणि इतरही विविध प्रकारे आपली लैंगिकता व्यक्त करणाऱ्या व्यक्तींना पाठिंबा म्हणून सार्वजनिक ठिकाणी झालेला हा हिमाचल प्रदेशातला पहिलाच कार्यक्रम.
“आम्ही अजीब हा शब्द वापरतोय, पण तोही अगदी अभिमानाने बरं,” या मोर्चाचा आयोजक आणि हिमाचल क्वियर फौंडेशन या संस्थेचा संस्थापक डॉन हसर सांगतो. हाच शब्द का यामागचं कारण सांगताना ३० वर्षीय डॉन म्हणतो, “क्वियरनेस किंवा वेगळं असण्याचा अर्थ सांगताना आपण इंग्रजी शब्द वापरतो. पण हिंदी आणि इतर भाषांचं काय? आम्ही आता स्थानिक भाषांमधल्या गोष्टी आणि गाण्यांचा वापर करून वेगळेपणा, लैंगिकतेतला प्रवाहीपणा किंवा अस्थायीपणा म्हणजे काय ते सांगतोय.”
इथे जमलेले ३०० लोक दिल्ली, चंदिगड, कोलकाता, मुंबईतून आले होते आणि इथल्या छोट्या मोठ्या गावांमधून इथे जमा झाले होते. या मोर्चाची माहिती काहींना अगदी शेवटच्या क्षणी मिळाली होती. शिमल्याचा २० वर्षीय आयुष विद्यापीठात शिकतो. तो प्राइड मोर्चाला आला होता. तो म्हणतो, “इथे याविषयी कुणीही काही बोलत नाही.” शाळेत असताना लघवी करायला जायचं म्हणजे आयुषसाठी मोठा कठीण प्रसंग असायचा. “माझ्या वर्गातली मुलं माझी चेष्टा करायची, माझ्यावर दादागिरीसुद्धा करायची. मला या समुदायाविषयी इंटरनेटवर समजलं तेव्हा मला इतकं सुरक्षित वाटू लागलं. तसं या आधी कधीच वाटलं नव्हतं. मला समजून घेऊ शकतील अशा लोकांचा सहवास मला मिळाला.”
आयुष आता त्याच्या कॉलेजमध्ये या विषयावर खुली चर्चासत्रं आयोजित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला एका प्राध्यापकांचं मार्गदर्शन मिळतंय. लोक येतात. लिंगभाव आणि लैंगिकता हे विषय समजून घेतात आणि नंतर त्यांच्या मनातल्या शंका विचारतात, विचार मांडतात.
शशांक कांग्रा जिल्ह्यातल्या पालमपूर तालुक्याचा रहिवासी असून हिमाचल क्वियर फौंडेशनचा सहसंस्थापक आहे. “मला आपण कायमच विजोड असल्यासारखं वाटायचं. हळूहळू समाजमाध्यमांवर माझ्यासारख्याच अडचणींचा सामना करावा लागणाऱ्या अनेकांची माझी भेट झाली. किती तरी लोकांना लाज, शरम किंवा अपराधी वाटतं. मी देखील कुणासोबत डेटवर गेलो तर गप्पांचा विषय हाच असायचा की आपल्याला किती एकाकी वाटतं,” शशांक सांगतो. या अनुभवांमधूनच शशांकने २०२० साली एक संकटकाळी मदत करणारी हेल्पलाइन सुरू केली.
अगदी कळीच्या मुद्द्याला हात घालत शशांक विचारतो, “ग्रामीण भागातल्या या आगळ्यावेगळ्या लोकांचे आवाज कुठे आहेत?” हिमाचल प्रदेशात ट्रान्सजेण्डर व्यक्तींच्या (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, २०१९ या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने त्या संबंधी शिमला उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शशांकची तयारी सुरू आहे.
डॉन हसरच्या सांगण्यानुसार हिमाचल प्रदेशातल्या १३ वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी येऊन आयोजन समिती स्थापन केली. मूळ कोलकात्याचा असलेल्या डॉनच्या म्हणण्यानुसार “सगळं काही अगदी दोन आठवड्यांत केलं आम्ही.” सुरुवात मॅकलॉइडगंजमध्ये जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून मोर्चासाठी परवानगी काढण्यापासून झाली.
त्यानंतर हिमाचल क्वियर फौंडेशनने समाज माध्यमांवर मोर्चाविषयी लिहायला सुरुवात केली. प्रतिसाद एकदमच चांगला होता. “प्राइड मोर्चासोबत चालायचं तर धाडस हवं. आम्हाला इथे या विषयांवर संवाद सुरू करायचा होता,” प्राइड मोर्चाच्या आयोजकांपैकी एक मनीष थापा सांगतो.
हा मोर्चा जात-वर्गाच्या भिंतींविरोधात तसंच भूमीहीनता, राज्याचं नागरिकत्व नसण्याविरोधातही असल्याचं डॉन यांचं म्हणणं आहे. एका फलकावर लिहिलं होतं, ‘नो क्वियर लिबरेशन विदाउट कास्ट ॲनिहिलेशन. (जातीअंताशिवाय लैंगिक मुक्ती शक्य नाही.) जय भीम!’
रविवारी निघालेल्या या प्राइड मोर्चाने दीड तासात १.२ किमी अंतर पार केलं. धरमशालाच्या सगळ्या बाजारपेठांमधून मोर्चा गेला. मध्ये मध्ये थांबून सहभागींनी नाच केला, लोकांशी संवाद साधला. “इथे ३०० छोटी दुकानं आहेत. आम्हाला मुख्य रस्त्यानेच जायचं होतं कारण तरच आम्ही लोकांना दिसणार होतो,” हाच मार्ग आणि ठिकाण का निवडलं यामागचं कारण मनीष थापा सांगतो.
ट्रान्सजेण्डर व्यक्तींविषयी राष्ट्रीय पोर्टलवरील माहितीनुसार हिमाचल प्रदेशात २०१९ पासून केवळ १७ ट्रान्स ओळखपत्रं वितरित करण्यात आली आहेत.
“हिमाचल प्रदेशातल्या कांग्रा जिल्ह्यात ट्रान्स ओळखपत्र मिळालेली पहिली व्यक्ती म्हणजे मी,” डॉन सांगतो. “ ते मिळवण्यासाठी मला काय दिव्यं पार करावी लागली. पण ज्यांना आपले हक्क कसे मिळवायचे हेच माहित नाही त्यांचं तर काय होत असेल? राज्यस्तरावर कल्याणकारी मंडळाची स्थापना झालेली नाही. निवारागृहं नाहीत, कल्याणकारी योजना नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये जाणीवजागृती देखील का केली जात नाही?”
स्थानिकांनी देखील पहिल्यांदाच प्राइड मोर्चा पाहिला असल्याने त्यांच्यामध्येही पुरेशी जागरुकता नसल्याचं दिसलं. आकाश भारद्वाज यांचं कोतवाली बझारमध्ये एक भाड्याचं दुकान आहे. तिथे ते इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्टेशनरी विकतात. ते हा मोर्चा पाहत होते. “हे मी पहिल्यांदाच पाहतोय आणि त्यांचं नक्की काय चाललंय ते काही मी नक्की सांगू शकणार नाही. पण ते नाचताना पाहणं मस्त वाटत होतं. त्याला काही माझी हरकत नाही,” ते म्हणतात.
नवनीत कोठीवाला गेली ५६ वर्षं धरमशालामध्ये राहतायत. त्यांना नाच वगैरे पाहणं फारच आवडलं. “मी पहिल्यांदाच असं काही तरी पाहतोय. मजा येतीये,” ते म्हणतात.
पण हा मोर्चा कशासाठी काढण्यात आला होता हे कळाल्यानंतर मात्र त्यांचं मत बदललं. “हे काही बरोबर नाहीये. त्यांनी या गोष्टींसाठी लढलंच नाही पाहिजे. कारण त्यांची जी काही मागणी आहे तीच निसर्गाच्या विरोधात आहे. पोरंबाळं कशी व्हावी?” ते म्हणतात.
“मोर्चाला मारिको आली त्यामुळे आम्ही फार खूश होतो,” डॉनचं मत.
तिबेटी भिक्खु असलेले सेरिंग दलाई लामा मंदिराकडे येत असलेला मोर्चा लांबून पाहत होते. “ ते त्यांच्या हक्कांसाठी भांडतायत. किती तरी इतर देशांनी त्यांना हे [लग्नाचे] हक्क देऊ केले आहेत. आता भारताने सुद्धा विचार करायला पाहिजे नाही का?” ते म्हणतात.
२०१८ साली भारतीय दंड विधानाचं कलम ३७७ हटवण्यात आलं तरीही समलिंगी जोडप्यांनी लग्न करण्याचा कायदेशीर हक्क आजही मिळालेला नाही. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातल्या याचिकांची सुनावणी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पूर्ण झाली असून निकाल अजून आलेला नाही.
या कार्यक्रमादरम्यान पोलिस नीलम कपूर गर्दीचं नियनम करतायत. “ आपल्या हक्कांसाठी लढणं ही चांगली गोष्ट आहे. प्रत्येकानेच आपल्या लोकांबद्दल विचार करायला पाहिजे,” त्या म्हणतात. “कुठून तरी सुरुवात व्हायलाच पाहिजे ना. मग इथूनच का नको?”